...... हि तर विवेकशून्य -तत्वशुन्य राजकारणाची साफसफाई करण्याची सुवर्णसंधी !!!!
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष कोणते व किती ? या प्रश्नाचे भाबड्या नागरिकाच्या मनात सहज येणारेउत्तर म्हणजे .... भाजप , शिवसेना , कॉंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , मनसे , आरपीआय , स्वाभिमानी आणि आणखी अमुक तमुक स्वराज्यवाले ... वगैरे ...वगैरे .
पण गेल्या एका महिन्यातील राजकीय पटलावरील महाभारत पाहता आता सामान्य नागरिकाचेमत बदललेआहे आणि आता त्याची पक्की धारणा झाली आहेकी , राजकारणात केवळ आणि केवळ एकच पक्ष असतो तो म्हणजे सत्तापिपासू लोकांचा समूह , त्याची एकच विचारधारा असती ती म्हणजेसत्तेसाठी वाटेल ते , त्याचे एकच तत्व असते ते म्हणजे सत्ता मिळविण्यासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते कोणाचीही मुलाहिजा न ठेवता -निर्लज्जपणे करणे म्हणजेच त्या त्या पक्षाचे तत्व .
एक गोष्ट पक्की झाली आहेकी , यांचे केवळ झेंडे वेगळे आहेत , यांचे नेते वेगवेगळे आहेत ,सांगण्यासाठी तत्वे -विचारधारा (?) .... पण या वेगवेगळ्या वेष्टणात दडलेला आहेतो " सत्तेसाठी वाटेल ते ... " हे एकमात्र तत्वाचे पालन करणारा राजकारणी .
' तत्वशुन्य राजकारणाचा अतिरेक ' मतदारांची निराशा वाढवणारा :
लोकशाहीत प्रत्येक पक्षाचे काही तत्वे असतात , विचारधारा असते आणि त्यास पसंती देत त्या त्या पक्षाचे अनुयायी असतात , मतदार असतात . किमान अशी तथाकथीत बुद्धिवाद्यांचा समज होता , मतदारांची धारणा होती . काही पक्ष तहयात जाती पातीचे राजकारण करतात , नव्हे तोच त्या पक्षाचा पाया असतो तरी ते पक्ष तथाकथीत 'सेक्युलर ' च असतात . एकीकडे उमेदवार ठरवताना जात -धर्म याची आकडेमोड करावयाची आणि तरी मात्र धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवायचा .
शेवटच्या ३ दिवसातील ' राजकीय तमाशा ' मतदारांना राजकारणाची चीड आणणारा होता . राजकारण्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे केवळ म्हटले जायचे मात्र आता मात्र खात्री झाली की जे दात दाखविलेजातात ते त्यांचे नसतातच . अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी पक्षांतर करणाऱ्याना उमेदवारी दिली गेली . ज्यांच्यावरचिखलफेक करण्यात आली त्यांच्याच गळ्यात गळा घालून धन्यता मानूलागले . सर्वात दुर्दैवी आणि वेदनादायी गोष्ट म्हणजे यास कोणताच पक्ष अपवाद नव्हता . राजकारणात काहीही घडू शकतेहि शिकवण भारतीय मतदारांना नियमित मिळत असली तरी
महाराष्ट्रात जे काही गेल्या महिन्याभरात झाले आहे ते सर्वसामान्य मतदारांचा लोकशाहीवरील विश्वासाला तडा देणारेच होते .
युत्या -आघाड्या या कोणत्याही तत्वावर आधारलेल्या नसतात तर सत्ता प्राप्त करण्यासाठी , प्रतिस्पर्ध्यांना (त्या क्षणी असणारा कारण आता कोण कोणाचा प्रतिस्पर्धी आहे हे जनतेच्या आकलना पलीकडे गेलेआहे ) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेल्या 'तडजोडी -जुगार ' असतात हाच धडा या काळाने दिला .
निवडणुका महागडया झाल्याचा कांगावा:
कोणीही उठसुठ नेते बनू लागल्यामुळे प्रामाणिक जनतेशी नाळ असणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते आहे . जनतेशी नाळ नसणारयांची राजकारणात चलती होत असल्यामुळे मते अक्षरशः विकत घ्यावी लागतात आणि मग निवडणुका महागडया झाल्याचा कांगावा केला जातो . सरपंच ते आमदार - खासदार हा टप्या-टप्याचा प्रवास इतिहास जमा झाल्यामुळेच उमेदवारांना पैशाचा आधार अनिवार्य ठरतो आहे . निवडणुकांना दोष देणारयानी याचा विचार करावा . रांगण्याआधीच धावायचे ठरविले तर आधार लागणारच ना ?
राजकारणातील साफसफाईची सुवर्णसंधी :
उमेदवारांची अंतिम यादी आता तयार आहे . पक्ष चिन्हावरून उमेदवार ओळखण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत . त्यामुळेच आता मतदारांनी पक्षचिन्ह न पाहता मतदान करणे काळाची गरज झाली आहे . कोणतेही उत्पन्नाचे सदृश्य साधन नसताना कोटीकोटीची हनुमान उडी घेणारेउमेदवारांना जनतेने आता घरचा रस्ता दाखविणे गरजेचे आहे कारण या राजकारण्याचे उत्पन्नाचे साधन हे केवळ लोकाभिमुख योजनातील भ्रष्टाचार असतो हे एव्हाना जनतेच्या लक्षात आले आहे . अर्थातच पगारी नोकरदारांच्या बचतीतील व्याजावर करडी नजर ठेवणाऱ्या आयकर विभागाच्या हे लक्षात का येत नाही हे अनाकलनीय आहे . संपत्तीचे भरून देण्यात येणारे विवरणपत्र केवळ धूळफेक ठरू लागलेआहे . परदेशी ४ मोटारी बुडाखाली असताना , कोट्यावधीची मालमत्ता असताना स्वतः कडे चारचाकी नाही हि धूळफेक नव्हे तर काय म्हणावी .
एक डाव भुताचा ...
जनतेने ' एक डाव देवाला' या नियमानुसार हा डाव केवळ लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी हा दृढनिश्चय करत कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो , कोणता पक्ष सत्तेत येऊ शकतो याचा विचार न करता ( कारण निवडणूक पश्चात कोणीही कोणाच्या गळ्यात गळा घालून मतदाराचा गळा कापू शकतात ) घराणेशाही , भ्रष्ट , गुन्हेगारी पार्श्वभूमी , जात -धर्माचेकार्ड खात्रीचे हत्यार वापरणाऱ्या उमेदवाराला मतदान न करता स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या सुशिक्षित -सुसंकृत उमेदवारास (अर्थातच असा कोणी सापडल्यास ) मतदान करावे .
कोणताही राजकीय पक्ष सत्तेत आला तरी त्यांच्या कडून राजकारणाची साफसफाईची अपेक्षा करणे म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्या सारखेहोईल , त्यामुळे राजकारणातील साफसफाईची हि सुवर्णसंधी समजून मतदान करणे खूप गरजेचेआहे . कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या जीवनात काही फरक पडत नाही हि धारणा मनाशी बाळगत मतदान करणाऱ्यांनी आता हेसिद्ध करावे की , " आम्ही योग्य व्यक्तीला मतदान करून मात्र 'राजकारण्यांच्या ' जीवनात फरक पाडूशकतो " .
मतदान हेजर खरच लोकशाही व्यवस्थेतील ' पवित्र ' दान असेल तर भ्रष्ट -असंस्कृत -अशिक्षीत -गुंडपुंडाच्या झोळीत दान करताना मतदाराचा हात धरधरायलाच हवा ...... लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी ती काळाची गरज आहे ...
.जो पर्यंत लोकशाहीचा आधार स्तंभ असणाऱ्या मतदारात 'डोळस दानाचा दृष्टीकोन ' रुजत नाही , प्रत्येक निवडणुकागणीस तो वृद्धीगंत होत नाही तो पर्यंत जगातील सर्वात मोठी लोकशाही असा बिरुद मिरवणाऱ्या देशाचेभविष्य अंधारमयच असणार या साठी कोणा राजकीय विश्लेशकाची -भविष्यवेत्त्याची आवश्यकता नक्कीच नसावी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा