" तुळजाभवानी
मंदिराकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींना सोन्या-चांदीचा आशीर्वाद " हे वृत्त क्लेशदायक असले तरी अनपेक्षित वा
धक्कादायक नक्कीच नाही कारण ते राज्यातील
धार्मिकतेच्या गोंडस नावाखाली सर्वत्र चालू असलेल्या प्रत्यक्ष वा
अप्रत्यक्ष लुटीचे प्रातिनिधिक उदाहरण आहे .
शेगाव -अक्कल वा तत्सम एखादा दुसरा अपवाद वगळता ' श्रद्धा
आणि सबुरीचे ' अध:पतन
झाल्यामुळे धार्मिक संस्था या लुटीच्या संस्था बनल्या आहेत हे कटू वास्तव आहे .
काशीच्या मंदिरात पुजाऱ्याकडूनच चोरी हे वृत्त याचाच दाखला देते की राज्याबरोबरच
देशातही ' लूटीचे
' प्रतिबिंब
दिसते
दुर्दैवाची गोष्ट हि की , ज्या धार्मिकतेच्या विवेकी पायावर समाजातील
नैतिकता , सद्प्रवृत्ती
,त्याग
यासम भावनांचा डोलारा अवलंबून असल्याचे गृहीत धरले जाते तोच पाया मंदिराच्या
नावाने स्थापन झालेल्या ' ट्रस्ट ' नेच 'ट्रस्ट' गमावल्यामुळे भूसभूसित झाला आहे आणि
निसर्गाच्या नियमानुसार भुसभुशीत पाया असणारा डोलारा कधीच उपयुक्त ठरू शकत नाही .
विश्वस्त आणि जिल्हाधिकारी ( संस्थानाचे अध्यक्ष ) यांनी केलेला खुलासा संपूर्ण
यंत्रणाच किती बटिक आणि निर्लज्ज झाली आहे याची साक्ष देणारा आहे . या
विचारधारेच्या विश्वस्तांकडून भविष्यातही फार
काही या लुटीत फरक पडेल असे दिसत नाही . शेवटी प्रश्न उरतो तो
या लुटीच्या विरोधातील कारवाईचा आणि ती कोणी करावयाची याचा ! अर्थातच
ज्यांच्याकडून कारवाई अपेक्षित आहे ते सर्वच या
' आशीर्वादाचे
आणि प्रसादाचे ' लाभार्थी असल्यामुळे त्यांचे ' हात ' कारवाई
करण्यापूर्वी लटपटणारच . ३ वर्षापूर्वी याच मंदिराच्या विश्वस्तांनी
सोन्याच्या शुद्धीकरणाच्या निमित्ताने
२५/३० किलो सोन्याची घट दाखवली होती परंतु भवानीच्या (?) आशिर्वादाने
( एकदा मस्तक टेकवाऱ्या पावणारी भवानी सतत तिथेच असणाऱ्यांना पावणारच ) पुढे सर्वच
शुद्ध-पवित्र झाले .
धार्मिक ठिकाणारावरील ' व्हीआयपी 'संस्कृती
तर देवापुढे सर्व समान या मुलभूत संकल्पनेलाच
छेद देणारी आहे . एखाद्या व्हीआयपी
व्यक्तीसाठी हजारो भक्तांना उन-वारा -पाऊस यात तिष्ठत ठेवण्यापेक्षा सरकारने
मंत्रालयावर आणखी एक अनधिकृत मजला चढवून तिथे पृथ्वीतलावर अस्तित्वात असणाऱ्या
सर्वच व्हीआयपी देवीदेवतांची मंदिरे उभारावीत आणि ती केवळ व्हीआयपीसाठीच राखीव
ठेवावीत . राज्यकर्त्यांच्या शिरावर (शब्दशः ) अशा देवदेवतांचा हात असेन तर हि
मंडळी अधिक जोमाने आणि निर्धास्तपणे 'जनसेवा '
करू शकतील.
बहुतांश देवस्थानच्या ठिकाणी
पिण्याचे पाणी ,
निवास , नैसर्गिक विधीची सोय या सारख्या मुलभूत
सुविधांची वानवा असताना सढळ हस्ते व्हीआयपीना ' दानधर्म ' करनाऱ्या विश्वस्तांना सामान्य भक्तांसाठी
या सुविधा निर्माण करण्याची सुबुद्धी ' तुळजाभवानी माता ' आणि त्या
त्या ठिकाणचे देवीदेवता का देत नाहीत हा एक यक्ष प्रश्न आहे . मराठवाडा आणि
राज्याचा विविध भाग वर्षानुवर्षे दुष्काळात होरपळत असताना हे विश्वस्त इतक्या
सढळ हस्ते मदत करण्यास पुढे आल्याचे
ऐकिवात नाही .
" सर्वांना
लाभ" या मुलभूत तत्वाचा अंगीकार
करत राज्यातील मंदिर विश्वस्तांची देखील
पक्षनिहाय वाटणी केली जात असल्याचे दिसते ." राजकारण्यांनी ज्या ज्या क्षेत्रात शिरकाव
केला आहे ते ते क्षेत्र गिळंकृत करून त्याचे वाटोळेच केले आहे हा सार्वत्रिक समज
राज्यकर्त्यांनी धार्मिक क्षेत्राचे वाटोळे करून अधिकच वृद्धिंगत केला आहे . आज
अनेक देवस्थानच्या केसेस कोर्टात चालू आहेत .
लुट करणारे लुट करू शकतात कारण तथाकथीत
भक्तांची मानसिकता . गावातल्या शाळेसाठी , पिण्याच्या पाण्याच्या विहरीसाठी एक रुपयाही
वर्गणी न देणारे मात्र गावाबाहेरील नामांकीत मंदिरांना सढळ हस्ते मदत करतात .
गरजूंना दान करण्याची दानत जो पर्यंत भक्तात निर्माण होणार नाही तो पर्यंत धार्मिक
संस्थानातील लुटीचा सुकाळ राहणार हे निश्चित . आज सर्वत्र पारदर्शकतेचे वारे वाहते
आहे . मंदिरातील ' अपारदर्शक
हुंड्या ' बंद
करून केवळ पावती वा चेकने देणग्या -दान स्वीकारण्याचा नियम करा. देणग्यांचे प्रमाण
अर्ध्यापेक्षा कमी होईल . बघा विश्वस्त कसे चवताळून उठतील कारण मंदिरातील
दानधर्मात पारदर्शकता ना दानकर्त्यांना ना
विश्वस्तांना ' सोयीची ' आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा