THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

नवी मुंबई पालिका आयुक्तांना दिलेले निवेदन




नवी मुंबई पालिका आयुक्तांना दिलेले निवेदन



प्रती ,                                                                                                   दिनांक : ४ जानेवारी २०१९ .
मा . आयुक्त ,
नवी मुंबई महानगर पालिका ,
नवी मुंबई .


विषय : अर्थसंकल्पात विशेष तरदूत करत  पालिकेने  व्यापक प्रमाणावर "क्रीडा व्हिजन " धोरण  राबवत प्रत्येक वार्ड निहाय    इनडोअर /आऊटडोअर क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य देण्याबाबत .


सर्वप्रथम पालिकेच्या २७व्या वर्धापन दिननिमित्त पालिकेचे हार्दिक अभिनंदन .

महोदय ,

       सुयोग्य नियोजनाचा अभाव म्हणजे अपयशाचे नियोजन होय " असे विचारवंताने म्हटलेले आहे . हे अतिशय चपखलपणे लागू पडते ते 'भारतीय क्रीडा धोरणाला '. जगातील २ नंबरची सर्वोच्च लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलम्पिक मध्ये मिळणाऱ्या पदकांची संख्या या वरील विधानाला पुष्टी देते . हे असे का होते या प्रश्नाचे सरळ -सरळ उत्तर म्हणजे 'क्रीडा धोरणाचा अभाव ' . गेल्या ७ दशकात भारतात क्रीडा संस्कृती रुजली नाही कारण भारतात खेळाच्या सुविधाच उपलब्ध नाहीत . याच अनुषंगाने आपणाशी हा पत्र संवाद .

       नवी मुंबई पालिकेने आजवर अनेक व्हिजन राबवले आहेत . सुदृढ भारत हे स्वप्न समोर ठेवत पालिकेने तातडीने 'क्रीडा व्हिजन धोरण राबविणे गरजेचे वाटते .




नवी मुंबईत उपलब्ध असणारे  एकूण क्रीडांगणेतरण तलाव इनडोअर -आऊटडोअर  खेळासाठींची सुविधा याचा आढावा घेतल्यास निश्चितपणे असे म्हणता येऊ शकेल की २१व्या शतकातील नियोजनबद्ध शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईत लोकसंख्येच्या मानाने क्रीडा सुविधांची वानवा आहेच . 

                वायमसीए सारख्या खाजगी संस्थाना तरणतलाव (आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालिकेचा एकही तरण तलाव अस्तित्वात नाही ) इनडोअर गेम्स बास्केट बॉल ,फुटबॉल सारख्या सुविधा देणे शक्य होत असेल तर नवी मुंबई सारख्या 'श्रीमंत पालिकेला निश्चितपणे अशा सुविधा देणे अशक्य नक्कीच नाही . फक्त गरज आहे ती तसा दृष्टिकोन ठेवत "व्यापक प्रमाणावर क्रीडा धोरण राबवण्याची ". आज खेळ म्हटला की फक्त  क्रिकेट आणि खेळाची सुविधा म्हणजे मोकळे मैदान असा गैरसमज झालेला आहे .खेळाची सुविधा म्हणजे मोकळं मैदान आणि खेळ म्हणजे क्रिकेट या पलीकडे क्रीडा धोरण म्हणून पाहणे आवश्यक आहे .


सुयोग्य पर्याय दिल्यास मुले खेळतील :

 आज प्रत्येक जण बोलताना दिसतो की ," आजकालची मुले मैदानी खेळ खेळतच नाहीत  !". अगदी बरोबर !! पण त्याच बरोबर प्रश्न हा आहे की मुलांनी ठरवले तरी तशा सुविधा आहेत का दुर्दैवाने याचे उत्तर नकारात्मकच आहे . वस्तुतः पालिकेने वार्डनिहाय इनडोअर /आऊटडोअर अगदी तरणतलावासह सुविधा देण्याचा मानस निश्चित करायला हवा . सकृतदर्शनी अशी मागणी अवास्तव वाटू शकेल पण नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती व जागेची उपलब्धता लक्षात घेता अर्थातच अशी मागणी अतिशोयुक्तीची ठरणार नाही .

पालिकेने फुटपाथ ,गटर ,रस्ते यासम कामांवर होणाऱ्या निधीच्या अपव्ययावर अंकुश ठेवला तर तेवढ्या निधीतून देखील अशा सुविधांच्या खर्चाची पूर्तता होऊ शकते . “Where there is a will, there is a way” या न्यायाने पालिकेने मनापासून निर्धार केला तर "वार्ड तेथे क्रीडा सुविधा " हा उपक्रम निश्चितपणे पूर्ततेस जाऊ शकतो .
सुविधा दिली की नागरीक आपोआप त्याचा लाभ घेतात हे एनएमएमसीने विविध ठिकाणी लावलेल्या ओपन -जिम वरून दिसून येते . अगदी मध्यमवयीन महिला वृद्ध देखील याचा वापर करताना दिसतात .

निधी व जागेची कमतरता हे कारण असमर्थनीयच  :
      " क्रीडा व्हिजन " राबवण्यासाठी सर्वाधिक गरज आहे ती निधी व जागेची . नवी मुंबईकर नागरिकांच्या सुदैवाने एनएमएमसीला या दोन्हीही गोष्टींची वानवा नाही . मोठाल्या इमारतींसाठी डोंगर पोखरून प्लॉट निर्माण करण्याची इच्छाशक्ती क्रीडा धोरणासाठी अंमलात आणली व प्राप्त निधीचा योग्य वाटा क्रीडा धोरणासाठी राखून ठेवल्यास  तर निश्चितपणे  “ वार्ड तेथे ,क्रीडा सुविधा " या नागरिकांच्या स्वप्नाची परिपूर्ती होऊ शकेल .
असे म्हटले जाते की २०३० मध्ये भारत हि डायबेटीसची राजधानी असेल . देश म्हणून हा सर्वात मोठा धोका आहे कारण ज्या देशाचे नागरीक सुदृढ असत नाहीत तो देश कधीच महासत्ता होऊ शकत नाही . एकवेळ महासत्ता होणे महत्वाचे नसेल ही पण या देशातील नागरीक निरोगी ,सुदृढ असणे मात्र महत्वाचे आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाने क्रीडा व्हिजन राबवणे काळाची गरज वाटते .
       आपणास नम्र निवेदन आहे की पालिकेने आगामी अर्थसंकल्पात 'क्रीडा व्हिजन राबवण्यासाठी आवश्यक निधी वर्ग करावा आणि भविष्यात प्रत्येक बजेटमध्ये क्रीडा व्हिजनसाठी लागणाऱ्या निधीसाठी वेगळे हेड  (Head  of Account ) निर्माण करावे .

          सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेने पूर्णविराम देतो .

धन्यवाद .
    


                                                                      सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,
      बेलापूर नवी मुंबई .
                                                                               भ्रमणध्वनी : ९८६९ २२ ६२ ७२.
                                                                              मेल :danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा