संपूर्ण महाराष्ट्रातील आसमंत गणेशोस्तवाच्या उत्साहाने बहरून गेला होता . गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत आणि सकृत दर्शनी हि आशादायक व आनंदाची बाब आहे .
धार्मिक उत्सवांचे मुख्य प्रयोजन हे सामाजिक प्रबोधन , नैतिक मूल्यांचे बीजारोपण , संस्कृतीचा व्यापक स्तरावर प्रचार -प्रसार , सामाजिक एकात्मतेच्या भावनेचे जतन आणि संवर्धन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात काही विरंगुळ्याचे क्षण ईत्यादी असते . वर्तमान सार्वजनिक उत्सव यापैकी किती उदिष्टपूर्ती करतात या प्रश्नांचे 'डोळस ' उत्तर दुर्दैवाने बहुतांश पातळीवर नकारात्मकच आहे .
उलटपक्षी जसजशी उत्सवांच्या संख्येत आणि प्रमाणात वाढ होते आहे तसतशी त्यांचे तोटे अधिक प्रमाणात जाणवू लागले आहेत . ध्वनीप्रदूषण , वायुप्रदूषण , पाणीप्रदूषण हि सर्वज्ञात काही उदाहरणे आहेत . गेल्या काही वर्षात या उत्सवांच्या निमित्ताने एक नवीन डोकेदुखी समोर येत आहे आणि ती म्हणजे सर्रासपणे होणारी वीजचोरी , अनधिकृत फ्लेक्स -बॅनरबाजी , खंडणी सदृश्य वर्गणी.
सार्वजनिक गणेशोत्सव हा अत्यंत विधायक उत्सव होता . या १० दिवसाच्या काळात पूर्वीच्या काळी समाजप्रबोधन करणारे भाषणे आयोजित केली जात असत . विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे . आता या सर्व सकारात्मक गोष्टीचे विसर्जन झालेले असून उत्सवांना केवळ आणि केवळ बीभस्त स्वरूप आलेले आहे .
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे काळानुसार बदल अपेक्षितच आहेत परंतू अगदी विरोधाभासी बदल हे उत्सवांच्या उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणारे ठरत असल्याने त्याचे सिंहावलोकन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीचा हा लेखप्रपंच .
२१ व्या शतकातील सुनियोजित शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरात एकूण सार्वजनिक गणेशमंडळाची संख्या आणि अधिकृत वीजजोडणी घेतलेलया मंडळाची संख्या यात मोठया प्रमाणावर तफावत असलयाचे उघड झालेले आहे . अर्थातच महाराष्ट्रातील अन्य शहरे देखील धार्मिक वीजचोरीच्या बाबतीत अपवाद असत नाहीत .
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई , पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत पणे घेतलेली वीजजोडणी , वीजवापराचा तपशील याची माहिती आरटीआय अंतर्गत मागवली असता प्राप्त माहितीतून 'सार्वजनिक उत्सवातील वीजचोरी ' अधोरेखीत करणारी आहे . हॅलोजन बल्ब , हजारो बल्ब , सजावटीच्या माळा यांचा झगमगाट असूनदेखील वीजबिलात दर्शविलेले युनिट मात्र १०० /२०० च्या आसपास तर काही मंडळांच्या बाबतीत अगदीच ३०/५० युनिट होते . सकृतदर्शनी वीजवापर पाहता हे कदापीही विश्वासार्ह नाही . अनेक मंडळानी वीज बिल देखील भरले नाही .
हे झाले अधिकृत 'तात्पुरती वीज जोडणी ' घेणाऱ्या मंडळाच्या बाबतीत परंतु अशी अनेक मंडळे अस्तिवात आहेत की जे या पेक्षा अधिक सुलभ मार्ग स्वीकारतात आणि तो म्हणजे सरळसरळ बेस्ट /एमएसईबी किंवा पालिकांच्या स्ट्रीट लाईटच्या पोलवरून वीजजोडणी घेतात. हे सामान्य नागरिकांना दिसते परंतु वीज कंपन्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मात्र का दिसत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे . बहुतांश मंडळे हि राजकारण्याची असल्यामुळे त्यांची दबंगगिरी आणि मंडळ आणि वीजकर्मचारी यांची 'अर्थपूर्ण ' युती हि कारणे मात्र कुठल्याही संशोधनाविना उघडपणे दिसतात .
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचा कोणताही कार्यकर्ता यांना लोकशाहीतील कुठलेही नियम बंधनकारक नसतात असा जो अलिखित नियम उदयास येत आहे त्यामुळे सार्वजनिक कुठलेही उत्सव /कार्यक्रम सर्व कायदे -बंधनातून मुक्त असतात हा नवा 'आदर्श ' महाराष्ट्रात रुजताना दिसतो आहे . नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण ठरते .
धार्मिक -सामाजिक -नैतिक अधःपतनाचा "श्रीगणेशा " :
निर्मितीच्या उद्दिष्टालाच हरताळ फासणे यात भारतीयांचा हातखंडा आहे हा आपला इतिहास आहे . याचे वर्तमानातील उदाहरण म्हणजे " गणेशोत्सव " . १८९३ ला लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला त्याची उद्दिष्टपूर्ती आजच्या गणेशोत्सवात होते आहे का ? याचे उत्तर सर्वार्थाने नकारात्मकच आहे . का होते आहे असे ? यास समाज म्हणून कोण जबाबदार आहेत ? या समाजाचा घटक म्हणून आपण उत्सवाच्या बाजारीकरणास जबाबदार आहोत का ? अगदी साधी गोष्ट पहा . या गणेशोत्सवासाच्या कालावधीत तलावात प्लास्टिकसह फेकले जाणारे निर्माल्य , डोळ्यांना इजा पोहचवणाऱ्या लेजर लाईटचा झगमगाट , कानाला इजा पोहचवणाऱ्या डीजेचा दणदणाट , पीओपी मूर्तीला बंदी असूनही उंचीच्या स्पर्धा करणाऱ्या मूर्तीकडे वाढणारा कल एकुणातच संपूर्ण समाजाच्या ‘ बुद्धीच्या विसर्जना ’चे प्रतीक ध्वनित करते असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही . धार्मिक उत्सव आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत त्यामुळे उत्सवांना विरोध असण्याचा प्रश्नच असत नाही , प्रश्न आहे तो उत्सवाच्या विद्रुपीकरणाचा , उत्सवाच्या बाजारीकरणाचा .
एखाद्या गोष्टीचे , व्यवस्थेचे राजकीय ध्रुवीकरण झाले , बाजारीकरण झाले की त्याची 'मातीच ' होते याची प्रचीती इतिहासातून होतच असते . आज साजरे केले जाणारे धार्मिक उत्सव जसे दहीहंडी , नवरात्रौत्सव , उरूस , धार्मिक मिरवणुका , गणेशोत्सव पाहता 'धार्मिकतेच्या प्रमुख हेतूवर ' कुरघोडी होते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये . राजकीय मंडळींनी धार्मिक उत्सवाचा वापर हा जाहिरातीच्या माध्यमातून निवडणुकीच्या दृष्टीने जनमानसात आपल्या प्रतिमेची स्थापना करण्यासाठी केला जात असल्याने उत्सवाच्या काळात शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे .
परमेश्वराला सर्वांचा मालक समजतात परंतु आजच्या प्रगत (?) युगात मनुष्य"प्राणी " हा परमेश्वराचाही 'मालक ' होताना दिसतो आहे . अनेक मंदिरे , धार्मिक उत्सव हे 'अमुक-तमुक ' च्या नावाने ओळखले जातात .अमुक -तमुकची दहीहंडी ,यांचा -त्यांचा गणपती , अमुक -तमुकचे शंकर मंदिर हे प्रातिनिधिक उदाहरणे . आपण " मालक " झाल्याच्या वृतीतूनच लालबागसारख्या विविध 'राजाच्या दरबारात' दिसणारी दबंगगिरी जन्मास येते हे कटू वास्तव ध्यानात घेणे निकडीचे आहे .
एकीकडे धार्मिकता (?) वाढते आहे असे चित्र उभे राहत असताना समजातील नैतिकतेचे ,सार्वत्रिक बौद्धिकतेचे अध:पतन होते आहे , हे विरोधाभासी चित्र 'धार्मिकतेचे बेगडीपण ' अधोरेखित करते . मंदिरांच्या ठिकाणी सोने-चांदी - रुपये सढळ हाताने दान करणारे हात मात्र माणसातले देवपण जपण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजसेवी संस्थाना 'हात' देताना मात्र का थरथरतात हे अनाकलनीय आहे .
उत्सवांच्या मूळ हेतुंचेच विसर्जन : गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत आणि सकृत दर्शनी हि आशादायक व आनंदाची बाब असली तरी त्याच बरोबर जसजशी उत्सवांच्या संख्येत आणि प्रमाणात वाढ होते आहे तसतशी त्यांचे तोटे अधिक प्रमाणात जाणवू लागले आहेत . ध्वनीप्रदूषण , जलप्रदूषण , रस्ताबंदी -नुकसान , खंडणीसदृश्य वर्गणी या बरोबरच सार्वजनिक उत्सवांना लागलेले आणखी एक ग्रहण म्हणजे " अधिकृत वीजचोरी ". या उत्सवांसाठी थेट विजेच्या डीपीतून-पोलवरून उघड उघड वीज चोरी हा ' सरकारमान्य हक्कच ' आहे अशा प्रकारे विजेची उधळपट्टी चालू असते .
मुळात आपल्याकडे
' धर्माचे
' लेबल
लावले
की
, सर्व
कायदे
-नियम
गुंडाळून
ठेवले
जाऊ
शकतात
अशी
सार्वत्रिक
धारणा
झाली
आहे
आणि
त्यामुळेच
उत्सवांना
हिडीस
रूप
येताना
दिसते
आहे
. सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तमान
उत्सवांना
' धार्मिक
उत्सव
' संबोधणे
कितपत
न्यायपूर्ण
आहे
.
अर्थातच आजही काही सार्वजनिक मंडळे आहेत की जे सार्वजनिकतेचे भान जपत असतात . पण अशी मंडळे अपवादानेच आढळतात . बुद्धीच्या देवतेच्या पायाशी 'निर्बुद्धांची ' गर्दी यापेक्षा दुर्दैव्य ते काय असू शकते .
मुळातच १०/१२ तास एका विशिष्ट ठिकाणच्या देवतेच्या दर्शनासाठी उभे राहणाऱ्यांना श्रद्धावान समजने हे 'परमेश्वर सर्वत्र असतो ' या मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे आहे . विशिष्ट ठिकाणचा गणपती हा नवसाला पावतो हि धारणा इतर ठिकाणच्या गणपतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत नाही का ? ज्यांच्या नवसाला पावला त्यांनी नवस फेडायचा तर प्रश्न हा राहतो कि ज्यांना पावला नाही त्यांनी काय खटले भरावयाचे का ? जो या पृथ्वीच्या निर्माता आहे त्याला 'अमुक होऊ दे , मग तमुक करीन' हा अधिकार मानवाला कसा प्राप्त होतो ?
देवाला सर्व ज्ञात असते असे म्हणतात तोच देव लाच -भ्रष्टाचार -काळे धंदे यातून मिळवलेल्या पैशाचे दान देणाऱ्याला कसा पावतो ? चोरून वीज वापरणाऱ्या , देवाच्या आगे-मागे जुगार खेळणाऱ्या , आगमन-विसर्जन मिरवणुकीत 'अमृत' प्राशन करून बेधुंद नाचणाऱ्या भक्तांना बुद्धीचा देव सदबुद्धी का देत नाही याचे उत्तर धर्मपंडित देणार का ? राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना मिळणारी 'विशेष ' वागणूक परमेश्वराच्या दारातही 'माणूस ' समान नाही हेच दर्शविते ना ? अशावेळी वेगळी रांग ठेवण्यापेक्षा वेगळी मंदिरे ठेवणे जास्त सयुंक्तिक असणार नाही का ? यासम अनेक प्रश्नाची उत्तरे प्रतीक्षित आहेत .
उत्सवांच्या बाजारीकरणात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा : धार्मिक उत्सवाचे ' इवेन्ट ' करण्यात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा आहे . खासकरून वृत्त वाहिन्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे. सुदैवाची गोष्ट हि कि अलीकडच्या काळात अनेक नागरिकांना भान आल्यामुळे धार्मिकतेच्या (?) नावाखाली चालणाऱ्या या दुकानापासून त्यांनी फारकत घेतली आहे . अनेक गणेश मंडळाचे मंडप ओस पडलेले दिसत होते .(वर्गणी देणे म्हणजे सहभाग नव्हे !) होय ! नास्तिक म्हणून आपण उपरोक्त विचारांना स्वार्थापोटी दूर करू शकू ! परंतु ‘ अंध आस्तिक ’ असण्यापेक्षा 'डोळस नास्तिक' असणे निश्चितच उत्तम ठरू शकते . स्पष्ट विचारांना 'नास्तिकतेचे ' लेबल लावणाऱ्याना एक प्रश्न अगदी विनम्रपणे विचारावासा वाटतो की नवरात्र उत्सवानंतर प्रचंड वाढणारे 'गर्भपाताचे ‘ प्रमाण कोणती धार्मिकता ध्वनित करते ?
तात्पुरत्या मंडपांचे जेंव्हा कायम स्वरुपात रुपांतर होऊन त्याच अनधिकृत ठिकाणावर त्या विभागाच्या ' राजाचे ' ( मंदिर उभारणारा स्थानिक नेता 'राजाच ' असतो त्यामुळेच कदाचीत देवालाही त्या त्या विभागाचा राजा संबोधण्याची प्रथा दिसते ) मंदिर कायमस्वरूपी मंदिर उभा राहत असेन तर ते योग्य आहे का ? अन्य कू -प्रथांवर अनेकवेळा चर्चा होत असते परंतु नेते आणि सरकारच उत्सव प्रिय असल्यामुळे वर्षानुवर्षे कायदे पायदळी तुडवली जात आहेत .
" सार्वजनिक उत्सव " संबोधने कितपत रास्त ? : उत्सव सार्वजनिक आणि धार्मिक असतो ना ? मग गणपती -देवीचा फोटो एका कोपऱ्यात टाकून काही मंडळींचा स्वतःचे फोटो मिरवणाऱ्या फ्लेक्सचा अट्टाहास कशासाठी ? स्वतःची प्रसिद्धी न करता कराना धार्मिक उत्सव साजरे ! त्या त्या विभागातील केवळ ५-१० मंडळींच्या ताब्यात असणाऱ्या उत्सवांना सार्वजनिक म्हणून संबोधणे हाच मुळात दांभिकपणा दिसतो .
मुळात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की तेच सत्य वाटू लागते . या उत्सवांच्या बाबतीतही काहीसे तसेच होताना दिसत आहे . विद्यमान उत्सव ' धार्मिक ' आहेत , ते 'सार्वजनिक ' आहेत ; ते लोकाग्रहास्तव साजरे केले जातात , ते समाज प्रबोधनासाठी आहेत वगैरे वगैरे … आज ज्या विकृत पद्धत्तीने उत्सव साजरे केले जातात ते पाहता उपरोक्त उल्लेखित गोष्टींची ते पूर्तता करतात का हा खरा प्रश्न आहे .
एक
गोष्ट
अगदी
स्पष्ट
आहे
कि
एकूणच
गणेश
चतुर्थी
ते
अनंत
चतुर्थी
पर्यंतची सद्यस्थिती पाहता लोकमान्य टिळकांच्या
गणेशोत्सवाचे
विसर्जन
होते
आहे
? असे
म्हटले
तर
अतिशोयुक्तीचे
ठरणार
नाही
.
सार्वजनिक धार्मिक उत्सवांना ' वीजचोरीचे ' ग्रहण :
मुंबई व उपनगरात जवळपास १४ हजार छोटी -मोठी गणेश मंडळे असल्याचे समजते , पैकी ६००० हजार मोठी मंडळे आहेत . ३ वर्षांपूर्वी माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार केवळ २० टक्के मंडळानी तात्पुरत्या स्वरुपाची वीजजोडणी घेतल्याचे दिसते . १० दिवस विजेची मुक्तहस्ते उधळण करूनही अनेक मंडळांचा वीजवापर ५०/१०० युनिट असल्याचे दिसते . अनेक नामवंत ' राजे ' देखील वीजचोरीत समाविष्ट असतात . जनरेटर व्यवस्था केवळ दिशाभूल करण्यासाठी असते . गैर ते गैरच . त्यामुळे धार्मिक उत्सव मग तो कोणाचाही का असेना , भावनिक लेबले लावून सर्रास होणाऱ्या वीजचोरीला प्रतिबंध घातलाच गेला पाहिजे . शेवटी चोरून वापरलेल्या विजेचा भार ग्राहकांवर टाकला जातो हे थांबायलाच हवे .
स्व-प्रसिद्धसाठी उत्सवांचा वापर : जर राज्यातील सर्व जनतेचे ' मत ' लक्षात घेतले तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की , किमान ८० टक्के नागरिकांना या उत्सवांशी काहीही देणे घेणे नसते . उत्सवांची खरी गरज वाटते ती नेत्यांना आणि त्यांच्या बगल बच्चांना . सर्व पक्षीय नेत्यांची जनतेशी थेट नाळ तुटली आहे . कुठलाही नेता जनतेचे कामे करून प्रकाशझोतात येऊ पाहत नाही आणि त्यामुळे त्यांना झळकण्यासाठी अशा उत्सवांची गरज पडते . उतसावांच्या निमित्ताने फलकबाजी करत आपला चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी सर्व धडपड चालू असते .
शेवटी , या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची “श्रीगणेशाला ” प्रार्थना आहे की , उत्सवासाठी देव पाण्यात ठेऊन असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष , सर्व धर्मीय संत -महात्मे -मुल्ला -मौलव्वी , स्वतःला धार्मिक उत्सवांचे तारणहार समजणारे नेते , त्यांच्यासाठी आपला जीव ओतणारे , " शुद्ध हरपून " कामे करणारे कार्यकर्ते , सध्या उत्सवाच्या विकृतीकरणावर चर्चा करणारी आणि योग्य वेळ येताच त्याचे लाईव्ह प्रसारण करणारी प्रसारमाध्यमे या सर्वांना सुबुद्धी दे .
गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे गणेशोत्सवाचे स्वरूप समोर पाहता लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव उद्दिष्टपूर्तीचे " विसर्जन " तर होत नाही ना ? हा प्रश्न आपसूकच निर्माण होतो . त्याचे उत्तर कोण देणार ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो .
वीजचोरी , अनधिकृत बॅनरबाजी टाळण्यासाठी दृष्टीक्षेपातील संभाव्य उपाय
:
· तात्पुरती वीज जोडण्या घेणाऱ्या मंडळाची यादी, फ्लेक्स -बॅनर्सची परवानगी घेणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर टाकावी .
· जनतेला वीजचोरी, अनधिकृत फ्लेक्स -बॅनर्स दिसल्यास त्याबाबतची माहिती टोलफ्री क्रमांकावर किंवा त्याचे फोटो मेल करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी .
· प्रसारमाध्यमांनी गणेशोस्तवाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासोबतच वीजचोरी , अनधिकृत फ्लेक्स -बॅनर्स सारख्या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकावा
· वीज कंपन्यांनी स्थानिक लाईनमन आणि कनिष्ट अभियंता यांच्यावर त्या त्या विभागातील मंडळाची वीज जोडणी तपासण्याची जबाबदारी टाकावी . त्याच बरोबर अनधिकृत फ्लेक्स -बॅनर्स बाबतची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर सुनिश्चित करावी
· पोलिस प्रशासनाने 'एनओसी ' दिलेल्या मंडळाची यादी वीज कंपन्यांना द्यावी किंवा संकेतस्थळावर टाकावी , जेणे करून अधिकृत वीज जोडणी घेणारे मंडळे उघड पडतील .
· वीज कंपन्यांनी प्रत्येक उतस्वानंतर मंडळाचे नाव , वापरलेले युनिट , बिल भरले आहे किंवा नाही याची माहिती संकेत स्थळावर टाकावी .
· वीज कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान १० मंडळांना अचानक भेटी देऊन वीज जोडणी आणि वापरात असणाऱ्या विजेच्या उपकरणांच्या प्रमाणात वीज वापराची मीटर मध्ये नोंद होते आहे का हे तपासावे.
तळटीप : या लेखाचा उद्देश हा उत्सवाच्या उद्दिष्टपूर्तीचे सिंहावलोकन हा असून 'धार्मिक भावना 'दुखावणे हा नाही .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी 9869226272 danisudhir@gmail.com
परंपरागत उत्सव संपले. आता फक्त इव्हेंट साजरे केले जातात. सणाचे पावित्र्य कोठेही दिसत नाही.
उत्तर द्याहटवानकारत्मक दृष्टिकोण योग्य नाही, बदलाव योग्य शांततेच्या व नवयुवक यांना संस्कृति व संस्कार ची कल्पना करून द्या,समाज एकत्र येवून हिंदू एकवटून राहावा हे मुख्य उद्देश लोकमान्य तिलक यांचा होता,परिवर्तन निसर्गका नियम है।याला पूज्यनीय लोकांनी संस्कार द्या।अन्यथा तरून भरकटून जाईल।
उत्तर द्याहटवायाला दोषी समाजातील वडीलधारी मंडळी हे कमी पडत आहे,संस्काराने संस्कार वाढतात।
उत्तर द्याहटवा