THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

... आता तरी खंद्या कार्यकर्त्यांनी नागरीकांनी -मतदारांनीयोग्य धडा घ्यायला हवा



*राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेत एकमेकांशी शत्रुत्व -वैरत्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच खंद्या कार्यकर्त्यांनी नागरीकांनी -मतदारांनी आता तरी  योग्य धडा घ्यायला हवा*     

        शेतकऱ्यांच्या हितासाठी , गरीबांच्या कल्याणासाठी , नव महाराष्ट्राची निर्मिती अशी विविध स्वप्ने उराशी बाळगत विविध   राजकीय पक्षांनी १७ -१८ दिवसाच्या  संघर्षातून महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याचे सुनिश्चित केले आहे . या *आपल्या सरकारला* सर्वप्रथम शुभेच्छा .

          आता वळू यात मुख्य मुद्याकडे . *निवडणुका म्हटल्या की  सर्व प्रथम डोळ्यासमोर येतो तो ग्रामीण भागातील विविध राजकीय पक्षाच्या समर्थकांचा संघर्ष*  काही प्रमाणात  तो निमशहरी व शहरी भागात देखील दिसतो परंतू त्यात  तीव्रता नसते . 

       भाजपा -शिवसेना -काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या खंद्या समर्थकांनी आणि विशेष करून अशा समर्थकांनी की ज्यांनी या पक्षांसाठी आपल्याच कुटुंबातील , आपल्याच गावातील , आपल्याच तालुक्यातील अन्य लोकांचे तात्पुरत्या स्वरूपातील किंवा आयुष्यभरासाठी शत्रुत्व - वैरत्व निर्माण करून घेतले किंवा स्वकीयांना तोडले त्यांनी क्षणभरासाठी डोळे बंद करून *डोळस विचार* करून स्वतःलाच विचारावे की  मी काय मिळवले ? दुर्दैवाने याचे उत्तर आहे हिताचे काहीच नाही , पत्करावे लागली ती केवळ दुष्मनी . 

   गेल्या १७ दिवसातील भाजप -शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस या सर्वच पक्षांची वर्तवणूक पाहिली एक गोष्ट स्पष्टपणे दिसते ती म्हणजे पक्षांची नावे जरी वेगवेगळी असली , त्यांचे झेंडे जरी वेगवेगळे असले , त्यांचे निवडणूक चिन्ह जरी वेगवेगळे असले , त्या -त्या राजकीय पक्षाची व त्या पक्षाच्या नेतृत्वाची विचारधारा , पक्षाची तत्वे हि वेगवेगळी असल्याचे ' *भासवले* '  जात असले तरी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे *लोकप्रतिनिधी -नेता-पक्ष कुठलाही असला तरी त्याचे राजकारणात येण्यामागचे एक आणि एकमात्र तत्व आहे ते म्हणजे येनकेन प्रकारे सत्ताप्राप्ती* . अर्थातच ती कशासाठी हे तुम्ही -आम्ही सर्वच जाणतो !!!

         मग प्रश्न हा आहे की  , *आपण सामान्य नागरीक -मतदार विविध पक्षांचे खंदे समर्थक म्हणून विनाकारण रक्त का जाळायचे ? एकमेकांशी वैरत्व का पत्करायचे ? याचा सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे ती ग्रामीण भागातील युवकांनी* .  सत्ता कुठल्याही पक्षाची असो तसा फारसा काही फरक पडत नाही याची प्रचिती आपण सर्व मतदारांना गेल्या ३०/४० वर्षाच्या अनुभवातून आलेली आहेच . तरीही आपण मतदार सुज्ञ का होत नाही ? हा खरा प्रश्न आहे . बहुतांश नागरीक  उगाचच  आपला नेता , आपल्या पक्षाचे सरकार या  अंधविश्वासाने वाटचाल करत असतात . एक गोष्ट लक्षात ठेवावी की  , कुठलाच राजकीय पक्ष हा " *सत्तेसाठी राजकारण* " या सूत्राला अपवाद नाही . तो तो पक्ष , ते ते नेते काहीही सांगत असले तरी " सत्तेसाठी आणि केवळ सत्तेसाठीच सर्व काही " हा त्यांचा छुपा अजेंडा असतो .

*आता  मावळत्या भाजप -शिवसेनेच्या मावळत्या सरकारचेच उदाहरण पहा . हे सरकार पारदर्शक कारभार , स्वच्छ कारभार हा आपला अजेंडा असल्याचे सांगत होते . पण प्रत्यक्षात त्यांनी हा अजेंडा त्यांच्या त्यांच्या सोयीने राबवला . पारदर्शक कारभाराचा डंका पिटवून देखील ना त्या सरकारने नगरसेवक -आमदार -खासदार निधी जनतेसमोर ठेवण्याचा निर्णय केला ना स्थानिक स्वराज्य संस्थांतील *अधिकृत भ्रष्टाचाराला* आला घातला .  ना खाऊंगा - ना खाने दूंगा अशी दवंडी पिटवली मात्र खाजगी शैक्षणीक संस्थांना मात्र भरपेट खाऊ दिले , पालकांची आर्थिक लूट करू दिली* . 

     काँग्रेस गेली ७ दशके गरिबी हटवत आहे पण प्रत्यक्षात काय झाले आहे ते तुम्ही -आम्ही जाणतोच . राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी हिताची  दवंडी आता पिटवत असली तरी त्यांच्या काळात शेतकऱ्यांचे किती हित जपले गेले याचा देखील इतिहास आपल्या समोर आहे .

 असो !!! मांडावयाचा मुद्दा हा आहे की  ,सरकारे येतील -जातील . आज एखाद्या पक्षाचे सरकार  असेल तर कालातंराने अन्य कुठल्या पक्षाचे असेल . *जे राजकीय उमेदवार एकमेकांशी लढले ,  जे नेते निवडणुकी दरम्यान एकमेकांशी प्राणपणाने भांडले , जे -जे पक्ष निवडणुकीत एकमेकांची विचारधारा भिन्न असल्याचे सांगत लढत होते ते क्षणार्धात सत्तेसाठी एकत्र आले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे पक्ष निवडणुकीपूर्वी आम्ही जनसेवेसाठी-लोकहितासाठी  एकत्र येत निवडणूक लढले होते त्यांनी देखील सत्तेसाठी भांडणं करत काडीमोड घेतला आहे*  याचा अर्थ एकच राजकारणात *कुठलाही नेता एकमेकांचा शत्रू नसतो , कुठलाही पक्ष एकमेकांचा शत्रू नसतो* हेच जर धडधडीत नागडे सत्य असेल तर सामान्य नागरीक  , ग्रामीण भागातील मतदार आणि युवा या नेत्यांसाठी , राजकीय पक्षांसाठी नाहक शत्रुत्व का ओढून घेतो ?

        आता खरे तर प्रत्येक राजकीय पक्षाच्या समर्थकांनी -पाठीराख्यांनी  शहाणे होण्याची गरज आहे . निवडणूक काळात राजकीय संघर्षातून कार्यकर्त्यांच्या अंगावरील जखमा अजून भरून देखील आल्या नसतील , पण सत्तेसाठी राजकीय पक्षांनी मात्र आपल्यातील निवडणुकीतील विरोधाची दरी  सहजपणे बुजवत एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत . याचा विचार करत  *राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेत एकमेकांशी शत्रुत्व -वैरत्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच खंद्या  कार्यकर्त्यांनी -नागरीकांनी -मतदारांनी योग्य धडा घेण्याची गरज आहे*  होय ! विविध नेत्याचे -राजकीय पक्षाचे हितचिंतक असण्यास काहीच हरकत नाही फक्त त्यात आपण वाहत तर जात नाही ना ? याचा मात्र विचार करणे काळाची गरज वाटते .

आपल्या प्रतिक्रियांचे स्वागतच ..

 NOTE : हा संदेश शेअर करण्यास हरकत नाही उलट तसे केल्यास आनंदच वाटेल .
सुधीर दाणी . ९८६९ २२ ६२ ७२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा