THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ९ मार्च, २०२४

 

महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त भारताची "मोदी गॅरंटी " देणाऱ्या सन्माननीय पंतप्रधानांना अनावृत पत्र :

 

सन्माननीय नरेंद्र मोदी जी ,

 पंतप्रधान भारत .

 महोदय ,

 

                      गेल्या १० वर्षाच्या काळात आपण भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी विविध उपाय योजले आहेत आणि त्याचा दृश्य परिणाम देखील जनतेला दिसतो आहे . या साठी  आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !

            असे असले तरी अजूनही सामान्य नागरिकांचा अगदी जन्मांपासून ते मरणापर्यंत ज्या यंत्रणेशी दैनंदिन संबंध येतो अशा ग्रामपंचायत ते महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था मात्र अजूनही आर्थिक घोटाळे , भ्रष्टाचार , करदात्या नागरिकांच्या निधीचा अपव्यय या पासून मुक्त झालेल्या नाहीत आणि म्हणूनच " भ्रष्टाचार मुक्त भारत " या "मोदी गॅरन्टी " वर काही अंशी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे . 

                 लोकशाहीच्या  मूलभूत तत्वानुसार लोकशाही यंत्रणांचा कारभार हा जनतेच्या कर रुपी पैशातून चालवला जात असल्याने त्या यंत्रणांचा कारभार नागरिकांसाठी खुला असणे अत्यंत आवश्यक आहे , असे असले तरी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जनतेसाठी खुला झालेला नाही . हा प्रकार थेट लोकशाहीची प्रतारणाचं ठरते .

   स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्टचाराची कारणे आणि त्यावरील संभाव्य उपाय आपल्या समोर ठेवण्यासाठी हा पत्रसंवाद . या अनावृत पत्राच्या माध्यमातून आपल्याकडे पुढील मागण्या करत आहोत : 

मागणी क्रमांक )   महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपारदर्शक कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या " कारभाराची माहिती " या मूलभूत निकषाची होणारी पायमल्ली बाबत आक्षेप नोंदवण्याबाबत .

मागणी क्रमांक )     महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भ्रष्टचारा  बाबत तक्रार .

 

मागणी क्रमांक )    पारदर्शक कारभाराची पूर्तता होण्यासाठी आणि भ्रष्टचाराला आळा घालण्यासाठी उपाय योजनांची अंमलबजावणी करण्या बाबतचे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारला देणे बाबत .  

Prayer before Hon PMO :    सुशासन भ्रष्टाचार मुक्त कारभाराची नागरिकांना  प्रचिती येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात कालसुसंगत बदल  करण्या बाबतचे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारला देणे बाबत .  

             स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली जात नाही .  त्यामुळे आपणाशी या अनावृत पत्राच्या माध्यमातून संवाद साधत आहोत

महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रमुख मागण्या : 

)स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पब्लिक डोमेनवर खुला असावा : 

    देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतीवर्षी किमान १५/२० लाखांचा ते कमाल कोटी -दीड कोटींचा निधी प्राप्त होत असतो . एवढ्या मोठया प्रमाणावर निधी मिळून देखील अजूनही अनेक ग्रामीण भागातील खेडी  आवश्यक अशा किमान पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत . याचे प्रमुख कारण म्हणजे गुप्त कारभार पद्धती .  ग्रामपंचायत ते महानगरपालिकांचा कारभार स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरु असून देखील अजूनही जनतेपासून गुप्तच ठेवला जातो आहे .

   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याने अनेक वेळेला कामे करताच बिले काढली जातात . सत्ताधारी आमदार -खासदार -नगरसेवकांच्या  कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी / लाखाची अनावश्यक कामे काढली जातात . थातुर माथूर थुकपट्टीची कामे केली जातात .  यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कारभाराचा लेखाजोखा थेट पब्लिक डोमेनवर करणे सक्तीचे करावे .

) केंद्रीय पद्धतीने कर्मचारी /अधिकारी / अभियंत्याची केंद्रीय पद्धतीने  भरती करावी :

        माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार नवी मुंबई महानगरपालिकेतील १४० अभियंत्यापैकी केवळ २७ अभियंते हे पदवी पात्र असून उर्वरित ११३ केवळ  पदविका पात्र आहेत . लिपिक पदापासून ते अभियंत्यांपर्यंतची सर्व भरती हि स्थानिक पातळीवर केली जात असल्याने "शैक्षणिक दृष्ट्या अपात्र व्यक्तींची नियुक्ती केली " जाताना दिसते . संगणक ऑपरेटर म्हणून भरती झालेल्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असेलच अशी खात्री नसते .

   अपात्र व्यक्तीची भरती हि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अवास्तव हस्तक्षेपातून केली जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थातील सेवांचा दर्जा आवश्यक पात्रतेचा राखला जात नाही

    योग्य दर्जाच्या व्यक्तींची नियुक्ती केली जावी यासाठी भविष्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचारी /अधिकारी / अभियंत्यांची भरती हि राज्य पातळीवर केंद्रीय पद्धतीने करण्याचा कायदा करावा .

 

) कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या कालबद्ध पद्धतीने बदल्यांचा नियम करावा :

          वर्तमानात स्थानिक पातळीवर कर्मचारी -अधिकाऱ्यांची भरती हि स्थानिक पातळीवर केली जात असल्याने भरती झाल्यापासून ते निवृत्त होई पर्यंत एकाच ठिकाणी  नोकरीचा कार्यकाळ असल्याने कर्मचारी -अधिकाऱ्यांची स्थानिक लोकप्रतिनिधी -कंत्राटदार यांच्याशी "अर्थपूर्ण संबंध " निर्माण होतात . कर्मचारी -अधिकारी  सरंजामशाही पद्धतीने वागू लागतात . 

    अनेक वरिष्ठ अधिकारी हे स्वतःच  अप्रत्यक्षपणे कंत्राटदाराची भूमिकेत जात आहेत .

    एकाच ठिकाणी अनेक वर्षे नियुक्ती हे स्थानिक स्वराज्य संस्थातील गैरकारभार , भ्रष्टचाराचे प्रमुख कारण ठरते आहे . या साठी आगामी काळात लिपिक पदापासून ते  वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या ठराविक वर्षानंतर कालबद्ध पद्धतीने एका स्थानिक स्वराज्य संस्थेंतून दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बदली करण्याचा कायदा तातडीने करावा .

 

) प्रत्येक कामाचा दोष निवारण कालावधी फिक्स करावा :     सर्वसाधारण पणे विकसित देशात डांबरी रस्त्याचे आयुष्य हे १२ ते १५ वर्षे तर सिमेंटच्या रस्त्यांचे आयुष्य हे २२ ते २८ वर्षे फिक्स केलेले असते . भारतात मात्र करोडो रुपये खर्च करून बांधलेला रस्ता  विशिष्ट कालावधी साठी टिकेलच याची खात्री देता येत नाही . नुकतेच मुंबई महानगरपालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी ११० कोटीचे कंत्राट पावसाळ्या पूर्वीची दुरुस्ती यासाठी काढलेले आहे . यावरून रस्त्यावरील खर्चात किती भ्रष्टाचार आहे याची प्रचिती येऊ शकते

           देशाची आर्थिक राजधानी देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकने गेल्या १० वर्षात रस्ते निर्मिती -देखभालीवर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च केलेले असून तरीही  मुंबई अजूनही खड्डेमुक्त होऊ शकलेली नाही  .

   देशातील महापालिकांनी  आजवर केवळ रस्ते ,फुटपाथ , गटारे यांच्यावर जेवढा खर्च केला आहे तेवढ्या खर्च चीनची भिंत बांधायला देखील आलेला नसेल .  प्रत्येक  वर्षाच्या काळात सुस्थितीतील रस्ते -फुटपाथ -गटारांची कामे केली जातात .

  रस्ते -फुटपाथ -गटारे हि केवळ प्रातिनिधिक उदाहरणे झाली . दोष निवारण कालावधी बाबत अनिश्चितता असल्याने अनेक कामांवर केवळ नगरसेवक -कंत्राटदार -अधिकऱ्यांचे खिसे भरण्यासाठी त्याच त्या सुस्थितीतील कामांवर पुन्हा पुन्हा खर्च केला जातो आहे . यामुळे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या निधीचा अपव्यय होतो आहे .

 करदात्या नागरिकांच्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रत्येक कामाचा दोष निवारण कालावधी सुनिश्चित केला जावा . 

 

) नगरसेवक निधी चा लेखाजोखा जनतेसाठी पब्लिक डोमेनवर खुला केला जावा .

) कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या संगणकीय /लॉटरी पद्धतीनेच कराव्यात : स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्टाचारा साठी असणारे एक प्रमुख कारण म्हणजे कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्तीतील भ्रष्टाचार . पाहीजे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळवण्यासाठी रक्कम मोजायची आणि त्या पोस्टिंगच्या माध्यमातून  अनेक पट मलिदा लाटायचा .

 याला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या संगणकीय / लॉटरी पद्धतीने करण्याचे निर्देश द्यावेत .

 

कळावे ,

आपला विश्वासू

 

सुधीर लक्ष्मीकांत  दाणी

 

danisudhir@gmail.com

9869226272

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा