THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

..... तर प्रामाणिक -पारदर्शक प्रशासन अफवाच ठरेल


      गणराज्य दिनी राजपथावर सादर झालेल्या पथसंचलनात  " महाराष्ट्राचे ' सोंगी मुखवटे ' लोकनृत्य प्रथम " हे लोकसत्तातील वृत्त वाचून झालेला आनंद क्षणिक  ठरला . त्याला कारण ठरले ते लोकसत्ता मुखपृष्टावरील अश्न्विनी जोशी यांच्या संभाव्य बदलीचे वृत्त . हे दोन्ही वृत्त वेगवेगळे असले तरी नाटकातले ' सोंगी मुखवटे ' आणि राजकारणात 'प्रामाणिक मुखवट्याचे सोंग ' करणारी मंडळी हे दोन्ही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत याची खात्री या दोन्ही वृत्तातून झाली . या संभाव्य बदली मागे भाजप खासदार -आमदारांचा पुढाकार असल्याचे म्हटले आहे . विद्यमान सरकारचा प्रामणिकता - पारदर्शकता हा मूलमंत्र आहे आणि त्याची वाच्यता गल्ली पासून -दिल्ली पर्यंत भाजप नेते करत असतात . सरकारचे " काम " जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या जाहिरातीत देखील " प्रामाणिक -पारदर्शक -गतिमान " सरकार असा ठळक उल्लेख असतो . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतो तो हा की , जे जनतेला दाखवून देण्यासाठी आटापिटा केला जातो ते पक्षाच्या आमदार -खासदारांना सांगितले जात नाही का ? सांगितले जात असेन तर ते त्यांना कळते का ? मान्य असते का ? अर्थातच याचे उत्तर ' हो ' असेन  तर एखाद्या प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्याच्या एका वर्षात बदलीचा घाट  का घातला जातो ? हे सामान्य नागरिकांच्या आकलना पलीकडे आहे  आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की , जर सरकार मधील प्रतिनिधींनाच ' प्रशासनातील प्रामाणिकता -पारदर्शकता ' नको असेन तर सरकारचा   पारदर्शक -प्रामणिकतेचे "सोंगी मुखवटे "  धारण करण्याचा अट्टाहास कशासाठी ?  

     नुकताच आपण ६७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला . गेले ६ दशके , सत्तेवर असणारे प्रत्येक सरकार ,प्रत्येक मुख्यमंत्री स्वच्छ -पारदर्शक प्रशासनाचा दावा करताना दिसतात . असे असताना पायाभूत सुविधा , जनकल्याणकारी  योजना यावर काही लाख करोडो रुपये खर्चून देखील आज हि रस्ते -वीज -पिण्याचे पाणी -सुदृढ आरोग्य व्यवस्था -' गळती ' नसणारे  शिक्षण यासम सुविधांची वानवा का आहे ? निधी कुठे मुरतो ? या सर्वांचे एकच उत्तर दिसते ते म्हणजे शासन -प्रशासनातील  " ढोंगी मुखवटे " . जनतेला सर्व ज्ञात आहे . प्रजा एकीकडे तर सत्ता दुसरीकडे या गेल्या ६ दशकातील वाटचालीमुळे जनतेला या सर्वाची सवय झाली आहे.  मामला थंड झाल्यावर तांत्रिक बाजू पुढे करत अश्विनी जोशींना बढती -बदली दिली जाईल . प्रश्न केवळ एका जिल्हाधिकाऱ्यापुरता मर्यादीत नाही . प्रश्न आहे प्रामाणिकता अंगी बाळगणे हे प्रशासनात दुर्गुणच ठरतो हे अनुभवातून कळून देखील काही व्यक्ती ती वाट सोडत नाही अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना  जाणाऱ्या संदेशाचा . पूर्वीच्या काही सरकारबाबत जनतेने काही कृत्य गृहीतच धरलेली होती त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग होत नव्हता . राज्यातील -केंद्रातील भाजपा सरकारने स्वत:च जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत . त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी लोकप्रतिनिधीनी घेणे अत्यंत आवश्यक आहे . वारंवार सरकारच्या कृतीतून जनतेचा अपेक्षाभंग होत गेला तर प्रामाणिक मुख्यमंत्री -प्रामाणिक पंतप्रधान या अफवाच ठरतील . हे सारे जनहितासाठी घडू नये  या साठी हा पत्रप्रपंच .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा