THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

सजग नागरिक मंच नवी मुंबईच्या वतीने राज्य सरकारला खुले पत्र : प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी पंचवार्षिक कृती आरखडा योजावा ! सरकारे बदलून पाहिली आता गरज व्यवस्था बदलण्याची !!

 

                                                                            दि . ३० जानेवारी २०२५

 

प्रति ,

 ] मा . देवेंद्र जी फडणवीस ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .

] मा . एकनाथ जी शिंदे ,उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

] मा . अजित पवार ,उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

 

सजग नागरिक मंच नवी मुंबईच्या वतीने  विनम्र निवेदन .. 

विषय : ] जिल्हा नियोजन समितीचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर खुला करणे बाबत .

           ] पारदर्शक कारभार , लोकाभिमुख कारभार , भ्रष्टाचार मुक्त कारभार या  घोषणांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पंचवार्षिक कृती आराखडा जाहीर करणेबाबत .

 

सन्माननीय महोदय ,

 

                         पालक मंत्री पदावर आरूढ होण्यासाठी टोकाची स्पर्धा का असते याचा वर्तमानातील मूर्तिमंत पुरावा म्हणजे "बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  प्रत्यक्षात कामे करता तब्बल ७३ कोटींचा झालेला अपहार " .   

                     युरेका ! युरेका !! युरेका !!! अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील या अपहाराबाबत सत्ताधारी पक्षाचे आमदार , विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमे  व्यक्त होत असली तरी " जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सरकारी निधीची सरकारमान्य पद्धतीने लूट " हि गेल्या काही दशकांतील राजकीय -प्रशासकीय कार्यसंस्कृतीच आहे  हे अगदी  जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याला देखील ज्ञात आहे . त्यामुळे बीड जिल्ह्यात निधीचा अपहार हा अपवादात्मक प्रकार आहे असे चित्र निर्माण करणे हा  शुद्ध फसवणुकीचा प्रकार ठरतो

                 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी येणारा विकास निधी वा  अन्य विकास निधी वापराचा अधिकार हा " पालकमंत्री " महोदयांना असल्याने ते जिल्ह्याचे 'मुख्यमंत्री' असतात असे म्हटले जाते . वर्तमानात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काढली जाणाऱ्या कामांचा लेखाजोखा हा जनतेपासून गुप्त राखला जात असल्याने  अत्यंत सहजपणे  त्या निधीचा गैरवापर करणे , प्रत्यक्ष कामे करता अपहार करणे शक्य होते आहे .

                          प्रशासनातील अधिकारी खाजगीत असे स्पष्ट सांगतात की  सदरचा निधीच्या माध्यमातून जी कंत्राटे दिली जातात त्याच्या बदल्यात कंत्राटदाराला  ४० टक्के  रक्कम द्यावीच लागते . ३० टक्के पालकमंत्री आणि संलग्न कार्यकर्ते आणि १० टक्के प्रशासन असा उघड उघड हिशोब असतो . बऱ्याच वेळेला तर  जवळचे कार्यकर्तेच कामे  सुचवितात आणि त्यानुसार 'ज्या कंत्राटदाराला काम द्यायचे सुनिश्चित झालेले आहे तोच फाईल बनवून आणतो , ३० टक्के रक्कम पालक मंत्र्याच्या निर्देशानुसार  हस्तांतरित केली जाते तदनंतर त्यास जिल्हा नियोजन समिती  कडून  १० टक्के घेऊन मान्यता दिली जाते .

  

                   कंत्राटदार देखील स्वतःला नफा प्राप्त व्हावा या नैसर्गिक उदिष्टानेच काम करत असल्याने तो मंजूर रकमेतील २०/३० टक्के रक्कम  बाजूला काढतो . याचा अर्थ  हाच होतो की  प्रत्यक्षात  केवळ ४०/५० टक्केच प्रत्यक्ष कामावर खर्च केली जाते . हा सर्वप्रकारे शासकीय नियमात बसतो . त्यामुळेच की  काय काम करता  रक्कम घेतल्यास त्यास 'भ्रष्टाचार ' असे संबोधले जात असावे अशी करदात्या नागरिकांना शंका आहे .

                     हि गोष्ट अत्यंत विनम्रतेने पण निर्भीड  [ राज्याच्या कानाकोपऱ्यात वाल्मिक कराड वृत्तीचे कार्यकर्ते सर्वच रे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने कार्यरत  आहेत तरी देखील निर्भय पणे या अर्थाने  ]   आणि परखड पणे  नमूद करत आहोत की  "लोकाभिमुख कारभार , पारदर्शक कारभार , भ्रष्टाचार मुक्त कारभार " अशा राणाभीमदेवी थाटात घोषणा केल्या  जात असल्या तरी प्रत्यक्षात १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि २०१४ ला दुसरे स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील  आज पर्यंत भ्रष्टाचार सुखनैवे   नांदत आहे .   अजून थेटपणे सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की  भ्रष्टाचार हा प्रशासनाला आणि  सर्वच पक्षीय लोकप्रतिनिधींना प्राणप्रिय आहे . तसे नसते तर गुप्त कारभार पद्धती हि  "आर्थिक गैरकारभार , भ्रष्टाचार  , आर्थिक घोटाळे , शासनाच्या निधीची लूट " याची प्रमुख जननी आहे हे ज्ञात असून देखील स्वातंत्र्य प्राप्तीपासून 'चालू असणाऱ्या ' गुप्त कारभार पद्धतीला राजकीय अभय , सरकारचे अभय  राहिले नसते . पारदर्शक कारभार पद्धती अस्तित्वात असती तर काम करता बीड जिल्ह्यात झालेला  निधीचा अपहार [ तो अन्य जिल्ह्यात देखील झालाच नसेल असे ग्राह्य धरणे म्हणजे  भ्रष्टाचाराकडे डोळेझाक ठरते ] कधीच शक्य झाला नसता .                   

 

                      जिल्ह्याचा विकास निधी”  हा कार्यकर्त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना सरकारी खर्चाने सांभाळण्यासाठी असतो अशा पद्धतीने कुठे नाहक पद्धतीने पेव्हर ब्लॉक बसव तर कुठे स्मशान भूमीची असलेली भिंत पाडून ती नव्याने बांध अशी पद्धतीने फुटकळ कामे काढली जाताना दिसतात .

           एकीकडे पारदर्शक कारभाराच्या घोषणा तर दुसरीकडे  स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर देखील भ्रष्टाचारास पूरक गुप्त प्रशासकीय कार्यपध्दतीस अभय !  

                 खरे तर कुठे आहे लोकशाही हा प्रश्न आता शासन -प्रशासनाला विचारण्याची वेळ आलेली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही ? कुठे आहे लोकशाही हा  राज्यातील करदात्या नागरिकांचा प्रश्न आहे कारण आजही ग्रामपंचायतीचा कारभार गुप्त पद्धतीने चालू असून तो जनतेसाठी खुला नाही

                   कुठे आहे लोकशाही?”  हा  राज्यातील करदात्या नागरिकांचा प्रश्न आहे कारण  काही हजार करोड रुपयांचे बजेट असणाऱ्या महापालिकांच्या कारभाराचा  लेखाजोखा मतदारांसाठी पब्लिक डोमेनवर उपलब्ध केला जात नाही

                  कुठे आहे लोकशाही?”  हा  राज्यातील करदात्या नागरिकांचा  आणि मतदारांचा प्रश्न आहे  कारण राज्याच्या कोणत्याही विभागाच्या कारभाराचा लेखाजोखा  जनतेसमोर मांडला जात नाही  .

                    कुठे आहे लोकशाही?”  हा  राज्यातील १४ करोड  नागरिकांचा प्रश्न आहे कारण "लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य म्हणजेच लोकसहभागाचे राज्य , लोकांसाठी खुला कारभार असणारे राज्य " या लोकशाहीच्या आत्म्याचाच गळा घोटला जातो आहे

                        या सर्वपार्श्वभूमीवर आपणांस अत्यंत विनम्र आणि कळकळीची विनंती आहे की  ,  आजवर लोकशाहीची जी  पायमल्ली केली जाते आहे ती थांबवा !  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या निधीचा विनियोग त्या त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर खुला करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महोदयांना द्या . त्याच बरोबर राज्य सरकारच्या संकेतस्थळावर कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिला याची माहिती खुली करावी . त्याच बरोबर आर्थिक वर्ष संपल्यानंतर वापरलेल्या निधीचा विनियोग जिल्हानिहाय पद्धतीने राज्याच्या संकेतस्थळावर खुला केला जावा .  

                   प्राप्त तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत परिपूर्ण असे "संवाद अँप " निर्माण करून राज्याचा सर्व कारभार टप्याटप्याने जनतेसाठी खुला करत  स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अभिप्रेत खऱ्या लोकशाहीची स्वप्नपूर्ती  करण्याचा ' पंचवार्षिक कृती आरखडा ' बनवावा त्याची प्रामाणिक अंमलबजावणी केली जावी  .  

              मा . मुख्यमंत्रीजी आपण सातत्याने पारदर्शक कारभाराचे स्वप्न जनतेला दाखवत असतात ,  जिल्हा नियोजन समिती निधीचा लेखाजोखा  पब्लिक डोमेनवर खुला  करत पारदर्शक कारभाराच्या स्वप्नपुर्तीचा "श्री गणेशा " करावा हि आग्रहपूर्वक विनंती

                    वर्तमानात प्रशासकीय भ्रष्टचार किती  उघडउघड केला जातो आहे  आहे याची पडताळणी करावयाची असेल तर मुंबई ,नवी मुंबई ,ठाणे , पुणे  ,नागपूर अशा कोणत्याही महानगरपालिकेतील कामे त्या कामांसाठी केलेला खर्च प्रत्यक्षात खाजगी आस्थापानाकडून त्याच कामावर केला जाणारा खर्च , महापालिका कामाचा दर्जा खाजगी आस्थापनांच्या कामाचा दर्जा याचा तुलनात्मक अभ्यास तटस्थ खाजगी यंत्रणेमार्फत केल्यास आपणांस भ्रष्टचाराची खोली अधिकृतरितीने   निश्चितपणे कळू शकेल

            घोषणा भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या आणि प्रत्यक्षात मात्र भ्रष्टचाराने बरबटलेल्या प्रशासकीय यंत्रणा , बरबटलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे कटू वास्तव आहे . हे नमूद करताना अत्यंत वेदना होतात पण  वास्तव नाकारता येत नाही हे हि तितकेच कटू वास्तव

             जनतेपासून ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवरील कारभार गुप्त ठेवत पारदर्शक कारभाराच्या घोषणा या थेटपणे नागरिकांची , मतदारांची  "शासनमान्य फसवणूकचठरते.

              आज महाराष्ट्रातील वास्तव इतके भयानक आहे की  प्रशासनाच्या , लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर व्यक्त होणे हा प्रकार देखील जोखमीचा झालेला आहे . याचे कारण म्हणजे  जसे सर्व राजकीय  पक्षात 'वाल्मिक कराड वृत्ती ' सक्रिय आहे तशीच ती प्रशासनात देखील कार्यरत आहे . व्यवस्था देखील 'वाल्मिक ' वृत्तीस अत्यंत पोषक आहे . 

          गेल्या साडेसात दशकांच्या काळात मतदारांनी वारंवार सरकारे बदलून पाहिली परंतु खेदाची बाब हि आहे की  परिस्थिती सुधारणापेक्षा ती अधिकाधिक खालावत चालली आहे . त्यामुळे मतदारांचे स्पष्ट 'मत ' झालेले आहे की  आता सरकारे बदलून फायदा नाही गरज आहे ती व्यवस्था परिवर्तनाची . भ्रष्टाचारास पूरक असणारी व्यवस्था बदलण्याची .  त्या दृष्टीने आपल्या सरकारने पाऊले उचलावीत हि अपेक्षा .

 

आपण सदरील निवेदनाची संवेदनशीलपणे नोंद घेत ता अनुषंगाने प्रतिबंधात्मक प्रशासकीय उपाययोजना योजला याची १०० टक्के खात्री आहे .

 

             कळावे

          आपले विनीत

 

सजग नागरिक मंच नवी मुंबई .

                        संपर्क इमेल : alertcitizensforumnm@gmail.com

                                                                                                                                           9869226272

 

 

 

२ टिप्पण्या:

  1. नमस्कार
    मी मुंबई कांदिवलीतून चेतन ठक्कर नागरिकांची तक्रार नाही नागरिकांनी महाराष्ट्र राज्य सरकार & मुंबई महानगर पालिका चा नियम बाह्य पद्धतीने उभारलेले आनधिकृत बांध काम किंवा अन्य कुठलाही समस्या असलाने संबंधित विभागीय अधिकारी & सहायुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त,विधी अधिकारी ये सगळे लोकसेवक नाही नागरिकांचे लोकांचे शेठ आणि कायदेशीर मदद ऐवजी पदाचा दुरुपयोग व भ्रष्टाचार करून मदद मांगणार नागरिकांची तक्रार वर त्याला मानसिक, शारीरिक आर्थिक शोषन करून गदार कामचोर लोग बोलते एक हे तो सेफ हे आपला आभार मोबाईल न 9594828083

    उत्तर द्याहटवा
  2. अपले म्हणणं अगदी बरोबर आहे.कार्यकर्ते भाड्याने घेतली जातात बहुसंख्य ,इमानदार माणसं मतदान करत नाही.प्रत्येक कामाचा लेखाजोखा वेळेवर सार्वजनिक केला पाहिजे ,शिक्षक वर्गात जावून शिकवत नाही,ते उघड झाले पाहिजे शिक्षण व्यवस्था बिघडली तर सर्व बिघडेल

    उत्तर द्याहटवा