THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

आगामी अधिवेशनासाठी जनतेचा प्रश्न : मानीव अभिहस्तांतरणाची अटच रद्द करा

  


सदनिका धारकावर अन्याय करणारी  "अव्यवहार्य , अतार्किक "  मानीव अभिहस्तांतरणाची अटच  रद्द करा...

                  

             अधिवेशनात लोकप्रतिनिधीनी जनतेचे प्रश्न उपस्थित करणे अभिप्रेत असते .  आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी नागपूर ऐवजी मुंबईला होण्याची शक्यता आहे . या अधिवेशनात राज्यातील लाखो नागरिकांच्या दृष्टीने अत्यतं जिव्हाळ्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी मांडावा . जनतेचा हा प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच .

           मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया म्हणजे ज्या भूखंडावर इमारत उभी आहे त्या भूखंडाचा ताबा सोसायटीकडे हस्तांतरित  करणे . गेल्या काही दिवसांपासून सरकार " मानीव अभिहस्तांतरण  प्रक्रिया अधिक सुलभ " केली असल्याचे सांगत आहे.  राज्यातील सदनिकाधारकांसाठी ही बाब वरकरणी  सकारात्मक वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकार " तोंडाला  मुसके घालून दिवसभर घासात फिरवत  जनावराला  पोटभर खा "  असे सांगण्यासारखे होय . 




      सरकार मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया वारंवार सोपी केल्याची दवंडी पिटत असले तरी सध्या राज्यात सुमारे ६० हजारांहून अधिक सोसायट्यांनी अभिहस्तांतरण बाकी आहे . याचे प्रमुख कारण म्हणजे  विकासकाची , बिल्डरची असहकाराची  भूमिका . भविष्यातील लाभ लाटण्यासाठी भूखंडावर आपला अधिकार असणे आपल्यासाठी फायद्याचे आहे हे ध्यानात घेत विविध कारणे पुढे करत ९९ टक्के बिल्डर " ज्या  भूखंडावर इमारत उभी आहे त्या भूखंडाचा मालकी हक्क येनकेन प्रकारे आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करतो . 

          या पार्श्वभूमीवर एक गोष्ट सुनिश्चित आहे की , जो पर्यंत बिल्डर /विकसकाचा मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत  टक्का जरी सहभाग आवश्यक असेल , त्यांच्याकडून एक जरी कागद लागत असेल तर भविष्यात देखील सोसायट्यांच्या दृष्टीने मानीव अभिहस्तांतरण  हे केवळ मृगजळच ठरणार हे नक्की .

       खरे तर , मानीव अभिहस्तांतरणाचा नियमच सदनिकाग्राहकांसाठी अन्यायकारक , अतार्किक  अव्यवहार्य आहे . सदनिकाच्या किंमतीत भूखंडाच्या किंमतीचा अंतर्भाव होत असल्यामुळे स्वतंत्रपणे पुन्हा भूखंडावर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी अन्य प्रक्रियेचा सोपस्कार कशासाठी ? हा नियमच बिल्डर धार्जिणा ठरतो  प्रत्येक सरकार हे बिल्डरांची तळी उचलून धरणारे असल्यामुळे असा अव्यवहार्य नियम राज्यातील करोडो ग्राहकांच्या  माथी मारला जातो आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . यामुळे सरकारने सदनिका धारकावर अन्याय करणारा नियमच रद्द करणे जास्त गरजेचे आहेसत्तेवर येणारी बहुतांश सरकारे  ही 'बिल्डर धार्जिणी  ' असल्यामुळे वर्षानुवर्षे ग्राहकांवर हा नियम लादला जात आहे  हा नागरिकांचा आरोप गैर नक्कीच ठरत नाही .

       एक कवडीही खर्च  करता अनधिकृतपणे सरकारी जागेवर झोपडी बांधली तर सरकार त्या जागेवरील 'मालकी हक्क ' मान्य करत त्या झोपडं धारकाला पर्यायी जागा देते पण दुसरीकडे ७०/८० लाख रुपये खर्च करत सदनिका विकत घेणाऱ्यांचा मात्र भूखंडावर हक्क नाहीअसा विसंगत  नियम जगाच्या पाठीवर संभवत नाही .

    मानीव अभिहस्तांतरणासाठी सोसायटी स्थापन करणे आवश्यक आहे .  मुळात ज्या भूखंडावर /  फ्लॅट असतात त्यांना ना सोसायटी स्थापन करता येत ना अपार्टमेंट . मग त्यांनी भूखंडावर हक्क कसा प्रस्थापित करायचा. ?  एवढेच कशाला मुंबई -पुणे शहरात असे बंगले आहेत की  बंगले बांधून २०/३० वर्षे झाली पण अजूनही प्लॉटचे मालक वेगळेच आहेत . आता नावावर प्लॉट करून देण्यासाठी मूळ मालकाचे वारस  अवाजवी मुहमांगी किंमत मागताना दिसतात . 

                एकुणातच डीम्ड कन्व्हेयन्स मधील बिल्डरांची आडकाठी लक्षात घेत सरकार ने 'मानीव अभिहस्तांतरणाची अट ' पूणर्पणे रद्द करून फ्लॅट खरेदी धारकास त्याच्या त्याच्या फ्लॅटच्या कारपेट क्षेत्रफळानुसार भूखंडावर मालकी हक्क प्रदान करण्याचा नियम अस्तित्वात आणावा . फ्लॅट खरेदी धारकांवर वर्षानुवर्षे अन्याय करणारा मानीव अभिहस्तांतरणाचा नियम रद्द करावा . तेच राज्यातील ग्राहक हिताचे ठरू शकते .

     अन्यथा प्रक्रियेत कितीही सुलभता आणण्याचे नाटक केले तरी करोडो सदनिकाधारकांची अवस्था हि  "मुसके बांधून घासाच्या शेतात फिरवत  ,  बाहेर आल्यावर जनावराला  आता भरले का पोट  "  अशीच राहणार हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही .  ज्यावर प्लॉटवर  फ्लॅट खरेदी करतानाच हक्क आहे  ज्याची किंमत मोजली आहे त्यावर हक्क स्थापित करण्यासाठी ग्राहकांना मजबूर करणे कोणत्या ग्राहक कायद्यात मोडते  त्यावर ग्राहक हक्क संघटना आवाज का उठवत नाहीत हा खरा अनुत्तरित प्रश्न आहे .

         खरे तर , इमारतीतील सर्व सदनिका विकल्यानंतर देखील प्लॉटचा हक्क बिल्डरांकडे राहण्याचा नियम म्हणजे चारचाकी विकणाऱ्या कंपन्यांनी चारचाकी संपूर्ण किमंत वसूल केल्यानंतर देखील गाडी तुमची पण गाडीच्या सर्व चाकांवर आमचाच हक्क असेल , तुम्हाला चाकांवर मालकी हक्क हवा असेल तर त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया करावी लागेल , अधिकची किंमत मोजावी लागेल असा नियम कंपनीने करण्यासारखे  होय.

                                                                               सुधीर लक्ष्मीकांत दाणी                               danisudhir@gmail.com ९००४६१६२७२ /९८६९२२६२७२          


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा