पुणे दुर्घटना पश्चात प्रसारमाध्यमातून वाचण्यात -पाहण्यात आलेल्या बातम्या , विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची वक्तव्ये , आरोप -प्रत्यारोप , पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भाष्य या अनुषंगाने "मत प्रपंच "
आजवरचा इतिहास लक्षात घेता " या सर्व कारवाया नौटंकी " असून त्या केवळ जनशोभ शांत करण्यासाठी आहे आणि यातील कोणालाच अंतिम शिक्षा होणार नाही याची खात्री वाटते . याचे प्रमुख कारण म्हणजे "उत्तरदायित्व शून्यता " हा आपल्या लोकशाहीचा स्थायीभाव झालेला आहे .
कल्याणी नगर अपघाताने महाराष्ट्रातील राजकीय -प्रशासकीय यंत्रणा आर्थिक -नैतिक भ्रष्टाचाराच्या वाळविणे किती किडलेली आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जनतेसमोर आणले आहे . अपघाताने २ युवक आणि त्यांच्यावर आधारित कुटुंब यांच्यावर घाला घातलेला असल्याने हे प्रकरण स्थानिक पोलीस , स्थानिक लोकप्रतिनिधींनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणे अपेक्षित असताना त्यांचे जे जे वर्तन समोर आलेले आहे ते पाहता 'पुरोगामित्वाचा डंका पिटवणाऱ्या , कायद्याचे राज्य अशी गर्जना करणाऱ्या महाराष्ट्राची किती दुर्दशा झालेली आहे , कायद्याचे उल्लंघन या बाबतीत महाराष्ट्राने एकेकाळच्या बिहारला हि मागे टाकलेले आहे हेच स्पष्ट होते .
अर्थातच पुणे अपघात राजकीय -प्रशासकीय अधःपतनाचे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल . सामान्य नागरिकांना महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा किती सडलेल्या आहेत याचा निरंतर प्रत्यय येत असतो , नव्हे त्याचा दैनंदिन जीवनात सातत्याने सामना करावा लागतो . प्रसारमाध्यांनी , जनतेने यावर वारंवार आवाज उठवून देखील कुठलाच फरक पडताना दिसत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे 'निर्ढावलेले सर्वपक्षीय राजकारणी ". आम्हाला कोण विचारतो ? अशा थाटात नेते वागताना दिसतात .
महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा सडण्यामागचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे " प्रशासनावर असणारे शून्य उत्तरदायित्व " . पुणे अपघातानंतर अनेक अनधिकृत पब वर कारवाई करण्यात आली . पण हे पब अनधिकृत असताना देखील चालू राहत असतील तर त्याचे उत्तरदायित्व पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी -अधिकाऱ्यावर जायला हवे . पण प्रत्यक्षात काय होते आहे ? ना पोलीस आयुक्त , ना उत्पादनशुल्क आयुक्त , ना गृहमंत्री -मुख्यमंत्री "पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला उत्तरदायित्वाची जाणीव करून जाब विचारताना दिसतात . उलट पक्षी अनधिकृत पब , लेडीज बार वार धडक कारवाईचे करण्याचे आदेश दिल्याचे सांगत पाठ थोपटून घेतली जाते आहे .
दुसरे उदाहरण घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेचे पहा . १७ बळी घेणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स दुर्घटनेमुळे जागे झालेल्या महापालिकांच्या सर्व्हेतून राज्यात हजारो होर्डिंग्स अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले . आता सर्व अनधिकृत होर्डिंग्स हटवणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्त पाठ थोपटून घेताना दिसतात . पुन्हा तोच प्रश्न " महापालिका हद्दीत अनधिकृत गोष्टींना लगाम घालण्यासाठी शेकडो कर्मचारी , शेकडो अधिकारी व आयुक्त ' यांची नियुक्ती झालेली असताना राज्यातील सर्वच सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत होर्डिंग्स अगदी डोळे झाकल्यावर देखील दिसतील अशा प्रकारे गल्लोगल्ली , चौकाचौकात , महामार्गावर अनधिकृत होर्डिंग्स उभा राहतातच कसे ?" . अनधिकृत झोपड्या , अनधिकृत इमारती , अनधिकृत शाळा , अनधिकृत ' हे ' , अनधिकृत 'ते ' याचे उत्तरदायित्व कोणाचे ?
वर्षानुवर्षे पावसाळा पूर्वी काळात शेकडो झोपड्यावर कारवाई , अनधिकृत इमारतींना नोटीस देऊन फार मोठे कर्तव्य पार पाडल्याचा आव महापालिका आयुक्त , प्रशासन आणते . पण या गोष्टी उभा राहू नयेत हे तुमचे प्रशासकीय उत्तरदायित्व आहे हे सांगण्याचे धाडस कोणतेच सरकार करताना दिसत नाही .
एकुणातच हि गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की , जोवर प्रशासकीय उत्तर दायित्व प्रशासनातील त्या त्या स्तरावरील कर्मचारी -अधिकाऱ्यांवर फिक्स केले जात नाही तोवर भूतकाळाची पुनरावृत्ती अटळ असल्याने महाराष्ट्राचे भविष्य सामान्य नागरिकांच्या दृष्टीने भययुक्त आणि अंधारमयच असणार हे सुनिश्चित समजावे .
एखाद्या शेतकऱ्याने महागडे बीज पेरले , पिकासाठी २४ तास वीज -पाण्याची व्यवस्था केली , मुबलक खतांचा वापर केला , पिकांच्या मशागती साठी महागडे मशिन्स , मोठ्या प्रमाणावर मजूर यांची व्यवस्था केली व त्यानंतर पिकाचा मोबदला पदरात पडावा याकरिता पिकाचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'कुंपण ' घातले तर त्याची अपेक्षा हि त्या पिकातून मुबलक उत्पन्न मिळेल हि अपेक्षा असणार . मुबलक उत्पादनासाठी शेतकऱ्याने केलेल्या सर्व गोष्टी यशस्वी होऊन देखील जर कुंपणानेच शेत खाण्यास सुरुवात केली तर शेतकऱ्याचा अपेक्षाभंग १०० टक्के ठरलेलाच .
भारतातील लोकशाहीची वर्तमान अवस्था हि वरील शेतकऱ्याप्रमाणे झालेली आहे . रोजंदारीवर काम करणारे मजूर असोत की मोठं मोठाले उद्योग असोत , या सर्व भारतीय नागरिकांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दिलेल्या करातून लोकशाहीतील गल्ली पासून -दिल्ली पर्यंतच्या सर्व यंत्रणांचा कारभार सुरु असतो . शेतकरी ज्या प्रमाणे पिकाचे संरक्षण करण्यासाठी कुंपण घालतो त्याच प्रमाणे लोकशाहीतील कर रूपातून भरणाऱ्या तिजोरीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासकीय -राजकीय यंत्रणांचे कुंपण घातलेले आहे . "तिजोरीचे संरक्षण " हेच प्रशासनाचे प्रमुख घटनदत्त कर्तव्य आहे . प्रत्यक्षात ग्रामपंचायती पासून ते मंत्रालया पर्यंत काय होते हे आता गुपित राहिलेले नाही . शेंबडे पोर हे देखील जाणते आहे की , कुंपणच शेत खाते आहे .
तरी देखील त्यांना जाब विचारला जात नसेल तर याचा अर्थ तोच होतो की 'उत्तरयित्व शून्य व्यवस्था ' अस्तित्वात आलेली आहे . कार चालवणारा हा जर कार धडकून बळी जाणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असेल तर त्याच न्यायाने राज्यातील बेकायदशीर , अनधिकृत बजबजपुरीला जबाबदार ठरत नाहीत का ? कार चालकाला अपघाताची शिक्षा हा न्याय असेल तर याच 'न्याय शास्त्रानुसार ' वर्षानुवर्षे " तिजोरी लुटणाऱ्या घटकांना शिक्षा देऊन लोकशाहीला न्याय कधी मिळणार ?
जोवर शेत खाणारे कुंपण अस्तित्वात आहे तोवर शेतकऱ्याने बीजाच्या दर्जात , मशागतीच्या पद्धतीत किती ही वेळा बदल केला तरी ' पिकावरील खर्चाच्या बदल्यात योग्य उत्पन्न " हि स्वप्नपूर्ती केवळ आणि केवळ अशक्य आहे .
याच नुसार देशात कितीही वेळा निवडणुका घेतल्या , कितीही वेळा लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून बदलेले , कितीही अधिकाऱ्यांच्या 'कर्तव्यात कसूर ' हे कारण देत शिक्षा म्हणून बदल्या केल्या तरीही लोकशाहीतील करदात्या नागरिकांची स्वप्नपूर्ती तोवर संभवत नाही जोवर भारतात राजकीय -प्रशासकीय उत्तरदायित्व फिक्स केले जात नाही .
उत्तरदायीत्वाचे बंधन नाही त्यामुळे सर्वच निर्धास्त :
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या सर्व लोकशाही यंत्रणांमध्ये गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा अवास्तव ,अनियंत्रित हस्तक्षेप वाढलेला आहे . यामुळे सर्व यंत्रणांचा कारभार सडला गेला आहे . भारत हा असा देश आहे की , यादेशात लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दोन प्रमुख घटक म्हणजे लोकप्रतिनिधी व नोकरशाहीवर कुठलेच उत्तरदायित्व फिक्स नाही . याच्या समर्थनार्थ हे उदाहरण पहा . आपल्या देशात ग्रामपंचायत ते महानगरपालिका , सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने "उच्चत्तम दर , निच्चत्तम दर्जा " अशा पद्धतीने करोडो रुपये खर्च करून बांधलेले रस्ते दर्जाहीन असतात हे नागडे वास्तव आहे . पण आजवर रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला म्ह्णून कधी कोणत्या अधिकाऱ्याला , कोणत्या सरपंचाला , कोणत्या मंत्र्याला शिक्षा झाल्याचे उदाहरण दाखवा . रस्ते निर्मिती देखभालीमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार आहे हे उघड उघड दिसत असून देखील ना प्रशासन जबाबदार आहे ना लोकप्रतिनिधी .
सर्वच सरकारी कारभारात हीच कार्यपद्धती आहे . कोणावरच उत्तरदायीत्वाचे बंधन नसल्याने नोकरशहा -लोकप्रतिनिधी सर्वच निर्धास्तपणे भ्रष्टाचार करतात . हि किती खेदाची गोष्ट आहे की ज्या लोकप्रतिनिधींवर रस्ते दर्जेदार निर्माण करण्याची जबाबदारी असते तेच कमिशन घेऊन रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाकडे दुर्लक्ष करतात आणि तरीही काही अंध मतदार त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात . नागरिकांचा असा दृष्टिकोन असेल तर व्यवस्थेत परिवर्तन कसे होणार ? राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या आपसातील कुरघोडीमुळे आमदार -खासदार , मंत्री -मुख्यमंत्री यांचा प्रशासनाला धाक उरलेला दिसत नाही .
सध्या ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडतायेत आणि त्यावरील राजकीय -प्रशासकीय प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात आपसूकच प्रश्न उभा राहतो की , " महाराष्ट्रात नेमके चाललंय तरी काय ? , " महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का ?" ,
...... असो ! कोळसा कितीही उगाळला तरीही काळाच . आपण सर्व नागरिकांनी हि गोष्ट लक्षात घ्यायला हवे की जो पर्यंत आपण नागरिक सजग होत नाहीत तोवर उत्तरयित्व शून्य व्यवस्थेला तडे जाणार नाहीत .
अन्यथा पुणे -डोंबिवली -घाटकोपर अशा घटनांची पुनरावृत्तीत निष्पाप बळी जातच राहणार हे नक्की .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
९८६९२२६२७२ danisudhir@gmail.com
मुळात लोकशाही आहे का हा प्रश्न निर्माण होतो या देशात लोकशाहीचा डंका नुसता पिटला जातो पण मुळात लोकशाही नसून राजकीय आणि प्रशासकीय यांची ठोकशाही आहे. सर्वसामान्य माणूस ज्यावेळी स्वतःच्या कामासाठी प्रशासकीय कार्यालयात जातो त्यावेळेला त्याची अधिकाऱ्यां बरोबर भेट होऊन दिली जात नाही आणि तो अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कुठल्याही त्वेषाने लिपिकाकडे
उत्तर द्याहटवाबोलला तर जेमतेम त्याला त्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेले जाते परंतु तो अधिकारी त्याच्या प्रश्नाला बगल देत त्याच्या सभ्यततेबद्दल त्याला बाळकडू पाजतो आणि चेतावणी देतो. यावर बोलला तर त्याला पोलीस स्टेशनची पायरी कायद्याने दाखवली जाते आणि मग तो न्यायालयात आपली चप्पल झिजवत असतो. न्याय कधी मिळत नाही. माघार घेणेच क्रमप्राप्त ठरते. हिला लोकशाही कशी म्हणणार, नेत्यांनी कसे ही आंदोलन करून नासधूस केली अथवा अधिकाऱ्यावर चिखल फेक केली तर सर्व सम्य असते, कारण त्यांचे ठरले असते मी मारलं सारखं करीन तू रडल्या सारखे कर. हा सर्व फार्ष असतो आणि मग सर्वसाधारण nagarik त्यांच्या पायी नतमस्तक होतो, ही शोकांतिका आहे. यांच्यात बदल ज्यावेळी. होईल त्यावेळी शस्त्राचा कायदा झुगारून प्रत्येक माणूस शस्त्र हाताळणी करेल त्याच वेळी खऱ्या लोकशाहीचा अर्थ समजेल. श्री राम यांनी सर्व आपले घर, राज्य, संपत्ती सोडली पण खांद्यावरील धनुष्य सोडले नाहीं, म्हणुन ते घनदाट अरण्य मध्ये सुद्धा राहू शकले पण स्वातंत्र्यानंतर आमचे हे शस्त्र काढून घेतले कारण एकच होते की की याच शस्त्रांनी सर्व स्वातंत्र्याच्या सेनेनी ब्रिटीश सरकार लास धरू की पळू केलें. आत्ता सावरकरांची सतत स्मृती जागृत करून याची उक्ती जनतेला. देणे गरजेचे आहे. धन्यवाद 🙏