निर्मितीची उद्दिष्टपूर्तीची पूर्तता झाली किंवा उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासला जात असेल तर त्याचे विसर्जन करणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय ठरतो हा व्यवहारातील नियम आहे . हा नियम सर्वानांच लागू पडतो . मग ती व्यक्ती असो की संस्था . ज्या हेतूने निर्मिती केली गेली आहे त्याची परिपूर्ती संपन्न झाली की पुढे त्या निर्मितीच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही .
मुद्दा मांडण्यामागचा मतितार्थ समजून घेण्यासाठी कोविड काळात तातडीने बांधलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय करोना सेंटरचे देता येईल . उपलब्ध असणारी वैद्यकीय सुविधा पुरेशी नसल्याने करोडो रुपये खर्च करून ' तात्पुरत्या स्वरूपातील कोविड उपचार केंद्र बांधले होते . कालांतराने करोना संपला व त्या कोरोना सेंटरची गरज संपली म्हणून त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला . कोविड सेंटरचे विसर्जन करण्यात आले .
मुद्दा लक्षात आलाच असेल . हाच नियम सिडकोला देखील लागू पडतो . मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करणे या उद्दिष्टपूर्तीसाठी सिडकोची स्थापना ७० च्या दशकात केली गेली होती . शेतकऱ्यांच्या , भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊन सिडकोने नवी मुंबई हे शहर वसवले . पायाभूत सुविधा निर्माण केल्या . १९९२ ला नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना केली गेल्याने सिडकोने शहरातील पायाभूत सुविधांसह शहराचा कारभार पालिकेकडे हस्तांतरित केला .त्याला देखील आता उणेपुरे ३२ वर्षे झालेली आहेत .
याविषयी दुमतच संभवत नाही की सिडकोने नवी मुंबईचा विकास केला आहे , एका चांगल्या शहराची निर्मिती केलेली आहे . प्रश्न आहे तो वर्तमानात नवी मुंबई शहरात सिडकोचे असणे आवश्यक आहे का ? सिडको निर्मिती उद्दिष्टपूर्ती पूर्ण झालेली आहे . शहर वसवले गेले आणि त्याचा कारभार आता पालिका पाहत आहे . त्यामुळे आपसूकच प्रश्न उरतो की आता नवी मुंबई शहराला सिडकोची आवश्यकता आहे का ? .... तर याचे थेट उत्तर आहे ... नाही ... नाही ...नाही ... अजिबातच नाही !
राज्यातील अनेक शहरांचा कारभार महानगरपालिका सांभाळत आहेत . त्यामुळे नवी मुंबई शहराला २ सरकारी यंत्रणांची आवश्यकता असण्याची बिलकुल गरज नाही !
" रिकामे मन कुविचाराचे धन " आणि " निष्क्रिय मन म्हणजे सैतानाची कार्यशाळा " अशा अर्थाच्या म्हणी आणि सिडको यात वर्तमानात सुसंगती दिसते . सिडकोला वर्तमानात काम उरलेले नसल्याने सिडको नको ते "उदयॊग " करू लागलेली दिसते . याचे ताजे उदाहरण म्हणजे "सिडकोचा खासदार ,आमदार , सनदी अधिकाऱ्यांसाठी महानिवास गृहप्रकल्प ".
हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . त्याच बरोबर सामाजिक भूखंड सेवा अंतर्गत "अर्थपूर्ण " पद्धतीने भूखंड तथाकथित सामाजिक संघटनांना वाटणे / भूखंड वाटून घेणे. सिडकोचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असेल तर सिडकोने गेल्या २० वर्षात विविध सामाजिक योजनांतर्गत वाटलेल्या भूखंड वितरण केलेल्या संस्थांची यादी आणि त्या संस्थांचे सदस्य /अध्यक्ष याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी . सिडको प्रशासनाचा दृष्टिकोन पाहता हे शक्य वाटत नाही कारण सिडको अगदी आरटीआय अंतर्गत विचारलेली माहिती देखील देण्यास टाळाटाळ करते . गुप्त कारभार पद्धती हि भ्रष्टचाराची जननी असते आणि सिडको प्रशासनाला गुप्त कारभार पद्धतच अत्यंत प्रिय आहे .
जुन्या इमारतींना "अर्थपूर्ण पद्धतीने ओसी" देणे , भूखंड विक्रीतून स्वतःची घरे भरणे , अयोग्य पद्धतीने टीडीआर वाटप , मँग्रोज ला हानी पोहचवून , खाडी बुजवून , पारसिक हिल , बेलापुर हिल ला हानी पोहचवत , निसर्गाला -पर्यावरणाला हानी पोहचवत भूखंड निर्माण करणे , ट्रान्स्फर चार्जेसच्या नावाखाली नागरिकांची लूट करणे , विविध प्रकारच्या एनओसी देण्यासाठी नागरिकांची आर्थिक लूट करणे असे अनेक उद्योग सिडको करताना दिसते आहे . अशा उदयॊगा मागचे प्रमुख कारण म्हणजे "सृजनशील , सकारात्मक " कामेच उरलेली नाहीत .
वर्तमानात सिडकोचे प्रशासनाचा दृष्टिकोन हा समाजहिताचा न राहता तो केवळ आणि केवळ व्यवसायीक झाल्याने भूखंडाचे श्रीखंड हा दृष्टिकोनातून आर्थिक लूट हाच सिडकोच्या कारभाराचा आत्मा झालेला असल्याने आता गरज आहे ती सिडकोच्या विसर्जनाची !
एकुणातच सर्व परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांचे अत्यंत स्पष्ट मत आहे की , नवी मुंबईतील सिडकोच्या स्थापनेची उद्दिष्टपूर्ती सफळ संपूर्ण झालेली आहे . सिडकोचा वर्तमानातील कारभार हा उद्दिष्टपूर्ती ला हरताळ फासणारा आहे... सिडको उद्दिष्ट पूर्तीपासून दूर जाते आहे.. त्यामुळे आता थेट गरज आहे ती सिडकोचे विसर्जन करण्याची !
अनेक जणांचा दावा असेल की सिडकोच्या वतीने आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती , मेट्रो असे प्रकल्प सुरु आहेत . अगदी मान्य ! पण हि गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे की सिडकोचा सदरील उपक्रमात निधी देण्याव्यतिरिक्त थेट ,प्रत्यक्ष सहभाग दिसत नाही . ज्या सिडकोला स्वतःच्या गृह प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा सल्लागार आवश्यक असतो , स्वतः बांधलेली घरे विकण्यासाठी एजेंट ची गरज पडते ती सिडको विमानतळ उभारणीत कोणते योगदान देऊ शकते हा संशोधनाचा विषय आहे .
सिडकोचे विसर्जन हे मत मान्य नसेल त्यांनी एकदा सिडकोचा कारभाराचा एजेंट न लावता अनुभव घ्यावा , सिडकोच्या प्रशासकीय कामकाज पद्धतीकडे डोळसपणे पहावे . लाचखोरी ,भ्रष्टाचार या आणि याच तत्वावर वर्तमानात सिडकोचा कारभार "चालू " आहे हे नागडे सत्य आहे . सिडको प्रशासनाचा नैतिक ऱ्हास इतका झालेला आहे की , अगदी निवृत्त झालेले अधिकारी उघड उघड निवृत्तीनंतर कार्यालयात येऊन फाईल मंजूर करण्याचे कृष्णकृत्य करतात .
आता सिडकोला सिंगापूर निर्मितीची संधी द्या :
मा . पंतप्रधानांनी सिंगापूर दौऱ्यावर असताना भाष्य केले आहे की , भारतात आम्हाला अनेक सिंगापूर निर्माण करावयाचे आहेत . राज्य सरकारने देशाच्या पंतप्रधानांच्या स्वप्नपुर्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी नवी मुंबईतील सिडकोचे विसर्जन करून सिडकोला राज्यात अन्य ठिकाणी जमीन देऊन 'सिंगापूर निर्मिती" साठी धाडून द्यावे .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
बेलापूर नवी मुंबई .
danisudhir@gmail.com 9869226272
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा