THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

सामाजिक कार्यकर्त्यांवरील जीवघेणे हल्ले आणि त्याप्रती प्रशासकीय -सामाजिक -राजकीय निष्क्रियता , उदासीनता : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा !!!

  शिक्षक - शिक्षणतज्ज्ञ , विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ता हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याकडे एक वैयक्तिक पातळीवरील घटना अशा दृष्टिकोनातून पाहता या घटनेकडे व्यापक स्वरूपातून पाहणे आवश्यक आहे . या हल्ल्यामागचे समोर आलेले कारण म्हणजे सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात १०० यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असूनही शाळेच्या परिसरात असणाऱ्या टपऱ्या हटवण्यासाठी प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा

         एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे आणि यासाठी एक महत्वाचे कारण म्हणजे खुलेआम पद्धतीने मिळणारे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ .

           हि बाब लक्षात घेऊन "जाऊ द्या , हे असेच चालायचे !आपल्याला काय करायचे ? "  अशा प्रकारची असंवेदनशील भूमिका घेता  एक संवेदनशील शिक्षक या नात्याने त्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य पार  पाडले आणि या चांगल्या कामाची शिक्षा त्यांना भोगावी लागली हि बाब अत्यंत निषेधार्य आहे हे नक्की .

                     त्याही पेक्षा अधिक निषेधार्ह बाब आहे ती म्हणजे या घटनेपश्चात त्यांना मिळालेली पोलीस विभागाची वागणूक , मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेऊ पर्यंत स्थानिक आणि राज्य पातळीवरील प्रसारमाध्यांनी केलेले दुर्लक्ष , शिक्षक संघटनेची अलिप्तता , समाजाने चार दूर राहण्याची घेतलेली भूमिका या अधिक निषेधार्य आहेत . शनिवारी घडलेल्या घटनेची प्रमुख वृत्तपत्रात मंगळवारी बातमी आली . इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यानंतर जागे झालेले दिसले . एरवी राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी घट्ट झाले तरी त्याची ब्रेकिंग करणाऱ्या प्रसार माध्यमांना हि घटना महत्वाची वाटू नये यातून प्रसारमाध्यमांच्या प्रगल्भतेवर प्रश्चचिन्ह निर्माण होते .

               सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे शिक्षक संघटनांची अलिप्तता . शिक्षण संघटनांना व्यवस्थेला शरण जाणारे शिक्षक हे  व्यवस्थेला जागे करण्यासाठी समोर येणाऱ्या शिक्षकांची ऍलर्जी आहे का  ?  हा प्रश्न देखील यातून समोर आलेला दिसतो

   व्यवस्थे विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला समाजाचा सक्रिय पाठिंबा मिळाला नाही तर भविष्यात पुरोगामी महाराष्ट्रातील व्यवस्थे विरोधातील आवाज क्षीण होत जाण्याचा धोका संभवतो आणि त्याची परिणीती व्यवस्थेच्या अधःपतनात होऊ शकते .

                उरतो प्रश्न सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा ! त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरते कारण  "समाजकंटक  अप्रवृत्ती " हे भांडवल असते . अशा प्रवृत्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवत त्यांना  आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो त्यामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांना जरब बसवणारे समाज कंटक " आपले कार्यकर्ते " वाटत असतात हे नागडे सत्य आहे .  तशी भूमिका उघड उघड घेता येत नाही म्हणून लोकलज्जेस्तव सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी हे  निषेधाचा सूर लावत असतात . मुळात राजकीय वरदहस्त असल्याशिवाय समाज कंटक वृत्तीच्या व्यक्ती इतक्या बिनधास्तपणे समाजात वावरूच शकत नाही  हे देखील आणखी एक नागडे सत्य आहे . कटू असले तरी हे वास्तव आहे आणि ते नाकारले जाऊ शकत नाही .

                    प्रश्न हा एकट्या हेरंब कुलकर्णींचा नसून, प्रश्न आहे तो या घटनेतून सामाजिक कार्यकर्त्यांना जाणाऱ्या संदेशाचा . जी व्यक्ती समाजासाठीच  व्यवस्थेविरोधात लढा देते त्या व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद ज्या प्रमाणावर  समाजात पडणे अपेक्षित होते ते ना अहमदनगर मध्ये दिसून आले ना राज्य पातळीवर . खरे तर किमान शाळेत शिकणाऱ्या सर्व पालकांनी एकत्रित येऊन आरोपींना पडकून कठोरात कठोर शिक्षा द्या यासाठी पोलीस विभागाला निवेदन दिले पाहिजे होते . अहमदनगर शहरातील  विचारवंत मंडळी , सामाजिक कार्यकर्ते , समाजसेवकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून समाज कंटकांना खणखणीत इशारा देणे अपेक्षित होते . पण खेदाची बाब हि आहे की  प्रशासकीय यंत्रणा , राजकीय व्यक्ती यांचे सोडा  समाजाची उदासीनता , अलिप्तता , निष्क्रियता  अधिक खटकणारी आहे  .

                   समाजासाठी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्याचा आवाज बंद करण्याच्या घटनेला पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात मिळणारा थंड प्रतिसाद हा  धोक्याची घंटा ठरू शकतो कारण भविष्यात पुढे येणारे विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते  समाजासाठी व्यवस्थे विरोधात उभे राहताना १०० वेळा विचार करतील  .

                 हेरंब कुलकर्णीच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर निषेधाचा सूर लावल्यानंतर वरिष्ठ पातळीवर या घटनेची दखल घेतली गेली . त्या नंतर पोलीस सूत्रे हालली  , कारवाईला सुरुवात झाली , प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली . हा घटना क्रम सामाजिक वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला शोभनीय असत  नाही . यातून महाराष्ट्राचे नैतिक ,सामाजिक , प्रशासकीय -राजकीय अधःपतनच अधोरेखित होते . या दृष्टिकोनातून या जीवघेण्या हल्ल्याकडे पाहून महाराष्ट्रात  विचारमंथन होणे  अत्यंत निकडीचे आहे .

           आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे अहमदनगर शहराचे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची  अवैध गोष्टीकडे उघडउघड  केली  जाणारी  डोळेझाकहि बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की  प्रशासनचा , स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याशिवाय उघडउघड अवैध गोष्टी सुरु राहू शकत नाही . टपऱ्या हि केवळ एक प्रातिनिधिक गोष्ट झालीया घटनेमुळे पालिकेच्या आणि पोलिसांच्या अन्य अशा  कायदेबाह्य गोष्टींना असणाऱ्या वरदहस्ताचा मुद्दा देखील  अत्यंत महत्वाचा ठरतो  . प्रशासनाने सरकारनेच केलेल्या नियमाचे , कायद्याचे पालन केले असते तर हेरंब कुलकर्णींना प्रशासनाला जागे करण्याची वेळच आली नसती . उलटपक्षी  प्रशासनाच्या " बेकायदेशीर , अवैध गोष्टींकडे असणाऱ्या अर्थपूर्ण  दृष्टिकोनामुळे " समाजकंटकांना , गुन्हेगारांना धाक उरलेला दिसत नाही . त्यामुळेच अल्पवयीन विद्यार्थी वयातील मुले केवळ १५ हजारांसाठी  एक व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करू शकतात .

    विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांनी एक शिक्षकावर केलेला हल्ला हा वर्तमान शिक्षणाचे अपयश देखील अधोरेखित करणारा आहे . शिक्षण सोडून युवक का भरकटले जात आहेत ? महाराष्ट्राची उडता पंजाब कडे  प्रवास तर सुरु झालेला नाही ना ? या अंगाने देखील महाराष्ट्रात विचार मंथन होणे आवश्यक आहे .

                  व्यवस्था परिवर्तनासाठी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या , सामाजिक कार्यकर्त्याचा वसा स्वयंप्रेरणेने घेणाऱ्या व्यक्तींनी 'जीवाला धोका ' या गोष्टीची थोडी बहुत जाणीव असतेच असते त्यामुळे वर्तमानात महाराष्ट्रात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते या घटनेमुळे मागे हटणार नाहीत हे नक्की पण त्यांच्या प्रति अशाच प्रकारची  सामाजिक , प्रशासकीय उदासीनता , असंवेदनशीलता वारंवार समोर येऊ लागली तर भविष्यात सामाजिक परिवर्तनासाठी आपला जीव धोक्यात घालून  सामाजिक कार्यकर्ता , समाजसेवकाचा सदरा घालायचा की  नाही याबाबत नवीन कार्यकर्ते नक्कीच विचार करू लागतील हे नाकारता येणार नाही . आणि हि गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची मोठी  हानी करू शकणारी ठरू शकेल . "पुरोगामी विचारांचा वारसा " जपणारा महाराष्ट्र अशी दवंडी पिटणाऱ्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ठरू शकते . 

शाळाबाह्य परिसर तंबाखूमुक्त करा : या घटनेतून संपूर्ण राज्यात शैक्षणिक संस्थाबाहेरील तंबाखूमुक्त परिसर नियमाची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे .  या घटनेतूं सकारात्मक बदल घडला जावा हि अपेक्षा आहे . राज्य सरकारने राज्यातील जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त , मुख्याधिकारी , पोलीस आयुक्तांना  आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळा , महाविद्यालये परिसर नियमानुसार तंबाखू मुक्त करण्याचे आदेश द्यावेत . भविष्यात शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू , गुटखा , तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असतील तर त्याची गुप्तपद्धतीने तक्रार करण्यासाठी ईमेल आयडी , व्हाट्सअँप नंबर जाहीर करावा .

                                                                                                                                                                                                             सुधीर लक्ष्मीकांत दाणी .

संपर्क :  danisudhir@gmail.com   9869226272

(लेखक   सामाजिक कार्यकर्ते आहेत )

    

२ टिप्पण्या:

  1. आपण अगदी योग्य विषयाकडे लक्ष वेधले आहे, त्याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद! एक प्राध्यापक म्हणुन मला या घटना क्रमाचे वाईट तर वाटलेच पण कोठेतरी "मी तरी काय केले?" हो बोच मनाला लागली! शिक्षक आमदार आणि इतर संघटना यांची भुमिका अधिक महत्त्वाची वाटते!
    दिलीपभानु

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय सुधीरजी,आपण नेहमीच अन्याया विरूध्द आवाज उठवत असतात पण आज एका नामवंत शिक्षक तज्ञा वरील अन्याय सहन न झाल्याने तुम्ही समाजासह आणि सर्व शासन व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कामच केले नव्हे तर हृदयापर्यत हात घातला.आता शिक्षकांनी व शिक्षक प्रेमींनी आर्य चाणक्य शिक्षक मंच तयार करून गावोगावी धनानंद नेत्यांना जरब बसण्यासाठी चंद्रगुप्त तयार केले पाहिजे. यासाठी अल्प बुद्धीने कविता केली .ती सादर करत आहे.

    आर्य चाणक्य पुन्हा जन्मवा

    तालुक्यात नेते झालेत एवढे उदंड.
    नेते होण्यासाठी आहे का मापदंड?

    नेते होण्यासाठी देऊ आता आदर्श
    तरच आपल्या सर्वांचा खरा उत्कर्ष

    ज्याच्या गावात शाळा असेल आदर्श
    मुले उद्याची राष्ट्र संपत्ती, हा परामर्श

    ज्या गावी आहे आदर्श शेत ग्राम रस्ते
    शेतकऱ्यांच्या समृद्धीचे आहे हम रस्ते

    ज्या नेत्याची आपली भावकी आदर्श
    तोच इतरांना संस्काराचे देईल परामर्श

    आमच्या गावोगावी एवढे आहे शिक्षक
    राज्यालाही आम्ही पुरावितो हे शिक्षक

    तरी गावोगावी नेते आहे एवढे धनानंद
    शिक्षकांचा अपमान करण्यातच आनंद

    गावातून एकतरी व्हावा आर्य चाणक्य
    तरच धनानंद नेते ठेवतील गावा ऐक्य

    ज्या गावी आदर्श शिक्षका नाही मान
    तेथेच गरीबाचीच कापली जाते मान

    शिक्षक व शिक्षण प्रेमींना हे आव्हान
    आदर्श गावच्या नेत्याचा व्हावा मान

    आदर्श गावचे दोनच नेते ते आदर्श
    नेता निवडीला घेऊ त्यांचा परामर्श

    शिक्षक व शिक्षण प्रेमी करुया मंच
    तरच धनानंद पुढाऱ्यांना बसेल पंच.

    यासाठी समजुन घेऊ आर्य चाणक्य
    धनानंदाला प्रती उत्तर नव्हते शक्य

    तयाला इतरांचा अपमानी वाटे आनंद
    राजाला ज्ञान सभा घेण्याचा होता छंद

    ज्ञानी जनांचा अपमानातही परमानंद
    यातूनच चाणक्याने दम दिला धनानंद

    'तुझे राज्य उलथून टाकेल' ही प्रतिज्ञा
    'तोपर्यंत शेंडीस गाठ नाही' मज आज्ञा

    आर्य चाणक्याने घडवून चंद्रगुप्त मौर्य
    'धनानंद पदचुत करून' हे केवढे शौर्य!

    दस सहस्त्र बुद्धे शिक्षकांना सहज शक्य
    गावागावातून करता येईल आर्य चाणक्य

    आर्य चाणक्या होता,धनानंद होतील नष्ट
    तव आमदार नेता जनतेसाठी घेईल कष्ट.

    शिक्षकात पहा,तुम्ही केवढे मोठे हे शौर्य!
    धनगराच्या मुलालाही केले चंद्रगुप्त मौर्य.

    पारनेर तालुक्यातील शिक्षक आहेत महान
    त्यांनी घडविलेला नेता, राहणार नाही लहान.

    दोन आदर्श गावचे नेते देशाला ठरले आदर्श
    त्यांच्या मार्गदर्शनाने आमदार मिळेल आदर्श.

    शिक्षकांना आदर्श गाव नेत्यांचे हे मार्गदर्शन
    आदर्श आमदारचे देशाला होईल खरे दर्शन.

    रचना भास्कर चेमटे मो.9423786744
    दिनांक २१/१०/२०२३

    उत्तर द्याहटवा