THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

प्रामाणिक ,पारदर्शक , सचोटी व लोकाभिमुख कारभाराची 'परंपरा ' असणाऱ्या मुंबई पालिकेची चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा जाहीर निषेध !


               महापालिकेतील 'प्रामाणिक '  अभियंते , 'प्रामाणिक ' अधिकारी  आणि   'प्रामाणिक ' डॉक्टरांमागे ईडी ,एसआयटीचा ससेमिरा न थांबवल्यास , चौकशी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालिका संघटनांनी ,  म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनने   देत ज्या ठामपणे प्रामाणिक पालिका प्रशासनमागे  उभा राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच   .

    अशा चौकश्यांमुळे त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे आणि पर्यायाने सार्वजनिक जीवनात त्यांना बदनामीला सामोरे जावे लागते आहे आणि म्हणून चौकशीचा ससेमिरा थांबवा असा इशारा संघटनांनी दिलेला आहे .

  पालिकेतील "प्रामाणिक " अधिकाऱ्यांच्या , अभियंत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या संघटनांचे सर्वप्रथम समस्त मुंबईकर करदाते आणि मुंबईला आदर्श मानणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने जाहीर आभार आणि अभिनंदन !

              " कराच्या रूपाने मिळणारा प्रत्येक पैसा नी  पैसा  केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठीच ... ... "  या तत्वाने पालिकेच्या स्थापनेपासून सर्वच राजकीय पक्षांच्या अधिपत्याखालच्या काळात आजवर निरंतरपणे   सचोटी , प्रामाणिकता ,संवेदनशीलता आणि उत्तरदायित्वाच्या ओतप्रत भरुन वाहणाऱ्या  परंपरेची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या मुंबई पालिकेचे प्रशासन कोरोना सारख्या संकटाच्या काळात 'गैरकारभार करतील " हाच आरोप मुळात चुकीचा ठरतो

    प्रामाणिकता हा गुणधर्म रक्तात असेल तर ते प्रशासन कधीच गैरकारभार करू शकत नाही हे चौकशी करणाऱ्या यंत्रणांनी  समजून घ्यायला हवे  .  राजकीय कुरघोडीतून अशी चौकशी लावणाऱ्या राज्यकर्त्यांनी देखील समजून घ्यायला हवे .

          खरे तर ईडी असो , एसआयटी असो की  अन्य कोणतीही राज्य --केंद्र सरकारची तपास यंत्रणा असो त्यांनी मुंबईत डोळसपणे डोकावले तर त्यांना पदोपदी "पालिका प्रशासनाच्या प्रामाणिकतेचे प्रतिंबीब सहज नजरेत पडू शकते .

         सध्या पावसाळा असल्याने पालिका प्रशासनाची वर्षानुवर्षे जपली जाणाऱ्या  आणि वृद्धिंगत होणाऱ्या  'प्रामाणिकतेचे प्रतिंबीब संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यातील पाण्यात ' दिसू शकेल . पालिकेतील अभियंत्यांची  प्रामाणिकता संपूर्ण मुंबईभर नजरेस पडत असताना त्यांची चौकशी हा त्यांचा अपमान नव्हे काय ? असा उघड उघड अपमान केला जात असेल तर त्यांच्या पाठीशी उभा राहणे हे त्यांच्या संघटनांचे  प्रमुख कर्तव्यच ठरते .   

                  मुंबई पालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत नियमानुसार , पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने "चालू " असल्यानेच मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची घरे ,झोपड्यांच्या माध्यमातून राहण्याची   व्यवस्था हि अगदी सहजपणे मुंबईतील पदपथावर , रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असणाऱ्या जमिनीवर , आजूबाजूच्या डोंगरावर , सरकारी जमिनीवर  गेली कित्येक दशके होत होती आणि  होते आहे . पालिकेच्या वार्ड ऑफिसर पासून ते आजवर जे जे आयुक्त होऊन गेले त्यांचा 'हा प्रामाणिकपणा  ' पाहिल्यावर देखील तपास यंत्रणांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांची चौकशी करावी हा त्यांच्या 'प्रामाणिकतेचा ' अपमान ठरत नाही का ?

                 कोरोना काळातील खर्चाची चौकशी हा तर पालिकेतील डॉक्टरांचा घोर अपमान ठरतो . ज्या अधिकाऱ्यांनी आपला प्राण पणास लावून 'आदेश ’  येईल त्या त्या कंत्राटदारांना तात्पुरते हॉस्पिटल्स उभारण्याची , त्यात लागणाऱ्या करोडो रुपयांच्या साहित्यांची खरेदी करण्याचे  कंत्राटे दिली . हे सर्व त्यांनी मुंबईकरांचा 'जीव ' वाचवण्यासाठी  केलेले असताना त्यांची चौकशी हि त्यांचा अपमानच ठरतो .

         मुंबईकरासाठी आपला 'जीव ' ओवाळणाऱ्या एकाही अधिकाऱ्याची ,अभियंत्यांची  चौकशी हा खरे तर ज्या ज्या नागरिकांनी  तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात जीव गमावला त्यांचा देखील घोर अपमान ठरतो हि बाब राज्य आणि केंद्र सरकारने  घ्यायला हवी कारण तपास करणाऱ्या यंत्रणा या त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत .

  लोकशाही व्यवस्थेत सर्व यंत्रणांचा कारभार हा जनतेच्या पैशातून चालत असतो आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेतील प्रत्येक कामाच्या खर्चाचा लेखाजोखा करदात्या नागरिकांसमोर  ठेवा अशी मागणी करून मुंबई पालिकेच्या प्रशासनावर , पालिकेतील अधिकारी , अभियंते , डॉक्टर्स आणि आयुक्त यांच्या प्रामाणिकतेवर अविश्वास दाखवणाऱ्या  नागरिकांवर खरे तर 'राजद्रोहाचे  खटलेभरा अशी मागणी पालिकेतील सर्वपक्षीय ' सजग ,संवेदनशील " संघटनांनी करायला हवी .

                कोरोना व्हायरस कितीही विश्वव्यापी असला तरी पालिकेतील प्रशासनाची प्रामाणिकतेवर त्या एका दिसणाऱ्या विषाणूसाठी पालिका प्रशासनाच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उभा करणे अत्यंत गैर ठरते आणि म्हणूनच संघटनाचा इशारा अत्यंत स्वागतार्ह  आहे . तमाम संघटनांचा आणि त्यांचे सदस्य असणाऱ्या पालिकेतील सर्व  अभियंते , डॉक्टर्स , अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन . तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे  आम्हाला अत्यंत दुःख झालेले आहे  आणि तुमच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी  आहोत .

                   तुम्ही होणाऱ्या चौकशीमुळे नाराज होऊ नका ,हताश होऊ नका , तुमची " चालू "असणाऱ्या   जनसेवेचा वसा ' टाकू नका . तुमच्या प्रामाणिकतेला सिद्ध करण्यासाठी वर्तमानात  मुंबईकरांवर असणारा कर कमी  पडत असेल तर आमच्यावरील कर वाढावा आणि तुमचा 'प्रामाणिक जनसेवेचा वारसा '  भविष्यात देखील निरंतरपणे 'चालू ' ठेवा . 

          आम्ही आपल्या जनसेवेसाठी आतुर आहोत त्यात कुठलीही बाधा आलेली , कोणी आणलेली आम्हाला देखील खपणार नाही  .  आमची कळकळीची विनंती लक्षात घ्या आणि मुंबई महानगरपालिकेचा कारभार आजवर ज्या प्रामाणिकपणे चालवला आहे तो तसाच  भविष्यात  'चालू ' असू द्या . अशा ताथूरमाथुर यंत्रणांच्या चौकशीला  घाबरणाऱ्यातले आपण नाही आहात ,आपले आणि आपल्या संघटनांचे वरपर्यत पोहचणारेहात’  आपल्या वर अन्याय करणाऱ्या यंत्रणांचा गळा  दाबण्यास समर्थ आहेत याची खात्री आहेच . आणि  ती सत्यात   उतरेल याची देखील २०० टक्के खात्री देखील आहे .

               ज्या प्रकारे पालिकेने मुंबईतील रस्ते , दवाखाने ,पदपथ , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , दर्जेदार शिक्षण व्यवस्था  अशा  माफक पायाभूत सुविधा निर्माण केल्या , अधिकृत असो की अनधिकृत पणे सर्वांचा घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी  जी नागरिकांना मोकळीक दिली ,  उच्च दर्जाच्या सोयी -सुविधा निर्माण करत मुंबईला देशाची आर्थिक राजधानी , आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आणि भविष्यातील 'सिंगापूर ' होण्याची ताकद दिली अशा मुंबई पालिकेचा गौरव करण्याचे सोडून  प्रामाणिक ,पारदर्शक , लोकाभिमुख कारभाराची 'परंपरा ' असणाऱ्या मुंबई पालिकेची चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा  समस्त महाराष्ट्रीयन करदात्या नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध !

तळटीप ): पालिकेशी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रीतीने संलग्न असणाऱ्या  पालिकेतील लोकप्रतिनिधींच्या , सरकार मधील लोकप्रतिनिधींच्या "प्रामाणिकता ,सचोटी , जनतेप्रती उत्तरदायित्व , जनतेची सेवा करण्यासाठीची असणारी तळमळ या विषयी मत व्यक्त केलेले नाही कारण ज्या गुरूंचे शिष्य इतके सचोटी , प्रामाणिकतेची जातां -संवर्धन करणारे आहेत ते गुरु निश्चितच तितकेच प्रामाणिक असतील हे गृहीत धरलेले आहे .

) तळटीप : सदरील कौतुकाची थाप हि उपरोधिक नसून  ज्यांचा ज्यांचा मुंबईशी संबंध येतो आहे , आला आहे त्यांच्या  हृदयाच्या आतून आलेला हा आवाज आहे  .

 


 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .

danisudhir@gmail.com  9869226272

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा