THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

" उचलून अधिवेशनाची आर्थिक व्यवहार्यता , उपयोजितेचे सिंहावलोकन निकडीचेच ...

 

" उचलून अधिवेशनाची आर्थिक व्यवहार्यता , उपयोजितेचे सिंहावलोकन निकडीचेच ...

 

      नागपूर करारानुसार  विधानसभेचे  हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा प्रघात आहे . या वर्षी मात्र नागपुरातील अनियंत्रित कोरोना प्रादुर्भाव अधिवेशनाच्या निमित्ताने हजारो अधिकारी ,लोकप्रतिनिधी , प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यासम मंडळी आल्यास नागपुरातील परिस्थिती आणखीनच आटोक्याबाहेर जाईल हि भीती व्यक्त करत दस्तुरखुद्द काही लोकप्रतिनिधीनींच यावर्षी अधिवेशन नागपुरात भरवण्याबाबत नकारघंटा वाजवली आहे .  

    वर्तमान परिस्थती लक्षात घेता लोकप्रतिनिधींचे हे 'मत ' अगदीच रास्त वाटते .  या निमित्ताने एकुणातच "नागपूर येथे घेण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची आर्थिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता , उपयुक्तता तपासण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने हा लेख प्रपंच .

 


 

              मुख्यमंत्री एका ठिकाणावर बसून तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्र चालवू शकत असतील ते रास्त असेल तर एखाद्या विशिष्ट ठिकाणीच अधिवेशन घेण्याचा अट्टाहास कितपत रास्त ठरतो .उरतो प्रश्न  नागपूर कराराचा, त्याचा सन्मानच व्हायला हवा पण तूर्त प्रसंग  आणीबाणीचा आहे .  . तसेही कोविडमुळे निसर्गाने मानवी जीवनातील अनेक करारांना अपवाद केला आहे . त्यामुळे अधिवेशनाच्या कराराबाबत देखील अपवाद करायला हरकत नसावी . तसेही डोळसपणे पाहिले तर गेल्या दशकांत लोकशाहीला अभिप्रेत अनेक करारांना सर्वपक्षीय नेत्यांनी मोडीत काढलेले आहे .

          सर्वात महत्वाचे हे आहे की  , अगदीच अट्टाहास करत नागपूरला अधिवेशन घेतले तर त्याची निष्पत्ती काय असणार आहे हे सर्वच जाणतात . आजवरचा इतिहास लक्षात घेता संभाव्य घटनाक्रम असा असेल . तो म्हणजे .... 

     अर्थातच प्रथेप्रमाणे चहापानावरील बहिष्कारापासून सुरुवात होऊन निषेध , सभागृह बंद पाडणे , हाणामाऱ्या , पळवापळवी , सभात्यागया सम अपेक्षित आणि अनपेक्षीत गोष्टी घडत सर्व सोपस्कार पार पडले जातील . मग प्रश्न पडतो याच साठी का करोडो रुपयांची उधळपट्टी ( अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक अधिकारी ,लोकप्रतिनिधींना आपल्या बाडबिस्ताऱ्यासह मुंबईहून नागपूरला जावे लागत असल्यामुळे अधिक खर्च होतो ) करण्याचा  अट्टाहास ?  या निमित्ताने   उचलून अधिवेशनाचे प्रयोजन काय ?    या दुर्लक्षित मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा प्रपंच .

         मुला-मुलींची पसंती आणि वरपिता-वराकडील मंडळीच्या मागण्यांची पूर्तता झाली किकार्यस्थळाचा विषय ऐरणीवर येतो . वधुपित्याला मनुष्यबळ , आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनॆ त्याच्या निवासस्थानी किंवा गावातील कार्यालयात लग्न करून देणे  सोयीस्कर असते . परंतु कधी कधी ना  वरपित्याच्या गावी ना वधूपित्याच्या गावी अश्या त्रयस्थ  ठिकाणी "उचलून " लग्न करून द्या असा वराकडील मंडळीचा अट्टाहास असतो . बालहट्टा नंतरचा हा सर्वात कठीण हट्ट असतो . या मागे तार्किक कोणते असा प्रतिप्रश्न वर पित्या कडे केल्यास त्याच्या कडे कुठलेही समर्पक उत्तर नसते. तसाच काहीसा प्रकार नागपूर येथे घेण्यात येणाऱ्या  अधिवेशनाबाबत दिसतो .

     अधिवेशन पूर्वकाळात मंत्री , आमदार ,निवास, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री निवास स्थाने, , अधिकारी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था याची डागडुजी , रंगरंगोटी यावर करोडो रुपये खर्च केले जातात . प्रत्यक्ष अधिवेशनासाठी मंत्रालयातून आवश्यक कागदपत्रे , फाईलींची रवानगी करणे , त्याची सुरक्षा , कर्मचारी अधिकारी , आमदार मंत्री यांच्या साठी प्रवास भत्ता , प्रत्यक्ष अधिवेशन काळात होणारा खर्च हा सर्व प्रकार म्हणजे "उचलून " लग्न करुन देण्याच्या अट्टाहासा करिता झालेल्या अतिरिक्त खर्च होय .

     कळीचा मुद्दा हा आहे कि , नागपूरला अधिवेशन घेण्य मागचे प्रमुख तार्किक कारण कोणते याचा खुलासा होणे गरजेचे वाटते . त्या त्या विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी अधिवेशन घेणे हे समर्थन तोकडे वाटते    

                    'अमुक एका विभागाचा विकास होण्यासाठी त्या विभागात अधिवेशन घेणे आवश्यक असते ' हिच मुळात अंधश्रद्धाच ठरते . अधिवेशन ज्या भागात घेतले जाते त्या ठिकाणचा विकास होतो हे समीरकरण ग्राह्य धरले तर मुंबईचे सिंगापूर सोडा , स्वर्ग झाले असते . प्रत्यक्षात मात्र मुंबईच 'स्वर्गवासी ' होण्याची वेळ आलेली आहे .   

        आता काळ बदलला आहे . दळणवळणाची साधने प्रगत झाली आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माहिती - समस्या क्षणार्धात मंत्रालयात प्राप्त होऊ शकतात . आमदार खासदारांची आपल्या मतदार संघात नियमित दौरे होत असतात . जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्ह्याची इंत्यभूत माहिती असते . यामुळे मंत्रालयाचे मुख्य कार्यालय सोडून त्रयस्थ ठिकाणी अधिवेशन आणि ते हि राज्याची आर्थिक स्थिती सक्षम नसताना नाहक करोडो रुपयांचा चुराडा  करून घेणे कालसुसंगत वाटत नाही .

    सर्वात महत्वाचा आणि संशोधनाचा विषय हा आहे की  , " अधिवेशनाची उपलब्धी -उपयोजिता कोणती आणि किती ?" , सार्वजनिक हिताचे कोणते निर्णय या निमित्ताने घेतली जातात . लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांशी , आपल्या उत्तरदायित्वा संदर्भात संवेदनशील असतात का ? वर्तमानात सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा सवांद घडतात का ? अधिवेशनाच्या संपूर्ण कालवधीत प्रत्येक सत्रासाठी कितीजण प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होतात ? किमान किती प्रतिनिधी उपस्थित असतात ? उपस्थित असले तरी मनाने कितीजण तेथे हजार असतात ? याचा उहापोह होणे गरजेचे ठरते .

      अधिवेशनपूर्व  चहापाण्याच्या सोपस्कारावर बहिष्कार टाकण्यापासून विरोधी पक्षाच्याविरोधासाठी विरोधाचा कार्यक्रम सुरु होतो . फक्त बहिष्कारासाठीच चहापाण्याचा वापर केला जात असेल तर त्याचाही  पुनर्विचार व्हायला हवा .

  विधानसभा असो की लोकसभा , गेल्या /10 वर्षातील अधिवेशन बघता तो "टाइमपास " शो होतो आहे . कुठल्यातरी मुद्यावर आप आपल्या भूमिकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ठाम राहतात . त्यामुळे सर्वाधिक काळ हा तहकुबीतच जातो . अधिवेशनाचा खर्च मिनीटाला लाखो करोडो रुपये असतो परंतु याचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही . एकमेकावर कुरघोडी करण्यासाठीचे प्रमुख साधन हा अधिवेशनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला मारक ठरतो आहे       

             दुर्दैवाने लोकशाहीचा चौथा स्तंभ हि बिरुदावली मिरविणारी प्रसारमाध्यमे देखील त्यातच सामील होतात . राजकीय पक्षाच्या आरोप प्रत्यारोप , कुरघोडीवर तासोनतास चर्चा करण्यात , अग्रलेख लिहण्यात धन्यता मानतात . उलटपक्  षी त्यांनी संवेदनशील प्रश्न ऐरणीवर आणायला हवेत .

          

अधिवेशन घेण्याचा ठिकाणाला अवास्तव महत्व देण्यापेक्षा "जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक " करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे . प्रगत महाराष्ट्रातील 'आरोग्य व्यवस्था ' किती प्रगत आहे हे कोरोनाने सर्वांना 'दाखवून ' दिले आहे . करोनाने दिलेल्या धड्यातुन योग्य बोध घेत आता युद्ध पातळीवर 'गाव तेथे ,आरोग्य सुविधा ' हा उपक्रम राबवत आरोग्य सुविधेचा विस्तार व अस्तित्वात असलेल्या सरकारी हॉस्पिटल्स मध्ये आवश्यक साधन सामुग्रीची उपलब्धता निर्माण करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दर्जाचे उच्चीकरण निकडीचे आहे .

   कोसळणाऱ्या इमारती व त्यात नाहक जाणारे मानवी बळी , करोडो रुपयांच्या योजना आखून देखील मुंबईची होणारी 'तुंबई ', विद्यापीठीय परीक्षेतील गोंधळ , कोरोना मुळे बुडीत जाणारे व्यवसाय त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी , अतिरिक्त -अवेळी पावसामुळे होणारे शेतकऱ्यांचे

 वर्षानुवर्षे प्रलंबित तेच ते प्रश्न :

अनधिकृत बांधकामे , पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि दर्जा , सहकारातील लुटीमुळे सहकारी बॅंका - कारखाने यांना  येणारे चीट फंडाचे स्वरूप , सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर जाणारे शिक्षण , विजेची अपुरी उपलब्धता , महिला सुरक्षा , प्रामाणिक अधिकाऱ्याची राजकीय नेत्यांमुळे होणारी ससेहोलपट , वाढती बेरोजगारी , दाभोलकरांच्या  हत्येच्या रूपाने होणारी विचारांची हत्या , भ्रष्टाचारी नेते -अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात होणारी दिरंगाई , ग्रामीण भागत  पिण्याचे पाण्याची टंचाई असे एक हजारो प्रश्न प्रलंबित आहेत .

          शैक्षणिक प्रवेशातील सावळा गोंधळ , शुल्कवाढीचा पालकांवर पडणारा बोजा , सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव , सरकारी आरोग्य व्यवस्था स्वतःच रुग्ण शय्येवर असून तिला अवकळा  आली आहे . खाजगी हॉस्पिटलांच्या अनिर्बंध नफेखोरीमुळे बिल भरताना आप्तस्वकीयांना छातीत धडकी भरते , अनियंत्रित बांधकाम व्यवसाय आणि डोंगरा एवढे जागेचे दर यामुळे नागरिक "निवारा " या घटनादत्त मुलभूत अधिकारापासून वंचित आहे .

       प्रतिवर्षी देखभालीवर लाखो रुपये खर्चूनही तालुकांतर्गत रस्ते , रस्ते म्हणावयाच्या लायकीचे राहिले नाहीत . महानगरपालिका भ्रष्टाचाराची कुरणे बनत आहेत .  खाबुगिरी नियोजनाच्या अभावामुळे अनियमित बांधकामाचे पेव फुटले आहे , शहरे बकाल होत आहेत . शासन दंड भरून अनधिकृत बांधकामे  अधिकृत करण्यात धन्यता मानत  आहेत . क्लस्टर डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली अजून भ्रष्टाचाराची नवीन दालने खोलण्यात सरकार धन्यता मानणार असेल तर भविष्यात बांधकामा विषयीचे सर्व नियम बासनात गुंडाळून ठेवावे लागतील .

 

       अधिवेशना नंतर अधिवेशने येतात आणि जातात . प्रश्न समस्या मात्र त्याच त्या राहतात . महाराष्ट्र स्थापनेच्या 5 दशका नंतरही सर्वांपर्यंत मुलभूत सुविधा पोहचत नसतील तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे सिंहावलोकन होणे अनिवार्य दिसते . ज्या उद्देशाने अधिवेशन  भरवली जातात त्याची परिपूर्ती होते आहे का ? याचाही विचार व्हायला हवा . नवीन अधिवेशांची सुरुवात होण्यापूर्वी गत अधिवेशनातील घोषणा , आश्वासने याची पूर्तता झाली का ? त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली का ? या सर्वांचे मूल्यमापन व्हायला हवे . अधिवेशनाची  उदिष्ट परिपूर्ती सर्वात महत्वाची आहे . त्या कडे दुर्लक्ष करत उचलून अधिवेशनाची परंपरा साभाळण्यातून काय हशील होणार आहे हा जनतेचा खरा प्रश्न आहे .

. …. अन्यथा अधिवेशने केवळ सोपस्कारच ठरतील कालांतराने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल . ती वेळ येऊ नये या साठी वेळीच लोकप्रतिनिधीनी उचलून अधिवेशन घेण्याचा सोपस्कार पाडण्यापेक्षा त्याच्या उदिष्टपुर्तीकडे अधिक लक्ष देणे जास्त संयुक्तिक ठरेल .

                                                            सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,     

                                                                                                                                                                                                            ९८६९२२६२७२/९००४६१६२७२

                                                                                                                                  danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा