THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

प्रशासकीय सुधारणांची उद्दिष्टपूर्ती प्रश्नांकितच? तूर्त तरी प्रशासकीय सुधारणा ठरतायेत केवळ ‘फार्स’! 🤔🏛️

 

❓ प्रशासकीय सुधारणांची उद्दिष्टपूर्ती प्रश्नांकितच? तूर्त तरी प्रशासकीय सुधारणा ठरतायेत केवळ ‘फार्स’! 🚨



🏛️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणा अधिक लोकाभिमुख, नागरिकांसाठी सुलभ, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याच्या हेतूने ‘१०० आणि १५० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा उपक्रम’ राबविला. उद्देश निश्चितच चांगला होता; मात्र या उपक्रमाची प्रत्यक्ष उद्दिष्टपूर्ती झाली का, याचे ठोबळ मानाने उत्तर दुर्दैवाने नकारात्मकच दिसते.

सरकारचे धोरणे, प्रशासकीय त्रुटींवर किंवा दिरंगाईवर कोणी प्रश्न उपस्थित केला, की अलीकडच्या काळात सरकार त्याला थेट ‘बौद्धिक नक्षलवाद’ असे लेबल लावून विषयाला भलतेच वळण देण्याचा प्रयत्न करताना दिसते. 

⚠️ त्या दृष्टीने या लेखाकडे न पाहता, लेखातील नमूद मुद्दे आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबतची पडताळणी करून त्याकडे डोळसपणे पहावे हि अपेक्षा.

💻 आज परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्री, मंत्री, शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे ईमेल आयडी आणि अधिकृत सोशल मीडिया (ट्विटर/एक्स) अकाउंट्स, संकेतस्थळे हे केवळ आणि केवळ त्यांची स्वतःची "प्रसिद्धीची माध्यमे" बनले दिसतात. अगदी मुख्यमंत्र्यांना ट्विट किंवा ईमेल केल्यानंतर नागरिकांना त्याला अपवादानेच प्रतिसाद प्राप्त होत असावा, बहुतांश वेळेला तो कधीच प्रतिसाद प्राप्त होत नाही.

👥 लोकशाहीतील मुख्य घटक असणारे नागरिक (सामान्य नागरिक असा उल्लेख सातत्याने करत नागरिकांची मानसिकता गुलामगिरीची बनवली जाते आहे) जेंव्हा एखादे निवेदन किंवा तक्रार सादर करतात, तेव्हा ते केवळ संबंधित विभागाकडे पाठवणे एवढेच आपले कर्तव्य आहे, असा अत्यंत बेफिकीर दृष्टिकोन ग्रामपंचायत पातळीपासून ते मुख्यमंत्री कार्यालय स्तरावरील प्रशासनाचा दिसून येतो.

💧 डोंगरावरून वाहणारे पाणी जसे वरून वाहत खाली जाते आणि शेवटी जमिनीत मुरून गायब होते... अगदी त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदन, तक्रार किंवा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रशासनातील निम्न स्तरावर अग्रेषित (फॉरवर्ड) केले जातात. पुढे ते अधिकारी अजून खालच्या अधिकाऱ्याकडे फॉरवर्ड करतात आणि तो ईमेल, तक्रार वा निवेदन प्रशासकीय फायलींच्या गर्तेत कायमचे गुप्त होऊन जाते!

📜 एकुणातच प्रशासनातील अधिकारी मंडळी उत्तरदायित्व न स्विकारता केवळ "पोस्टमन" ची भूमिका निभावताना दिसतात आणि म्हणूनच मोठा गाजा वाजा करत केलेल्या प्रशासकीय सुधारणा केवळ आणि केवळ फार्स ठरताना दिसतात. केवळ एक सोपस्कार ठरताना दिसत आहेत.

⚠️ सेवा हक्क हमी कायदा कुपोषितच!

🏛️ Grampanchayat पासून ते थेट मंत्रालयापर्यंतच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी दिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ १० ते २० टक्के प्रकरणांतच विहित कालावधीत कामे पूर्ण केली जातात.

🛑 बाकी ठिकाणी "सरकारी काम, लाच देईपर्यंत थांब" असाच कारभार अजूनही सुरू आहे.

सरकारने त्या त्या कामासाठी विहित केलेला कालावधी हा केवळ कार्यालयांनी आपल्या भिंती रंगवण्यासाठीचे माध्यम झालेले दिसते. मोठमोठाले फलक लावले जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मुळात आपल्या देशात तंत्रज्ञान प्रगत असून देखील त्याला जाणीवपूर्वक अर्थपूर्ण हेतूने प्रशासकीय सुधारणांपासून दूर ठेवले जाते आहे. त्यामुळे सेवा हक्क कायदा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असा झालेला आहे.

💡 राज्य सरकारची प्रामाणिकपणे सेवा हक्क हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याची ईच्छा असेल तर त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे "डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत अर्जाचे ट्रॅकिंग सिस्टीम". यामुळे प्रत्येकाचे उत्तरदायित्व फिक्स होऊ शकेल व जाणीवपूर्वक अडवणुकीचा मार्गाला पायबंद बसू शकतो.

📉 प्रशासकीय सुधारणा योजनेची वासलात लावणारी नवी मुंबईतील दोन प्रातिनिधिक उदाहरणे:

  • १. कौटुंबिक शोकांतिका (दिरंगाई आणि लाचखोरी):

    🏚️ नवी मुंबईतील एका महिलेच्या पतीचे निधन झाले. पतीच्या नावावर कळंबोली येथे फ्लॅट आणि जळगाव येथे जमीन होती. या मालमत्तेला वारस म्हणून नाव लावण्यासाठी ती महिला व तिचा भाऊ सतत पाठपुरावा करत आहेत. ⚖️ न्यायालयीन शुल्कासह आतापर्यंत दीड ते दोन लाखांचा खर्च झालेला आहे, तरीही यश मिळालेले नाही. अगदी न्यायालयातून पत्र घेण्यासाठीही पैसे मोजावे लागतात; नव्हे, तो एक अलिखित नियमच बनला आहे! एनकेन प्रकारे नागरिकांची अडवणूक हा आपला अधिकारच आहे अशी धारणा प्रशासनाची झालेली दिसते.

    🗣️ "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" असे आपले पूर्वज म्हणत असत, आता त्यात आणखी एक भर पडताना दिसते आहे ते म्हणजे "शहाण्याने सरकारी कार्यालयांची पायरी चढू नये!" असे मत त्या महिलेने व्यथा सांगताना व्यक्त केले.

  • २. सजग नागरिक मंचाचा विदारक अनुभव:

    📩 ‘सजग नागरिक मंच, नवी मुंबई’च्या वतीने सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यमंत्री कार्यालय, विविध जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयांना गेल्या काही वर्षांत शेकडो निवेदने पाठवली गेली. परंतु एखादा अपवाद वगळता कोणीही प्रतिसाद देण्याचे कष्ट घेतले नाही.

    👑 ‘यथा राजा तथा प्रजा’ या सूत्राने महापालिका, सिडको सम महामंडळे आणि पोलीस आयुक्तालयांचे प्रमुख व त्यांच्या अखत्यारीतील अधिकारी केवळ ‘पोस्टमनची’ भूमिका पार पाडण्यात धन्यता मानताना दिसतात.

    📍 विशेष बाब हि आहे की अनेक आयुक्त, जिल्हाधिकरी, सचिव तर पत्राची दखलच घेताना दिसत नाही. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सिडको.

📑 एवढेच नव्हे तर अगदी शासनाला अभ्यासू सुधारणा पाठवल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही:

  • 📁 मंचाने सरकारला आरटीआय अधिकाधिक पारदर्शी, उत्तरदायी, आरटीआयचा गैरवापर करणाऱ्याला चाप, वारंवार तीच ती माहिती देण्यात प्रशासनाचा 'बहुमूल्य' समय जाऊ नये यासाठीचा उपाय सुचविणारा ३० पानांचा सुधारणा अहवाल पाठवला होता.

  • 🚌 त्याच बरोबर एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना देखील एसटीला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येण्यासाठी उपाय सुचविणारा अहवाल पाठवला होता.

❌ परंतु या पैकी एकाला हि अगदी एका ओळीचे देखील उत्तर प्राप्त झालेले नाही.

✉️ प्रतिसादच प्राप्त होत नाही या बाबीचा तीव्र निषेध करण्यासाठी सजग नागरिक मंचाने नवी मुंबई महापालिका आयुक्तांना "कोरे निवेदन" पाठवून पाहिले. खेदाची गोष्ट ही की, त्याचाही प्रशासनावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही; पालिका प्रशासनाकडून त्याला देखील अद्याप कुठलाच प्रतिसाद आला नाही.

❓ शासनाचा, शासकीय यंत्रणांचा असा प्रतिसाद नेमका कोणत्या प्रशासकीय सुधारणांच्या परिभाषेत बसतो? याचे उत्तर हवे आहे.

📂 आरटीआयची माती:

शासनाचीच माहिती अधिकार कायद्या प्रति नकारात्मक भूमिका असल्याने अलीकडच्या काळात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा आरटीआयला थेट केराची टोपली दाखवताना दिसते.

⏳ आरटीआयच्या द्वितीय अपील सुनावणीसाठी किमान २ ते ३ वर्षांचा कालावधी लागत असल्याने या कायद्याचा धाक प्रशासनाला उरलेलाच नाही. राज्याच्या ऑनलाइन पोर्टलवरील अर्ज देखील केवळ औपचारिक सोपस्कार ठरत आहेत.

🏛️ मुख्यमंत्र्यांना विनंती:

सरकारने नागरिकांच्या रास्त तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा त्याला ‘बौद्धिक नक्षलवाद’ संबोधण्यापेक्षा राज्यातील:

  • 🏢 कोणत्याही ५ महापालिका

  • 🏛️ ५ जिल्हा परिषदा

  • 🏢 ५ पंचायत समित्या

  • 🏘️ ५ ग्रामपंचायती

  • 🏗️ ५ सिडको सम महामंडळे

  • 💻 राज्याच्या ऑनलाइन आरटीआय पोर्टलवरील

उद्दिष्टपूर्तीची निष्पक्ष पडताळणी, निःपक्ष ऑडिट करून पाहावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. 🥛💧

🛠️ प्रशासकीय यंत्रणा उत्तरदायी व लोकाभिमुख करण्यासाठी ५ आवश्यक उपाययोजना:

प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने कार्यक्षम करायची असेल तर केवळ कागदी उपक्रम राबवून चालणार नाही, तर खालील आवश्यक त्या सुधारणांची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे:

  • 📱 १. सेंट्रलाइज्ड रिअल-टाईम ट्रॅकिंग सिस्टीम:

    मुख्यमंत्री कार्यालय व मंत्रालयाने निवेदने फक्त फॉरवर्ड करून थांबता कामा नये. प्रत्येक निवेदनाला ‘युनिक टोकन नंबर’ देऊन ते नक्की कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर प्रलंबित आहे, हे नागरिकांना पाहता येईल अशी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करावी आणि वेळेत उत्तर न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी.

  • 🔍 २. सेवा हक्क कायद्यांतर्गत थर्ड-पार्टी ऑडिट व दंड:

    राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि महामंडळांमध्ये सेवा हक्क कायद्याची काय स्थिती आहे, याचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट केले जावे. विहित मुदतीत काम न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करून तो पीडित नागरिकाला भरपाई म्हणून दिला जावा.

  • ३. माहिती अधिकार अपिलांसाठी कालबद्ध मर्यादा:

    द्वितीय अपिलांची २-३ वर्षे रखडणारी सुनावणी कमाल ६० दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी माहिती आयुक्तांची पदे भरावीत. माहिती लपवणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक व विभागीय कारवाईचा बडगा उगारला जावा.

  • 👥 ४. प्रत्यक्ष ‘नागरिक दरबार’ व तक्रार निवारण दिन:

    महापालिका आयुक्त, सिडको प्रमुख, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी महिन्यातून किमान एकदा ‘थेट नागरिक दरबार’ भरवून प्रलंबित तक्रारींचा जागीच निपटारा करणे बंधनकारक केले पाहिजे.

  • 💡 ५. नागरिक व संस्थांच्या सूचनांसाठी ‘कक्ष’:

    सजग नागरिक मंचासारख्या अभ्यासू संघटनांनी पाठवलेल्या सुधारणात्मक प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विभागात एक विशेष कक्ष स्थापन केला जावा, जेणेकरून प्रशासनात लोकसहभागातून खऱ्या सुधारणा घडून येतील.

🎯 प्रशासकीय सुधारणांचा मुख्य आत्मा हा ‘नागरिक केंद्रबिंदू’ मानण्यात आहे. जोपर्यंत सामान्य माणसाच्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नाही आणि लाचखोरीला आळा बसत नाही, तोपर्यंत १०० किंवा १५० दिवसांचे उपक्रम हे केवळ कागदी घोडे आणि प्रसिद्धीचा ‘फार्स’च ठरतील! कटू असले तरी प्रशासकीय यंत्रणांचे हेच वास्तव आहे.

✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी

(लेखक सामाजिक विषयाचे अभ्यासक आहेत आणि सजग नागरिक मंच नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत)

📧 लेखक संपर्क: alertcitizensforumnm@gmail.com

❓ प्रश्न करदात्या नागरिकांचा : लोकशाही की लुटशाही? 🤔

"School Theek Karo" अभियान अधिक प्रभावी कसे करावे? सजग नागरिक मंचचे कॉकरोच जनता पार्टीला खुले पत्र

 प्रति, 

अभिजित दिपके, 

संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी.

मित्रा अभिजित, सर्वप्रथम तुझे खास अभिनंदन!

तू म्हणाला होतास, “व्यक्तीला व्यवस्थेपेक्षा मोठे करण्याच्या ज्या चुका केलेल्या आहेत, त्या माझ्या बाबतीत करू नका.” म्हणूनच हे खुले पत्र लिहिताना तुझा उल्लेख ‘सन्माननीय’ किंवा ‘साहेब’ असा न करता ‘मित्रा’ असा केला आहे.

“उच्च शिक्षण घ्यायचे, अमेरिकेसारख्या देशात स्थिरस्थावर व्हायचे आणि स्वतःचे भविष्य उज्ज्वल करायचे”, ही वर्षानुवर्षांची तरुणांची रुळलेली वाट. मात्र ही वाट नाकारून, उच्च शिक्षणानंतरही परदेशात नोकरी न करता भारतात परत येऊन व्यवस्था परिवर्तनाचा खडतर मार्ग स्वीकारल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!


शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित मूलभूत विषय आहेत. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली असली तरी शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत आजवरच्या सरकारांच्या प्रगतीपुस्तकात समाधानकारक गुण मिळाले आहेत, असे म्हणणे कठीण आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शिक्षण हा विषय अनेकदा दुय्यम ठरतो.

म्हणूनच कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या “School Theek Karo” अभियानासाठी तुझे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. आजवर दुर्लक्षित राहिलेला विषय तुम्ही ऐरणीवर आणला आहे.

या अभियानाला अधिक कायदेशीर, प्रभावी आणि व्यापक बनविणारा एक मार्ग तुझ्यासमोर मांडण्यासाठी हे पत्र.

आज तू स्वतः आणि अनेक कार्यकर्ते शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणत आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याला विरोध होत असल्याचे दिसते. बीड जिल्ह्यात शाळांमध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यास प्रतिबंध करणारे आदेश, कार्यकर्त्यांवर गुन्हे आणि काही ठिकाणी मारहाणीचे प्रकारही समोर आले आहेत. अशा परिस्थितीत शाळा तपासण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी सरकारच्या स्वतःच्या कागदपत्रांचीच तपासणी का करू नये?

१. “यु-डायस” प्रणालीचा परिपूर्ण वापर

भारत सरकारच्या UDISE+ (Unified District Information System for Education) प्रणालीमध्ये प्रत्येक शाळेबाबत वर्गखोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, वीज, खेळाचे मैदान, ग्रंथालय, फर्निचर, हात धुण्याची सुविधा, डिजिटल साधने, संगणक, शैक्षणिक साहित्य आदींची विस्तृत माहिती उपलब्ध असते. प्रत्येक कार्यकर्ता, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या गावातील किंवा परिसरातील शाळेची UDISE+ वरील माहिती डाउनलोड करून घ्यावी.

माहिती मिळवण्याची सोपी प्रक्रिया:

  • https://udiseplus.gov.in ला भेट दिल्यावर मुख्यपृष्ठावर 'Know Your School' किंवा 'School Directory' या पर्यायावर क्लिक करावे.

  • जर शाळेचा ११ अंकी यु-डायस कोड उपलब्ध असेल, तर तो प्रविष्ट करून थेट माहिती मिळवता येते; अन्यथा राज्य 'महाराष्ट्र', संबंधित जिल्हा, तालुका आणि शाळेचे नाव निवडून माहिती प्राप्त करता येते.

  • शोध निकाल (Search Result): स्क्रीनवर दिसणाऱ्या शाळेच्या नावावर किंवा 'View Details' पर्यायावर क्लिक करताच शाळेची विद्यार्थी संख्या, उपलब्ध शिक्षक, भौतिक सुविधा आणि इतर तपशील असलेली संपूर्ण माहिती उघडते.

  • शेवटी 'Download Report Card' किंवा 'Print to PDF' वर क्लिक करून ही माहिती मोबाईलवर PDF स्वरूपात डाउनलोड करता येते.

२. आरटीआयच्या (RTI) माध्यमातून अधिकृत पडताळणी

यु-डायस वरील माहितीची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्यासाठी आरटीआयचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या भागातील शिक्षण प्राधिकरणाकडे संबंधित शाळेतील सर्व पायाभूत सुविधांची माहिती मागवायची आणि त्याची तुलना यु-डायस वरील माहितीशी करायची. यातून अनेक शाळांचे व शासकीय यंत्रणांचे पितळ उघडे पडू शकते.

उदा. UDISE+ वर एखाद्या शाळेत “ग्रंथालय उपलब्ध” असल्याचे नमूद असेल, तर शिक्षण विभागाकडे RTI द्वारे विचारता येईल—ग्रंथालय कधी निर्माण झाले? किती निधी मंजूर झाला? किती खर्च झाला? कोणत्या योजनेतून निधी मिळाला? किती पुस्तके खरेदी केली? बिले कुठे आहेत? स्टॉक रजिस्टरमध्ये नोंद आहे का? आणि सद्यस्थितीत ही सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहे का?

अशाच पद्धतीने प्रत्येक पायाभूत सुविधेची कागदोपत्री पडताळणी करता येईल.

३. “कागदावरची सुविधा विरुद्ध प्रत्यक्ष शाळा”

UDISE+ वरील माहिती आणि RTI मधून प्राप्त अधिकृत माहितीची तुलना केल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीशी त्याची पडताळणी करता येईल.

मग प्रश्न निर्माण होईल—UDISE+ मध्ये सुविधा अस्तित्वात असल्याचे कोणी नमूद केले? माहिती कोणी भरली? कोणी प्रमाणित केली? पडताळणी कोणी केली? आणि अधिकृत अभिलेखात चुकीची माहिती आढळल्यास त्याची जबाबदारी कोणाची?

त्यामुळे प्रश्न केवळ “कार्यकर्त्याने शाळेत फोटो काढला की नाही” एवढाच राहत नाही; तो थेट शासकीय अभिलेखांच्या विश्वासार्हतेचा आणि जबाबदारीचा बनतो. जर अधिकृत कागदपत्रांच्या आधारे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदविल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांची प्रशासकीय तसेच लागू कायदे व नियमांनुसार कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करता येईल.

म्हणून “UDISE माहिती + RTI माहिती + Ground Reality” हा “School Theek Karo” अभियानाचा स्वतंत्र उपक्रम बनू शकतो. त्यातून “School Reality Report” तयार करून महाराष्ट्रातील शाळांची वस्तुनिष्ठ स्थिती समोर आणता येईल.

फोटोवर वाद होऊ शकतो; पण सरकारी अभिलेखांवर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे.

पुढील रणनीती आणि एक महत्त्वाचा सल्ला

मित्रा अभिजित, लढाई सरकारच्या व्यवस्थेशी आहे आणि म्हणूनच ती हुशारीने, कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने लढणे आवश्यक आहे. शाळा सार्वजनिक ठिकाणे असल्याने फोटो-व्हिडिओबाबतचे निर्बंध हा स्वतंत्र कायदेशीर विषय आहे; मात्र त्यावर संघर्ष करण्यापेक्षा सरकारी माहिती आणि अभिलेखांची पडताळणी अधिक प्रभावी ठरू शकते.

शिक्षण क्षेत्रातील समस्या मात्र एवढ्यावर संपत नाहीत. खाजगी शाळांची शुल्कवाढ, शिक्षक-प्राध्यापक भरतीतील गैरप्रकार, शिक्षणावरील अपुरा सार्वजनिक खर्च, KG ते PG शुल्कावर कमाल मर्यादा आणि काही संस्थांना मिळणाऱ्या विशेष सवलती अशा अनेक प्रश्नांवर भविष्यात लढा द्यावा लागणार आहे. पण तूर्तास पहिले पाऊल भक्कमपणे पडणे महत्त्वाचे.

शेवटी एक विनंती—“समस्या तुमच्या, निराकरणासाठी प्लॅटफॉर्म आमचा” अशा उपक्रमासाठी कॉकरोच जनता Đảng चा अधिकृत ई-मेल जाहीर करून पालकांना त्यांच्या शैक्षणिक समस्या व गैरकारभाराची माहिती पाठवण्याचे आवाहन करावे. अनेक पालकांना आवाज उठवायचा असतो; मात्र आपल्या पाल्याला भविष्यात त्रास होईल या भीतीने ते गप्प राहतात. विश्वासार्ह व्यासपीठ मिळाले तर ते नक्की पुढे येतील.

शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू केलेल्या या लढ्याला मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन!

कळावे,

शिक्षणाची जाण व चाड असणारा तुझा मित्र,

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

संघटक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई.

ई-मेल : alertcitizensforumnm@gmail.com

भ्रमणध्वनी : 9869226272




शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

लोकशाही व्यवस्थेच्या ‘सखोल शुद्धीकरणा’ची गरज!

 

 राजकीय पक्षांपेक्षा लोकशाही मोठी: लोकशाही व्यवस्थेच्या ‘सखोल शुद्धीकरणा’ची गरज!

⚖️ राजकीय स्वार्थ, पक्षांतर आणि ‘रिसॉर्ट  राजकारणाच्या ' पार्श्वभूमीवर मतदारांच्या विश्वासाचे संरक्षण नक्की कोण करणार?

निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढणारे पुढे एकत्र येत सत्ता स्थापन करतात, तर कधी एकत्र निवडणूक लढवणारे पुढे वेगवेगळे होऊन ज्यांना मतदारांनी निवडणुकीत नाकारले, त्यांच्याशी युती-आघाडी करून सत्तेला गवसणी घालतात.

ही कुठली लोकशाही, न्यायमूर्ती महोदय?

ही थेट मतदारांच्या मताशी प्रतारणा करणारी लोकशाही नव्हे का? तसे असेल, तर अशा लोकशाहीविरोधी गोष्टींना प्रतिबंध घालून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचे रक्षण व संवर्धन करणे ही लोकशाहीच्या सर्व स्तंभांची जबाबदारी नव्हे काय?

🗳️ बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी ‘विशेष सखोल पडताळणी अभियान’ जसे राबवले जाते, त्याच पद्धतीने निकोप, लोकाभिमुख, सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी लोकशाहीला बाधक ठरणाऱ्या गोष्टींच्या निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवणे ही जबाबदारी लोकशाहीच्या सर्वच स्तंभांची नव्हे काय?

⚖️ ते आपले कर्तव्य पार पाडत नसतील, तर राजकीय पक्षांना लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्यास बाध्य करणे हे लोकशाहीच्या प्रमुख स्तंभांपैकी एक असलेल्या न्यायपालिकेचे उत्तरदायित्व नाही का?

‘राजकीय पक्ष नंतर, आधी लोकशाही महत्त्वाची’ याला सर्वोच्च प्राधान्य देणारी व्यवस्था निर्माण करणे हे नक्की कोणाच्या अखत्यारीत येते?

📝 मतदारांच्या मनातील अशा अनेक प्रश्नांना व्यवस्थेसमोर मांडणे हे या लेखाचे मुख्य प्रयोजन आहे.

⚠️ प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही; प्रश्न लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाचा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मात्र सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ विशिष्ट राजकीय पक्षापुरता मर्यादित नाही. स्वार्थासाठी होणारे पक्षांतर, पक्षफोड आणि सत्तेसाठी बदलणाऱ्या राजकीय भूमिका हा देशातील १४० कोटी जनतेच्या विश्वासाचा आणि लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

  भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही मानली जाते. परंतु अलीकडच्या काळात देशात सुरू असलेले राजकीय नाट्य, लोकप्रतिनिधींची कथित खरेदी-विक्री आणि पक्षांतराचे उघड खेळ यामुळे लोकशाहीचा मूळ गाभाच धोक्यात आला आहे.

आपल्या देशात संसदीय आणि पक्षीय लोकशाही व्यवस्था आहे. जेव्हा एक सामान्य मतदार मतदान केंद्रावर जातो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीला मत देत नसतो; तर त्या उमेदवाराचा पक्ष, त्या पक्षाची विचारधारा — वर्तमानात ती सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत लुप्त झालेली दिसते — जाहीरनामा आणि धोरणे यावर विश्वास ठेवून आपले मत नोंदवतो.

दुर्दैवाने, एकदा निवडून आल्यानंतर तोच लोकप्रतिनिधी वैयक्तिक, आर्थिक किंवा राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलतो, दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देतो किंवा मूळ पक्षाविरुद्ध बंड करतो.

💔 हा प्रकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मतदारांच्या विश्वासाचा थेट घात आहे.

🏨 ‘रिसॉर्ट राजकारण’ लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत सदस्यांपासून ते आमदार-खासदारांपर्यंत पक्षांतर, गटबाजी, पक्षफोड आणि लोकप्रतिनिधींची कथित खरेदी-विक्री हे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.

इतकेच नव्हे, तर अनेक पक्षांना स्वतःच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना रिसॉर्टमध्ये ठेवून त्यांचे संरक्षण करावे लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

🚨 ही स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

जर मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी काही दिवसांत किंवा काही महिन्यांत वेगळ्या पक्षात जाणार असतील, तर मतदारांनी मतदान करताना कोणावर आणि कशावर विश्वास ठेवायचा?

🗳️ लोकशाहीचा पाया हा मतदारांच्या विश्वासावर उभा असतो. जर हा विश्वास सतत तुटत राहिला, तर मतदानाविषयी उदासीनता वाढते आणि लोकशाहीची गुणवत्ता खालावते.

म्हणूनच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना भविष्यात अशा प्रकारचे मतदारांच्या विश्वासघाताचे प्रकार थांबवण्यासाठी दीर्घकालीन संस्थात्मक उपाययोजनांचे निर्देश द्यावेत.

 हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही; तो भारतीय लोकशाहीच्या भवितव्याचा आहे.

लोकशाहीचे संरक्षण करणे हे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सरकार आणि नागरिक — या सर्वांचे समान उत्तरदायित्व आहे.


🔄 सकाळी एक पक्ष, दुपारी दुसरा आणि संध्याकाळी तिसरा!

सध्या ग्रामपंचायत सदस्यांपासून ते आमदार आणि खासदारांपर्यंत लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री होणे, त्यांना रिसॉर्टमध्ये डांबून ठेवणे आणि सत्तेसाठी राजकीय निष्ठा बदलणे हे रोजचेच झाले आहे.

🌅 सकाळी एका पक्षात,
☀️ दुपारी दुसऱ्या पक्षात,
🌆 आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात दिसणारे लोकप्रतिनिधी मतदारांची उघड थट्टा करत आहेत.

यामुळे ❓ “आपल्या एका मताला काही अर्थ उरला आहे का?” असा प्रश्न सामान्य नागरिकाच्या मनात निर्माण होत असून, अनेक नागरिक मतदानापासून दूर जात आहेत.

🚨 ही स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि मारक आहे.

या पार्श्वभूमीवर माननीय न्यायालयाने केवळ एका प्रकरणाचा तात्पुरता निर्णय न देता लोकशाहीच्या दीर्घकालीन हिताचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

⚖️ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ म्हणून न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर व स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत.


⚠️ राजकीय स्वार्थ आणि लाचार लोकशाही

🔍 लोकशाहीच्या ‘सखोल पडताळणी’चे व ‘शुद्धीकरणा’चे उत्तरदायित्व नक्की कोणाचे?

प्रशासकीय, राजकीय, संसदीय आणि न्यायालयीन व्यवस्थांच्या सुधारणांचा प्रश्न समोर आला की प्रत्येक जण स्वतःला विशिष्ट चौकटीत फ्रेम करत आपल्या लक्ष्मणरेषा स्पष्ट करतो आणि “Throwing the ball in others’ court” असा खेळ करतो.

खेदाची गोष्ट ही आहे की लाभासाठी मात्र सर्वच चौकटी गळून पडताना दिसतात.

🚫 “मालक सगळेच जबाबदार, मात्र कोणीच नाही” अशी उत्तरदायित्वशून्य व्यवस्था हे वर्तमानातील लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण झालेले आहे.

उघड्या डोळ्यांनी सर्व काही दिसत असूनदेखील कोणालाच धाक उरलेला नाही.

🛣️ याचे साधे उदाहरण म्हणजे — भारतातील रस्ते आणि पूल!

हजारो कोटी रुपये खर्च करूनदेखील खड्डेमुक्त, दर्जेदार रस्त्यांची स्वप्नपूर्ती संभवत नाही; कारण व्यवस्थेलाच खड्डे पडलेले आहेत. भगदाडे पडलेली आहेत.

🌉 ब्रिटिशांनी बांधलेले पूल १५० वर्षे टिकतात, पण भारतीयांनी बांधलेले पूल मात्र अर्धशतकी वाटचाल करण्याच्या पात्रतेचे नसतात.

पूर्वीपेक्षा आता आधुनिक तंत्रज्ञान आहे, हुशार इंजिनिअर्स आहेत, दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. तरीदेखील रस्त्यांवरील खड्डे हद्दपार होत नाहीत.

कारण एकच — प्रामाणिक कंत्राटदार, प्रामाणिक अभियंते आणि प्रामाणिक सरकारांचा अभाव.

🚧 कुंपणच शेत खात असल्याने आजवर एकाही अभियंत्याला दर्जाहीन रस्त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ सोडा, साधी त्याच्या नोकरीवर गदा येऊ शकत नाही.

तीच गत कंत्राटदारांची, नेत्यांची.

दोषी असूनही सर्वच निर्धास्त आहेत.

ही कुठली लोकशाही व्यवस्था?

लोकशाहीच्या सखोल पडताळणीचे व शुद्धीकरणाचे उत्तरदायित्व नक्की कोणाचे?

📢 हा प्रश्न आहे —

“पब्लिक पूछती है, लेकिन यहाँ जवाब देने वाला कोई नहीं है!”


📢 पब्लिक यह चाहती है!

  लोकशाहीच्या रक्षणासाठी आवश्यक दीर्घकालीन उपाययोजना

आज देशातील सर्वसामान्य नागरिकाची हीच भावना आहे की, निवडणुकीतील ‘बाजाराला’ आणि ‘रिसॉर्ट राजकारणाला’ कायमचा पूर्णविराम मिळाला पाहिजे.

⚖️ सर्वोच्च न्यायालयाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला कायदेशीर सुधारणांचे निर्देश दिले, तरच मतदारांच्या विश्वासाचे रक्षण होईल आणि भारतीय लोकशाहीचा आत्मा जिवंत राहील.

1️⃣ पूर्ण पक्षांतर बंदी व अनिवार्य राजीनामा

ग्रामपंचायत ते संसद या सर्व स्तरांवर निवडून आलेल्या उमेदवाराने ज्या पक्षाच्या चिन्हावर किंवा ज्या भूमिकेवर निवडणूक लढवली आहे, ती भूमिका बदलण्यास पूर्णतः बंदी असावी.

2️⃣ पुन्हा जनादेश घेणे अनिवार्य

जर कोणत्याही लोकप्रतिनिधीला आपली भूमिका किंवा पक्ष बदलायचा असेल, तर त्याला सर्वप्रथम आपल्या पदाचा राजीनामा देणे अनिवार्य केले पाहिजे.

त्यानंतरच नव्या पक्षातून किंवा नव्या भूमिकेतून पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवण्याची परवानगी असावी.

3️⃣ कठोर कायदेशीर चौकट

⚖️ राजकीय स्वार्थासाठी होणाऱ्या पक्षफोडीला पायबंद घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक नियमावली तयार करावी.

4️⃣ नियंत्रण शक्य नसेल तर मग थेट ‘लिलाव पद्धती’ सुरू करा!

💰 “जो आपल्या भ्रष्टाचाराने, गैरमार्गाने लुटलेल्या संपत्तीला अभय देईल तोच आपला नेता आणि तोच आपला पक्ष” अशा प्रकारची [अ]विचारधारा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्ते-नेत्यांत रुजत असल्याने मतदारांच्या मताला पायदळी तुडवून सर्रासपणे लोकशाहीचा बाजार मांडला जात आहे.

त्याला प्रतिबंध घालणे निवडणूक आयोग, न्यायालयाला शक्य नसेल तर निवडणुका बंद करून थेट लिलाव पद्धती सुरू करा.

🏛️ विधानसभेच्या २८८ जागांसाठी लिलाव पद्धतीने आमदार निवडा.

🏛️ लोकसभेच्या ५४८ जागांसाठी लिलाव पद्धतीने खासदार निवडा.

जो पक्ष बहुमतासाठी आवश्यक आमदार-खासदार खरेदी करू शकेल, त्याला सरकार स्थापण्याची संधी द्या.

हीच पद्धत ग्रामपंचायत ते महानगरपालिका निवडणुकांसाठी अंमलात आणावी.

यामुळे मतदारांच्या मताच्या मूलभूत अधिकाराची अवमान प्रक्रिया तरी थांबू शकेल.


  राजकीय पक्षांपेक्षा लोकशाही मोठी!

लोकशाही ही कोणत्याही राजकीय पक्षाची मालमत्ता नाही. ती मतदारांची, नागरिकांची आणि संविधानाची व्यवस्था आहे.

पक्ष बदलणे, सत्ता बदलणे किंवा आघाड्या बदलणे हा राजकीय प्रक्रियेचा भाग असू शकतो; परंतु त्या प्रक्रियेत मतदारांच्या जनादेशाचा अर्थच बदलून टाकला जात असेल, तर त्या व्यवस्थेकडे केवळ राजकीय गणित म्हणून पाहता येणार नाही.

आज गरज आहे ती एका पक्षाच्या विजयाची किंवा पराभवाची नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेच्या सखोल आत्मपरीक्षणाची.

🔍 लोकशाहीला भ्रष्ट करणाऱ्या,
🗳️ मतदारांचा विश्वास कमी करणाऱ्या,
⚖️ सार्वजनिक संस्थांची उत्तरदायित्वाची भावना कमकुवत करणाऱ्या

प्रत्येक प्रवृत्तीविरुद्ध संस्थात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कारण शेवटी प्रश्न एकच आहे —

❓ “राजकीय पक्ष मोठे की लोकशाही?”

🇮🇳 उत्तर स्पष्ट असले पाहिजे —

राजकीय पक्षांपेक्षा लोकशाही मोठी!


✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी
लेखक, सजग नागरिक मंच, नवी मुंबईचे मुख्य संघटक

📞 संपर्क: ९८६९२२६२७२
📧 ई-मेल: alertcitizensforumnm@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

विद्यार्थी पालकांचा सरकारला थेट प्रश्न : : परीक्षा वेळेत, निकाल वेळेत… मग प्रवेश प्रक्रिया जलद का नाही?

विद्यार्थी पालकांचा सरकारला थेट प्रश्न : 

🚨 परीक्षा वेळेत, निकाल वेळेत… मग प्रवेश प्रक्रिया जलद का नाही?


"शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची आणि क्रांतीची गरज! सरकारी अनास्थेमुळे अभियांत्रिकी आणि ११ वीची प्रवेश प्रक्रिया व्हेंटिलेटरवर!"

 

'डिजिटल महाराष्ट्र' आणि 'डिजिटल इंडिया'च्या मोठ्या घोषणा आपण दररोज ऐकतो. परंतु, या घोषणांची खरी परीक्षा जेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होते, तेव्हा हा सगळा 'डिजिटल देखावा' पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून पडताना दिसतो.

यंदा महाराष्ट्र शासनाने कौतुकास्पद पाऊल उचलत १२ वीची परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये घेऊन २ मे २०२६ रोजी नेहमीपेक्षा आधी निकाल जाहीर केला. वाटले होते की यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल; पण "निकाल वेळेत लागला, मग प्रवेश प्रक्रिया वेळेत का नाही?" या एकाच प्रश्नाने आज राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची झोप उडवली आहे.

नियोजनाचा पूर्ण बोजवारा आणि मानसिक छळ

निकाल लागून ३ महिने उलटून गेले, तरी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील 'ऑप्शन फॉर्म' (महाविद्यालय पसंतीक्रम) भरण्याची प्रक्रिया जुलैच्या शेवटी (२८ जुलै) सुरू झाली. पुढे कॅप राऊंड्स, सीट वाटप आणि कॉलेज रिपोर्टिंग करता करता सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडणार!

पालकांची व्यथा:

"सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सीईटी सेलच्या वेबसाइटवर 'रिफ्रेश'चे बटण दाबून दाबून बोटे सुजली आहेत. दर दोन दिवसांनी नवीन सुधारित वेळापत्रक येते... उद्या काय होणार, याची काहीच शाश्वती नाही!"

हाच सावळागोधळ ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेतही पाहायला मिळाला. ४-५ नियमित राऊंड, त्यानंतर विशेष राऊंड, आणि तरीही हजारो मुले प्रवेशापासून वंचित!

💻 'डिजिटल इंडिया' की 'सर्व्हर क्रॅश इंडिया'?

कोट्यवधी रुपयांचा निधी आयटी पायाभूत सुविधांवर खर्च करूनही:

  • अचानक पोर्टल ठप्प होणे

  • तासभर भरलेला पसंतीक्रम गायब होणे

  • पैसे खात्यातून वळते होऊनही पावती न मिळणे

नागपूरपासून मुंबईपर्यंत लाखो विद्यार्थी एकाच वेळी लॉगिन करतात, हे सीईटी सेलला माहीत नसते का? 'लोड बॅलन्सिंग', 'क्लाऊड ऑटो-स्केलिंग' आणि 'हाय अव्हेलेबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर' या गोष्टी फक्त कागदावरच राहणार आहेत का? कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रणाली दरवर्षी क्रॅश का होते?

📉 शैक्षणिक गुणवत्तेचा बळी

सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकीचे कॉलेज सुरू झाले, तर पहिल्या सेमिस्टरसाठी मिळणारे दिवस किती? ज्या विद्यार्थ्यांना चार महिन्यांत शिकून प्रात्यक्षिके, प्रोजेक्ट्स आणि सेमिस्टर परीक्षा द्यायची आहे, त्यांना अवघ्या ५०-६० दिवसांत हा सगळा अभ्यासक्रम आटपावा लागणार.

परिणामी:

  • गुणवत्तेशी तडजोड

  • विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरीक्त ताण

  • शिक्षकांची उरकाउरकी

❓ शासनाला १० रोखठोक प्रश्न!

  1. फेब्रुवारीत परीक्षा घेऊनही प्रवेश प्रक्रियेला ३ ते ४ महिने विलंब का झाला?

  2. मागील ५ वर्षांत सीईटी सेल आणि ११ वी पोर्टलवर एकूण किती खर्च झाला?

  3. सर्व्हरची क्षमता कमी का पडते आणि वारंवार क्रॅश होण्यास जबाबदार कोण?

  4. वेळापत्रक वारंवार बदलून पालकांना अनिश्चिततेत का ठेवले जाते?

  5. कमी झालेल्या अध्यापन दिवसांमुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई कशी करणार?

  6. सीईटी सेलचे स्वतंत्र तांत्रिक (IT) आणि प्रशासकीय ऑडिट होणार का?

  7. भविष्यात 'वैधानिक प्रवेश कालमर्यादा' (Statutory Admission Timeline) लागू केली जाईल का?

  8. क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात कधी होणार?

  9. या साऱ्या गोंधळावर शासन 'श्वेतपत्रिका' (White Paper) प्रसिद्ध करणार का?

  10. जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई कधी होणार?

💡 तातडीचा कृती आराखडा (Action Plan)

                       【शिक्षण व्यवस्थेसाठी तातडीच्या सुधारणा】
                                        │
     ┌──────────────────────────────────┼──────────────────────────────────┐
     ▼                                  ▼                                  ▼
【६ महिने आधी वेळापत्रक】       【IT स्ट्रेस टेस्ट & ऑडिट】         【उत्तरदायित्व व कारवाई】
प्रवेश प्रक्रियेचे कॅलेंडर         प्रणालीची पूर्ण तांत्रिक           विलंब करणाऱ्या कंत्राटदार व
आधीच जाहीर व्हावे.              चाचणी केली जावी.                 अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
  • 'स्टुडंट फर्स्ट' पॉलिसी: धोरण ठरवताना प्रशासकीय सोयीपेक्षा विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानणारा शासन निर्णय (GR) तातडीने काढण्यात यावा.

  • विशेष शैक्षणिक ॲडजस्टमेंट: विलंबाची भरपाई करण्यासाठी विद्यापीठांनी विशेष अध्यापन तासिका जाहीर कराव्यात.

  • KG to PG शिक्षण सुधारणा आयोग: केंद्र सरकारने 'NTS' संदर्भात दाखवलेली तत्परता महाराष्ट्र सरकारने 'केजी टू पीजी शिक्षण सुधारणा आयोग' स्थापन करून दाखवावी.

 

महाराष्ट्र सरकारने पुढील ३ महिन्यांत प्रवेश प्रक्रियेसह शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर ठोस धोरण आणि उत्तरदायित्वांची रचना जाहीर करावी. अन्यथा, आज शांत असलेला पालक आणि विद्यार्थी उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षण ही कोणाची मेहेरबानी नाही, तो विद्यार्थ्यांचा घटनात्मक हक्क आहे!

✍️ लेख-संकलन:

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

📱 संपर्क: ९८६९२२६२७२

📧 ईमेल: danisudhir@gmail.com

👥 अध्यक्ष, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

🌐 ब्लॉग: Mission Education (danisudhir.blogspot.com)