THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

भ्रष्टाचार मुक्त भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रष्टाचार मुक्त भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मार्च, २०२४

 

महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त भारताची "मोदी गॅरंटी " देणाऱ्या सन्माननीय पंतप्रधानांना अनावृत पत्र :

 

सन्माननीय नरेंद्र मोदी जी ,

 पंतप्रधान भारत .

 महोदय ,

 

                      गेल्या १० वर्षाच्या काळात आपण भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी विविध उपाय योजले आहेत आणि त्याचा दृश्य परिणाम देखील जनतेला दिसतो आहे . या साठी  आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !

            असे असले तरी अजूनही सामान्य नागरिकांचा अगदी जन्मांपासून ते मरणापर्यंत ज्या यंत्रणेशी दैनंदिन संबंध येतो अशा ग्रामपंचायत ते महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था मात्र अजूनही आर्थिक घोटाळे , भ्रष्टाचार , करदात्या नागरिकांच्या निधीचा अपव्यय या पासून मुक्त झालेल्या नाहीत आणि म्हणूनच " भ्रष्टाचार मुक्त भारत " या "मोदी गॅरन्टी " वर काही अंशी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे . 

                 लोकशाहीच्या  मूलभूत तत्वानुसार लोकशाही यंत्रणांचा कारभार हा जनतेच्या कर रुपी पैशातून चालवला जात असल्याने त्या यंत्रणांचा कारभार नागरिकांसाठी खुला असणे अत्यंत आवश्यक आहे , असे असले तरी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जनतेसाठी खुला झालेला नाही . हा प्रकार थेट लोकशाहीची प्रतारणाचं ठरते .

   स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्टचाराची कारणे आणि त्यावरील संभाव्य उपाय आपल्या समोर ठेवण्यासाठी हा पत्रसंवाद . या अनावृत पत्राच्या माध्यमातून आपल्याकडे पुढील मागण्या करत आहोत : 

मागणी क्रमांक )   महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपारदर्शक कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या " कारभाराची माहिती " या मूलभूत निकषाची होणारी पायमल्ली बाबत आक्षेप नोंदवण्याबाबत .

मागणी क्रमांक )     महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भ्रष्टचारा  बाबत तक्रार .

 

मागणी क्रमांक )    पारदर्शक कारभाराची पूर्तता होण्यासाठी आणि भ्रष्टचाराला आळा घालण्यासाठी उपाय योजनांची अंमलबजावणी करण्या बाबतचे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारला देणे बाबत .  

Prayer before Hon PMO :    सुशासन भ्रष्टाचार मुक्त कारभाराची नागरिकांना  प्रचिती येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात कालसुसंगत बदल  करण्या बाबतचे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारला देणे बाबत .  

             स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली जात नाही .  त्यामुळे आपणाशी या अनावृत पत्राच्या माध्यमातून संवाद साधत आहोत

महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रमुख मागण्या : 

)स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पब्लिक डोमेनवर खुला असावा : 

    देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतीवर्षी किमान १५/२० लाखांचा ते कमाल कोटी -दीड कोटींचा निधी प्राप्त होत असतो . एवढ्या मोठया प्रमाणावर निधी मिळून देखील अजूनही अनेक ग्रामीण भागातील खेडी  आवश्यक अशा किमान पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत . याचे प्रमुख कारण म्हणजे गुप्त कारभार पद्धती .  ग्रामपंचायत ते महानगरपालिकांचा कारभार स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरु असून देखील अजूनही जनतेपासून गुप्तच ठेवला जातो आहे .

   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याने अनेक वेळेला कामे करताच बिले काढली जातात . सत्ताधारी आमदार -खासदार -नगरसेवकांच्या  कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी / लाखाची अनावश्यक कामे काढली जातात . थातुर माथूर थुकपट्टीची कामे केली जातात .  यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कारभाराचा लेखाजोखा थेट पब्लिक डोमेनवर करणे सक्तीचे करावे .

) केंद्रीय पद्धतीने कर्मचारी /अधिकारी / अभियंत्याची केंद्रीय पद्धतीने  भरती करावी :

        माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार नवी मुंबई महानगरपालिकेतील १४० अभियंत्यापैकी केवळ २७ अभियंते हे पदवी पात्र असून उर्वरित ११३ केवळ  पदविका पात्र आहेत . लिपिक पदापासून ते अभियंत्यांपर्यंतची सर्व भरती हि स्थानिक पातळीवर केली जात असल्याने "शैक्षणिक दृष्ट्या अपात्र व्यक्तींची नियुक्ती केली " जाताना दिसते . संगणक ऑपरेटर म्हणून भरती झालेल्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असेलच अशी खात्री नसते .

   अपात्र व्यक्तीची भरती हि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अवास्तव हस्तक्षेपातून केली जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थातील सेवांचा दर्जा आवश्यक पात्रतेचा राखला जात नाही

    योग्य दर्जाच्या व्यक्तींची नियुक्ती केली जावी यासाठी भविष्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचारी /अधिकारी / अभियंत्यांची भरती हि राज्य पातळीवर केंद्रीय पद्धतीने करण्याचा कायदा करावा .

 

) कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या कालबद्ध पद्धतीने बदल्यांचा नियम करावा :

          वर्तमानात स्थानिक पातळीवर कर्मचारी -अधिकाऱ्यांची भरती हि स्थानिक पातळीवर केली जात असल्याने भरती झाल्यापासून ते निवृत्त होई पर्यंत एकाच ठिकाणी  नोकरीचा कार्यकाळ असल्याने कर्मचारी -अधिकाऱ्यांची स्थानिक लोकप्रतिनिधी -कंत्राटदार यांच्याशी "अर्थपूर्ण संबंध " निर्माण होतात . कर्मचारी -अधिकारी  सरंजामशाही पद्धतीने वागू लागतात . 

    अनेक वरिष्ठ अधिकारी हे स्वतःच  अप्रत्यक्षपणे कंत्राटदाराची भूमिकेत जात आहेत .

    एकाच ठिकाणी अनेक वर्षे नियुक्ती हे स्थानिक स्वराज्य संस्थातील गैरकारभार , भ्रष्टचाराचे प्रमुख कारण ठरते आहे . या साठी आगामी काळात लिपिक पदापासून ते  वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या ठराविक वर्षानंतर कालबद्ध पद्धतीने एका स्थानिक स्वराज्य संस्थेंतून दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बदली करण्याचा कायदा तातडीने करावा .

 

) प्रत्येक कामाचा दोष निवारण कालावधी फिक्स करावा :     सर्वसाधारण पणे विकसित देशात डांबरी रस्त्याचे आयुष्य हे १२ ते १५ वर्षे तर सिमेंटच्या रस्त्यांचे आयुष्य हे २२ ते २८ वर्षे फिक्स केलेले असते . भारतात मात्र करोडो रुपये खर्च करून बांधलेला रस्ता  विशिष्ट कालावधी साठी टिकेलच याची खात्री देता येत नाही . नुकतेच मुंबई महानगरपालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी ११० कोटीचे कंत्राट पावसाळ्या पूर्वीची दुरुस्ती यासाठी काढलेले आहे . यावरून रस्त्यावरील खर्चात किती भ्रष्टाचार आहे याची प्रचिती येऊ शकते

           देशाची आर्थिक राजधानी देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकने गेल्या १० वर्षात रस्ते निर्मिती -देखभालीवर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च केलेले असून तरीही  मुंबई अजूनही खड्डेमुक्त होऊ शकलेली नाही  .

   देशातील महापालिकांनी  आजवर केवळ रस्ते ,फुटपाथ , गटारे यांच्यावर जेवढा खर्च केला आहे तेवढ्या खर्च चीनची भिंत बांधायला देखील आलेला नसेल .  प्रत्येक  वर्षाच्या काळात सुस्थितीतील रस्ते -फुटपाथ -गटारांची कामे केली जातात .

  रस्ते -फुटपाथ -गटारे हि केवळ प्रातिनिधिक उदाहरणे झाली . दोष निवारण कालावधी बाबत अनिश्चितता असल्याने अनेक कामांवर केवळ नगरसेवक -कंत्राटदार -अधिकऱ्यांचे खिसे भरण्यासाठी त्याच त्या सुस्थितीतील कामांवर पुन्हा पुन्हा खर्च केला जातो आहे . यामुळे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या निधीचा अपव्यय होतो आहे .

 करदात्या नागरिकांच्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रत्येक कामाचा दोष निवारण कालावधी सुनिश्चित केला जावा . 

 

) नगरसेवक निधी चा लेखाजोखा जनतेसाठी पब्लिक डोमेनवर खुला केला जावा .

) कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या संगणकीय /लॉटरी पद्धतीनेच कराव्यात : स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्टाचारा साठी असणारे एक प्रमुख कारण म्हणजे कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्तीतील भ्रष्टाचार . पाहीजे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळवण्यासाठी रक्कम मोजायची आणि त्या पोस्टिंगच्या माध्यमातून  अनेक पट मलिदा लाटायचा .

 याला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या बदल्या संगणकीय / लॉटरी पद्धतीने करण्याचे निर्देश द्यावेत .

 

कळावे ,

आपला विश्वासू

 

सुधीर लक्ष्मीकांत  दाणी

 

danisudhir@gmail.com

9869226272

 

 

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

“भ्रष्टाचार मुक्त भारत “ हे आजपर्यंत तरी "जादुई स्वप्नच "!

                         सन्माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वपूर्ण मुद्दा होता तो भ्रष्टाचार मुक्त भारत .  " कितीही उच्च कोटींचा जादूगार असला तरी कधी ना कधी त्याची पोतडी रिकामी होणे नैसर्गिक असते ". डॉक्टर कितीही निष्णांत असले तरी औषधांची पुनरावृत्ती टाळली जाऊ शकत नाही .  हेच पंतप्रधानाच्या भाषणाचे अवलोकन केले असता दिसून येते .  असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे अनेक गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसली . भ्रष्टाचार मुक्त भारत हि घोषणा २०१४ ला देखील  दिली गेलेली होती आणि पुन्हा तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या घोषणेला ऐरणीवर आणलेले आहे .

          खरे तर "भ्रष्टाचार मुक्त भारत " हे जसे मा . पंतप्रधानांचे स्वप्न आहे तेच स्वप्न देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचे आहे . खरा प्रश्न हा आहे की  हे स्वप्न पूर्णत्वास जाणार का ? जाणार असेल तर कधी ? आणि केंव्हा ? हे कळीचे मुद्दे आहेत . त्याही पुढचा मुद्दा हा आहे की  , तसे प्रयत्न जरी केले गेले तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा त्या प्रयत्नांचा स्वीकार करेल का ?

          सन्माननीय मोदी जींची कार्यपद्धती लक्षात घेता ते बोललेले करून दाखवतात हे नक्की . पण आजवरचा भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणेचा इतिहास लक्षात घेता "भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न प्रश्नांकित आहे " हे देखील नाकारता येणार नाही .

             जादूच्या बाबतीतील दुसरे सत्य हे असते की  " जादू हि नेहमी भास निर्माण करणारी असते , जादू म्हणजे निव्वळ हातचलाखी असते ". जादूने निर्माण केलेल्या नोटा हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण झाले .

                गेली ७७ वर्षे भारतातील प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता -नेता , भारतातील उच्चपदस्थ प्रशासकीय मंडळी हे सातत्याने भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न दाखवत असतात पण अजून तरी ते स्वप्न पूर्णत्वास येताना दिसत नाही आणि म्हणूनच "भ्रष्टाचार मुक्त भारत हे देखील  आजपर्यंत  तरी  "जादुई स्वप्न " ठरते  असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही.

                 आणखी एक जादू म्हणजे या देशातील प्रत्येक जण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असताना , भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी प्रयत्न करत असताना भारतातून भ्रष्टाचार हद्दपार होण्याचे सोडा तो अधिकाधिक सर्वव्यापी होतो आहे अधिकाधिक सर्वमान्य होतो आहे . १४० करोड जनता  विरोधात असताना आपला विस्तार करणे हि जादूच नव्हे काय ?

            अनेकांना भारतात भ्रष्टाचार वाढतो आहे हे मत नकारात्मक वाटते . ते म्हणतात पुराव्यानिशी मत मांडत रहा. पाश्चात्य देशातील रस्तेबांधणीच्या दरापेक्षा अधिक दर देऊन देखील  करोडो रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ? कुठल्याही प्रकारचा अधिकृत व्यवसाय -उद्योग नसताना देखील देशातील सरपंचा पासून ते आमदार -खासदारापर्यंतच्या (अगदी बोटावर मोजता येतील असे अपवाद वगळता ) लोकप्रतिनिधींची संपत्ती प्रत्येक पंचवार्षिकमध्ये गुणोत्तरीय पद्धतीने वाढत असते हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ? केजी असो की पीजी डोनेशनशिवाय प्रवेश मिळतच नाही हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ?

                  एवढेच कशाला या देशाचे सन्माननीय पंतप्रधान जेंव्हा "भ्रष्टाचार मुक्तीची घोषणा " देतात हा देखील भारतात अजूनही भ्रष्टाचार आहे याचा सर्वोत्तम पुरावाच ठरत नाही  का ?

           भ्रष्टाचाराने आपल्या देशातील सर्वच यंत्रणांना ग्रासलेले आहे . भ्रष्टाचार हा केवळ सरकारी यंत्रणात असतो हे मानणे बाळबोधपणाचे ठरते . शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतलेला कृषिमाल ५/१० पट किंमतीला विकणे हा देखील भ्रष्टाचारच नव्हे का ? शिक्षण ,क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्र , राजकीय क्षेत्र , औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराची 'चलती ' असल्याचे पदोपदी दिसून येते .

                भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वात मोठा असणारा गैरसमज म्हणजे केवळ पैशांची अफरातफर म्हणजे भ्रष्टाचार . खरे तर तसे नाही . निवडणुकीत मटण -दारू -पाकिटाच्या बदल्यात मत 'विकणे ' हा देखील मोठा भ्रष्टाचारच ठरतो . शिक्षक-प्राध्यापकांची नियुक्ती थैल्या घेऊन करणे , शिक्षक -प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या वेतनातून  काही रक्कम प्रतिमाह संस्थाचालकाने वसूल करणे हा देखील भ्रष्टचाराचाच एक अविष्कार ठरतो . हनुमानाच्या शेपटी सारखी हि यादी जितकी पाहिजे तितकी लांबवली जाऊ शकते  .

 जमिनीपासून ते आकाशापर्यंत  भ्रष्टाचाराने अवकाश व्यापलेले असल्याने भ्रष्टाचार मुक्त भारत हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधानांना अत्यंत कठोर पाऊले उचलावी लागतील  . वर्तमानातील राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेला ते पचनी पडतील का ? मोदीजींचे सहकारी असणाऱ्यांना देखील ते रूचत का ? या प्रश्नांच्या उत्तरातच  " भ्रष्टाचार मुक्त भारताचे भविष्य " दडलेले असणार आहे .

अनेकांना रुचणार नाही , पटणार नाही . नकारात्मक मताचा राग येऊ शकेल पण कटू वास्तव हेच आहे की  आजवरचा सर्व राजकीय नेत्यांचा , राजकीय पक्षांचा , प्रशासकीय यंत्रणांचा भ्रष्टाचारा प्रति असणारा स्नेहभाव लक्षात घेता हेच म्हणता येईल की  “भ्रष्टाचार मुक्त भारत “  हे   तूर्त तरी १४० करोड जनतेच्या मनातील  "जादुई स्वप्नच "! आहे  .

  असो ! लोकशाही व्यवस्थेत सरकार नामक यंत्रणा हि ब्रह्मदेवासारखी असते हे लोकशाही सत्य लक्षात घेत देशातील प्रामाणिक पक्षाच्या पंतप्रधानांनी दाखवलेले  "भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न "  लवकरच पूर्तीस जाईल हि सकारात्मक आशा व्यक्त करत पूर्णविराम.






सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

लेखक संपर्क  : 9869226272

danisudhir@gmail.com