THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव उद्दिष्टपूर्तीचे " विसर्जन " तर होत नाही ना ?




आज गणेश विसर्जन . बुद्धीच्या देवतेचे विसर्जन . गेल्या काही वर्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मत . 

            निर्मितीच्या उद्दिष्टालाच हरताळ फासणे यात भारतीयांचा हातखंडा आहे हा आपला इतिहास आहे . याचे वर्तमानातील उदाहरण म्हणजे 'गणेशोत्सव'

      १८९३ ला लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला त्याची उद्दिष्टपूर्ती आजच्या गणेशोत्सवात होते आहे का ? याचे उत्तर सर्वार्थाने नकारात्मकच आहे . का होते आहे असे ? यास समाज म्हणून कोण जबाबदार आहेत ? या समाजाचा घटक म्हणून आपण उत्सवाच्या बाजारीकरणास जबाबदार आहोत का ? अगदी साधी गोष्ट पहा . या गणेशोत्सवासाच्या कालावधीत तलावात प्लास्टिकसह फेकले जाणारे निर्माल्य आपल्या बुद्धीच्या  विसर्जनाचे तर प्रतीक ध्वनित करत नाही ना ?  वर्तमान गणेशोत्सवाची दिशा आणि दशा या सगळ्याचा 'डोळस ' धांडोळा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . धार्मिक उत्सव आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत त्यामुळे उत्सवांना विरोध असण्याचा प्रश्नच असत नाही , प्रश्न आहे तो उत्सवाच्या विद्रुपीकरणाचा , उत्सवाच्या बाजारीकरणाचा .  


         एखाद्या गोष्टीचे , व्यवस्थेचे राजकीय ध्रुवीकरण झाले , बाजारीकरण झाले की त्याची 'मातीच ' होते याची प्रचीती इतिहासातून होतच असते . आज साजरे केले जाणारे धार्मिक उत्सव जसे दहीहंडी , नवरात्रौत्सव , उरूस , धार्मिक मिरवणुका , गणेशोत्सव पाहता 'धार्मिकतेच्या प्रमुख हेतूवर ' कुरघोडी होते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये .

       परमेश्वराला सर्वांचा मालक समजतात परंतु आजच्या प्रगत (?) युगात मनुष्य"प्राणी " हा परमेश्वराचाही 'मालक ' होताना दिसतो आहे . अनेक मंदिरे , धार्मिक उत्सव हे 'अमुक-तमुक ' च्या नावाने ओळखले जातात .अमुक -तमुकची  दहीहंडी ,यांचा -त्यांचा  गणपती , अमुक -तमुकचे  शंकर मंदिर हे प्रातिनिधिक उदाहरणे .  आपण " मालक "  झाल्याच्या वृतीतूनच लालबागसारख्या विविध राजाच्या दरबारात दिसणारी दबंगगिरी जन्मास येते .

        एकीकडे धार्मिकता (?) वाढते आहे असे चित्र उभे राहत असताना समजातील नैतिकतेचे मात्र अध:पतन होते आहे , हे विरोधाभासी चित्र 'धार्मिकतेचे बेगडीपण ' अधोरेखित करते . मंदिरांच्या ठिकाणी सोने-चांदी - रुपये सढळ हाताने दान करणारे हात मात्र माणसातले देवपण जपण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजसेवी संस्थाना 'हात' देताना मात्र का  थरथरतात हे अनाकलनीय आहे .

  उत्सवांच्या मूळ हेतुंचेच विसर्जन
   
     गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत आणि सकृत दर्शनी हि आशादायक व आनंदाची बाब आहे . धार्मिक उत्सवांचे मुख्य प्रयोजन हे सामाजिक प्रबोधन , नैतिक मूल्यांचे बीजारोपण , संस्कृतीचा व्यापक स्तरावर प्रचार -प्रसार , सामाजिक एकात्मतेच्या भावनेचे जतन आणि संवर्धन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात काही विरंगुळ्याचे क्षण ईत्यादी असते . वर्तमान सार्वजनिक उत्सव यापैकी किती उदिष्टपूर्ती करतात या प्रश्नांचे 'डोळस ' उत्तर दुर्दैवाने बहुतांश पातळीवर नकारात्मकच आहे .

          उलटपक्षी जसजशी उत्सवांच्या संख्येत आणि प्रमाणात वाढ होते आहे तसतशी त्यांचे तोटे अधिक प्रमाणात जाणवू लागले आहेत . ध्वनीप्रदूषण , जलप्रदूषण , रस्ताबंदी -नुकसान , खंडणीसदृश्य वर्गणी या बरोबरच सार्वजनिक उत्सवांना लागलेले आणखी एक ग्रहण म्हणजे " अधिकृत वीजचोरी ". या उत्सवांसाठी थेट विजेच्या डीपीतून-पोलवरून उघड उघड वीज चोरी हा ' सरकारमान्य हक्कच '  आहे  अशा प्रकारे विजेची उधळपट्टी चालू असते .

         मुळात आपल्याकडे ' धर्माचे ' लेबल लावले की , सर्व कायदे -नियम गुंडाळून ठेवले जाऊ शकतात अशी सार्वत्रिक धारणा झाली आहे आणि त्यामुळेच उत्सवांना हिडीस रूप येताना दिसते आहे .  सर्वात महत्वाचे  म्हणजे वर्तमान उत्सवांना ' धार्मिक उत्सव ' संबोधणे कितपत न्यायपूर्ण आहे .

             अर्थातच आजही काही सार्वजनिक मंडळे आहेत की जे सार्वजनिकतेचे भान जपत असतात . पण अशी मंडळे अपवादानेच आढळतात . हे दुर्दैव्य

बुद्धीच्या देवतेच्या पायाशी 'निर्बुद्धांची ' गर्दी : 

      मुळातच ३० तास एका विशिष्ट ठिकाणच्या देवताच्या दर्शनासाठी उभे राहणाऱ्यांना श्रद्धावान समजने हे 'परमेश्वर सर्वत्र असतो ' या मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे आहे . 

     विशिष्ट ठिकाणचा गणपती हा नवसाला पावतो हि धारणा इतर ठिकाणच्या गणपतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत नाही का ? ज्यांच्या नवसाला पावला त्यांनी नवस फेडायचा तर प्रश्न हा राहतो कि ज्यांना पावला नाही त्यांनी काय खटले भरावयाचे का ? जो या पृथ्वीच्या निर्माता आहे त्याला 'अमुक होऊ दे , मग तमुक करीन' हा अधिकार मानवाला कसा प्राप्त होतो ? देवाला सर्व ज्ञात असते असे म्हणतात तोच देव लाच -भ्रष्टाचार -काळे धंदे यातून मिळवलेल्या पैशाचे दान देणाऱ्याला कसा पावतो ? चोरून वीज वापरणाऱ्या , देवाच्या आगे-मागे जुगार खेळणाऱ्या , आगमन-विसर्जन मिरवणुकीत 'अमृत' प्राशन करून बेधुंद नाचणाऱ्या भक्तांना बुद्धीचा देव सदबुद्धी का देत नाही याचे उत्तर धर्मपंडित देणार का ? राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना मिळणारी 'विशेष ' वागणूक परमेश्वराच्या दारातही 'माणूस ' समान  नाही हेच दर्शविते ना ? अशावेळी वेगळी रांग ठेवण्यापेक्षा वेगळी मंदिरे ठेवणे जास्त सयुंक्तिक असणार नाही का ? यासम अनेक प्रश्नाची उत्तरे प्रतीक्षित आहेत .

   उत्सवांच्या बाजारीकरणात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा :  

      धार्मिक उत्सवाचे  ' इवेन्ट ' करण्यात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा आहे . खासकरून वृत्त वाहिन्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे.   सुदैवाची गोष्ट हि कि अलीकडच्या काळात अनेक नागरिकांना  भान आल्यामुळे धार्मिकतेच्या (?) नावाखाली चालणाऱ्या या दुकानापासून त्यांनी फारकत घेतली आहे . अनेक गणेश मंडळाचे मंडप ओस पडलेले दिसत होते .(वर्गणी देणे म्हणजे सहभाग नव्हे !) होय ! नास्तिक म्हणून आपण उपरोक्त विचारांना  स्वार्थापोटी दूर करू शकू ! परंतु  अंध आस्तिक असण्यापेक्षा 'डोळस नास्तिक' असणे निश्चितच उत्तम ठरू शकते . स्पष्ट विचारांना 'नास्तिकतेचे ' लेबल लावणाऱ्याना एक प्रश्न अगदी विनम्रपणे विचारावासा  वाटतो की नवरात्र उत्सवानंतर प्रचंड वाढणारे 'गर्भपाताचे प्रमाण कोणती धार्मिकता ध्वनित करते ? 

            तात्पुरत्या मंडपांचे जेंव्हा कायम स्वरुपात रुपांतर होऊन  त्याच अनधिकृत ठिकाणावर त्या विभागाच्या ' राजाचे ' ( मंदिर उभारणारा स्थानिक नेता 'राजाच '  असतो त्यामुळेच कदाचीत देवालाही त्या त्या विभागाचा राजा संबोधण्याची प्रथा दिसते ) मंदिर  कायमस्वरूपी मंदिर उभा राहत असेन तर ते योग्य आहे  का ? अन्य कू -प्रथांवर अनेकवेळा चर्चा होत असते परंतु नेते आणि सरकारच उत्सव प्रिय असल्यामुळे वर्षानुवर्षे कायदे पायदळी तुडवली जात आहेत .


 " सार्वजनिक उत्सव  "  संबोधने कितपत रास्त ? :   

     उत्सव सार्वजनिक आणि धार्मिक असतो ना ? मग गणपती -देवीचा फोटो एका कोपऱ्यात टाकून काही मंडळींचा स्वतःचे फोटो मिरवणाऱ्या फ्लेक्सचा अट्टाहास कशासाठी ? स्वतःची प्रसिद्धी न करता कराना धार्मिक उत्सव साजरे ! त्या त्या विभागातील केवळ ५-१० मंडळींच्या ताब्यात असणाऱ्या उत्सवांना सार्वजनिक म्हणून संबोधणे हाच मुळात दांभिकपणा दिसतो 
. 
   मुळात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की  तेच सत्य वाटू लागते . या उत्सवांच्या बाबतीतही काहीसे तसेच होताना दिसत आहे . विद्यमान उत्सव ' धार्मिक ' आहेत , ते 'सार्वजनिक ' आहेत ; ते लोकाग्रहास्तव साजरे केले जातात , ते  समाज प्रबोधनासाठी आहेत  वगैरे वगैरे आज ज्या विकृत पद्धत्तीने उत्सव साजरे केले जातात ते पाहता उपरोक्त उल्लेखित  गोष्टींची ते पूर्तता करतात का हा खरा प्रश्न आहे .
                  एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे कि एकूणच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतची  सद्यस्थिती पाहता  लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन होते आहे ? असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही .

सार्वजनिक धार्मिक उत्सवांना ' वीजचोरीचे ' ग्रहण :


         मुंबई व उपनगरात  जवळपास १४ हजार छोटी -मोठी गणेश मंडळे असल्याचे समजते , पैकी ६००० हजार मोठी मंडळे आहेत . ३  वर्षांपूर्वी माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार केवळ २० टक्के मंडळानी तात्पुरत्या स्वरुपाची वीजजोडणी घेतल्याचे दिसते . १० दिवस विजेची मुक्तहस्ते उधळण करूनही अनेक मंडळांचा वीजवापर ५०/१०० युनिट असल्याचे दिसते .  अनेक नामवंत ' राजे ' देखील वीजचोरीत समाविष्ट असतात .  जनरेटर व्यवस्था केवळ दिशाभूल करण्यासाठी असते . गैर ते गैरच . त्यामुळे धार्मिक  उत्सव मग तो कोणाचाही का असेना ,   भावनिक लेबले लावून  सर्रास होणाऱ्या वीजचोरीला प्रतिबंध घातलाच गेला पाहिजे . शेवटी चोरून वापरलेल्या विजेचा भार  ग्राहकांवर टाकला जातो हे थांबायलाच हवे .

स्व-प्रसिद्धसाठी  उत्सवांचा वापर : जर राज्यातील सर्व जनतेचे ' मत ' लक्षात घेतले तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की , किमान ८० टक्के नागरिकांना या उत्सवांशी काहीही देणे घेणे नसते . उत्सवांची खरी गरज वाटते ती नेत्यांना आणि त्यांच्या बगल बच्चांना . सर्व पक्षीय नेत्यांची जनतेशी थेट नाळ तुटली आहे . कुठलाही नेता जनतेचे कामे करून प्रकाशझोतात येऊ पाहत नाही आणि त्यामुळे त्यांना झळकण्यासाठी अशा उत्सवांची गरज पडते . उतसावांच्या निमित्ताने फलकबाजी करत आपला चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी सर्व धडपड चालू असते .
          शेवटी ,  या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची श्रीगणेशालाप्रार्थना आहे की , उत्सवासाठी देव पाण्यात ठेऊन असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष  , सर्व धर्मीय संत -महात्मे -मुल्ला -मौलव्वी , स्वतःला धार्मिक उत्सवांचे तारणहार समजणारे नेते , त्यांच्यासाठी आपला जीव ओतणारे , " शुद्ध हरपून " कामे करणारे कार्यकर्ते  , सध्या उत्सवाच्या विकृतीकरणावर चर्चा करणारी आणि योग्य  वेळ येताच त्याचे लाईव्ह प्रसारण करणारी प्रसारमाध्यमे या सर्वांना सुबुद्धी  दे .

      

    समाधानाची व आशादायक गोष्ट म्हणजे गेल्या २/३ वर्षात उपरोक्त परस्थितीत हळू हळू का होईना सकारात्मक बदल होत आहेत . 


तळटीप : या लेखाचा उद्देश हा उत्सवाच्या उद्दिष्टपूर्तीचे सिंहावलोकन हा असून 'धार्मिक भावना 'दुखावणे हा नाही .


सुधीर लक्ष्मीकांत दाणी 9869226272 danisudhir@gmail.com
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा