जनतेच्या न्यायालयात सर्वच राजकीय पक्ष ,नेते "अपात्र " ठरत असल्याने
लोकशाहीच्या जतन -संवर्धनासाठी संपूर्ण ५ वर्षासाठी "आदर्श आचासंहिता " निकडीची
!!!
सध्या परीक्षांचा काळ सुरु आहे . परीक्षा म्हणजे त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरींचे मूल्यमापन . त्या त्या वर्गाला , त्या त्या विषयाला शिकवणारे शिक्षक -अध्यापक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत असतात . काही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची आवश्यकताच असत नाही कारण त्यांचे वर्षभराच्या वर्तनातून त्यांच्या गुरूंना त्यांची कामगिरी ज्ञात असते . अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्वारे मूल्यमापन हा केवळ सोपस्कार ठरतो कारण ते गुरुजनांच्या नजरेतून आधीच 'अपात्र ' ठरलेले असतात .
जनतेच्या न्यायालयात सर्वच राजकीय पक्ष ,नेते "अपात्र " !
वर्तमानातील सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे मतदारांच्या दृष्टीने "अपात्र " ठरलेले आहेत . निवडणुकीतील मतदानाद्वारे त्यांचे मूल्यमापन हा केवळ सोपस्काराच ठरतो .
" भारतातील लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि मतदार हा लोकशाहीतील राजा असतो " हे वाक्य भारतीय लोकशाहीतील सर्वात दिशाभूल करणारे वाक्य आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही . वास्तव हे आहे की , निवडणुकीतील मतदाना व्यतिरिक्त मतदारांना काडीचीही किंमत नसते . यासाठीचा सर्वोत्तम पुरावा म्हणजे " स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होऊन देखील अजूनही लोकशाहीतील बहुतांश यंत्रणांचा कारभार हा मतदारांपासून गुप्त ठेवला गेलेला आहे ".
अलीकडच्या काळात कुठल्याही नेत्यांवर , राजकीय पक्षावर कुठलेही गंडांतर आले की त्या पासून बचाव करण्यासाठी एक वाक्य सर्रासपणे वापरले जाते ते म्हणजे " आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागू " ! हि सुद्धा केवळ दांभिकताच असते कारण जी मंडळी जनतेला सर्वोच्च स्थानी मानतात त्या त्या राजकीय पक्षाना , नेत्यांना जनतेची -मतदारांची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळी होते , अडचणीच्या प्रसंगावेळी होते . मतदारांना राजा संबोधणारे नगरसेवक ,आमदार -खासदार मतदारांकडे ढूंकुनही पाहत नाहीत . एवढेच कशाला यांच्या "संपर्क कार्यालयाला लागलेले टाळे देखील केवळ निवडणुका आल्यावरच उघडतात " .
अन्य वेळी गरजवंत मतदारांना त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी वणवण भटकावे लागत असते . ज्यांना "मतदार राजा " म्हणून संबोधले जाते त्या मतदाराला मतदान कक्षातून मतदान करून बाहेर पडल्यानंतर पुढील ५ वर्षे काडीचीही किंमत दिली जात नाही आणि तरीही दवंडी पिटवली जाती की भारतातील लोकशाही हि जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही व्यवस्था आहे . याला केवळ आणि केवळ "राजकीय नौटंकी " असेच संबोधले जाऊ शकते .
महाराष्ट्राचे नाव मोठे लक्षण खोटे :
राजकीय क्षेत्र वगळता महाराष्ट्राचे देशपातळीवरील नाव मोठे असले तरी महाराष्ट्र्रातील गेल्या ५ वर्षातील भाजप -काँग्रेस -शिवसेना -राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्वच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या , लोकप्रतिनिधींच्या नैतिकताशून्य , विचारशून्य , चारित्र्य शून्य वर्तनामुळे महाराष्ट्राची अवस्था "नाव मोठे ,लक्षण खोटे " अशी झालेली आहे.
ज्या पद्धतीच्या कोलांटउड्या सर्वच्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी , लोकप्रतिनिधींनी मारलेल्या आहेत त्याकडे "डोळसपणे " पाहिले तर महाराष्टातील प्रत्येक मतदारापुढे हा प्रश्न उभा राहिलेला आहे की , निवडणुकीतील आपल्या मताला काडीचीही किंमत नसेल तर आम्ही मतदान तरी का करायचे? असे मत व्यक्त केले की एरवी मूग गिळून , डोळे मिटून लोकशाहीचा तमाशा निमूटपणे पाहणारी तथाकथित बुद्धिवादी , लोकशाही वादी मंडळी तत्वज्ञानाचा डोस पाजायला सुरुवात करतात की , मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठे दान आहे , कर्तव्य आहे . अगदी मान्य . पण मुद्दा हा आहे की "दान सत्पात्री नको का ?". आम्ही कर्तव्य पार पाडले नाही तर लोकशाहीचा सन्मान होत नाही , मग ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेले असते आणि ज्या कर्तव्यासाठी निवडून दिलेले असते ते त्यांनी पार पाडले नाही तर तो लोकशाहीचा "अपमान " ठरत नाही का ?
यक्षप्रश्न : पक्ष म्हणून मतदान का करायचे ? कोणत्या पक्षाला करायचे ?
भारतीय लोकशाही व्यवस्थेत "राजकीय पक्ष " हि संकल्पना आहे . त्या त्या राजकीय पक्षाची विचारधारा असते . कार्यपद्धती असते . त्या त्या पक्षाचा झेंडा असतो . चिन्ह असते . कार्यसंस्कृती असते . देशाबद्दल विचारधारा असते . त्यास अनुसरून मतदार मतदान करत असतात . म्हणूनच अमुक -तमुक पक्षाचे सरकार असे संबोधले जात असे . अलीकडे युती -आघाडीचे सरकार असे संबोधले जाऊ लागले होते कारण २ पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत असे .
पण गेल्या ५ वर्षातील महाराष्ट्रातील सरकारे हि "खिचडी सरकार " ठरत आहेत . कारण निवडणूका पूर्वी युती -आघाडी हा राजधर्म सोडून सत्ताधर्म प्राप्त करण्यासाठी कोणताही विचार न करता एकत्र येऊन सरकारने 'बनवलेले ' आहेत .
गेल्या ५ वर्षात प्रत्येक राजकीय पक्षाचा आमदाराने सत्ताधारी व विरोधी या दोन्ही भूमिका निभावल्या आहेत . महाराष्ट्रातील मतदारांनी राजकीय पक्ष , राजकीय चिन्ह पाहून जे मतदान केलेले होते त्याला सर्वच राजकीय पक्षांनी पायदळी तुडवत "सत्तेसाठी वाट्टेल ते " असे वर्तन ठेवलेले आहे . त्यामुळे एक वेळ मतदान करायचे ठरवले तरी "नेमके कोणत्या पक्षाला ?" मतदान करायचे हा यक्षप्रश्न महाराष्ट्रीयन मतदारांसमोर उभा राहिलेला आहे कारण गेल्या ५ वर्षातील लोकप्रतिनिधींच्या सत्तालोलुप वृत्तीमुळे पक्ष हि संकल्पनाच निकालात निघालेली आहे . केवळ आणि केवळ "सत्ता " प्राप्ती या लोभामुळे " विचारधारा " या दृष्टिकोनातून कोणत्याच राजकीय पक्षाचे अस्तिव उरलेले नाही .
झेंड्याचे रंग वेगवेगळे असले , पक्षचिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वच राजकीय पक्षानी व नेत्यांनी , लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तनातून जनतेसमोर हे नागडे वास्तव आणले आहे की " झेंडा ,चिन्ह हे केवळ वरवरचे आहे , आतून सर्वच सर्वच "एनकेन प्रकारे सत्ताप्राप्ती " या व्याधीमुळे आतून सर्व एकच आहेत ". त्यांच्यात पक्षचिन्ह , झेंडा , पक्षाचे नाव वगळता "वेगळेपण " असे काहीच उरलेले नाही .
या सर्व पार्श्वभूमीवर अमुक तमुक एका पक्षाची ध्येयधोरणे , विचारधारा लक्षात घेऊन मतदान केले जाऊ शकते हि शक्यताच पूर्णपणे मावळली आहे . पुरोगामी ,पुरोगामी ,पुरोगामी असा डंका पिटवणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने , संवेदनशील नागरिकांच्या दृष्टीने , मतदारांच्या हि सर्वात मोठी शोकांतिका ठरते .
आदर्श आचारसंहिता निवडणुकीनंतर देखील हवी :
निवडणुका जाहीर झाल्या की "आदर्श आचारसंहिता लागू " होते . लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर अंकुश येतो . प्रशासकीय मंडळींना लगाम घातला जातो . त्यामुळे का होईना किमान "लोकशाहीच्या नावाने निवडणुकांचा सोहळा "पार पाडला जातो . लोकशाहीचे अस्तित्व जपण्याचे -टिकवण्याचे -समृद्ध करण्याचे प्रयत्न केले जातात . खेदाची गोष्ट हि आहे की स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर देखील आपल्या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीनंतरच्या लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर कुठलाच अंकुश नाही . त्यामुळेच वयानुसार लोकशाही व्यवस्था अधिक प्रगल्भ ,समृद्ध होण्याऐवजी अधिकाधिक विकलांग , अपंग होते आहे . निवडणुकीपूर्वीच्या लोकशाहीला निवडणुकीनंतर 'हुकूमशाहीचे , मनमानीशाहीचे स्वरूप येताना दिसत आहे . राज्यकर्त्यांच्या , आमदार -खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारी कोणतीच 'अधिकृत व्यवस्था ' नसल्याने जाहिराती ,आश्वासने , जाहीरनामे यांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जाताना दिसते आहे . ५ वर्षातील कामगिरी बाबतच्या जाहिराती आणि वास्तव यात मोठी तफावत दिसते .
एकुणातच अलीकडच्या काळातील सर्वच्या सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांचे वर्तन लक्षात घेता भारतीय लोकशाहीचे अस्तित्व टिकवायचे असेल , लोकशाही अधिक लोकाभिमुख , समृद्ध , बळकट करावयाची असेल तर निवडणुकीच्या नंतरच्या काळासाठी देखील "आदर्श आचारसंहिता " योजून तिची काटकोर अंमलबजावणी करण्याशिवाय अन्य पर्याय असत नाही .
सर्व मतदारांनी आता त्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
संपर्क : ९८६९२२६२७२ / danisudhir@gmail.com
[ लेखक विविध सामाजिक राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत ]
आपण स्पष्टपणे मांडलेली मते अत्यंत योग्य आहेत.
उत्तर द्याहटवाNo candidate is adequately educated so that he can understand the provisions of constitution before making of laws for public. They have no knowledge of English. To meet the world leaders one has to understand English & not local language. Those who have no experience of nagarsewak are opting to become member of parliament.
उत्तर द्याहटवामतदारांनी,जनतेने आमदार खासदार यांना अवास्तव महत्त्व देणे बंद केले पाहिजे.त्यांच्या सर्व सुखसुविधा काढून घेतल्या पाहिजेत.लोकसेवक,जनसेवा काय असते हे सांगितले गेले पाहिजे.जुना काळ असा होता जेंव्हा यांना काही सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या तेंव्हा जबरदस्तीने उमेदवार उभा करावा लागत होता.तो अविरोध निवड येत होता.आता ' असतील शिते तर जमतील भूते ' असा प्रकार पहायला मिळत आहे.
उत्तर द्याहटवा