THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

कुठे आहे " तो " सर्वात पुढील महाराष्ट्र ?



         कुठे आहे " तो " सर्वात पुढील  महाराष्ट्र ?

        निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गेल्या काही ' दिवसात /महिन्यात ' समाजाच्या उन्नतीसाठी अवलंबलेल्या धडाकेबाज कर्तृत्वाला लगाम बसेल . वीस षटकाच्या सामन्यात शेवटची काही चेंडू महत्वाची असतात याची मनाशी खुणगाठ बांधू लोकसभेच्या निकालानंतर शेवटच्या महिन्यात राज्य सरकारने धडाकेबाज निर्णयांची बरसात केली . अगदी वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारया बोल्टला देखील हेवा वाटावा असा  एका दिवसात ५० अध्यादेश (जी आर ) काढण्याचा विक्रम केला . ज्यांच्यावर फाईलवर सही करताना लकवा भरतो अशी टिप्पणी केली गेली अश्या मा . मुख्यमंत्र्यांनी निर्णयांच्या फाइलींचा डोंगर रचत आपला 'हात' दाखवला . घड्याळ्यांच्या काट्यालाही सरकारच्या कामाचा आवाका पाहून क्षणभर थांबण्याचा मोह झाला असेल.
      असो ! गेली १५ वर्षे महाराष्ट्रातआघाडीचेराज्य आहे आणि त्यामुळेच राज्य सर्वच आघाड्यांवर  'आघाडीवर ' असल्याचे जनतेला जाहिरातीतून कळले . शेवटच्या महिन्यात जेवढे निर्णय झाले त्याचे स्वागत केले तर जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की  , मग गेली १५ वर्षे काय केले ?  जर मुद्रित , इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमे , बस , ट्रेन वरील विकासाच्या जाहिराती सत्य मानल्या तर जनतेच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण होतो की  मग शेवटच्या क्षणी इतके निर्णय घेण्याची वेळ का आली ? बरे ! जर अंतिम टप्यात झालेले निर्णय हे जर गेल्या १५ वर्षात झालेल्या निर्णयांपेक्षा वेगळी  ' प्रगती ' करणारे असतील तर सरकारने आपला विजय निश्चित मानायला हवा . पुन्हा प्रश्न . एवढ्या कार्यकर्तृत्व सरकारमधील मंत्री अन्य राजकीय पक्षांच्या वळचणीला का धावतायेत ? कुठल्याही सामन्यात शेवटची काही षटके निश्चितपणे महत्वाची असतात हे विश्वमान्य  सत्य आहे परंतु त्याच वेळेस हे हि ध्यानात ठेवणे क्रमप्राप्त असते की शेवटच्या षटकातील कामगिरीच्या जोरावर विजय मिळविण्यासाठी 'त्या आधीच्या प्रारंभिक ' षटकात काही कर्तृत्व असावे लागते अन्यथा शेवटच्या शतकातील कामगिरी हि केवळ विजयाची आशा निर्माण करणारी धुकधुकी ठरते .
     पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करण्याची गरज आहे ती म्हणजे या लेखाचा उद्देश सत्ताधारी -विरोधी पक्षाच्या बाबतीत 'डावे -उजवे ' सिद्ध करण्याचा नसून एक सामान्य सजग मतदार म्हणून नागरिकांच्या मनात जी भावना आहे त्याचे प्रतिबिंब रेखाटण्याचा आहे . विरोधी पक्षालाही एक नागरीक म्हणून प्रश्न विचारावासा  वाटतो की , वर्तमान सरकारच्या निष्क्रियतेमुळे आपणास विजयाची संधी आहे याची खात्री असेल (एव्हाना असल्यामुळेच ? त्यांनी तर गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे ) तर निष्क्रिय पक्षातील नेत्यांना -कार्यकर्त्यांसाठी पायघड्या का घातल्या जात आहेत ? जर त्यांना पक्षात घेऊन जर तुम्ही कर्तव्यतत्पर सरकार देणार असताल तर त्याच पक्षाला पुन्हा संधी का देऊ नये ? अशी कोणती जादूची काडी  तुमच्या कडे आहे की , भ्रष्ट नेत्यांना घेऊन देखील  तुम्ही 'भ्रष्टाचार मुक्त ' सरकार देणार आहात ?  जर तुमच्या कडे भ्रष्ट नेत्याला प्रामाणिक करणारे कुठले 'गंगा जल ' असेल तर तुम्ही भारतातील सर्वच नेत्यांना एकदा त्या गंगाजलात बुडवून काढून 'स्वच्छ भारत ' निर्माण का करत नाहीत ?
कुठे आहे 'तो ' महाराष्ट्र ?:

     जाहिरातीत दिसते ते महाराष्ट्रातील लोकाभिमुख शासन -प्रशासन, शिक्षण क्षेत्रातील क्रांती आणि तिचे खेड्यातील शाळांपर्यंत आलेली फळे , आरोग्य , उद्योग ,वाहतूक-दल्न्वळण, महिला सक्षमीकरण , सुरक्षित महाराष्ट्र , जलसिंचनाच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांचा झालेलें उत्कर्ष आणि त्यातून शेतकरी वर्गात आलेली सधनता , संगणकावर आधारित शासन-प्रशासन . एकूणच काय तर प्रत्येकाला तोंडात बोट घालावे लागेल अशी प्रगती असलेला महाराष्ट्र जाहिरातीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला गेला आहे . सामान्य नागरीक आणि मतदारांच्या मनात प्रश्न एक मुलभूत प्रश्न आहे की , आपणही  महाराष्ट्रातच राहतो , असे असताना हा महाराष्ट्र आपल्या नजरेत का पडत नाही . जलसिंचनामुळे सर्वत्र पाणी वाहत असताना आपल्या गावाला टंकर पुरवठा का केला जातो ?, शिक्षणात क्रांती झालेली असताना माझ्या गावात वर्गासाठी २च वर्गखोल्या , शिक्षक कसे? , प्राथमिक आरोग्य केंद्रच का आजारी पडलेले आहे ? प्रगतीशील महाराष्ट्रात गाव असताना गावाला रस्ता का नाही ? पै -पै करून सहकारी बँकेत ठेवलेली ठेव आता कधीच मिळणार नाही का ? …. अशी हनुमानाच्या शेपटी सारखे अनंत प्रश्न आहेत , त्यामुळे पुन्हा पुन्हा वाटते की  , कुठे आहे " तो " सर्वात पुढील  महाराष्ट्र ?
        एका वृत्त वाहिन्याच्या दाव्यानुसार या जाहिरातींमधील अनेक लाभार्थी हे प्रत्यक्षपणे लाभापासून वंचीत आहे . हे मात्र अतीच क्लेशदायक आहे .
  जाहिराती केवळ भूलाविण्यासाठीच असतात (?) हे व्यवहारी जगातील सूत्र मान्य केले तरी , किमान जे दाखविले जाते ते किमान पातळीवर तरी जाणवायला हवे . प्रत्यक्षात मात्र जाहिरातीतील अनेक क्षेत्रात स्वप्नरंजन  आणि वास्तवातील विसंगती खटकणारी भासते . पारदर्शी स्वच्छ प्रशासनाचा डंका पिटताना , प्रामाणिक अधिकाऱ्यांवर बदल्यांचे अस्त्र वापरण्यापूर्वी सरकारने किमान एकदा विचार करायला जावा होता . उक्ती आणि कृती या जर लोहचुंबकाचे टोके ठरणार असतील तर जनतेने विश्वास कसा ठेवायचा हा खरा प्रश्न आहे .

   हा तर जनतेच्या पैशाचा अपव्ययच :
        जाहिरातींच्या भडिमारावरील आक्षेपाचा प्रतिवाद करताना दाखला दिला जातो तो मोडी आणि कंपनीने लोकसभा निवडणुकात राबविलेल्या आवेशपूर्ण जाहिरात प्रचार तंत्राचा आणि प्राप्त उत्तुंग यशाचा . सकृत दर्शनी हा प्रतिवाद योग्य दिसत असला तरी तो करत असताना पार्श्वभूमीचा विचार करणे गरजेचे ठरते , तंत्र एकच असले तरी पार्श्वभूमी विसंगत आहे . मोदी आणि कंपनीची पाटी अगदीच कोरी होती त्यामुळे स्वप्नांचे प्रतिबिंब रेखाटणे सहज सोपे होते . या उलट आघाडीने १५ वर्ष सत्ता उपभोगली आहे . ३५/४० वर्षाचा संसार केलेल्या सासूने दिलेली आश्वासने आणि लग्नानंतरच्या गुलाबी दिवसात सुनेने दिलेली आश्वासने यातील विश्वासार्हता कोणाची अधिक असणार या सम हा प्रकार आहे . मुळात म्हणजे मोदी  आणि कंपनीने जाहिरातींवर केलेला खर्च हा संपूर्णपणे खाजगी होता तर राज्य सरकारने पूर्णपणे जनतेच्या पैशाचा वापर केला आहे

      जाहिरात तंत्र हे दुधारी शस्त्र :
    केवळ जाहिरातींचा भडीमार हे फार फार तर १०/२० टक्के यशस्वी ठरते आणि ते सुद्धा केवळ आणि केवळ पती कोरी असेल तरच अन्यथा हे अस्त्र बुमरंग ठरू शकते आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भाजपचे "शायनिंग इंडिया " होय . मुळात म्हणजे युपीएने जाहिरातींचा अवलंब केला नाही हे धांदात खोटे ठरते कारण केंद्र सरकारने लोक्साभापुर्वा काळात तब्बल दोन हजार करोड खर्च केवळ केलेल्या (?)कामाच्या प्रसिद्धीवर केला होता . सर्वात महत्वाचे म्हणजे आश्वासने - जाहिराती कोणत्या या बरोबरच ते कोण देते आणि त्यांची पार्श्वभूमी हे परिणाम कारक घटक असतात .
   शेवटी नम्रपणे नमूद करतो कि , या लेखाचा उद्देश हा कोणाचे समर्थन वा कोणाचा प्रतिवाद हा नसून एकाच गोष्ट सर्व() राजकीय पक्षाच्या लक्षात आणून द्यावयाची आहे ती म्हणजे जनता सर्वज्ञ-सर्वज्ञानी आहे. जनतेला गृहीत धरून राजकारण या पुढे धोकादायक ठरणार हे मात्र निश्चित.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी  , बेलापूर , नवी मुंबई .
9869 22 62 72 danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा