THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

'भाडे तत्वावर सदनिका: ११च महिन्याचा करार का ?

                    

     सदनिकेचे हस्तांतरण करताना किंवा विक्री करताना सदनिकाधारकाला बांधकाम व्यवसायिकाचे  ना हरकत प्रमाणपत्र 'एन ओ सी ' घेणे बंधनकारक नाही असा निर्णय घेऊन  मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील लाखो सदनिकाधारकांना दिलासा दिला आहे . ग्राहकाला आपण खरेच राजा आहोत असा वाटणारा निर्णय घेतल्याबद्दल मा. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना लाख लाख धन्यवाद व हार्दिक अभिनंदन .
             

      बांधकाम व्यवसाय हा सर्वाधिक लूट आणि नफेखोरीचा आहे हे सर्व ज्ञात ,सर्वश्रुत 
आहे . या व्यवसायात पारदर्शकता येण्यासाठी अनेक उपाय अवलंबले जाऊ शकतात . परंतु जाणीव पूर्वक याकडे डोळेझाक केली जात होती . यामुळेच आजवर बिल्डर ,डेव्हलपर हे 
राजकारणी व मुख्यमंत्र्यांचा (माजी ) फोटो त्यांच्या कार्यालात लावीत असत पण 
पहिल्यांदाच ग्राहकांनीही मुख्यमंत्र्यांचा फोटो आपल्या सदनिकेत लावावा असे वाटणारा हा निर्णय .
      आकाशाला भिडणारे जांगांचे दर आणि आवाक्याबाहेर जाणारे व्याज दर यामुळे 
 वर्तमान परिस्थितीत स्वतःचे घर घेणे दिवास्वप्न ठरते. 'लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून ' या म्हणीतून घर बांधणीतील वा घर खरेदीतील अनंत अडथळे ध्वनित होतात 
.मध्यम आणि निम्न मध्यम वर्गासाठी सध्या उपलब्ध असलेला मध्यममार्गी मार्ग म्हणजे घर 'भाडे तत्वावर 'घेणे . तो हि मार्ग दिवसेंदिवस खडतर बनत आहे . ११ महिन्याचा 
करार , एजेन्टला कमिशन पोटी द्यावे लागणारे २ महिन्याचे भाडे तर १ महिन्याचे कमिशन ज्याचे घर घेत आहोत त्या मालकाला या सारख्या नियांमानामुळे ससेहोलपट होते . पुन्हा ११ महिन्यानंतर ...येरे माझ्या मागल्या . घर विकत घेणे ही एकदाची डोकेदुखी आहे तर 
घर भाड्याने घेणे ही दर ११ महिन्याची . शाळांचे प्रवेश , वातावरणाशी जुळवून घेणे , 
लहान मुलाचे मित्र-मैत्रीण बदलल्यामुळे होणारी घुसमट , नवनवीन शेजाऱ्यांशी जुळवून 
घेण्यासाठी करावी लागणारी कसरत ,कटकट यासारख्या कारणामुळे  घर बदलणे 
अग्निदिव्य ठरते .सुदैवाने जर पुढे ११ महिन्याची मुदतवाढ मिळाली तरी पूर्वीचा एजेन्ट कमिशन मागतो .
     सध्याचे युग हे तंत्राद्यानाचे युग आहे असे म्हटले जाते . मग जी घरे भाड्याने 
उपलब्ध आहेत त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध का करून दिली जात नाही . 
कोणाच्या हितासाठी हि माहिती 'ओंनलाईन' केली जात नाही, याचा खुलासा व्हायला हवा .
    मुळात या संदर्भात काही कळीचे प्रश्न आहेत . ११च महिन्याचा करार का ? जास्त 
काळासाठी एखादा भाडेकरू एका ठिकाणी राहिल्यास मालमत्ता त्याचे नावे होईल  हि भीती रास्त आहे का ? वास्तवात असा नियम आहे का ? असल्यास तो कालसुसंगत आहे का ? असा नियम मालकावर अन्यायकारक नाही का ?  या प्रकारामुळे आज शेकडो घरे खाली 
असूनही भाडेतत्वावर दिली जात नाही . पालकांच्या इच्छेनुसार  मालमत्ता अपत्याच्या नावे करावयाची असली तरी सर्व सोपस्कार पूर्ण करावे लागतात . मग भाडेकरू कितीही दिवस 
राहिला तरी मालमत्ता त्याच्या नावे कशी होऊ शकते . जसा बिल्डरच्या एनओसीचा अस्तित्वात नसलेला नियम लादला गेला होता तद्वतच मध्यस्तीच्या फायद्यासाठी असा 
नियम जाणीवपूर्वक पसरवला तर जात नाही . संबंधित यंत्रणा , या क्षेत्रातील जाणकार , तज्ञ  यांनी  जनहितासाठी खुलासा करावा . 

         घर / फ्लॉट  हडप होऊ नये या भीतीपोटी अनेक सदनिकाधारक सदर फ्लॉट मोकळे ठेवणे पसंद ठेवतात . त्यामुळे सदनिकांच्या तुडवड्यात भरच पडते . हा सर्व प्रकार म्हणजे ," दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत " असा होतो . यावर त्वरित उपाय योजनाची आवशकता आहे .
 
   दुधाची तहान ताकावर भागवणाऱ्या 'भाडेकरूंसाठी' ही मा. मुख्यमंत्र्यांनी काही उपाय 
योजना करावी ही माफक अपेक्षा . संकेतस्थळावर भाडेतत्वावर उपलब्ध घरांची माहिती  
'ओंनलाईन' करून देणे हा एक त्यावरील मार्ग संभवतो. त्याची दृष्टीक्षेपातील फायदे असे :
  • ज्याला घर भाड्याने हवे आहे त्याला त्याची माहिती सहज उपलब्ध होईल .
  • कमिशनपोटी बसणारा आर्थिक फटका वाचेल .
  • आज ६० ते ७० टक्के घरे भाड्याने दिल्यानंतरही त्याचे 'रजिस्ट्रेशन' केले जात नाही . त्यामुळे सरकारचा महसूल तर बुडतोच पण कोण कुठे राहतो याची माहिती मिळत नाही , शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .
  • 'ओंनलाईन' माहिती अनिवार्य केल्यास सरकारला महसूल मिळेल , राहणाऱ्या नागरिकांची माहितीही मिळेल आणि ग्राहकांचीही ससेहोलपट थाबेल .
  • एका व्यक्तीच्या नावावर किती घरे आहेत याचीही माहिती आपसूकच मिळेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा