THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे " कै. लक्ष्मीकांत दाणी महानगरपालिका मुख्यालय " असे नामकरण करा

 

प्रति ,                                                                                                                             

मा . आयुक्त ,

नवी मुंबई महानगरपालिका ,

नवी मुंबई.

 

विषय : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे  " कै. लक्ष्मीकांत दाणी महानगरपालिका मुख्यालय " असे नामकरण  करावे असा प्रस्ताव देणारे   विनंती पत्र  .

      महोदय ,

 

                    नवी मुंबई महानगरपालिकैचा    गेली २५ वर्षांपासूनचा रहिवाशी आणि करदाता आहे . नवी मुंबई पालिका क्षेत्रात असणारे रस्ते (अगदी  एकूण २०० मीटर अंतर असणारे गल्लीतले देखील ) , बगीचे ,तलाव , पालिकेच्या इमारती जसे प्राथमिक आरोग्य केंद्रे , रुग्णालये ,विविध प्रकारच्या समाजोपयोगी इमारती तत्सम अन्य ठिकाणांना नावे दिलेली आहेत . सर्वसामान्यपणे  राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक -खेळ -क्रीडा -साहित्य अशा विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व असणाऱ्या , समाजाप्रती सेवा करणाऱ्या , समाजासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या समाजसेवकांची नावे देण्याचा प्रघात आहे . सदरील व्यक्तीच्या सामाजिक उत्तरदायित्वाला ,कर्तृत्वाला सलाम , ऋण व्यक्त करण्यासाठी नावे दिले जातात .

                 ज्या अर्थी  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही हजारात नामकरण झालेले आहेत त्या अर्थी नवी मुंबईला महान ,कर्तृत्ववान , समाजसेवकांची उज्वल परंपरा आहे .  या शहराचा नागरिक या नात्याने याचा सार्थ अभिमानच आहे . ज्या मातीत आपण राहतो त्या मातीला अशा कर्तृत्वान समाजसेवकांची उज्वल परंपरा आहे  हे पाहून मन धन्य होते आहे .  नवी मुंबई पालिकेने ज्या ज्या व्यक्तींची नावे देऊन त्या त्या थोर पुरुषांनी आयुष्यभर केलेल्या जनसेवेचा, त्यांच्या विशेष कर्तृत्वाचा  आदर केला आहे  त्या सर्व थोर महात्म्यांना मनापासून नमस्कार  .

                माझे वडील कै .  श्री . लक्ष्मीकांत प्रल्हादराव दाणी हे देखील  ७० च्या दशकातील आदर्श शिक्षक ,  समाजसेवक होते . त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे कुटुंबासाठी कमी तर  विद्यार्थ्यांसाठी ,समाजासाठी वेचलेले आहे . प्रत्येक संकटाच्या वेळी धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते खऱ्या अर्थाने "समाजसेवक " होते  अशी धारणा सर्व गावकऱ्यांची आहे .

            त्यांचा आणखी विशेष गुण म्हणजे त्यांना आयुष्यभर अगदी सुपारीच्या खांडाचे देखील व्यसन नव्हते . त्यामुळे मद्यप्राशन वगैरे तर दूरची गोष्ट झाली . त्यांना कधीच कुठल्या गुन्ह्यासाठी  आरोपी म्हणून पोलीस स्टेशनची , न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली नव्हती . अशा गुणांचा  ( सद्गुणांचा म्हणणे जास्त उचित ठरेल ) देखील नामकरणासाठी पात्र ठरण्यासाठी विचार केला जात असेल अशी माझी धारणा असल्याने मी या 'अधिकच्या  गुणांचा ' विशेष उल्लेख करत आहे .

                सदरील प्रस्तावासाठी " पात्र उमेदवार " म्ह्णून माझे वडील पात्र ठरतात अशी माझी  स्पष्ट धारणा  आहे कारण त्यांचे संपूर्ण आयुष्य हे "प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरहित " होते . याचे प्रमुख कारण म्हणजे स्वतः ते कधी सरपंच नव्हते ना नगरसेवक वा कुठल्याच राजकीय पदावर ते नव्हते . त्याच बरोबर ना त्यांचे  वडील  वा अन्य कोणी जवळचे नातेवाईक राजकारणी होते त्यामुळे कधीच रुपयाचा देखील भ्रष्टाचार -गैरव्यवहार त्यांनी केलेला नाही . स्वच्छ चारित्र्य हा देखील  नाव देण्यासाठीचा एक प्रमुख निकष असेल अशी माझी खात्री आहे म्हणून मी सदरील माहिती जाणीवपूर्वक प्रशासनासमोर ठेवत आहे जेणेकरून या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाईल , तो मंजूर केला जाईल .

              नवी मुंबई पालिकेत विविध ठिकाणी नावे देण्यासाठी  ज्या प्रकारची  तत्परता आजवर दिसून आलेली आहे त्याच धर्तीवर सदरील विनंतीचा तत्परतेने विचार करून पालिका मुख्यालयास  माझ्या वडिलांचे नाव दिले जाईल अशी मला अपेक्षा आहे . सदरील प्रस्तावाची विनंती मान्य करून त्यावर तातडीने कार्यवाही झाल्यास मी  पालिका प्रशासनाचे स्वागत अभिनंदनच करेल .

               पण सदरील प्रस्ताव नामंजूर वा नादखल केला गेल्यास त्या मागची कारणमीमांसा जाणून घेणे हा माझा घटनादत्त अधिकार आहे . भारतीय  लोकशाहीचा मूळ पाया हाच मुळात जनता जनार्धन (WE THE PEOPLE.. ) असल्याने प्रत्येक प्रशासकीय कृतीची माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे . आजवर जी नावे दिली गेलेली आहेत ती नावे पात्र ठरवण्यासाठीचे निकष  त्यातील कोणत्या निकषात माझ्या वडिलांचा प्रस्ताव बसत नाही याचा खुलासा केला  जाईल अशी माझी अपेक्षा आहे .

            पात्र  व्यक्तीचा म्हणजेच माझ्या वडिलांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला जाणे हा मी माझा अपमान समजतो . या पार्श्वभूमीवर मी प्रशासनास प्रश्न विचारू इच्छितो की , राजकीय -प्रशासकीय हितसंबंध , वरदहस्त हाच पात्रतेचा निकष असेल तर अशा व्यक्तींची नावे  सार्वजनिक ठिकाणाला देणे हा समस्त करदात्या नागरिकांचा अपमान नव्हे काय ? त्याही पुढे जाऊन प्रश्न आहे की , मुळात वैयक्तिक स्वरूपाची नावेच का द्यायची ? उलटपक्षी त्या त्या विभागाची नावे देणे जास्त संयुक्तिक ,उचित ठरत नाही का ? उदा .  बेलापूरला असणाऱ्या  प्राथमिक आरोग्य केंद्राला बेलापूर आरोग्य केंद्र , रस्त्यांना रोड क्रमांक , ,.... अशा प्रकारचे  नामकरण जास्त सोयीचे ठरते .

                   हे पुन्हा एकदा नम्रपणे नमूद करतो की ,सदरील प्रस्तावास नकार हा माझा अपमान आहे कारण  मी सुद्धा नवी मुंबई पालिकेचा करदाता आहे , नागरिक आहे आणि जो सन्मान अन्य नागरिकांचा केला जातो तसाच सन्मान माझा देखील केला जायला हवा अशी माझी अपेक्षा आहे  .

                  प्रशासन सुयोग्य कारणास्तव सदरील विनंती प्रस्ताव नाकारणार असेल तर प्रशासनास माझी विनंती आहे की , भविष्यात सार्वजनिक ठिकाणाला राजकीय -प्रशासकीय हितसंबंधातून  नावे देण्याच्या कार्यपद्धतीला पूर्णपणे पूर्णविराम द्यावा .

             नगरसेवक -आमदार -खासदारांना मिळणारा निधी हा जनतेच्या कराचा पैसा असतो त्यामुळे त्यांची वैयक्तिक नावे अगदी बेंच पासून देणे हे लोकशाही मूल्याची प्रतारणा ठरते . लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वैयक्तिक उत्पनातून कामे केल्यास त्यांच्या सौजन्याने अशा प्रकारच्या पाट्या लावणे रास्त आहे पण सार्वजनिक पैशातून  दिल्या जाणाऱ्या सुविधांना  वैयक्तिक नावे देणे कितपत रास्त ठरते ?

नामकरणाबाबत पारदर्शक धोरण ठरवा :

                  माझ्या वडिलांच्या नावाचा प्रस्ताव हा अत्यंत रास्त आहे अशी माझी १०० टक्के धारणा आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार करावा हि माझी पुन्हा -पुन्हा प्रशासनास विनंती राहील .

                 सदरील प्रस्ताव नाकारला जाणार असेल तर नामकरणाबाबत पालिकेचे धोरण कोणते याचा सविस्तर ,सखोल अहवाल  मला दिला जावा अशी माझी प्रशासनास नम्र विनंती आहे .  अर्थातच केवळ "साम -दाम -दंड , प्रशासकीय -राजकीय हितसंबंध " हेच पालिकेचे सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या नावाबाबत असेल तर ते गैर आहे आणि  म्हणून पालिकेने एक तर तातडीने या विषयाच्या अनुषंगाने उच्च स्तरीय समिती नेमून "सार्वजनिक ठिकाणच्या नामकरणाबाबतचे धोरण निश्चित करावे आणि ते पब्लिक डोमेनवर खुले करावे " . त्याच बरोबर या निकषात बसणाऱ्या ज्या ज्या व्यक्तींची नावे आजवर दिली गेलेली आहेत  ती तातडीने मागे घ्यावीत आणि भविष्यात अपात्र व्यक्तींची नावे सार्वजनिक ठिकाणाला दिली जाणार नाहीत याबाबतची काळजी घ्यावी . 

                  नामकरण हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून तो आर्थिक हानीचा देखील मुद्दा आहे , करदात्या जनतेच्या पैशाच्या अपव्ययाचा देखील मुद्दा आहे कारण प्रत्येक ठिकाणी नावाच्या पाट्या लिहण्यासाठी  करोडो रुपयांचा चुराडा केला जाताना दिसतो आहे . कधी विटांच्या भिंती बांधून तर / वर्षांनी स्टीलच्या फ्रेम मध्ये नावे लिहून जनतेच्या पैशांची शब्दशः लूट होते आहे .  पालिकेच्या अपारदर्शक कारभारामुळे हा सर्व गैरव्यवहार झाकली मूठ सव्वा लाखाची अशा स्वरूपाचा आहे   .

महोदय,

               आपणास पुन्हा पुन्हा नम्र निवेदन आहे की  , माझ्या वडिलांचे नाव मुख्यालयास देऊन आपण त्यांचा सन्मान करावा . त्यांना वाहिलेली ती खरी श्रद्धांजली ठरेल . आपणांकडून  सकारात्मक प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने तूर्त पूर्णविराम .

 

कळावे आपला

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

९८६९२२६२७२  / danisudhir@gmail.com

महत्वाची तळटीप : बोटावर मोजता येईल अशा सन्माननीय व्यक्तींच्या , ज्यांनी खरंच समाजासाठी आपले आयुष्य वाहिलेले आहे अशा थोर व्यक्तींच्या नावाबाबत आक्षेप नसून  सरसकटपणे गल्ली -बोळात केल्या जाणाऱ्या अपात्र व्यक्तीबाबतच्या नामकरणाबाबत आक्षेप आहे .

 

प्रत : माहिती सुयोग्य कार्यवाहीसाठी :

 

) मा . मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

) मा . उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

) मा . नगरविकासमंत्री , महाराष्ट्र राज्य .

)मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य .

) मा . नगरविकास सचिव , महाराष्ट्र राज्य .

) मा . इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया ( प्रसिद्धीसाठी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा