वृत्त वाहिनीवरील लालबाग राज्याच्या दरबारी
भाविकांच्या ससेहोलपटीचे चित्रण पहिले की वर्तमान
गणेशोत्सवाची दिशा आणि दशा स्पष्ट होते . एखाद्या गोष्टीचे , व्यवस्थेचे राजकीय ध्रुवीकरण झाले , बाजारीकरण झाले की त्याची 'मातीच ' होते याची प्रचीती इतिहासातून होतच असते
. आज साजरे केले जाणारे धार्मिक उत्सव जसे दहीहंडी , नवरात्रौत्सव , उरूस , धार्मिक मिरवणुका , गणेशोत्सव पाहता 'धार्मिकतेच्या प्रमुख हेतूवर ' कुरघोडी होते आहे असे म्हटले तर वावगे ठरू
नये .
परमेश्वराला सर्वांचा मालक समजतात परंतु आजच्या
प्रगत (?) युगात मनुष्य"प्राणी " हा परमेश्वराचाही
'मालक ' होताना दिसतो आहे . अनेक मंदिरे , धार्मिक उत्सव हे 'अमुक-तमुक ' च्या नावाने ओळखले जातात .कदम -आव्हाडाची
दहीहंडी , छोटा राजनचा गणपती , नाईकांचे शंकर मंदिर हे प्रातिनिधिक उदाहरणे
. आपण मालक झाल्याच्या वृतीतूनच लालबागच्या
राजाच्या दरबारात दिसणारी दबंगगिरी जन्मास येते .
मुळातच ३० तास एका विशिष्ट ठिकाणच्या देवताच्या
दर्शनासाठी उभे राहणाऱ्यांना श्रद्धावान समजने हे 'परमेश्वर सर्वत्र असतो ' या मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे आहे . विशिष्ट
ठिकाणचा गणपती हा नवसाला पावतो हि धारणा इतर ठिकाणच्या गणपतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
निर्माण करणारी ठरत नाही का ? ज्यांच्या नवसाला पावला त्यांनी नवस फेडायचा तर प्रश्न हा राहतो कि ज्यांना
पावला नाही त्यांनी काय खटले भरावयाचे का ? जो या पृथ्वीच्या निर्माता आहे त्याला 'अमुक होऊ दे , मग तमुक करीन' हा अधिकार मानवाला कसा प्राप्त होतो ? देवाला सर्व ज्ञात असते असे म्हणतात तोच
देव लाच -भ्रष्टाचार -काळे धंदे यातून मिळवलेल्या पैशाचे दान देणाऱ्याला कसा पावतो
? चोरून वीज वापरणाऱ्या , देवाच्या आगे-मागे जुगार खेळणाऱ्या , आगमन-विसर्जन मिरवणुकीत 'अमृत' प्राशन करून बेधुंद नाचणाऱ्या भक्तांना
बुद्धीचा देव सदबुद्धी का देत नाही याचे उत्तर धर्मपंडित देणार का ? राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना मिळणारी
'विशेष ' वागणूक परमेश्वराच्या दारातही 'माणूस ' समान
नाही हेच दर्शविते ना ? अशावेळी वेगळी रांग ठेवण्यापेक्षा वेगळी मंदिरे ठेवणे जास्त सयुंक्तिक
असणार नाही का ? यासम अनेक प्रश्नाची उत्तरे प्रतीक्षित
आहेत .
एकीकडे
धार्मिकता (?) वाढते आहे असे चित्र उभे राहत असताना समजातील
नैतिकतेचे मात्र अध:पतन होते आहे , हे विरोधाभासी चित्र 'धार्मिकतेचे बेगडीपण ' अधोरेखित करते . मंदिरांच्या ठिकाणी सोने-चांदी - रुपये सढळ हाताने दान
करणारे हात मात्र माणसातले देवपण जपण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजसेवी
संस्थाना 'हात' देताना मात्र का थरथरतात हे अनाकलनीय आहे .
बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने आजही
दगडूशेट हलवाई सारखी काही मंडळे कटाक्षाने या उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक उपक्रम
जपत आहेत , परंतु एकूण मंडळाच्या संखेच्या मानाने अशी
मंडळे ' अल्पसंख्याक ' आहेत . गल्लोगल्लीचे राजे असणाऱ्या मंडळाकडे
लाखो -करोडो रुपये जमा होतात . लालबागचा राजा , सिद्धिविनायक सारख्या मंदिराकडे सोनेचांदी
, रोकड मोजण्यासाठी बँकेतल्या लोकांना बोलवावे
लागते . या पैशाचा विनियोग कसा केला जातो ? कोणते लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवावे लागतात हे सर्व गुलदस्त्यातच
राहते . वास्तविक या मंडळाचा आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर मांडणे या मंडळाचे आद्य कर्तव्य
ठरते .
धार्मिक उत्सवाचे ' इवेन्ट ' करण्यात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा
आहे . खासकरून वृत्त वाहिन्यांनी याबाबत आत्मपरीक्षण
करायला हवे. उत्सवाच्या
निमित्ताने निसर्गाला होणाऱ्या हानी विरोधात
निसर्गाने ' स्टिंग रे ' ऑपेरेशन मधून आपली नाराजी प्रगट केली आहे
. यावर्षी सुदैवाची गोष्ट हि कि अनेक नागरिकांना भान आल्यामुळे धार्मिकतेच्या (?) नावाखाली चालणाऱ्या या दुकानापासून त्यांनी
फारकत घेतली आहे . अनेक गणेश मंडळाचे मंडप ओस पडलेले दिसत होते .(वर्गणी देणे म्हणजे
सहभाग नव्हे !) होय ! नास्तिक म्हणून आपण उपरोक्त विचारांना स्वार्थापोटी दूर करू शकू ! परंतु ‘ अंध आस्तिक ’ असण्यापेक्षा डोळस नास्तिक असणे निश्चितच
उत्तम ठरू शकते . स्पष्ट विचारांना 'नास्तिकतेचे ' लेबल लावणाऱ्याना एक प्रश्न अगदी विनम्रपणे
विचारावासा वाटतो की नवरात्र उत्सवानंतर प्रचंड
वाढणारे 'गर्भपाताचे ‘ प्रमाण कोणती धार्मिकता ध्वनित करते ?
गणपती विसर्जनात वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना पाहता
धार्मिकतेच्या बाजारात बुद्धीचे दैवत असणाऱ्या गणेशोत्सवातच 'बुद्धीचे विसर्जन ' होताना दिसले . श्रद्धा आणि अंधश्रधा या
मधील लक्ष्मण रेषा वर्षागणिक अरुंद होते आहे आणि हे निश्चितच चिंताजनक म्हणावे लागेल
. सार्वजनिक गणेशोत्सावाच्या उद्देशावर उपस्थित
केलेले प्रश्नचिन्ह अनेकांना रुचणारे ,पटणारे नसतील परंतु ते मांडण्याचे धाडस
अगदी आवश्यक होते म्हणून हा लेख प्रपंच कारण आज उत्सवाच्या लाटेत ते करण्याचे धाडस
आणि इच्छा अभावानेच दिसते , एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे कि एकूणच गणेश
चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतची सद्यस्थिती
पाहता लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन
होते आहे ? असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा