THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

राजकारणातून “निखळ मनोरंजनासाठी “ सर्व राजकीय पक्ष -नेत्यांचे जाहीर आभार !

                     गेल्या दिड वर्षांपासून सुरु असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव , टाळेबंदी , अनाकलनीय पद्धतीने आप्तस्वकीयांना गमावणे , नोकऱ्या -व्यवसाय गेल्यामुळे आलेली आर्थिक हतबलता यासम कारणांमुळे राज्यातील जनता तणावात होती . गेल्या काही महिन्यातील राजकीय धुळवडीचा सर्वोच्च कळस साधत  मंगळवारी रात्री उशीरापर्यंत "चालू " असणाऱ्या अटक प्रकरणाच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील धुरंदर नेत्यांनी "राजकारणातून निखळ  मनोरंजनाचा आदर्श वस्तुपाठसंपूर्ण जगासमोर ठेवत राज्यातील जनतेला "तणावमुक्त " केले यासाठी राज्यातील १२ कोटी जनतेच्या वतीने राज्यातील समस्त सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वांचे मनःपूर्वक आभार .

          भूतकाळात  पुरलेली मढे उकरून आम्हा "जनतेचा भविष्यकाळ" अधिकाधिक उज्वल कराल आशा आहे . आपण अशाच प्रकारचे "राजकारणातून निख्खळ मनोरंजन " हा लोकहिताचा कार्यक्रम राबवत जनतेला आनंदी ठेवाल अशी आशा नव्हे खात्रीच वाटते .

                     तसेही राज्यातील बहुतांश प्रश्न हे  विरोधी पक्षाच्या रेट्यामुळे आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्षमतेमुळे संपलेलेच आहेत . त्यामुळे तुम्हा राजकीय नेत्यांना देखील अन्य कुठले 'जनहिताचे उद्योग ' राहिलेलेच नाहीत , त्यामुळे तुमचाही नाईलाज असणार हे आम्ही जाणतो .

                       होय ! लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी भूमिका अगदी प्राणपणाने जपण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील आपले स्वर्वस्व पणाला लावले . संपूर्ण अटक नाट्याचा एक क्षणही जनतेच्या डोळ्यातून सुटू नाही म्हणून जे 'लाईव्ह दर्शन ' घडवले त्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचे देखील जाहीर आभार . तसे ही  मनोरंजनाचे  कार्यक्रम देणाऱ्या वाहिन्यांचा मनोरंजनाचा दर्जा घसरलेला असताना त्याची भरपाई करत "महाराष्ट्रातील तमाम वृत्त वाहिन्यांनी जो मनोरंजनाचा वसा " घेतला आहे  त्यासाठी देखील प्रसारमाध्यमांचे अभिनंदन .

                    जनता मूर्ख आहे त्यामुळे त्यांच्या अपेक्षा राजकारणी आणि माध्यमांकडून अनाकलनीय , अवास्तव आहेत .   अपारदर्शक कारभारामुळे जनतेची लूट नोकरशहा ,राजकारणी  करतात हे सत्य असले तरी त्यात अनपेक्षित असे काय आहे .  " जनतेची लूट " हा तर लोकशाहीचा आत्माच आहे आणि प्रसारमाध्यमे हि लोकशाहीचा चौथा सतंभ असल्यामुळे  लोकशाहीचे रक्षण हा तर माध्यमांचा धर्मच आहे . आपण   प्राणपणाने या धर्माचे पालन करता यासाठी समस्त प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे  आभार .

                  " राजकरण म्हणजेच लोकशाही आणि लोकशाही म्हणजेच राजकारण " हे अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्र आणि माध्यमांनी अवलंबलेले लोकशाही बाबतचे सूत्र सामान्य जनतेच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांच्या लोकशाही बाबतच्या अजूनही वेगळ्या धारणा आहेत.  त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून आणि राजकीय व्यवस्थेकडून  अन्य अपेक्षा ठेवणे हा नागरिकांचा दोष आहे .  आज जे त्यांना अपेक्षा भंगाचे दुःख झेलावे लागत आहे त्यास कारणीभूत देखील "लोकशाही विषयी अज्ञान " असणारे नागरिकच आहेत .  

                     शेतात रक्त गाळून पिकवलेल्या टोमॅटो -कोबीला मातीमोल भाव मिळाला म्हणून युवा शेतकऱ्याने टेम्पोभर माल रस्त्यावर फेकून दिला हि काय समस्या असू शकते काय ?  अर्ध्याहून अधिक शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अजून शाळा -महाविद्यालये कुलूपबंद आहेत , ११ वीचे प्रवेश रखडलेले आहेत हि काय  समस्या असू शकते काय ?  कृषिप्रधान देशात निघाले बियाणे डुप्लिकेट तर त्यात काय एवढे विशेष आहे ?  संपूर्ण जग लसीकरण वेगाने व्हावे , कोरोनाच्या तिसऱ्या  लाटेत मानवी हानी होऊ नये यासाठी  युद्धपातळीवर लसीकरण करत असताना आपल्याकडे मात्र लसीचा तुटवडा आहे , याला समस्या समजणे म्हणजे जनतेचा शुद्ध वेडेपणा नाही का ?  लसीच्या चोऱ्या होत आहेत , काळाबाजार होत आहे  याला समस्या समजणे खऱ्या अर्थाने गैरच आहे .

                 असो ! राजकारणालाच समस्या मानणाऱ्या जनतेचे फारसे मनावर घेऊ नका !  अखेर ते सामान्य  जनतेचे केवळ  'मत ' आहे . त्याला अधिकचे महत्व देऊन लोकशाहीचा अपमान करू नका . आपण सर्व राजकीय नेते आणि पक्ष हे  सामान्य नागरिकांच्या निवडणुकीतील 'मताला ' किंमत देता हे  देखील " हे हि नसे थोडके  "  या न्यायाने लोकशाहीचा सन्मानच आहे  .

 

  "जनतेच्या निख्खळ मनोरंजनासाठी "  पुनश्य एकदा महाराष्ट्रातील सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे आभार अभिनंदन !!!

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , 9869226272 danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा