गेल्या दशकामध्ये जनतेला समाजसेवकांची ओळख हि त्यांच्या
जनतेप्रतीच्या कामातून होत असे . अडलेल्या -नडलेल्या नागरिकांना समाजसेवक हे मोठा आधार
वाटत असे कारण समस्या -प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हि मंडळी सदैव तत्पर असत . धावून
येत असत . अशा मंडळींची समाजाप्रती असणारी
कामे , सेवा लक्षात घेत समाजच स्वतः हुन त्यांना "समाजसेवक " अशी उपाधी लावत
असत . 'समाजमान्य समाजसेवक ' अशी हि मंडळी असत .
काळ बदलत गेला आणि समाजसेवकांची परिभाषा
बदलत गेली . अलीकडच्या काळात समाजसेवकांची ओळख जनतेला होती ती
गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव , दहीहंडी , दसरा - दिवाळी अशा उत्सवाच्या वेळी राज्याच्या
कानाकोपऱ्यात लावल्या जाणाऱ्या बॅनर्समधून . या मंडळींनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
कार्यकर्त्यांच्या नावाने (ते देखील स्वतःच्या खर्चाने ) " समाजसेवक " अशा
नावाने लावलेल्या बॅनर्समधून ते समाजसेवक आहेत
हे नागरिकांना माहित पडते . बॅनर्स व्यतिरिक्त समाजकार्यात हे कुठेच दिसत नाहीत
. समाज मान्यता नसलेल्या अशा "स्वयंघोषित समाजसेवकांची " भाऊगर्दी
मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे .
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजसेवकांचा भूतकाळ कसाही असला तरी त्यांचे भविष्य किती उज्वल , महान असणार हे देखील जनतेला
वेळोवेळी लागणाऱ्या बॅनर्समधूनच कळते . यांचे
भविष्य असते 'भावी सरपंच , भावी पंचायत समिती
-जिल्हा परिषद सदस्य -अध्यक्ष , भावी आमदार -खासदार " . जनतेने ठरवण्याआधीच यांचे
पद फिक्स झालेले असते हे विशेष .
त्यांच्या कर्तृत्वाचा , समाजसेवेचा आलेख गुप्तच
राहताना दिसतो . महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना प्रश्न हा आहे की
, सणउत्सव , निवडणुकांचा काळ वगळता हि समाजसेवक मंडळी नेमकी कुठे असतात ? समाजसेवकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या
असून देखील महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न -समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित का राहतात
? समाजसेवकांच्या समाजसेवेचे प्रतिबिंब प्रत्यक्ष समाजात उमटताना का दिसत नाही .
अत्यंत खेदाची गोष्ट हि आहे की जेंव्हा जेंव्हा उत्सवांच्या निमित्ताने बॅनर्स
लावले जातात तेंव्हा तेंव्हा असे दिसते की
ज्या देवतेचा उत्सव आहे त्या देवतेचा फोटो कुठे तरी कोपऱ्यात लहान असतो . कार्यकर्त्यांच्या
भाऊगर्दीत दिसून पण येत नाही पण तथाकथित समाजसेवकांचे फोटो मात्र देवतांच्या फोटो पेक्षा
मोठे असतात . देवापेक्षा हि महान असल्याची
प्रचिती यांना झालेली असती की काय ? अशी भावना जनमानसात निर्माण झालेली दिसते .
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ९० टक्क्याहून
अशा समाजसेवकांचे , नेत्यांना विविध प्रसंगी देण्यात येणाऱ्या शुभेच्छांचे बॅनर्स देखील
हि मंडळी स्वतःच्या पैशानेच स्वतःच लावतात . बॅनर्सवर झळकणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या नेत्याचा वाढदिवस
आहे , नेत्याला अमुक -तमुक पद प्राप्त झाले आहे हे बॅनर्समधूनच कळते .
खरे 'समाजमान्य समाजसेवक ' कसे असतात याचे
मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा . टाटांइतके स्वतःच्या पैशाने समाजकार्य अन्य कोणीच
करत नसेल . तरी देखील रतन टाटांचे रस्त्यावर
,सोशल मीडियावर समाजसेवक म्हणून कधी बॅनर्स झळकलेले दिसतात का ? कधीच नाही . अगदी रतन
टाटांना महाराष्ट्र राज्याचा 'उद्योगरत्न ' हा पुरस्कार मिळाल्यावर देखील ना कुठे बॅनर्स
झळकलेले दिसले , ना वर्तमानपत्रात पण भरून कौतुक करणाऱ्या जाहिराती प्रकाशित झालेल्या
दिसल्या . याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना
अशा खोट्या प्रसिद्धीची गरजच पडत नाही कारण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून , समाजसेवेतून
प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेले असते
.
ज्या गोष्टीतून फलनिष्पत्ती संभवत नाही त्यास वांझोटे असे संबोधले जाते . अलीकडच्या काळातील समाजसेवकांच्या बाबतीत देखील असेच होताना दिसते आहे . महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अशा तथाकथित समाजसेवकांची भाऊगर्दी असली तरी त्यांचा कुठलाच लाभ प्रत्यक्ष समाजाला होताना दिसत नाही . फल निष्पत्ती शून्य अशा समाजसेवकांची बॅनरबाजी समाजमनाच्या दृष्टीने पूर्णतः निषेधार्यच ठरते .
शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा
मुद्दा हा आहे की , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावायचे असतील तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक
असते , जितक्या दिवसांसाठी बॅनर्स लावायचे आहे त्या दिवसांसाठीचे शुल्क भरणे अनिवार्य
असते . पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नियमाला पायदळी तुडवत सर्रासपणे मोफत व अनधिकृतपणे
संपूर्ण राज्यभर बॅनरबाजी केली जाते . मा . न्यायालयाने आदेश देऊन देखील स्थानिक स्वराज्य
संस्थातील संलग्न अधिकारी अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्याचे धाडस दाखवताना दिसत नाही
. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बोटावर नाचणारे
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन कठपुतळ्या सारखे झालेले असल्याने प्रशासनाचा धाक
उरलेला नाही .
गणपती
बाप्पा ला बुद्धीची देवता असे मानले जाते . गणपती बाप्पाला एकच प्रार्थना
आहे की कुठलेही सामाजिक काम न करणाऱ्या लाखो
तथाकथित समाजसेवकांना सुबुद्धी दे . त्यांना
हि समज दे की समाजसेवेची काम नसेल करणार तरी
हरकत नाही पण किमान खेडी -शहरे बॅनर्स लावून बकाल तरी करू नका . अशा वांझोट्या समाजसेवकांची
जनतेला बिलकुल आवश्यकता नाही आणि सहानभूती हि नाही . असेल तर तुमच्या विषयी चीडच आहे
.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
Contact
: danisudhir@gmail.com
9869226272
लेखक विविध सामाजिक विषयांचे अभ्यासक भाष्यकार आहेत
