शिल्पकला शास्त्रानुसार प्रत्येक शिल्पकाराच्या , मूर्तिकाराच्या कौशल्याचे प्रतिंबिंब हे त्या शिल्पकाराने घडवलेल्या मूर्ती मध्ये प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे आकर्षक , मनमोहक , शिल्पकलेचा उत्तम अविष्कार असणारी मूर्ती हवी असेल तर योग्य पात्रतेचा शिल्पकार निवडणे अपरिहार्यच ठरते . हाच नियम सर्वच क्षेत्राला लागू पडतो .
शहराचे शिल्पकार हे त्या शहराच्या निर्मिती / देखभालीत समाविष्ट असणारे इंजिनियर्स असतात . त्या त्या शहरातील विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांचा दर्जा हा उत्तम असावा या हेतूची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी राज्य शासनाने त्या त्या पायभूत सुविधांची निर्मिती करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गासाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केलेली असते . राज्य शासनाने विहित केलेल्या शैक्षणिक अर्हतेचे पालन करणे हे राज्यातील सर्व महानगरपालिकांना अनिवार्य असते व नवी मुंबई महानगरपालिका देखील त्यास अपवाद असत नाही .
नवी मुंबई पालिका प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कामांच्या दर्जाबाबत विविध माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने फोरमने "शहराच्या शिल्पकाराचा दर्जा " जाणून घेण्याबाबत निर्णय केला व त्यानुसार आरटीआय दाखल केला होता .
पालिकेतील विविध विभागातील कनिष्ठ अभियंता , शाखा अभियंता , उप अभियंता ,कार्यकारी अभियंता ,अतिरीक्त शहर अभियंता आणि शहर अभियंता या संवर्गासाठी राज्य सरकारच्या नियमांनुसार विहित/निर्धारित किमान शैक्षणिक पात्रता व त्या त्या संवर्गात वर्तमानात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता याविषयीची माहिती मागवणारा अर्ज फोरमचे सदस्य श्री . रामचंद्र तुपे यांनी ९ जानेवारी रोजी पालिका आयुक्त कार्यालयाकडे दाखल केला होता . सदरील अर्जाच्या उत्तरादाखल प्राप्त ईमेलचे अवलोकन केले असता नवी मुंबई महानगरपालिकेत किमान शैक्षणिक अर्हता निकषांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आलेले आहे .
नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण ) नियम २०२१ अन्वये सामान्य प्रशासन विभाग, अभियांत्रिकी विभाग, नगर रचना विभाग ,पर्यावरण विभाग,लेखा /लेखा परीक्षण विभाग, तंत्रज्ञान विभाग, व सचिव विभाग, आरोग्य विभागातील विविध संवर्गासाठी किमान शैक्षणिक अर्हता सुनिश्चित केलेली आहे .
मार्च २०२३ रोजीच्या अंतिम सेवा जेष्ठता सूची नुसार शहर अभियंता ,अतिरिक्त शहर अभियंता ,कार्यकारी अभियंता उप अभियंता , सहाय्यक अभियंता , कनिष्ठ अभियंता , पदावरील व्यक्ती कार्यकारी अभियंता अशा पदांवर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांकडे विहित शैक्षणिक अर्हता नसल्याचे दिसते .
शहरा अभियंता १ अतिरिक्त शहर अभियंता १ कार्यकारी अभियंता १६ उपअभियंता ६० सहाय्यक अभियंता ० कनिष्ठ अभियंता १६४ अशा प्रकारे एकूण २४२ अधिकारी प्रशासनात आहेत . नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण ) नियम २०२१ नुसार शहर अभियंता पदावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अतिरिक्त शहर अभियंता स्थापत्य या पदावर किमान तीन वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या व मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्याची सेवा जेष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल असे म्हटलेले आहे . प्रत्यक्षात मात्र गेल्या ३ वर्षांपासून बीई (सिव्हिल ) हि शैक्षणीक अर्हता असणाऱ्या अधिकाऱ्याची शहर अभियंता या पदावर नियुक्ती केलेली दिसते .
पालिका आस्थापनातिला शहर अभियंता या पदाप्रमाणेच अतिरिक्त शहर अभियंता , कार्यकारी अभियंता ,उपअभियंता ,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य /विद्युत /यांत्रिकी ) पदावरील नियुक्त अधिकारी हे पदवी ( BE /B-TECH ) या किमान शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करत नसल्याचे दिसते .
आरटीआय मधील माहिती नुसार कार्यकारी अभियंता स्थापत्य या प्रवर्गातील १३ पैकी केवळ ४ उमेदवार हे बॅचेलर इन इंजिनियरिंग असून अन्य उमेदवार हे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग हि पदविका असलेले आहेत . कार्यकारी अभियंता विद्युत पदावरील दोन्ही अधिकारी हे डिप्लोमा होल्डर्स आहेत .
उपअभियंता स्थापत्य पदावरील ८ अधिकारी हे पदवी पात्र तर अन्य २० पदविका पात्र शिक्षण घेतलेले आहेत .
कनिष्ठ अभियंता विद्युत या पदावरील २ अधिकारी हे पदवीचे शिक्षण घेतलेले असून अन्य ६ पदविका पात्र आहेत . शाखा अभियंता यांत्रिकी विभागात कोणीही अधिकारी पदवी पात्र नाही . तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदावरील ८ अभियंत्यांपैकी ३ बीई मेकॅनिकल आहेत . कनिष्ठ अभियंता विद्युत प्रवर्गातील ८ पैकी २ अभियंत्यांची शैक्षणिक पात्रता पदवीची आहे . कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावरील ५० अभियंत्यांपैकी केवळ १० अभियंते हे पदवीचे शिक्षण घेतलेले असून अन्य पदविका पात्र आहेत . शाखा अभियंता स्थापत्य पदावरील २१ अभियंत्यांपैकी एकाही अभियंत्याकडे पदवीची अर्हता नाही .
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिपिक पदासाठी आवश्यक असणाऱ्या "एमएससीआयटी "( MS-CIT: Maharashtra State Certificate in Information Technology) पात्रता या पात्रतेचा उल्लेख हा बहुतांश प्रवर्गातील कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता या पदावरील उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये दिसून येतो . अभियांत्रिकी ची पदवी /पदविका शैक्षणिक पात्रता प्राप्त असणाऱ्या उमेदवाराकडे संगणक हाताळणीचे कौशल्य असतेच असते त्यामुळे अभियांत्रिकी पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारां बाबत एमएससी आयटी या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख खटकणारी बाब ठरते .
या माहितीच्या अवलोकनातून अलर्ट सिटिझन्सने काही प्रश्न समोर आणलेले आहेत . सॅटेलाईट सिटी , २१ व्या शतकाचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहराच्या महानगरपालिकेला शहराचा शिल्पकार असणाऱ्या शहर अभियंता या पदासाठी पदवी पात्र उमेदवार शोधूनही सापडला नाही का ? पालिका आस्थापनात किमान शैक्षणिक अर्हतेचा पात्र उमेदवार न मिळाल्यास शासनाद्वारे प्रतिनियुक्तीची अट असताना पालिका प्रशासनाने शासनाकडे पात्र व्यक्तीची मागणी केली आहे की नाही ? केली असल्यास किमान शैक्षणिक अर्हतेची व्यक्ती का मिळाली नाही ? पालिका प्रशासन शहर अभियंता यासारख्या महत्वपूर्ण पदावर किमान शैक्षणिक अर्हतेची अट पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीकडे ३ वर्षाहून अधिक काळ कार्यभार देण्यामागचा नेमका 'अर्थ ' कोणता ?
शिल्पकाराच्या कौशल्याचे प्रतिबिंब ज्या प्रमाणे त्याने घडवलेल्या शिल्पात प्रतिबिंबित होत असते . वर्तमानात पालिकेच्या बहुतांश कामाच्या दर्जाचे अध:पतन हे पालिका प्रशासनातील अकुशल अभियंत्याचे प्रतिबिंब तर नव्हे ना ? असे मत फोरमचे सदस्य अनंत पवार यांनी व्यक्त केलेले आहे .
राज्यात आणि देशात बीई /बीटेक झालेले अनेक अभियंते हे नोकरीच्या शोधात वणवण भटकत असताना , खाजगी कंपन्यात २०/३० हजारात नोकरी करण्यात धन्यता मानत असताना नवी मुंबई पालिका प्रशासनास अभियंता या पदावर नियुक्त करण्यासाठी बीई /बीटेक पदवी चे उमदेवार का मिळत नाहीत हा संशोधनाचा विषय असल्याचे मत फोरमचे सदस्य राजाराम जाधव यांनी व्यक्त केले आहे .
फोरमच्या मागण्या :
१) राज्य सरकारने पालिकेतील अधिकारी -अभियंत्यांच्या किमान शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रतेचे तटस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करावे .
२) राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी संवर्ग १ व संवर्ग २ वर्गाच्या नियुक्त्या या एमपीएसी कडून केंद्रीय पद्धतीने कराव्यात . अधिकारी अभियंते योग्य पात्रतेचे असतील तरच कामाचा दर्जा राखला जाऊ शकतो .
३) पालिकेतील अभियंते ,अधिकाऱ्यांच्या सरंजामशाहीला चाप बसवण्यासाठी व एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी -कंत्राटदार यांच्याशी प्रस्थापित होणाऱ्या 'अर्थपूर्ण ' संबंधाला चाप बसवण्यासाठी राज्यातील सर्व पालिका एकत्र माणून दर ५ वर्षांनी त्यांच्या एका पालिकेतून दुसऱ्या पालिकेत बदल्या करण्याचा नियम करावा .
४) पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध न झाल्यास पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध होईपर्यंत राज्य शासनाच्या अधीक्षक अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांमधून प्रचलित धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल या नियमाच्या अनुषंगाने आयुक्तांनी तातडीने सरकारकडे शहर अभियंता या पदावर सुयोग्य पात्रता असणाऱ्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यासाठी मागणी पत्र पाठवावे
अलर्ट सिटिझन्स फोरम नवी मुंबई .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा