सध्या राजकारणात जे पक्षांतरे 'चालू ' आहे त्यास केवळ आणि केवळ लोकशाहीची क्रूर चेष्टाच म्हणावी
लागेल . त्यास धूर्त राजकारण ,चाणक्य नीती ,
कालसुसंगत तडजोडी अशी गोंडस नावे दिली जात
असली तरी वर्तमानातील 'चालू ' प्रकार म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रकार
ठरतो .
भले ही अशा 'चालूपणा ' मुळे
एखाद्या राजकीय पक्षास यश मिळेल ,सत्ता मिळू शकेल पण त्यातून लोकशाहीच्या अस्तित्वास , मतदारांच्या
विश्वासास नख लागले जात आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे .
" स्वार्थ .. स्वार्थ आणि स्वार्थ
" हाच भारतातील सर्व राजकीय व्यक्ती -पक्षाचे ध्येय आहे हेच गेल्या काही
दिवसातील घाऊक पक्षांतरावरून अधोरेखीत होते .
विधिनिषेधशून्य राजकारणाचा वीट आला
आहे आणि त्यामुळे भारतात कुठल्याही राजकीय पक्ष 'पार्टी विथ डिफरंन्स ' नाही हे पुन्हा
पुन्हा दिसून येते आहे .
अर्थातच यास केवळ राजकीय व्यक्ती ,पक्ष जबाबदार आहेत असे म्हटले तर ती स्वतःचीच फसवणूक ठरू शकते कारण यास
राजकरण्या इतकेच भारतीय मतदार देखील जबाबदार आहेत .
'सुज्ञ मतदार' हा लोकशाहीचा पाया असतो आणि तोच पाया आज ढिसूळ झालेला
असल्यामुळे भारतात लोकशाही खऱ्या अर्थाने रुजू शकली नाही . नागरीकांचा कुठल्याच
राजकीय पक्षाला धाक उरलेला नसल्यामुळे जनतेचा विरोध डावलून 'माहिती अधिकार दुरुस्ती ' सारखे निर्णय
जनतेवर लादले जाताना दिसतात .
एखादी गोष्ट
सातत्याने घडत गेली की त्यावर जनतेचा
विश्वास बसतो या नियमानुसार स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच नेते , मंत्री , राजकीय पक्ष
जनतेची दिशाभूल ,फसवणूक करताना दिसतात आणि त्यामुळेच 'राजकारण हे असेच असते ,,राजकीय मंडळी देखील अशीच असतात हे नागरीकांनी गृहीत धरले आणि नेत्यांनी
मतदारांना गृहीत धरलेले असल्यामुळे लोकशाहीचे अध:पतन होते आहे
. भारताचे आणखी एक दुखणे म्हणजे गल्ली पासून
दिल्ली पर्यंत प्रत्येक जण दुसऱ्याला सुधारावयाचा प्रयत्न करत असतो . वास्तवात कुठलाही
अपेक्षीत स्वप्नपूर्ती साठी खरी गरज असते
ती सर्वप्रथम स्वतःत बदल करण्याची . आणि आता वेळ आली आहे ती आधी मतदारांनी
बदलण्याची व त्यातून राजकीय व्यक्ती व पक्षांना बदलवण्याची .
का वागतात हि
राजकीय मंडळी इतक्या निर्ढावल्यासारखे ? याचे
एकमेव आणि एकमेव उत्तर आहे 'देशातील अंध
मतदार , व्यक्ती -राजकीय पक्षांचे अंध भक्त '
. या आंधळ्या मतदारांमुळेच लोकशाहीसमोर अंधार निर्माण झाला
आहे .
सध्या जे काही चालू आहे तो आहे 'लोकशाहीचा
खून '. कुठलाही मतदार जेंव्हा निवडणूकीत आपले मतदान
करत असतो ते त्या राजकीय पक्षांचे ध्येय धोरणे पाहून . उमेदवाराला , राजकीय पक्षाला नाकारत असतो ते देखील त्या व्यक्तीचे ,पक्षाचे ध्येय -धोरणे-कार्यसंस्कृती पाहूनच . त्यामुळे ज्या
व्यक्तींना , पक्षाला मतदारांनी नाकारले आहे त्याच
व्यक्तींना ज्या पक्षाचे सध्या मार्केट जोरात आहे त्या पक्षाने आयात करून
निवडणुकीत मतदान मागणे व मतदारांनी अशा मागणीला भीक घालत केवळ पक्षाचे चिन्ह पाहून
अंधपणे मतदान करणे हा लोकशाहीचा खूनच ठरतो
.
मतदार राजा जागा
हो ! डोळस हो !! सुज्ञ हो !!! लोकशाही भारतात खऱ्या अर्थाने रुजवायची असेल ,
व्यक्तीशाही , पक्षशाहीला
गाडावयाचे असेल तर मतदारांनी स्वतःला बदलवणे
गरजेचे आहे .
भविष्यात निर्धांर करणे गरजेचे आहे की , मी जात -पात -धर्म -गावकी -भावकी -पक्ष
यासम गोष्टींच्या आहारी जाणार नाही , भावनेने मतदान करणार नाही .
ज्या व्यक्ती सातत्याने केवळ आणि केवळ आपल्या
स्वार्थासाठी , आपली काळी संपत्ती शाबूत ठेवण्यासाठी
, आपल्या गैरकृत्यांना अभय मिळण्यासाठी
पक्षांतर करतात त्यांना मतदान करणार नाही व त्याच बरोबर 'आयाराम -गयाराम 'संस्कृतीला
खतपाणी घालणाऱ्या पक्षाला देखील धडा शिकवील व भविष्यात मतदारांना गृहीत धरून
राजकरण करणाऱ्याला चपराक बसेल अशाच प्रकारे मतदान करेल अशी शपथ घेणे काळाची गरज
आहे .
नेते मंडळी जनहिताची ,लोकसेवेची शपथ
घेतात पण त्या शपथेचा अंगीकार करत नाहीत . यावर मात करण्यासाठी भारतीय मतदारांनी
आपले 'मत ' या लोकशाहीतील सर्वात प्रभावी आयुधाचा वापर करायला हवा . केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारांचा
विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावयाचे नाही हा वजरनिर्धार प्रत्येक
मतदाराने करत ,अगदी ग्रामपंचायती पासून याची अंमलबजाणी करायला हवी .
जो पर्यंत भारतीय
मतदार जागा होत नाही , निवडणुकीतील मतदानाचा सुयोग्य
पणे वापर करत नाही तो पर्यँत कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी नागरीकांच्या
आयष्यात बदल घडणार नाही हे नागडे सत्य आहे .
केवळ सोशल मीडियावर राजकीय मंडळींवर
आगडपाखड करून , माध्यमातून त्यांना दोष देऊन काहीच
फरक पडणार नाही कारण सर्वच राजकीय पक्षांनी आजवरच्या अनुभवातून मतदारांना गृहीत
धरलेले आहे .
राजकीय पुढारी ,नेतृत्व -पक्षांच्या
जनतेला गृहीत धरण्याचा प्रवृत्तीला जो पर्यंत चपराक दिली जात नाही , स्वातंत्र्यतोत्तर केवळ वर्षांची वाढ होत जाईल , जनतेच्या जीवनदर्जात मात्र वाढ होणार नाही . चला ! आधी आपण बदलू यात ! जनतेला गृहीत धरून
होणारी लोकशाहीची वाट आपोआप बदलेल .
अर्थातच आपण बदलवून आपण राजकीय पक्षांना देखील बदलण्यास भाग पाडू शकतो .
जे काही बोटावर मोजता येतील अशी राजकारणातील संवेदनशील मंडळी आहेत त्यांना एकच
आवाहन आहे की , एखाद्या पक्षाच्या बॅनरखाली निवडून
आल्यानंतर त्या व्यक्तीला किमान त्याचा त्या निवडणुकीतील कालावधी संपत नाही
तोपर्यंत 'पक्षांतर ' करता येणार नाही, अशा नियमासाठी आग्रह धरा .
निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे हा त्या त्या
मतदारांच्या विश्वासाचा खूनच आहे . एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या
व्यक्तीला त्या त्या पक्षात गेल्यानंतर किमान ५ वर्षाचे सदस्यत्व पूर्ण
केल्यानंतरच निवडणूक लढवता येईल असा कायदा करणे गरजेचे आहे . त्यासाठी देशात
परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या सामाजिक संघटनांनी न्यायालयीन लढाई लढणे नितांत आवश्यक
आहे . भारतीय निवडणूक प्रक्रिया शुद्ध झाली की
देश आपोआप बदलेल . देशातील अनागोदीचे प्रमुख कारण हे 'सदोष निवडणुका ' आहे व त्यात बदल
व्हायलाच हवा . या सर्व बदलासाठी मतदारांनी बदलणे गरजेचे आहे . राजकारणातील 'अर्थपूर्ण ' घाऊक आयात
-निर्यात थांबवायची असेल तर पक्षांतर करणाऱ्यांना निवडूनच देऊ नका . जे
नागरीक म्हणून तुमच्या हातात आहे ते करा ,
केवळ दुसऱ्या कडून बदलाची अपेक्षा करणे हे स्वतःचीच
फसवणूक ठरते .
खरे तर हा मुद्दा जनता व देशहिताच्या
दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे म्हणून देशहितासाठी
लढणाऱ्या संघटनांनी या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका टाकणे काळाची गरज
ठरते . … पण सर्वात महत्वाचा आणि आपल्या हातात असणारा मार्ग म्हणजे .. लोकशाहीचा
खून टाळण्यासाठी मतदारांनी स्वतः 'जागृत '
होण्याची गरज आहे ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा