मराठी भाषा जतन
-संवर्धन : वर्तुळावरील प्रवास
मराठी भाषा
दिनाच्या निमित्ताने सोशल मेडियावरील मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करणाऱ्या
संदेशांचा महापूर , वर्तमानपत्रातील लेख , नेते -अभिनेते यांचे मराठीच्या
अस्तित्वासाठी ढळणारे आश्रू , माध्यमावरील चर्चासत्रे व तत्सम सोपस्कार मराठीवरील दांभिकप्रेमाची अनुभूती वाटते . कारण
" पुढे काय ?"
हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो .
प्रासंगीक कृतीशून्य चर्चा हा वर्तमान
समाजाचा स्थायीभाव झाला आहे . याची आठवण आणि खातरजमा करणारी अनंत उदाहरणे दिसतात .
या पैकीच एक म्हणजे २७ फेब्रुवारी , "मायबोली
मराठी भाषा दिन" .ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा
. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन पाळला जातो तर १९९९
पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा 'जागतिक मातृभाषा दिन' साजरा करण्याचे
आवाहन केला आहे .
थोडक्यात हा आठवडा मातृभाषा आठवडा . या निमित्ताने 'मराठी भाषा जतन -संवर्धन ' यावर चर्चासत्रे , लेख , अस्मितेची (?) आठवण करून देणारे
भाषणे , मायबोलीचा कनवाळा व्यक्त करणारी सोशल
मेडियावरील रेलचेल याला भरती येताना दिसली . सगळे कसे रितीरिवाजाप्रमाणेच . पण पुढे काय ? हा प्रश्न मात्र अनेकांना निरुत्तर करणारा तर अनेकांना अस्वस्थ करणारा.
कारण प्रत्येकाला याचे उत्तर ठाऊक असते … पुढे
पुन्हा अशीच मातृभाषा दिनाच्या निमित्ताने … येरे माझ्या मागल्या . बरे , महत्वाचे हे की
यास अपवाद कोणाचाच नाही . ना व्यक्ती पातळीवर , ना समाज पातळीवर , ना राजकीय
पातळीवर . शासन -प्रशासन देखील यास अपवाद नाहीत . आणि म्हणूनच मराठी भाषा जतन
-संवर्धनाचा प्रश्न अधिकच गंभीर होतो आहे . आणखी महत्वाचे हे की समाजातील काही घटक
हा प्रश्नच मान्य करायला तयार नाहीत . किती सोपे . प्रश्न-समस्याच मान्य
नसल्यामुळे , ती सोडविण्याचा प्रश्नच उरत
नाही .
मुळातच कुठलीही समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भावनिक चष्मा
उतरवून समस्येचे विश्लेषण करून त्यावर कालानुरूप व्यावहारिक पातळीवर उपाययोजना
करणे म्हणजेच “ Analysis
to proper Action”. परंतु दुर्दैवाने मराठीच्या बाबतीत
अगदी उलटे होताना दिसत आहे . केवळ भावनिक मुद्दा करत व्यवहारशून्य दृष्टिकोनामुळे
"मराठी भाषा जतन व संवर्धन " हा केवळ वर्तुळावरील प्रवास ठरत आहे …
केवळ चर्चा आणि चर्चा आणि प्रत्यक्ष कृती मात्र मराठीच्या
अस्तीवास मारकच . बरे गंमत हि आहे की ,
मराठी मातृभाषा असणारे (यात समाज -शासन
-प्रशासन -अस्मिताचा झेंडा वाहणारे राज्यकर्ते सर्वच आले ) आणि ज्यांच्या
दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे ते काठावर उभे राहत मराठीच्या
अस्तित्वाचा प्रश्न सुटण्याची दिवास्वप्ने पाहत आहेत .
केवळ भाकरीची भाषा टिकते : ज्या भाषेमुळे
व्यक्तीच्या आयुष्यभराच्या ' भाकरीची ' सोय होते
त्या भाषेकडे व्यक्तीचा -समाजाची ओढ असणार हे स्वाभाविक आहे . याच नियमाने ज्यांना
मराठी भाषेच्या अस्तीवाची खऱ्या अर्थाने काळजी आहे त्यांनी मराठी ' भाकरीची
भाषा ' कशी होईल या कडे
लक्ष देणे अनिवार्य ठरते . होय ! हे कोणीही नाकारू शकत नाही की , मराठी
भाषेच्या अध:पतनास सर्वात मोठा गैरसमज कारणीभूत ठरत आहे तो म्हणजे ‘ केवळ
इंग्रजीच जगाची ज्ञानभाषा आहे’ . परंतु हा गैरसमज निर्माण होण्यात काळानुसार
मराठीभाषा अनेक व्यावहारीक पातळीवर समृद्ध केली गेली नाही हे ही नाकारता येणार
नाही . अगदी २ वर्षापर्यंत मोबाईलवर मराठी भाषेची सुविधा नव्हती. यासम अनेक कारणे
इंग्रजी भाषेच्या मराठीवरील कुरघोडीस कारणीभूत आहे .
मराठीच्या अस्तिवावर सर्वाधिक कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे
मराठी मातृभाषा असणाऱ्या वर्गाचा 'शिक्षणाच्या माध्यमा' विषयी झालेला गोड गैरसमज . आज स्पर्धेत
टिकायचे असेल तर इंग्रजीचे ज्ञान असणे
अत्यंत -अत्यंत आवश्यक आहे आणि चांगली इंग्रजी हि तेंव्हाच येऊ शकते जेंव्हा
इतिहास -भुगोलासहीत सर्व विषयाचे शिक्षण हे इंग्रजीत(च ) होणे अनिवार्य अशी धारणा
सर्व समाजाची झाली आहे . इंग्रजीच्या ज्ञानप्राप्तीसाठी सरसकट शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीची
अनिवार्यता स्वीकारण्यात झालेली गल्लत हा मराठीच्या अस्तीवावरील यक्षप्रश्न आहे .
अर्थातच मराठी माध्यमाच्या शाळा तो विश्वास समाजास देण्यात कमी पडल्या
हेही नाकारता येणार नाही . इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी भाषेतून संपूर्ण शिक्षण घेण्याची खरेच आवश्यकता आहे का? किंवा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यावरच इंग्रजी येते असे
आहे का? आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते येतेच असे
आहे का? याचा सारासार विचार व्हायला हवा दुर्दैवाने साधनालाच साध्य मानण्याच्या
गैरसमजामुळे 'इंग्रजी माध्यमाचे अंधानुकरण' होताना दिसते आहे.
दृष्टिक्षेपातील उपाय :
- ज्याचे बाजारमूल्य अधिक तेच टिकते हा बाजाराचा सार्वत्रीक नियम . मराठीभाषेचे बाजारमूल्य अधिकाधिक वृद्धिंगत करणे हाच मराठी भाषा जतन व संवर्धनावरील सर्वोत्तम मार्ग असू शकतो .करोडो रुपयांचे भाषा भवन किंवा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे यासम उपाय त्यावरील मलमपट्टी ठरतात . मराठी भाषेची निकड निर्माण करणे गरजेचे आहे , भाषेची सक्ती केवळ मगरीचे अश्रू ठरतात .
- · मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल हे सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे . मराठी माध्यमातून शिकूनही चांगले इंग्रजी येऊ शकते हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे .
- · इंग्रजी शिकणे अणि इंग्रजी माध्यमातून शिकणे याविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. या साठी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांचे रिपोर्टकार्ड उपलब्ध असायला हवेत .
- · संगणकाशी जोडणारे तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर्स) मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवीत. या व्यवहारीक वास्तवतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे
- · व्यावहारिक उपयोजिता हा कुठल्याही भाषेवरील प्रेमाचा प्रमुख निकष असतो. यामुळे मराठीची उपयोजिता वाढवण्यासाठी तातडीचे उपाय योजावेत.
- · मराठी माध्यमाच्या सर्व संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्यांोना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकणे बंधनकारक करावे. स्वत:ला झळ बसल्यास आपसूकच दर्जा सुधारेल.
- · मराठीला भाकरीची भाषा बनविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी नोकरीसाठी मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य असावे.
- · प्रशासन , तालुकापातळीवरील न्यायालयाचे कामकाज मराठीतून(च ) असणे अनिवार्य करावे .
- · सर्वात महत्वाचे आणि सोपे म्हणजे मराठी माणसांनी 'मराठी भाषेविषयी ' फुकाची अस्मिता न बाळगता ती प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावी . उदा . मार्केटिंगसाठी आलेला मोबाईलवरील कॉलला केवळ आणि केवळ मराठीतूनच उत्तर द्यावे . असे केल्यास आपसूकच मराठी भाषिकांनाही नोकरीत प्राधान्य मिळेल .
· एकमताचा अभाव हा
मराठी माणसांना लागलेला शाप . आजही मराठीसाठी सर्व ठिकाणी चालेल असा सर्व मान्य
फॉट मान्य नाही . प्रत्येक वृत्तपत्राचा फॉट वेगळा आहे .
अर्थातच उपाय अनेक आहेत , मुळात दुष्काळ आहे तो इच्छाशक्तीचा. मराठी
भाषेच्या अस्तीवाच्या प्रश्नाचे आजवर केवळ भांडवल म्हणूनच उपयोग केला जात
असल्यामुळे प्रतिवर्षी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठीच्या 'दीन' परिस्थीतिचे दळण
दळले जाते. वर्षानुवर्षे वर्तुळावरील प्रवासा सारखे पुन्हा कालांतराने आरंभ
बिंदुवरच .तीच कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवत समस्येचे निराकरण करत असल्याचा
आभास निर्माण केला जातो . मराठी भाषेची , मराठी माणसाकडूनच फसवणूक करण्याचा हा प्रकार
आता तरी थांबेन या आशेसह सर्व मराठी बांधवाना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक
शुभेच्छा .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
, बेलापूर , नवी मुंबई .
9869226272
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा