THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

सुशासन -पारदर्शक व्यवस्था : स्वप्न की मृगजळ ?

        
        कोल्हापूरच्या महापौर लाचखोरीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . लाचखोरीबरोबरच महापौरांचे नंतरचे वर्तन आणि त्यास असणारा शासन -प्रशासनाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असणारा वरदहस्त एकूणच व्यवस्थेच्या कोडगेपणाची चीड  आणणारा  आहे . अर्थातच नजीकच्या काळात सर्व काही " नियमाप्रमाणे " होईल आणि आजवरच्या इतिहासाप्रमाणे हे प्रकरण ' इतिहासजमा ' होईल . कदाचित याच महापौर आपल्या ' कर्तुत्वाने ' भविष्यात आमदार -खासदार आणि कदाचित अधिकच ' कर्तुत्व ' असेन तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीही होऊ शकतील …… होय कारण इथे लोकशाही आहे ?

      असो ! मुद्दा तो नाही . मुख्य मुद्दा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीचा आणि जनतेच्या पैशांच्या विनियोगाचा . नुकताच मुंबईकरांवर करवाढ लादणारा मुंबई महानगरपालिकेचा ३३ हजार ५१४ कोटीचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे . नवीमुंबई महानगरपालिकेचे बजेटही १८ हजार करोड रुपयांचे असते .हि दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणे .

 published in Sakal Mumbai on 18 Feb 2015:

LINK: http://epaper3.esakal.com/18Feb2015/Normal/Mumbai/page7.htm
      
       बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचे बजेट सक्षम असते .  विचार करा प्रतिवर्षी एवढा निधी खर्च होतो , आणि तो संवेदनशीलरीत्या केला गेला तर आपली शहरे ' शांघाय ' सोडा , प्रत्यक्षात ' स्वर्ग ' होऊ शकतील . पण आज चित्र काय आहे ? चालायला पदपथ नाहीत , खड्डेविरहीत रस्ते नाहीत , पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष , आरोग्य -शिक्षण व्यवस्था नेहमीच सलाईन वर . एक ना धड , बहुतांश पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि जिथे अस्तिवात आहेत त्यांच्या दर्जावर प्रश्न चिन्ह आहे . 

पारदर्शक व्यवस्था -सुशासन : एक  दिशाभूल

     जेंव्हा जेंव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा येतो तेंव्हा तेंव्हा लोकप्रतिनिधी त्याची सांगड रेशनकार्ड , लायसन्स , रेशन व्यवस्था ,७/१२ उतारा यासम गोष्टींशी घालून दिशाभूल करतात . रेशनकार्ड आयुष्यात एकदाच काढावे लागते . कागदपत्रे असतील तर हे मिळवणे हे फार अग्निदिव्य नाही . अगदी चीरीमिरीत हे सर्व थकून जाते . चिंधी निर्णयाभोवती फेर धरत शासनाकडून दिशाभूल केली जाते . सुशासन आणि पारदर्शकता हा स्वच्छ हेतू आहे तर , जमिन-सदनिका खरेदी-विक्रीचे  सर्व व्यवहार संकेतस्थळावर का टाकणे अनिवार्य केले जात  नाही . परंतु खरा प्रश्न आहे तो अप्रत्यक्षरीत्या जनतेला लुटल्या जाणाऱ्या व्यवस्थांचा .  दैनदिन जीवन जगताना लाखो -करोडोंचा फटका देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते . त्याकडे मात्र सुशासनाचे झेंडे आपल्या खांद्यावर मिरवत सत्ता हस्तगत करणारे पक्ष ( त्यास कोणीही अपवाद नाही ) मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लुटीकडे  जाणीवपूर्वक कानाडोळा करतात . सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमे देखील याविषयी चर्चा करताना दिसत नाहीत .

     आज जनतेचा पैसा सनदशीर मार्गाने लुटण्याची व्यवस्था ठरतायेत स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यात ग्रामपंचायत -पंचायत समिती -जिल्हा परिषदा -पालिका -महानगरपालिका सर्वच आल्या . शब्दशः या स्थानिक स्वराज्य संस्था लुटीचे केंद्रे झाल्या आहेत , तेही नागरिकांच्या डोळ्यादेखत आणि नाकावर टिच्चून .  उच्चतम दर -कनिष्ट दर्जा -कामाची पुनरावृत्ती हि लुटीची त्रिसूत्री आहे . जनतेच्या घामातून कर रूपाने प्राप्त केलेला पैसा इतका उघडपणे आणि सनदशीर पद्धत्तीने लुटला जाणारे असे उदाहरण दुर्मिळच . करोडो रुपयांच्या पैशाचा विनियोग कसा होतो हे कर भरणाऱ्यांच्या गावीच नसते . स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे 'बरम्युडा ट्रगंल ' झाल्यात , किती बजेट असो गायब ! प्रश्न हा आहे सुशासन-पारदर्शक व्यवस्थेचा डांगोरा पिटणारे सरकार या कडे डोळेझाक का करते .

    शासन मान्य लुटीचे सार्वत्रीकरण : जिथे तिथे लुट आणि लूटच .  शासनमान्य (?) लुटीचे अशी अनेक उदाहरणे आहेत . वानगीदाखल काही अशी : शैक्षणिक संस्था , बांधकाम क्षेत्र , खाजगी हॉस्पिटल्स. जाऊ द्या अहो साधे उदाहरण  रिक्षाचे पहा . मुंबई उपनगरांचा काही भाग वगळता राज्यात बहुतांश शहरात रिक्षांची मनमानी आहे . पुणे -औरंगाबाद सारख्या शहरात १/२ किमी साठी ४०/६० तर ५ किमी साठी १०० रुपये मोजावे लागतात . सरकार का नाही राज्यात मीटर नुसार(च) रिक्षा हा नियम अंमलात आणत . शेतकऱ्यांकडून २ रुपयांना घेतलेली मेथी जुडी शहरात २० रुपयांना विकली जाते . मृत व्यक्तीचे शव शहरातल्या शहरात नेण्यासाठी आठशे /हजार रुपये मोजावे लागतात , म्हणे सुशासन ! अशी शेकडो उदाहरणे आहेत . मोठ्यांना ' हात ' लावायची ताकद नाही तर हातावरचे पोट आहे हे कारण पुढे करत त्याकडे दुर्लक्ष करावायचे . सगळीकडे आनंदच . पेट्रोल -डिझेलचे दर वाढले की कोणाच्याही 'आदेशाची ' वाट न पाहता रात्रीतून महागाई वाढते मात्र ४ वेळा पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात होऊनही महागाई जैसे थेच . कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या लुटीचा प्रश्नही अजून सुटू शकलेला नाही म्हणे सुशासन ! प्रश्न हा आहे सुशासन-पारदर्शक व्यवस्थेचा डांगोरा पिटणारे सरकार या कडे  डोळेझाक का करते .

सुशासन, लोकाभिमुख -पारदर्शक व्यवस्था केवळ घोषणा नको :

     भारतीय लोकशाहीचा पाया निवडणुका आहेत आणि निवडणुकांचा पाया "घोषणा- आश्वासने  " आहेत म्हणजेच भारतीय लोकशाहीचा पाया हा 'घोषणा -आश्वासने " आहेत असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही . वर्तमान राज्य आणि केंद्र सरकारला देशात पारदर्शी -सुशासन लोकशाहीचे ' कमळ ' रुजवायचे असेन तर त्यांनी केवळ तत्सम घोषणा करण्या ऐवजी या घोषणास पूरक प्रत्यक्ष कृती करावी , अन्यथा उमललेले कमळ हळूहळू कोमजणारच हे शंभर टक्के निश्चित .

    व्यक्ती -राष्ट्राच्या प्रगतीचा राजमार्ग असणाऱ्या शिक्षण संस्था आज भ्रष्ट समाजाचे रोपण-संवर्धन 

करत आहेत . " पैसा फेको , डॉक्टर -इंजिनियर -एमबीए बनो " हे वर्तमान शिक्षण व्यवस्थेचे 

ब्रीदवाक्य  ठरतायेत . सर्व शैक्षणिक संस्थाना आपली सर्व माहिती (आर्थिक माहिती सह ) संकेत स्थळावर टाकणे अनिवार्य करा .गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धत्तीने  शिक्षक -प्राध्यापकांच्या नियुक्त्या अनिवार्य असाव्यात . कमाल मर्यादेसह शुल्क नियंत्रण कायदा केजी टू पीजी साठी लागू करा . याला म्हणतात सुशासन , पारदर्शक -लोकाभिमुख व्यवस्था .


    शिक्षण क्षेत्र हे वानगीदाखल उदाहरण . बांधकाम क्षेत्र , खाजगी हॉस्पिटल्स यासम लुटीच्या ठरणाऱ्या क्षेत्रात पारदर्शकता  आणणे अशक्य नक्कीच नाही . नाही ना ? हे तुम्हा -आम्हाला पटते ? मग प्रश्न हा आहे की स्वातंत्र्याच्या ६ दशकाच्या प्रवासानंतरही पारदर्शक व्यवस्था , लोकाभिमुख शासन -प्रशासन हि  स्वप्न आजवर प्रत्यक्षात का उतरले  नाही . काय वाटते ? होय , एकच कारण असू शकते ते म्हणजे करावयाचेच नाही . ???????? अर्थातच मान्य नसणारयानी आपली मते जनतेला ' मते ' मागण्या आधी जनतेसमोर मांडावीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा