सुज्ञ मतदार नागरीक हा लोकशाहीचा पहिला स्तंभ आणि लोकशाहीचा खरा शिल्पकार !!! ( CITIZENS : MAIN PILLAR OF DEMOCRACY )
उद्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे . प्रसारमाध्यमे म्हणतात उद्या उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होईल . खरे तर कुठल्याही निवडणुकीतून केवळ उमेदवारांचे नव्हे तर ज्या ठिकाणी निवडणूक होत आहे त्या ठिकाणच्या संपूर्ण जनतेचे भविष्य हे निवडणुकीतून ठरत असते . म्हणजे एका अर्थाने मतदारांना आपले भविष्य घडवण्याची संधी या निवडणूकातून मिळत असते म्हणून सुज्ञ मतदार हा लोकशाहीचा खरा शिल्पकार व प्रथम आधार स्तंभ आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरत नाही . . "एक वोट भी बडी चीज होती है बाबू ! " हे समजून घेत प्रत्येक मतदाराने अतिशय सुज्ञपणे ,डोळसपणे मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे .
आजराचे अचूक निदान करत सुयोग्य औषधोपचाराद्वारे आजराचे निराकरण करणे हे डॉक्टरांचे प्रमुख कर्तव्य . त्यातही आजार ,रोग चुकीच्या उपचारामुळे अधिक बळावला असेल तर तो रोग बरा करण्यास प्राधान्य देणे हि तर डॉक्टरांची सर्वात मोठी जबाबदारी . वर्तमानात लोकशाहीला जडलेले विविध रोग हे मतदारांच्या 'चुकीच्या मतदाना'मुळे झालेले असल्यामुळे आता त्या रोगाचे निदान करण्याची जबाबदारी हे देखील मतदारांचीच आहे . गेल्या काही दशकात लोकशाहीच्या नावाने जो खेळ चालू आहे तो पाहता मतदारांना आपण केलेल्या चुका सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे . अतिशय सुज्ञपणे , विवेक जागृत ठेवत , कुठल्याही भावनिक भूलथापांना बळी न पडता डोळसपणे मतदान करून आपणच लोकशाहीचे खरे आधारस्तंभ ,शिल्पकार आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे .
. " दिशाभूल " हा संपूर्ण भारत देशाला जडलेला महाभयंकर रोग आहे आणि भारतात "लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांसाठीचे राज्य " हा देखील दिशाभुलीचाच एक भाग म्हणावा लागेल . . सर्वच राजकीय पक्ष , नेते यांनी 'नेसूचे सोडून डोक्याला गुंडाळलेले 'असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाकडून नीतीपुर्ण ,चारित्र्यपूर्ण राजकारणाची अपेक्षा धरणे हेच मुळात मूर्खपणाचे ठरते . त्यामुळे भविष्यात लोकशाहीचा डोलारा सांभाळावयाचा असेल तर वर्तमान लोकशाहीच्या अधःपतनास हातभार लावणाऱ्या मतदारांना देखील आपले डोळे उघडावे लागतील . सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चुकीच्या औषधोपचाराची जबाबदारी घेत त्यामुळे बळावलेला रोग निस्तरण्याची डॉक्टरांची जशी असते तशीच लोकशाहीतील चुकीच्या गोष्टींवर उपचार करणे हि मतदारांची जवाबदारी आहे .
राजकारणात गुंडागणंगांना प्रतिष्ठा लाभण्यासाठी आपण राजकीय पक्ष ,नेत्यांना दोष देत असलो तरी त्यास कारणीभूत महाराष्ट्रातील सुमारे ९ कोटी मतदार देखील आहेत हे विसरता कामा नये . आपण केवळ घराणेशाही -घराणेशाही अशी ओरड करताना घराणेशाहीवर कोण शिक्कामोर्तब करतो हे पहा , आपण मतदारच त्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करतो ना ? चूक आपली आहे तर त्याची दुरुस्ती करणे देखील आपल्याच हातात आहे ,नव्हे ती आपलीच जबाबदारी आहे हे मतदारांनी विसरता कामा नये .
दूषित फळांमुळे आरोग्यास धोका आहे हे समजल्यावर ते फळ देणाऱ्या झाडाला होणारा दूषित पाणी पुरवठा , त्यावर होणारी दूषित फवारणी , त्या झाडाभोवतीचे दूषित हवामान थांबवणे आवश्यक असते . त्याच धर्तीवर आज लोकशाहीची जी विटंबना चालू आहे ती थांबवण्याची ताकद असणारा एकमेव घटक म्हणजे 'मतदार ' .
शासन ,प्रशासन ,न्यायपालिका ,प्रसारमाध्यमे हे जरी लोकशाहीचे स्तंभ समजले जात असले तरी खऱ्या अर्थाने 'लोकशाही व्यवस्थेचा प्रमख स्तंभ असतो तो त्या लोकशाहीतील सुज्ञ मतदार ' आणि दुर्दैवाने आज तोच स्तंभ पोकळ , दिशाहीन , विचारशून्य ,अंध झालेला आहे आणि म्हणूनच मतदारांना गृहीत धरून राजकारण करणाऱ्या नेत्यांचे ,राजकीय पक्षाचे फावते आहे . “ पक्ष पाहून की उमेदवार पाहून मतदान करावे हे मतदारांसमोर आव्हान आहे” हि आपण व्यक्त केलेली चिंता देखील निरर्थक आहे कारण बहुतांश वर्तमान मतदार 'ना पक्ष , ना उमेदवार पाहून मतदान करत आहे', तो मतदान करतो आहे ते जात-पात ,माझा काय फायदा या निकषांच्या आधारे. मग काय होऊ शकते ते आपल्या समोरच आहे .
स्वतःला अनभिक्षित सम्राट समजणाऱ्या सर्वच नेत्यांना निवडणुकीच्या मंडपातून जावेच लागते हे लोकशाहीचे सामर्थ्य आहे आणि ते ओळखत मतदारांनी आपले कर्तव्य बजावले तर आणि तरच भविष्यात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी लोकशाही अभिप्रेत होती तिची स्वप्नपूर्ती होऊ शकते .
मुळात शिक्षित असू देत कीं अडाणी , मतदान कर्तव्याबाबतीत ९९ टक्के भारतीय मतदार अडाणी आहेत ,अंध आहेत . अगदी ग्रामपंचायतीची निवडणुकीचे उदाहरण घ्या . गावची लोकसंख्या २/३ हजार असल्यामुळे प्रत्येकाला प्रत्यकाची खडा नी खडा माहिती असते . तरीही मतदान करताना मतदार नको त्या व्यक्तीस केवळ आपल्या भावकीतील आहे , आपल्या जातीची आहे याच्या आधारे निवडून देतात . अशा अंध मतदारामुळेच आज हि प्रगत महाराष्ट्रातील ३५ हजारांहून अनेक खेडी सरकारने विविध योजनांच्या नावाने लाखो -करोडो रुपये खर्च करून देखील अगदी पिण्याचे पाणी , प्राथामिक आरोग्य केंद्र , चालण्यास योग्य रस्ते , ग्रामपंचायतीची इमारत यासम मूलभूत गोष्टींपासून वंचीत आहेत . निधी येतो ,सरपंच सदस्य कागदोपत्री किंवा थातुरमाथुर कामे दाखवून निधी गिळंकृत करतात . मतदार मात्र वर्षानुवर्षे अशा ग्रामपंचायत सदस्य ,सरपंचांना पाचशे -हजार रुपयांना मत विकून निवडून देत आहेत . तीच गत गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या निवडणुकीत होते आहे . मग केवळ राजकीय पक्ष ,नेत्यांना दोष देण्यात काय अर्थ ?
खरे तर आज भारतात विविध राजकीय पक्ष आहेत हि देखील एक प्रकारची दिशाभूलच आहे कारण प्रत्येक राजकीय पक्षाची आपली ध्येय -धोरणे असतात , विचारधारा असते पण आपल्याकडे तसे काही राहिलेलेच नाही , केवळ सत्ताप्राप्ती हे एकमेव ध्येय व धोरण असल्यासारखे सर्वच राजकीय पक्ष ,नेते वागताना दिसतात . हे मत लिहीत असतानाच व्हाट्सअँप वर एक संदेश आलेला होता , त्याचे टायटल होते 'भाजप -शिवसेनेने तिकीट दिलेल्या उमेदवारांची यादी ' व त्यात नावे होती २१ उमेदवारांची जे मागील निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले होते . या सर्व उमेदवारांना व त्यांना सामावून घेणाऱ्या राजकीय पक्षांना कुठली विचारधारा असू शकते ? वर्तमानात भारतात विविध राजकीय पक्ष असले तरी त्यातील माल एकच आहे तो म्हणजे स्वार्थाने बरबटलेला राजकारणी . वेफरच्या विविध कंपन्या असतात म्हणून पाकिटावर त्या त्या कंपनीचे नाव असते पण आत असतात ते काप केलेले बटाटे , अगदी तसेच काहीतरी राजकीय पक्षांचे झालेले आहे .
सुज्ञ मतदार हाच लोकशाहीचा श्वास आहे , निरोगी आरोग्यासाठी श्वास शुद्ध असणे आवश्यक असते हा निसर्गाचा नियम आहे . गेली ७ दशके लोकशाही समृद्ध करण्यासाठी ,गुंडागणंगांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यासाठी . मतदार डोळस होण्यासाठी कुठलीच उपाययोजना जाणीवपूर्वक केली गेलेली नाही हे कटू वास्तव आहे . लोकशाहीचा डोलारा सांभाळणारा लोकशाहीचा "सुज्ञ मतदार " हा पाचवा स्तंभ अधिकाधिक डोळस ,चाणाक्ष होण्यासाठी आता प्रसारमाध्यमांनी देखील मोहीम राबवणे अत्यंत आवश्यक आहे . अन्यथा मतदारांना गृहीत धरत ,नेसूचे सोडून ,डोक्याला गुंडाळणाऱ्या नेते पक्षांचीच चलती असणार आहे हे निश्चित .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर ,नवी मुंबई . 9869 22 62 72 danisudhir@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा