THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

प्रगल्भ लोकशाहीला पूरक ठरणारा ठरणारा निकाल !!!!

         
       दिल्ली विधानसभेच्या अभूतपूर्व –अकल्पित व ऐतिहासिक निकालाने लोकसभा निवडणुकीनंतर चौफेर उधळणाऱ्या भाजपच्या वारूला लगाम लावण्याबरोबरच भारतीय लोकशाहीला भविष्यात 'अच्छे दिन ' येणार असल्याचे शुभसंकेत दिले . राजकीय विशेल्षक , निवडणूक निकालांचे अभ्यासक , तज्ञ आणि माध्यमे 'आप'आपल्या दृष्टीकोनातून अन्वयार्थ लावतील परंतु सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून या निकालाचा एका आणि एकच अर्थ संभवतो तो म्हणजे त्यांना दिल्लीत 'आप'लेच सरकार हवे होते . गेल्यावेळी ते स्वप्न काही कारणांमुळे अपूर्ण राहिले होते आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी अन्य सर्व राजकीय पक्षांचे प्रचिलित राजकारणाला मूठमाती देत , सर्व माध्यम पंडितांचे अंदाज धुडकावून लावत केजारीवालांच्या पारड्यात ७० पैकी तब्बल ६७ जागा टाकल्या . या पूर्वी असा पराक्रम केवळ एकदाच झाला होता तो म्हणजे १९८९ मध्ये सिक्कीम विधानसभा निवडणुकीत साक्किम संग्राम परिषदेला सर्वच्या सर्व ३२ जागा मिळाल्या होत्या . गेल्या काही दशकातील आघाडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा विजय निश्चितच लोकशाही व्यवस्थेत "मैलाचा दगड " ठरणारा आहे .


      'आप' च्या या विजयाने प्रचलित राजकारणातील गृहितकांना सुरुंग लावला आहे , पैकी काही अशी : सत्ता हि कोणाची(ही ) सुभेदारी -जहागिरी नाही ; लोकशाहीत प्रस्थापित नेते हे राजे असतात आणि त्यांना निवडणुका विजयाचे 'अमृत' मिळालेले आहे ; कुठलेही ठोस कर्तृत्व -विकासकामे न करता निवडणुकांच्या रणधुमाळीत केवळ जात-पात-धर्माच्या शिडात हवा भरत सत्तेचा सोपान प्राप्त करता येतो ; जनतेला गृहीत धरता येते ; पैसा -सत्ता -झुंडशाही -प्रचाराचा धडाका -लाट यांच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात.

      प्रचलीत परंपरागत राजकारण आता कालबाह्य झाले आहे हेच या निकालाने दाखवून दिले . घराणेशाही हा वर्तमान राजकारणाला जडलेला कॅन्सर आहे .  प्रस्थापितांचा  प्रत्येक निवडणुकीतील उमेदवारीवर प्रथम हक्क असतो आणि विजय त्यांच्या पायाशी लोळण घेतो या आजवर जोपासल्या गेलेल्या मिथकांना दिल्ली करांनी भल्या -भल्यांना 'आप'ल्या घरची वाट दाखवत तिलांजली दिली . हे सुचिन्ह ठरते. ९० टक्के जागा 'आप'च्या पारड्यात टाकणाऱ्या निकालाचे अनेक अन्वयार्थ असले तरी सामान्य मतदाराच्या दृष्टीने एकच अर्थ निघतो तो म्हणजे " गेली ६ दशके सत्तांतरे घडवूनही फारसा फरक पडलेला नाही त्यामुळे एक संधी आपला देण्यात काहीच नुकसान नाही; झाला तर फायदाच होईल " इतक्या साध्या  सार्वत्रिक विचारामुळेच मुळेच असंभव सहजसंभव झाले .

  


      दिल्लीचा निकाल म्हणजे मोदी लाटेला लागलेली ओहटी यावर मतमतांतरे असू शकतील परंतु हा निकाल मोदी सरकारला आता काही तरी "करून दाखविण्यास " भाग पाडणारा असणार आहे . दिल्लीत आपचे सरकार हि भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी  सुदृढतेसाठी पूरक ठरणारी आणि दीर्घकाळ परिणाम करणारी घटना असणार आहे . आणि म्हणूनच हा निकाल लोकशाही व्यवस्थेतील मैलाचा दगड ठरणार हे निश्चित .

     २ वर्षापूर्वी रामलीला मैदानावरील आंदोलनानंतर दिल्लीकरांसह अन्य भारतीयांना सत्ताकारणात एका वेगळ्या प्रयोगाची आस होती. गेल्या वेळी ती संधी चुकली होती आणि त्याची स्वप्न पूर्ती दिल्ली करांनी वर्तमान विधानसभा निकालातून साधली असे दिसते . अरविंद केजरीवालांचा पूर्वइतिहास पाहता त्यांना आता 'मुक्त हस्त ' मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करतील आणि एक 'आदर्श ' सरकारचा पायंडा पाडतील या आशेपोटीच ४९ दिवसातील काही चुकांना माफी देत आम आदमीने त्यांना संधी दिली आहे .

         केवळ दिशाभूल करणारे आणि भावनिक लाटांवर केले जाणारे राजकारण यापुढे भारतीय मतदार खपवून घेणार नाहीत हा इशाराच समस्त निकालाने समस्त राजकीय पक्षांना दिला आहे आणि या निकालाचे हे सर्वात महत्वाचे फलित म्हणावे लागेल . प्रस्थापित राजकीय पक्षांनी राजकारणाला जे विद्रूप स्वरूप आणले होते त्यावर 'झाडू ' मारण्याचे काम आपने केले आहे हेही तितकेच महत्वाचे . या निकालाच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या सर्वच निवडणुकांसाठीचा दृष्टीकोन सर्वच राजकीय पक्षांना बदलणे या निकालाने अनिवार्य केले आहे . जो बदलणार नाही त्याचे सत्तेतील 'हात ' कापलेच जाणार हा गर्भित इशारा राजकीय नेतृत्वाने ओळखणे गरजेचे आहे .

पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी  पूरक काळ : प्रत्येक गोष्टीसाठी ती वेळ यावी लागते असे म्हणतात आणि याच अनुषगाने आता प्रचलीत प्रस्थापित आणि कुठलेही कर्तृत्व न करता केवळ 'चांगला ' पर्याय नाही म्हणून आलटून-पालटून सत्तेचा सोपान चढणाऱ्या पक्षांना समाजातील 'चांगल्या -सचोटी -तळमळ - लोककल्याणकारी दृष्टी आणि समाज -राष्ट्र विकासाची प्रामाणिक  आंतरिक तळमळ असणारयांनी एकत्र येत पर्याय उपलब्ध केला तर जनता त्यांच्या पाठीशी उभा राहते हा विश्वास दिल्ली निकालाने दिला असल्यामुळे नजीकच्या काळात असे प्रयोग करण्यासाठी  सुगीचा काळ आहे . नव्हे ! असे पर्याय निर्माण होणे लोकशाहीच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक ठरते .

      “ Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely”. याची बाधा 'आम 

आदमी'च्या स्वप्नातील 'आप'च्या सरकारला होऊ नये , जनतेने टाकलेल्या विश्वासार्हतेला तडा जात 

अपेक्षाभंगाचे दुः ख नशिबी येऊ नये या अपेक्षेसह नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवालांना 

हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा