" साधू -संत येती घरा , तोचि दिवाळी दसरा " असे म्हटले जात असे . आता काळ
बदलला आहे . आजच्या
कलयुगात आता यात बदल झाला असून " मुख्यमंत्री ,मंत्री-संत्री जिथे
जाती तिथे -तिथेच
रस्त्यांना चकाकी येती
" याची
प्रचीती नागरिकांना येत आहे . मंत्रालयाचा परिसर
असो की आमदार निवासाचा परिसर असो . एवढेच कशाला
आमदार -खासदार यांची आप
आपल्या मतदार संघातील निवासस्थाने असणाऱ्या ठिकाणची रस्तेही 'टकाटक ' असतात .
एखादी
ललना जशी आपल्या सुंदर चेहऱ्यावर
फौन्डेशनचे एकावर एक असे थर चढवत असते तद्वतच
राज्यकर्त्यांचा ( खास करून सत्ताधारी) वावर जिथे -जिथे असतो
तिथे -तिथे गुळगुळीत रस्त्यावर
नियमितपणे
डांबराचे थर चढवले जातात .
उलटपक्षी महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामीण भागातील रस्ते , तालुक्याला जोडणारी रस्ते मात्र
रस्ते म्हणावीत या लायकीची राहिलेली नाहीत .
सरकारी नियमाप्रमाणे वेळोवेळी डागडुजी ,
दुरुस्ती करूनही एखाद्या गोऱ्या स्रीच्या मुखकमलावर काळा तीळ जसा असतो तितकेच या
रस्त्यावर
डांबराचे प्रमाण असते .
१०-१५ वर्षापूर्वी गावाकडील रस्ते डांबरी झाले . नंतर मात्र आजतागायत देखभाल आणि
डांबरीकरणा अभावी हे रस्ते 'कुपोषित
' होताना दिसत आहेत . होय , आम्हा जनतेस ज्ञात
आहे कि कागदोपत्री वेळोवेळी या रस्त्यांची दुरुस्ती , डांबरीकरण झालेले आहे . लोकशाहीत
नागरिकांनी एकदा निवडून दिले की ,त्या लोकप्रतिनिधीने "लोकशाही "
पद्धतीने कोणकोणती कामे
केली? , कोणा कॉनट्रक्टरकडून करून घेतली? , कामाचा दर्जा काय? , प्रत्यक्षात काम झाले आहे
किंवा नाही ? हे विचारण्याचा 'घटनादत्त ' अधिकार न उरल्यामुळे ते विचारण्याचे धाडस ग्रामीण
भागातील
स्वतःला 'सुशिक्षित ' समजणारी जनता करू शकत
नाही .गावात रहावयाचे असेल तर
'नेत्यांना
' धरूनच राहावायला हवे . ...अन्यथा सांजवेळी त्या नेत्याचा पुजारी ' अमृत ' प्राशन करून
तुमच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार करण्यासाठी येणारच या विषयी शंका नसावी .
राहतो प्रश्न तो ग्रामीण भागातील रस्त्यांना लागलेल्या 'भ्रष्टाचार सुरुंगा ' विरोधात
प्रसारमाध्यामानी आवाज उठवण्याबाबत
. स्थानिक
पत्रकार आणि बांधकाम विभागातील ( पीडब्लूडी
)कर्मचारी-अधिकाऱ्यांची 'उठण्या बसण्याची ' जागा' एकच ( श्रम परीहाराची !... गैरसमज नको
) असल्यामुळे हि समस्या ‘रस्त्यावर’ यायची शक्यता धुसर आहे . मिळणाऱ्या सरकारी
जाहिराती आणि अन्य 'अर्थपूर्ण
' सबंधामुळे स्थानिक प्रसार माध्यमांचे 'हात ' बांधलेले आहेत .
निर्भीड, नि:पक्ष पत्रकारिता केव्हांच हद्दपार झाली आहे
. त्या मुळे ‘हे असेच चालणार’ हि ग्रामीण
मानसिकता अधिक दृढ होताना
दिसते आहे . ज्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत
नाही
त्यांनी आपला उरलेला जमीन-जुमला विकून शहरांची वाट धरली आहे .
उरतो प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील
प्रसारमाध्यमांचा. अर्थात ते तरी कुठे कुठे पुरणार .
शायनिंग इंडियातील शहरांचे प्रश्न अधिक 'बातमी मुल्य '
असणारे
असल्यामुळे भारतातील
समस्यांकडे लक्ष देऊन आपल्या व्यावसायिक मूल्यांना तिलांजली
देत पायावर धोंडा का पडून
घ्यावा हा प्रश्नही तितकाच ‘मौल्यवान ' आहे
.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील रस्त्यांची लायकी 'रस्ता ' म्हणण्या इतपत
उंचावायची असेल तर मा . मुख्यमंत्र्यांनी एकदा स्वतः गाडीतून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा जाहीर करावा
. संपूर्ण यंत्रणा आपसूकच कामाला लागेल
आणि रस्ते सुधारतील . ...अर्थातच अति महत्वाच्या
'लोकोपयोगी' कामांमुळे असे करणे शक्य नसल्यास त्यांनी गेल्या २० वर्षात रस्त्यावर केलेला एकूण
खर्च , प्रत्यक्षात झालेली कामे , झालेल्या कामाचा दर्जा , वर्तमानातील या रस्त्यांची वस्तुस्थिती
याचा
लेखाजोखा घ्यावा.
पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत
नवीन रस्ते अगदीच निर्विकार आहेत .
पंतप्रधानांची प्रतिमा जपण्याकडचा कल या योजनेत
दिसतो .
सद्यस्थितीत "रस्त्यावर श्वेतपत्रिका " काढा असा कोणताही
सुजाण नागरिक मागणी करणार
नाही कारण
महाराष्ट्राचे 'रस्ते विकास ' खाते हे रस्ते गुजरात मधील रस्त्यांपेक्षाही अधिक
दर्जेदार
असल्याचा 'जावई शोध' लावून महारष्ट्रातील करोडो जनतेला निरुत्तर
करेल ....त्यामुळे सध्यातरी
किमान या रस्त्यांचा धांडोळा घ्या इतकीच मागणी
करणे जास्त संयुक्तिक ठरेल .
……..आणि हो जाता जाता आपल्या सर्व सन्माननीय
लोकप्रतिनिधीना एक आठवण करून
द्यावीशी वाटते की , आता एक वर्षावर निवडणूक आली आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघापासून दूर
राहणाऱ्या
लोकप्रतिनिधीना 'नाईलाजाने ' का होईना मतदार राजाला ( तसे संबोधण्याची प्रथा
आहे )
मते मागण्यासाठी या रस्त्यावरून फिरावे लागेल . आपल्या आलिशान गाडीतून महिना दोन महिने
का होईना या
रस्त्यावर फिरताना स्वतःला आणि आलिशान गाड्यांना काही त्रास होणार
नाही या साठी तरी ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्ष द्या ! ..जय
महाराष्ट्र !! जय महासत्ताक भारत !!!
ता.क : ज्या
लोकप्रतिनिधींचे मतदार 'फिक्स ' आहेत त्यांनी या मागणीकडे 'दुर्लक्षच '
करावे
हि विनंती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा