THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

सार्वजनिक धार्मिक उत्सव: "अति तिथे माती "....



              वर्तमान गणेशोत्सव लक्षात घेता , "सार्वजनिक धार्मिक उत्सवावर"  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . सवंग लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार  होत प्रसारमाध्यामाकडून  उत्सवाचे  झालेले बाजारीकरण व त्यातून  आलेले 'ईवेन्ट' चे स्वरूप पहाता उत्सवाचे  सार्वजनिकीकरण न राहता ' उत्सवांचे सार्वत्रीकरण ' व त्यातून मंडळाचे हाडाचे कार्यकर्ते आणि पुरस्कर्ते यांच्यात 'सावत्रीकरण ' होताना दिसते .
            
समाजाचे " वैचारिक अभिसरण " या मूळ उद्देशाला हरताळ फासत बहुतेक सर्वच उत्सवाचे होणारे " आर्थिक अभिसरण " काही प्रश्न निर्माण करतात . आज साजरे होणारे उत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक राहिले आहेत का ? सामान्य जनतेचा प्रत्यक्ष सहभाग कितीसा असतो आमुक -आमुक गुंडाचा गणपती ते या पक्षाचा /नेत्याचा गणपती असे होणारे नामकरण उत्सवाची दिशा व दशा स्पष्ट करतात .
            
गणपती उत्सवाच्या १० दिवसाचा लेखाजोखा  पहाता हा उत्सव "धार्मिक " या सदरात मोडू शकतो का ? वाजवली जाणारे गाणी , साजरे होणारे डान्स कार्यक्रम , गणपतीच्या पाठीला पाठ देत अहोरात्र रंगणारे जुगार , खंडणी रूपाने गोळा केली जाणारी वर्गणी , रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासठी होणारी भक्तांची (?) गर्दी व त्यातून होणारा प्रसादाचा  लाभ , अनधिकृत वीजजोडणी  वा तत्सम गोष्टी कोणत्या धर्माच्या परिभाषेत मोडतात . वास्तविक  गणपतीची मूर्ती वगळता कुठला धार्मिक माहोल असतो याचे सिंहावलोकन होणे क्रमप्राप्त ठरते .
              "
लालबागच्या राजावर " वृतवाहिन्याचा बहिष्कार व रोडावणारी गर्दी  व त्याचा आजूबाजूच्या मंडळाच्या गर्दीवर होणारा परिणाम हे सर्व समीकरण कशाचे द्योतक आहे . एकीकडे देव सर्वव्यापी आहे असे म्हणायचे तर दुसरीकडे  विशिष्ट मूर्तीच्या दर्शनासाठी २४ /२६ तास तिष्ठत राहावयाचे ( वशिला असेल तर देव ही  लवकर भेटतो ! ) हा  निव्वळ दांभिकपणा ( ग्रामीण भागात यांना धार्मिक पेताड असे विशेषण आहे ) नव्हे कायविशिष्ट मूर्तीच  नवसाला पावते असा प्रसार अन्य ठिकाणच्या मूर्तींच्या "देवत्वावर" प्रश्न चिन्ह निर्माण करते असे म्हणणे अतिशोयोक्तीचे ठरणार  नाही . प्रसारमाध्यमांचा विशिष्ट गणपतीला 'प्रोजेक्ट ' करण्याचा  'फंडाबाप्पांच्या  सत्तेच्या केन्द्रीकरणाची जनभावना बळावण्यास कारणीभूत ठरते . वर्षानुवर्षे 'लाईव्ह ' प्रसारण करणाऱ्या वृत वाहिन्याचे थेट बहीषकार टाकण्यापर्यंत 'मत परिवर्तन ' का झाले याचाही खुलासा झाला तर बरे होईल .
           
दुसरा प्रश्न हा आहे कि , वाढती भक्तांची संख्या लक्षात घेता हा 'कृपा प्रसादाचा ' लाभ १० च दिवसच  का ? जर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रातील ज्या-ज्या गणरायाजवळ आहे त्याचा लाभ ३६५ x २४   का मिळू नये . सर्वच समाज आनंदी ,सुखी होईल . त्यातून मंदीच्या विळख्यात अडकलेल्या अर्थकरणालाही गती मिळेल .
           
कुठलाही उत्सव असला की, "सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत " असे लागणारे फलक (९० % अनधिकृत ) राज्यात समाजसेवकांचा किती सुकाळ आहे याची प्रचीती देतो . पिण्याचे पाणी , बसण्यास जागा , विसर्जना पूर्वी आरती करण्यासाठी सुविधा या सारख्या मुलभूत सुविधाही ज्यांच्या गावी नसतात ते समाजसेवक सालाबादप्रमाणे प्रत्येक उत्सवात 'कोरडे स्वागत ' करण्यात धन्यता मानण्यात मश्गुल असतात . उत्सव गणपतीचा पण एखादा दुसरा अपवाद वगळता गणपतीचा फोटो किती फ्लेक्स वर असतो हे डोळसपणे पाहिल्यास हा 'सार्वजनिक गणेशोत्सव' की 'सार्वजनिक समाजसेवकोत्सव' असा प्रश्न पडतो .
      
नवरात्री उत्सव ,दहीहंडी वा इतर धर्मियांचे उत्सव असो कुठल्याही गोष्टींचा अतिरेक झाला की त्याचा बोजवारा हा उडणारच , म्हणून तर पूर्वजांनी म्हटले आहे "अति तिथे माती "....   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा