पुरोगामी महाराष्ट्रातील करोडो मतदारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले . निवडणूक आयोगाने मतपेट्या उघडल्या आणि निकाल जाहीर केला . निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर वोटिंग मशिन्स मधील डेटा डिलीट केला असेल त्याच पद्धतीने राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांच्या मताला 'डिलीट ' केले आणि आपापल्या सोयीने , राजकीय तडजोडी , कुरघोडी , पळवापळवी , घुसखोरी ,बंडखोरी अशा सर्व मार्गांचा वापर करत मनमानी पद्धतीने सरकार बनवले-बिघडवले-पाडले .
मतदारांनी दिलेल्या 'मता' ला गाडून आजवर प्रत्येक पक्षाचे आमदार हे सरकार मध्ये आणि सरकार बाहेत अशा प्रकारच्या विसंगत भूमिका बजावताना दिसलेले आहेत . गेल्या ४ वर्षात २८८ पैकी सर्वच आमदार हे सत्ताधारी झालेले दिसतात तर सर्वच आमदार विरोधी झालेले आहेत . राजकारणाच्या या घाणेरड्या खेळास 'चाणक्य नीती ' सारखे गोंडस नाव दिले जात असले तरी 'डोळसपणे ' पाहिले तर हि लोकशाहीची क्रूर थट्टाच ठरते . लोकशाही व्यवस्थेत मतदाराला 'राजा ' असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीनंतर मतदारांच्या मताला काडीचीही किंमत दिली जात नसेल तर त्यास लोकशाही व्यवस्था संबोधणे कितपत रास्त ठरते हा कळीचा प्रश्न आहे .
मान्य आहे की 'तडजोडी ' या राजकीय व्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे पण याचा अर्थ असा नव्हे की " अगदी काहीही करायचे " ( काहीही या अर्थाने की अगदी पक्षच्या पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार ) आणि जनतेने ते निमूटपणे मान्य करायचे आणि तरीही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था अशी दवंडी पिटत राहायचे .
एकुणातच महाराष्ट्रात अशी राजकीय परिस्थिती आहे की , मतदार रात्री झोपताना असणारे सरकार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असणारे सरकार सारखेच असेल याची खात्री नाही . मतदार सकाळी उठताना असणारे मुख्यमंत्री संध्याकाळी असतीलच असे नाही . अशा प्रकारची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते . राजकीय अस्थिरता असल्याने ना प्रशासनावर धाक उरला आहे , ना उद्योजकांना महाराष्ट्रावर विश्वास उरलेला आहे .
सर्वात खेदाची गोष्ट हि आहे की निवडणूक आयोग या कडे अशा पद्धतीने पाहताना दिसतो आहे की अशा गोष्टींशी आपला दुरान्वये संबंध नाही . लोकशाही व्यवस्थेने आपल्यावर दिलेले उत्तर दायित्व म्हणजे निवडणुका घ्या आणि धुतराष्ट्र -गांधारी च्या नजरेतून ५ वर्ष सर्व काही पाहत रहा . प्रश्न हा आहे की सन्माननीय टी .एन . शेषन सारखे निवडणूक आयुक्त असते तर हा राजकारणाचा खेळ इतका बिनधास्त पणे खेळला गेला असता का ? खरे तर निवडणूक आयोग हि स्वायत्त यंत्रणा असल्याने कालानुरूप लोकशाही व्यवस्थेत शिरकाव करणारे दोष निवारण करण्यासाठी निवडणूक आयोगाने काळानुसार उपाय योजणे अभिप्रेत आहे .
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्या प्रकारचा राजकीय खेळ 'चालू ' आहे त्याचा भविष्यातील लोकशाहीला संभावणारा धोका लक्षात घेत निवडणूक आयोगाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वर्तमानातील नियम -कायद्यात तातडीने बदल करणे अपेक्षित आहे . परंतू आत्तापर्यतची निवडणूक आयोगाची भूमिका लक्षात घेता भविष्यात देखील अशा "सत्तापिपासू " राजकीय युत्या -आघाड्यांना प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगा कडून काही पाऊले उचलली जातील अशी खात्री वाटत नाही .
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला एकाच गोष्टीची मागणी करणे मतदारांच्या हातात उरते . ती गोष्ट म्हणजे .... " जर भविष्यात देखील मतदारांच्या मताला तिलांजली देत , मतदारांच्या मताची कवडी किंमत करत , मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मतदान केले तरी कोणते सरकार सत्तेत येणार -जाणार हे निवडून आलेले उमेदवारच ठरवणार असतील .... अर्थातच केवळ निवडणूक आयोगच नव्हे तर लोकशाहीच्या जतन -संवर्धनास घटनेने जबाबदार असणारे कोणतीच यंत्रणा जर लोकशाहीला मारक ठरणाऱ्या गोष्टीला पायबंद घालणारी पाऊले उचलणार नसतील तर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाच घेऊ नयेत ".
५ वर्ष झाले की आहे त्याच आमदारांना पुन्हा आपापल्या मर्जीनुसार हव्या त्या पक्षाला पाठिंबा देत सरकार 'बनवण्याची ' संधी द्यावी . पुन्हा ५ वर्ष झाले की पुन्हा त्यांनाच संधी ... अशी लोकशाही पद्धती सुरु करावी . यामुळे निवडणुकीवर खर्च होईल ना मतदारांना पशात्ताप !
लोकशाही
व्यवस्थेत समस्या -प्रश्नांचे
निराकरण
करणाऱ्या
यंत्रणांच
जर
समस्या
-प्रश्नांकडे
दुर्लक्ष
करत
असतील
तर
मग
समस्या
कोणाकडे
मांडायची
हि
वर्तमान
लोकशाही
व्यवस्थेतील
सर्वात
मोठी
समस्या
ठरते
आहे
.
सुधीर दाणी ९८६९२२६२७२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा