THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

"वांझोट्या " समाजसेवकांची शहरांचे बकालीकरण वाढवणारी अनधिकृत बॅनरबाजी निषेधार्यच !


              गेल्या दशकामध्ये जनतेला समाजसेवकांची ओळख हि त्यांच्या जनतेप्रतीच्या कामातून होत असे . अडलेल्या -नडलेल्या नागरिकांना समाजसेवक हे मोठा आधार वाटत असे कारण समस्या -प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हि मंडळी सदैव तत्पर असत . धावून येत असत .  अशा मंडळींची समाजाप्रती असणारी कामे , सेवा लक्षात घेत समाजच स्वतः हुन त्यांना "समाजसेवक " अशी उपाधी लावत असत . 'समाजमान्य समाजसेवक ' अशी हि मंडळी असत .

                 काळ बदलत गेला आणि समाजसेवकांची परिभाषा बदलत  गेली .  अलीकडच्या काळात समाजसेवकांची ओळख जनतेला होती ती गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव , दहीहंडी , दसरा - दिवाळी अशा उत्सवाच्या वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात लावल्या जाणाऱ्या बॅनर्समधून . या मंडळींनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या नावाने  (ते देखील  स्वतःच्या खर्चाने ) " समाजसेवक " अशा नावाने लावलेल्या बॅनर्समधून  ते समाजसेवक आहेत हे नागरिकांना माहित पडते . बॅनर्स व्यतिरिक्त समाजकार्यात हे कुठेच दिसत नाहीत .    समाज मान्यता नसलेल्या अशा  "स्वयंघोषित समाजसेवकांची " भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे . 

 

           आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजसेवकांचा भूतकाळ कसाही असला तरी त्यांचे  भविष्य किती उज्वल , महान असणार हे देखील जनतेला वेळोवेळी लागणाऱ्या बॅनर्समधूनच कळते .  यांचे भविष्य असते  'भावी सरपंच , भावी पंचायत समिती -जिल्हा परिषद सदस्य -अध्यक्ष , भावी आमदार -खासदार " . जनतेने ठरवण्याआधीच यांचे पद फिक्स झालेले असते हे विशेष .

               त्यांच्या कर्तृत्वाचा , समाजसेवेचा आलेख गुप्तच राहताना दिसतो . महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना प्रश्न हा  आहे की  , सणउत्सव , निवडणुकांचा काळ वगळता हि समाजसेवक मंडळी नेमकी कुठे असतात  ? समाजसेवकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या असून देखील महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न -समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित का राहतात ? समाजसेवकांच्या समाजसेवेचे प्रतिबिंब प्रत्यक्ष समाजात उमटताना  का दिसत नाही .

                    अत्यंत खेदाची गोष्ट हि आहे की  जेंव्हा जेंव्हा उत्सवांच्या निमित्ताने बॅनर्स लावले जातात तेंव्हा तेंव्हा असे दिसते की  ज्या देवतेचा उत्सव आहे त्या देवतेचा फोटो कुठे तरी कोपऱ्यात लहान असतो . कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत दिसून पण येत नाही पण तथाकथित समाजसेवकांचे फोटो मात्र देवतांच्या फोटो पेक्षा मोठे असतात .  देवापेक्षा हि महान असल्याची प्रचिती यांना झालेली असती की काय ? अशी भावना जनमानसात  निर्माण झालेली दिसते .

               आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ९० टक्क्याहून अशा समाजसेवकांचे , नेत्यांना विविध प्रसंगी देण्यात येणाऱ्या शुभेच्छांचे बॅनर्स देखील हि मंडळी स्वतःच्या पैशानेच स्वतःच लावतात . बॅनर्सवर झळकणाऱ्या  कार्यकर्त्यांना देखील आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे , नेत्याला अमुक -तमुक पद प्राप्त झाले आहे हे बॅनर्समधूनच कळते .

            खरे 'समाजमान्य समाजसेवक ' कसे असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा . टाटांइतके स्वतःच्या पैशाने समाजकार्य अन्य कोणीच करत नसेल . तरी देखील रतन टाटांचे  रस्त्यावर ,सोशल मीडियावर समाजसेवक म्हणून कधी बॅनर्स झळकलेले दिसतात का ? कधीच नाही . अगदी रतन टाटांना महाराष्ट्र राज्याचा 'उद्योगरत्न ' हा पुरस्कार मिळाल्यावर देखील ना कुठे बॅनर्स झळकलेले दिसले , ना वर्तमानपत्रात पण भरून कौतुक करणाऱ्या जाहिराती प्रकाशित झालेल्या दिसल्या  . याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना अशा खोट्या प्रसिद्धीची गरजच पडत नाही कारण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून , समाजसेवेतून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेले असते  .

   ज्या गोष्टीतून फलनिष्पत्ती संभवत नाही त्यास वांझोटे असे संबोधले जाते .  अलीकडच्या काळातील समाजसेवकांच्या बाबतीत देखील असेच होताना दिसते आहे  .  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अशा तथाकथित समाजसेवकांची भाऊगर्दी असली तरी  त्यांचा कुठलाच लाभ प्रत्यक्ष समाजाला होताना दिसत नाही  . फल   निष्पत्ती शून्य अशा समाजसेवकांची बॅनरबाजी समाजमनाच्या दृष्टीने पूर्णतः निषेधार्यच ठरते .  

                        शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की  , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावायचे असतील तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते , जितक्या दिवसांसाठी बॅनर्स लावायचे आहे त्या दिवसांसाठीचे शुल्क भरणे अनिवार्य असते . पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नियमाला पायदळी तुडवत सर्रासपणे मोफत व अनधिकृतपणे संपूर्ण राज्यभर बॅनरबाजी केली जाते . मा . न्यायालयाने आदेश देऊन देखील स्थानिक स्वराज्य संस्थातील संलग्न अधिकारी अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्याचे धाडस दाखवताना दिसत नाही .  स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बोटावर नाचणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन कठपुतळ्या सारखे झालेले असल्याने प्रशासनाचा धाक उरलेला नाही .

गणपती बाप्पा ला  बुद्धीची   देवता असे मानले जाते . गणपती बाप्पाला एकच प्रार्थना आहे की  कुठलेही सामाजिक काम न करणाऱ्या लाखो तथाकथित  समाजसेवकांना सुबुद्धी दे . त्यांना हि समज दे की  समाजसेवेची काम नसेल करणार तरी हरकत नाही पण किमान खेडी -शहरे बॅनर्स लावून बकाल तरी करू नका . अशा वांझोट्या समाजसेवकांची जनतेला बिलकुल आवश्यकता नाही आणि सहानभूती हि नाही . असेल तर तुमच्या विषयी चीडच आहे .

 


 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

Contact : danisudhir@gmail.com   9869226272

लेखक विविध सामाजिक विषयांचे  अभ्यासक भाष्यकार आहेत 

२ टिप्पण्या:

  1. योग्य , मार्मिक व सुंदर लेख

    उत्तर द्याहटवा
  2. वांझोट्या समाजसेवकांची किंमत आपल्यामुळेच वाढते आहे हे विसरून चालणार नाही. (त्या मूर्खांना आपणच किंमत नाही दिली तर दिली तर चालणार नाही का ?)यास आपणच जबाबदार आहोत दुसरा कोणीही नाही. आपण मूर्ख बनतोय म्हणून ते बनवतात हे ही तितकेच बरोबर आहे.

    उत्तर द्याहटवा