THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने सर्व पक्षीय आमदारांना खुले पत्र

महाराष्ट्रातील राजकीय तमाशाच्या अनुषंगाने सामान्य मतदारांच्या मनातील भावना ध्वनित करण्यासाठी हा प्रपंच .


         ......  अखेर महाराष्ट्रातील चार पक्षीय लोकशाही नामक तमाशास पूर्णविराम मिळून सरकार मिळाल्यामुळे सत्तेचा प्रश्न निकालात निघाला असला तरी  झालेल्या प्रकारामुळे.  महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती बाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे . “मतदारांच्या मताला शून्य किंमत आहे हे उघडउघड  सिद्ध झाल्यामुळे आता भविष्यात मतदान करायचे कि नाही ? केले तरी कोणावर विश्वास ठेवून मतदान करायचे ?  हा महाराष्ट्राच्या मतदारांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे .  

        युती -आघाडीतल्या सर्वच आमदारांचे  २४ ऑक्टोबर पासून सरकार स्थापन करेपर्यंतचे वर्तन हे  " मतदार /जनता मूर्ख आहे हे गृहीत धरणारे  लोकशाही ला काळीमा फासणारे " होते  आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो .खरे तर या साठी आम्ही मतदारच दोषी आहोत असे आता आम्हाला वाटू लागले आहे कारण आम्ही मतदारांनीच तुमच्यावर विश्वास टाकत तुम्हाला मतदान केले....  ज्या प्रकारे तुम्ही उघड उघड विश्वासघात करत आहात ते पाहता   आम्ही तुम्हा आमदारांना मतदान केले हेच आमची सर्वात मोठी चूक होती अशी आमची धारणा झालेली आहे .  

  
      लोकशाही व्यवस्थेत जनता जनार्धनाच्या मताला  सर्वोच्च स्थान असते  असे म्हटले जाते परंतू  हे सगळे थोतांड असून प्रत्यक्षात  लोकप्रतिनिधींसाठी “  सत्ताप्राप्ती ”  लाच सर्वोच्च स्थान असते हे आता सर्वच जनतेला कळून चुकले आहे आजवर जे पडद्या आड घडत होते ते आता सर्व उघड उघड घडले  घडत असल्यामुळे तुम्ही अक्षरशः जनतेच्या समोर नागडे झालेले आहात. सत्तेच्या संघर्षात युतीने , आघडीने वा खिचडी ने  विश्वास मत ‘पास’ केले तरी एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की आम्हा ‘मतदारांच्या विश्वास’  परीक्षेत तुम्ही  सर्वच पक्ष  सर्वच आमदार  नापास झालेले आहात

      आजवर किमान काही अंशी आमचा विश्वास होता की  , प्रत्येक पक्षाला काही विचारधारा असते परंतू गेल्या महिन्यातील आपणा सर्वांचे वर्तन ( दुर्दैवाने यास कुठलाही पक्ष अपवाद नाही )  हे उघड्या डोळ्याने पाहता  आपणा ‘सर्वपक्षीयांचे’ वर्तन हे ‘कमरेचे सोडून , डोक्याला गुंडाळणारे’ होते.    हे वर्तन पाहता आम्हाला खात्री पटली आहे की , आपणा सर्वांचें झेंडे ,चिन्ह ,पक्ष  वेगवेगळे असले तरी आपणा सर्वांचे ध्येय मात्र केवळ एक  एकच दिसते ते म्हणजे  “एनकेन प्रकारे सत्ताप्राप्ती” .   
    
           अर्थातच असे ध्येय असण्यात गैर नक्कीच नाही मात्र आपण सर्वांनी  जनमताचा अनादर  करत ‘सत्ता ..सत्ता आणि सत्ता’  या ध्येयप्राप्ती साठी जो मार्ग चोखाळला  आहे तो मात्र अतिशय निषेधार्य आहे.    आपण सर्वपक्षीय नेते -आमदार नेहमीच महाराष्ट्राचा उल्लेख हा  ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असा करत असतात पण याच महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात जो काही  “राजकीय तमाशा”  चालू होते  त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा गेला आहे , संपूर्ण भारतात  जगात महाराष्ट्राची नाच्चकी झालेली आहे . 

      आपण सर्वपक्षीय आमदारांच्या वर्तनामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी केली जाऊ लागली आहे आणि भविष्यात याची किंमत संपूर्ण महाराष्ट्राला आगामी बऱ्याच काळासाठी भोगावी लागणार आहे .तुम्ही एकमेकांवर विश्वासघात केल्याचा ,पाठीत खंजीर खुपसन्याचाआरोप करत आहात पण खऱ्या अर्थाने आज तुमच्या निर्लज पणाच्या कृतीतून  तुम्ही सर्वच पक्ष महाराष्ट्रातल्या मतदारांचा विश्वासघात करत आहात  , त्यांच्या पाठीत नव्हे तर समोरून पोटात खंजीर खुपसत आहात...

     ... आणि त्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या की , आम्हा ९५ टक्के सामान्य नागरीकांना कोणतेही सरकार असले तरी तिळमात्र फरक पडत नाही  हे गेल्या ७० वर्षाच्या अनुभवातून आमच्या ध्यानात आलेले आहेफरकच पडत असेल तर तो तुम्हाला...आम्हाला नाही... त्यामुळे  लोकांची भावना आहे की , अमुक -तमूक सरकार असले पाहिजे,    जनभावनेच्या नावाखाली आपण धूळफेक करत केवळ आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयन्त करत असतात हे आम्ही जाणतो त्यामुळे ‘हितासाठी , कामगारांच्या हितासाठी’  हि दवंडी पिटवणे बंद करा.  

              होय ! एक चांगले झाले , गेला महिनाभर चाललेल्या  सत्तेची मलाई लाटण्याच्या संघर्षातून आपल्या सर्वांचा बुरखा फाटून खरे स्वरूप आम्हा समोर आले आहे  . आपणां सर्वांचा  बुरखा  वेगवेगळा असला तरी त्या मागे लपलेला खरा चेहरा हा सारखाच आहे आणि तो म्हणजे ‘ सत्तापिपासू’  चेहरा  . निर्लजपणाचा कळस काय असू शकतो हे आपण सर्वांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे . राजकारणात कुरघोडी असतात हे आजवर ऐकले होते पण आज जे चालले आहे तो  निर्लज्ज राजकारणाची परिसीमा  म्हणावी लागेल.  

                 आपण २८८ लोकप्रतिनिधी पैकी एकालाही आपल्या मतदारांशी देणेघेणे नाही हेच आपण दाखवून दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्र ओला  दुष्काळ , त्यातून झालेली पिकांची हानी  त्यातून उडणारा महागाईचा  आगडोंबात होरपळत असताना आपण मात्र सत्तेच्या तमाशात मश्गुल असल्यामुळे आप-आपल्या मतदारसंघात फिरकला देखील नाहीत .

      आता , आपण भविष्यात जेंव्हा आम्हा मतदारांसमोर येताल तेंव्हा तुमचा हिशोब करूच . परंतू आम्हा मतदारांचे आपणास केवळ एकच सांगणे आहे की  , या पुढे तरी आपण “छत्रपती शिवाजी -शाहू -फुले -आंबेडकर-गांधी -टिळक-आगरकर”  या महामानवांचे नाव घेत जाऊ नका कारण तुमच्या पैकी एकाच्याही आचरणात  टक्का  देखील त्यांचे विचार नाहीत . तुमचा विचार एकच दिसतो तो म्हणजे  “सत्तेसाठी काहीही ‘ .   आम्हा मतदारांच्या समोरील  सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की , जेंव्हा तुम्ही भविष्यात आमच्या समोर येताल तेंव्हा आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा_  ?  का विश्वास ठेवायचा?  

       शेवटीजाता जाता हेच सांगणे आहे कीआता या पुढे तरी , आमच्या पुढ्यात येऊन आम्हाला लोककल्याणकारी राज्यासाठी , लोकांच्या सेवेसाठी मताची भिक मागू नका ... आम्हा मतदारांच्या नावाने अश्रू गाळणे बंद करा... आम्ही सर्व महाराष्ट्रीयन  मतदार मूर्ख आहोत असे गृहीत धरून चालवलेला लोकशाही ला काळीमा फासणारा तमाशा बंद कराभविष्यात आमची फसवणूक थांबवण्यासाठी तुमच्या युत्याआघाड्या बंद करातुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेततुम्ही सर्व एकच आहात आणि ते म्हणजे.... लोकशाही व्यवस्थेला लागलेली कीड...

  आजवर तुम्ही “मतदार विसराळू आहेत”  हे गृहीत धरत वाटचाल करत आहात हे आम्हाला ज्ञात आहे पण गेल्या महिन्याभरातील तुम्हा सर्व पक्षीय आमदारांचे वर्तन हे विसरण्या पलीकडचे आहे ... आम्ही या गोष्टी   कदापिही विसरणार नाही  हे तुम्हीच लक्षात ठेवा.  सत्ता तुम्हाला जनसेवा लोकसेवा करण्यासाठी हवीय अशी कितीही दवंडी पिटली तरी तुम्हाला सत्ता जनतेच्या लुटीसाठी हवी हे आता शाळकरी पोरं देखील जाणते_... हे ध्यानात असू द्यात... आज आमच्या समोर पर्याय नाही पण प्रत्येक अती गोष्टीला अंत असतो यावर आमचा विश्वास आहे ...आणि तो दिवस देखील नक्की पुन्हा येईल .

      वस्तुतः ,  खरे तर कोर्टाने कुठलाही निकाल देण्याऐवजी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी  लोकशाही   व्यवस्था बळकट करण्यासाठी  गेल्या महिनाभरातील सर्वच आमदारांचे असंवेदनशील लोकशाही विरोधी वर्तन लक्षात घेता सर्वच्या सर्व म्हणजे २८८ आमदारांना कोर्टाने किमान १० वर्षासाठी संपूर्ण लोकशाही प्रक्रियेतून , निवडणुकीतून निलंबित करायला हवे होते  , तो सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची सर्वात मोठा धडा ठरू शकला असता .

 सुधीर दाणी  , बेलापूर , नवी मुंबई   ९८६९ २२ ६२ ७२



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा