सन्माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वपूर्ण मुद्दा होता तो भ्रष्टाचार मुक्त भारत . " कितीही उच्च कोटींचा जादूगार असला तरी कधी ना कधी त्याची पोतडी रिकामी होणे नैसर्गिक असते ". डॉक्टर कितीही निष्णांत असले तरी औषधांची पुनरावृत्ती टाळली जाऊ शकत नाही . हेच पंतप्रधानाच्या भाषणाचे अवलोकन केले असता दिसून येते . असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे अनेक गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसली . भ्रष्टाचार मुक्त भारत हि घोषणा २०१४ ला देखील दिली गेलेली होती आणि पुन्हा तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या घोषणेला ऐरणीवर आणलेले आहे .
खरे तर "भ्रष्टाचार मुक्त भारत " हे जसे
मा . पंतप्रधानांचे स्वप्न आहे तेच स्वप्न देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचे आहे
. खरा प्रश्न हा आहे की हे स्वप्न पूर्णत्वास
जाणार का ? जाणार असेल तर कधी ? आणि केंव्हा ? हे कळीचे मुद्दे आहेत . त्याही पुढचा
मुद्दा हा आहे की , तसे प्रयत्न जरी केले गेले
तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा त्या प्रयत्नांचा स्वीकार
करेल का ?
सन्माननीय मोदी जींची कार्यपद्धती लक्षात
घेता ते बोललेले करून दाखवतात हे नक्की . पण आजवरचा भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणेचा
इतिहास लक्षात घेता "भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न प्रश्नांकित आहे "
हे देखील नाकारता येणार नाही .
जादूच्या बाबतीतील दुसरे सत्य हे असते
की " जादू हि नेहमी भास निर्माण करणारी
असते , जादू म्हणजे निव्वळ हातचलाखी असते ". जादूने निर्माण केलेल्या नोटा हे
त्याचे प्रातिनिधिक उदाहरण झाले .
गेली ७७ वर्षे भारतातील प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता -नेता , भारतातील उच्चपदस्थ प्रशासकीय मंडळी हे सातत्याने भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न दाखवत असतात पण अजून तरी ते स्वप्न पूर्णत्वास येताना दिसत नाही आणि म्हणूनच "भ्रष्टाचार मुक्त भारत हे देखील आजपर्यंत तरी "जादुई स्वप्न " ठरते असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही.
आणखी एक जादू म्हणजे या देशातील प्रत्येक जण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असताना , भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी प्रयत्न करत असताना भारतातून भ्रष्टाचार हद्दपार होण्याचे सोडा तो अधिकाधिक सर्वव्यापी होतो आहे अधिकाधिक सर्वमान्य होतो आहे . १४० करोड जनता विरोधात असताना आपला विस्तार करणे हि जादूच नव्हे काय ?
अनेकांना भारतात भ्रष्टाचार वाढतो आहे हे मत नकारात्मक वाटते . ते म्हणतात पुराव्यानिशी मत मांडत रहा. पाश्चात्य देशातील रस्तेबांधणीच्या दरापेक्षा अधिक दर देऊन देखील करोडो रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ? कुठल्याही प्रकारचा अधिकृत व्यवसाय -उद्योग नसताना देखील देशातील सरपंचा पासून ते आमदार -खासदारापर्यंतच्या (अगदी बोटावर मोजता येतील असे अपवाद वगळता ) लोकप्रतिनिधींची संपत्ती प्रत्येक पंचवार्षिकमध्ये गुणोत्तरीय पद्धतीने वाढत असते हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ? केजी असो की पीजी डोनेशनशिवाय प्रवेश मिळतच नाही हा भ्रष्टाचाराचा पुरावा नव्हे काय ?
एवढेच कशाला या देशाचे सन्माननीय पंतप्रधान जेंव्हा "भ्रष्टाचार मुक्तीची घोषणा " देतात हा देखील भारतात अजूनही भ्रष्टाचार आहे याचा सर्वोत्तम पुरावाच ठरत नाही का ?
भ्रष्टाचाराने आपल्या देशातील सर्वच यंत्रणांना
ग्रासलेले आहे . भ्रष्टाचार हा केवळ सरकारी यंत्रणात असतो हे मानणे बाळबोधपणाचे ठरते
. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतलेला कृषिमाल ५/१० पट किंमतीला विकणे हा देखील भ्रष्टाचारच
नव्हे का ? शिक्षण ,क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्र , राजकीय क्षेत्र , औद्योगिक क्षेत्र
अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराची 'चलती ' असल्याचे पदोपदी दिसून येते .
भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वात मोठा असणारा गैरसमज
म्हणजे केवळ पैशांची अफरातफर म्हणजे भ्रष्टाचार . खरे तर तसे नाही . निवडणुकीत मटण
-दारू -पाकिटाच्या बदल्यात मत 'विकणे ' हा देखील मोठा भ्रष्टाचारच ठरतो . शिक्षक-प्राध्यापकांची
नियुक्ती थैल्या घेऊन करणे , शिक्षक -प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या वेतनातून काही रक्कम प्रतिमाह संस्थाचालकाने वसूल करणे हा
देखील भ्रष्टचाराचाच एक अविष्कार ठरतो . हनुमानाच्या शेपटी सारखी हि यादी जितकी पाहिजे
तितकी लांबवली जाऊ शकते .
जमिनीपासून ते आकाशापर्यंत भ्रष्टाचाराने अवकाश व्यापलेले असल्याने भ्रष्टाचार
मुक्त भारत हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधानांना अत्यंत कठोर पाऊले उचलावी
लागतील . वर्तमानातील राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेला
ते पचनी पडतील का ? मोदीजींचे सहकारी असणाऱ्यांना देखील ते रूचत का ? या प्रश्नांच्या
उत्तरातच " भ्रष्टाचार मुक्त भारताचे
भविष्य " दडलेले असणार आहे .
अनेकांना रुचणार नाही , पटणार नाही
. नकारात्मक मताचा राग येऊ शकेल पण कटू वास्तव हेच आहे की आजवरचा सर्व राजकीय नेत्यांचा , राजकीय पक्षांचा
, प्रशासकीय यंत्रणांचा भ्रष्टाचारा प्रति असणारा स्नेहभाव लक्षात घेता हेच म्हणता
येईल की “भ्रष्टाचार मुक्त भारत “ हे तूर्त
तरी १४० करोड जनतेच्या मनातील "जादुई
स्वप्नच "! आहे .
असो ! लोकशाही व्यवस्थेत सरकार नामक यंत्रणा हि ब्रह्मदेवासारखी असते हे लोकशाही सत्य लक्षात घेत देशातील प्रामाणिक पक्षाच्या पंतप्रधानांनी दाखवलेले "भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न " लवकरच पूर्तीस जाईल हि सकारात्मक आशा व्यक्त करत पूर्णविराम.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
लेखक संपर्क : 9869226272
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा