" माझी लोकशाही ..माझा हक्क.. माझी जबाबदारी "
अंतर्गत नागरिकांची ईमेल चळवळ
Citizens email movement for Transparency in Democracy
प्रति ,
मा . एकनाथ जी शिंदे ,
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .
विषय : भ्रष्टाचार मुक्त भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी व महाराष्ट्राला प्रगतीपथावरील अग्रेसर राज्य बनवण्याच्या निर्धारपूर्तीसाठी राज्य सरकारच्या सर्व यंत्रणांचा कारभार पब्लिक डोमेनवर खुला करा .
महोदय ,
ऐतिहासिक लाल
किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मा . पंत्रप्रधानांनी विकसित भारतासाठी 'पंचप्रण " जाहीर करताना देशाला वाळवीप्रमाणे पोखरणाऱ्या भ्रष्टाचार विरोधातील लढाई निर्णायक टप्यात आणण्याचा वज्रनिर्धार जाहीर केलेला आहे . नागरिकांनी देखील या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवत आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केलेले आहे .
आपण देखील महाराष्ट्राला प्रगतीपथावर अग्रेसर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे .
मा . पंत्रप्रधान आणि आपण व्यक्त केलेल्या निर्धाराची अंमलबजावणीच्या पातळीवर स्वप्नपूर्ती होण्यासाठी सर्वात प्रमुख गरज आहे ती " राज्य सरकारच्या सर्व यंत्रणांचा कारभार जनतेसाठी खुला करण्याची ". पारदर्शक कारभाराशिवाय ना राज्य , ना देश प्रगती करू शकतो हे गेल्या साडेसात दशकाच्या वाटचालीवरून ठळकपणे अधोरेखित झालेले आहे .
लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या वर्तमानातील व्यवस्थांची "गुप्त कार्यपद्धती " लक्षात घेता या देशावर प्रेम करणाऱ्या , ज्यांच्या ज्यांच्या हृदयात , श्वासात , रक्ताच्या थेंबाथेंबात " तिरंगा " आहे त्यांचे मत हे आहे कीं , स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर अभिप्रेत लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्थेतील वास्तव डोळसपणे पाहिले असता सर्वप्रथम प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे " कुठे आहे लोकशाही भारतातील सरकारी व्यवस्थेत , सरकारी यंत्रणेत ?"
"लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही हि लोकशाहीची व्याख्या आहे . याचा गर्भित अर्थ हा की , लोकशाहीच्या केंद्रस्थानी हे त्या देशातील नागरिक असतात . लोकशाहीतील सर्व व्यवस्था या नागरिककेंद्रित असतात . नागरिकांचे हित हा लोकशाहीचा आत्मा असतो . स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना जनतेसाठीची लोकशाही अपेक्षित होती .
उपरोक्त उल्लेखित लोकशाही आणि प्रत्यक्ष कारभारातील लोकशाहीचे वास्तव पाहता पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की , "कुठे आहे लोकशाही ?"
ज्या व्यवस्थेत जन्मापासून अगदी मरणानंतर देखील संबंध येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा म्हणजेच ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषदा , नगरपालिका , महानगरपालिका यांचा कारभार देखील अजून भारतीय नागरिकासांठी खुला नाही . राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व्यवस्थांची बात तर कोसो दूर आहे . ज्या जनतेसाठी राज्य सरकार , केंद्र सरकार विविध योजना राबवते त्या देखील स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षानंतर देखील जनतेसमोर पारदर्शकपणे ठेवल्या जात नाही . केवळ बोलणे -लिहणे -वागण्याचे स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही नव्हे !
१४० करोड जनतेची हि अपेक्षा आहे की , जी लोकशाहीची सुरुवात १९४७ नंतर सुरु होणे अभिप्रेत होती ती किमान आता अमृत महोत्सवी वर्षांनंतर तरी प्रत्यक्ष कारभारात आणा . अमृत महोत्सव साजरा करताना जनतेसाठी ग्रामपंचायत ते महानगरपालिकांचा कारभार संकेतस्थळावर टाकण्याच्या निर्णय घेऊन लोकशाही प्रत्यक्ष कारभारात आणण्याचा "श्रीगणेशा " करा .
प्रत्येकाने घरावर झेंडा लावा हे सांगताना हि गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की , आज ही भारतातील मोठा गट घरांपासून वंचित आहे . स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील दर्जेदार शिक्षण , पायाभूत सुविधांनी सुसज्ज आरोग्य व्यवस्थेची वानवा आहे . कोरोना कालावधीत शिक्षण आणि आरोग्याची झालेली ससेहोलपट यासाठीचा सर्वोत्तम पुरावा ठरतो .
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याला तेंव्हाच अर्थ प्राप्त होऊ शकतो की , जेंव्हा प्रत्यक्ष कारभारात लोकशाही अंमलात आणली जाईल तेंव्हा . प्रत्यक्ष कारभारात लोकशाहीला वेशीबाहेर ठेवत 'घर घर तिरंगा " या सम उपक्रम केवळ देखावा ठरतो . कटू वाटेल पण हेच सत्य आहे .
देशाभिमान , स्वाभिमान म्हणजे धुतराष्ट्र -गांधारी दृष्टीने लोकशाही व्यवस्थेकडे पाहणे नव्हे . देशहितासाठी जे जे आवश्यक त्या त्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणे म्हणजे देशप्रेम होय .
शेवटी , १४० करोड जनतेच्या "मन की बात " हिच आहे की , कुठे आहे लोकशाही ?
हा प्रश्न जनतेला विचारण्यासाठी संधी द्यावयाची नसेल तर आपण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार , राज्याच्या सर्व लोकाभिमुख योजनांचा लेखाजोखा , राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व खात्यांचा कारभार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पब्लिक डोमेनवर खुला करण्याची घोषणा करावी आणि प्रत्यक्ष कारभारात लोकशाहीचा " श्रीगणेशा " करावा . करावी . प्रत्यक्ष कारभारात लोकशाहीला कोसो दूर ठेवत , लोकशाहीचा अमृत महोत्सव साजरा करणे हा केवळ आणि केवळ लोकशाहीच्या नावाने सुरु असणारा कोरडा सोपस्कार ठरू शकतो .
"लोकशाहीतील व्यवस्था वजा लोकशाहीतील नागरिक " अशा व्यवस्थेला लोकशाही संबोधणे हीच मुळात देशाची आणि जनतेची शुद्ध फसवणूक ठरते .
कळावे ,
आपला नम्र
(महाराष्टातील करदाता नागरिक)
प्रत : सुयोग्य कार्यवाहीसाठी
१) मा . उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .
२) मा . लोकायुक्त , महाराष्ट्र राज्य
३) मा . वरिष्ठ अधिकारी , मंत्रालय , महाराष्ट्र राज्य .
४) मा . जिल्हाधिकारी (महाराष्ट्रातील सर्व जिल्हे )
५) मा . संलग्न अधिकारी (सर्व स्थानिक स्वराज्य संस्था )
६) मा . संपादक आणि प्रतिनिधी (प्रिंट / इलेक्ट्रॉनिक्स मीडिया )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा