मतदार याद्यातील
घोळासाठी केवळ दुषणे नकोत , सक्रीय सहभाग
हवा
एका
निष्णांत चित्रकाराने अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने एक भव्य सुंदर चित्र
काढले. त्यावर जनतेचे मत आजमिवण्यासाठी त्याने ते चित्र एका चौकात ठेवले.
चित्राखाली त्याने लिहिले होते या चित्रात आपणास कुठे चूक दिसल्यास त्याभागावर
फुली मारावी जेणे करून माझ्या चित्रकलेतील दोष मला समजतील. २
दिवसांनी पाहतो तर संपूर्ण चित्रावरच फुल्या मारलेल्या होत्या . तो एकदम नाराज
झाला आणि आपल्या गुरूकडे जाऊन हकीगत सांगितली . गुरूने त्याला सांगितले तू
माझ्याकडे ५ वर्ष राहून चित्रकला शिकला आहेस आणि त्यामुळे तू निश्चितपणे चांगला
चित्रकार आहेस याची खात्री बाळग . केवळ जनतेच्या शेऱ्यावर जाऊ नकोस , 'शेरा
मारणे , टीका करणे '
हाच अनेकांचा धर्म असतो . गुरूने
सांगितले , तू हेच चित्र पुन्हा त्याच ठिकाणी ठेव आणि केवळ
त्यावरील तळ टीप बदल . केवळ चुकीच्या ठिकाणी फुली मारा या ऐवजी " मी येथे ब्रश आणि रंग ठेवत आहे , आपणास
या चित्रात कुठे दोष दिसल्यास , चूक आढळ्यास आपण ती दुरुस्त करावी " असे
टीप टाकण्यास सांगितले . पुन्हा २ दिवसांनी येऊन पहिले तर चित्रावर कुठेही
दुरुस्ती केलेली नव्हती चित्र तब्बल ८
दिवस त्या ठिकाणी ठेऊनही एकानेही त्या चित्रातील दोष दाखविला नाही की तो दुरुस्त
केला नाही . याच मानसिकतेची प्रचीती सध्या "मतदार याद्यातील घोळा बाबत "
येताना दिसते आहे .
गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यातील घोळ सर्वाधिक गाजला होता .
राजकीय पक्ष ,
सामाजिक संस्था , प्रसारमाध्यमे , एनजीओ आणि विचारवंत -जागरूक नागरिकांनी या घोळासाठी निवडणूक आयोगाला
धारेवर धरले होते . अगदी निवडणूक आयुक्तांना माफी मागावी लागली होती .
अर्थातच लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क
डावलणे गैरच ठरते परंतु जबाबदारी केवळ निवडणूक आयोगावर ढकलणे म्हणजे केवळ
"चित्रावर फुल्या ' मारण्याच्या
मानसिकतेचे द्योतक होय . निवडणूक आयोग जबाबदार आहेच परंतु 'फुल्या
' मारणारे घटकही
तेवढेच जबाबदार असायला हवेत .
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ जून ते ३० जून पर्यंत मतदार नोंदणी अभियान निवडणूक आयोग राबवत आहे .
२१/२२ आणि २८/२९ जून या दिवशी विशेष नाव
नोंदणी अभियान होणार आहे . वास्तविक पाहता आता राळ उठविणाऱ्या सर्वच घटकांनी मतदार
नोंदणी अभियानात सक्रीय सहभाग घ्यायला हवा . विशेषतः राजकीय पक्ष , सामाजिक संस्थानी सोसायट्या , रेल्वेस्थानके , बसस्थानक वा तत्सम सामुहिक ठिकाणी टेबल लाऊन आवश्यक फॉर्म्स उपलब्ध
करून , कागदपत्रांची पूर्ततेसह भरलेले फॉर्म्स
नागरिकांकडून स्वीकारून ते आयोगाच्या कार्यालयात जमा करण्याची व्यवस्था करावी . विविध
सोसायट्य़ातील कमिटीही आपल्या सोसायटीतील
सदस्यांसाठी नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून सिंहाचा वाटा उचलू शकतात कारण
नावाच्या गळतीचे प्रमाण सोसायट्यात अधिक होते . इतर घटकही आपापल्या परीने मतदार
नोंदणीस हातभार लाऊ शकतात .
निवडणूक आयोगानेही पारंपारिक झापडबंद पद्धतीतून बाहेर पडायला हवे .एखादा नागरीक जर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या पुर्ततेसह आल्यास त्याचे
"ऑन दि स्पॉट रजीस्ट्रेशन " करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो . या
मुळे नावात , पत्यात
होणाऱ्या चुका टाळल्या जाऊन मतदार याद्या अधिक दोषमुक्त होण्यास मदत होईल आणि
घरोघरी जाऊन नोदणी करण्याची 'गधा मेहनत ' वाचेल . मतदार याद्यातील घोळ हा बहुतांशपणे सोसायट्यात
राहणाऱ्यांच्या बाबतीत झालेला (केलेला ?) दिसतो . या वर्गाला "ऑन लाईन " मतदार नोंदणीची सुविधा
दिल्यास बऱ्यापैकी निवडणूक आयोगाचे श्रम आणि वेळ वाचू शकतो . अर्थातच उपाय अनेक
आहेत ,
गरज आहे ती लोकशाहीतील
सर्वच घटकांनी रामसेतू बनविण्यात जसा खारीचा वाटा होता तसा आपला खारीचा वाटा
उचलण्याची .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा