भारताच्या उज्वल भवितव्यासाठी ब्रिटिश लोकशाही बाबत फुकाचा अभिमान बाळगण्यापेक्षा कृतिशील अनुकरण अधिक गरजेचे !
" कर्तृत्व हीच खरी पात्रता " हा लोकशाहीचा खरा पाया आहे हेच ब्रिटिश लोकशाहीने ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड करून सिद्ध केलेले आहे . जगातील सर्वात मोठी लोकशाही असा टेंभा मिरवणाऱ्या भारतात मात्र त्या त्या पदासाठी पात्रता , कर्तृत्व याच्याशी दुरान्वये देखील संबंध दिसत नाही . या पार्श्वभूमीवर भारताने अनुकरणच करावयाचे असेल तर ब्रिटिश लोकशाहीतील नेतृत्वासाठी "पात्रता आणि कर्तृत्व " याचे अनुकरण करावयाला हवे . तर आणि तरच भारताने महासत्तेचे स्वप्न प्रत्यक्ष उतरवण्यासाठी पहिले पाऊल योग्य दिशेने टाकले असे समजले जाऊ शकते .
अपात्र व्यक्तींच्या हातात देशाची सूत्रे देत महासत्तेचे स्वप्न पाहणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे होय ! जोवर भारतात केवळ धर्म -जात -पंथ -घराणेशाही अशा प्रकारच्या ढाल पुढे करत उत्तरदायित्वशून्य , पात्रताशून्य , कर्तृत्वशून्य व्यक्तींची वर्षानुवर्षे निवड केल्या जाण्याच्या राजकीय संस्कृतीला , अंधमतदान संस्कृतीला मूठमाती दिली जात नाही तोवर भारताच्या उज्वल भवितव्य ,विकास प्रश्नांकित राहणार हे सुनिश्चितच !
ऋषीं सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड या वृत्ताच्या अनुषंगाने जनता की मन की बात . या वृत्ताचा फुकाचा आनंद मानताना , हि घटना भारतातील तमाम १४० करोड नागरिकांनी लोकशाहीस पूरक नागरिक या नात्याने , लोकशाहीस पोषक राजकीय -प्रशासकीय यंत्रणा या अंगाने चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे असा वारंवार डंका पिटवला जात असला तरी प्रत्यक्ष अनुकरणात भारत या बाबतीत किती मागे आहे हे "लोकप्रतिनिधींच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वारसांना बिनविरोध निवडून देण्याची परंपरा ,जिल्ह्या जिल्ह्यातील घराणेशाही यातून अनेक वेळेला अधोरेखित झालेले आहे .
एकीकडे प्रत्येक ठिकाणी पात्रता असो की नसो "भूमिपुत्र
" या गोंडस नावाखाली शिरजोरी तर ब्रिटन सारख्या
देशात केवळ कर्तृत्वाने देशाच्या सर्वोच्च पदी होणारी नियुक्ती . कोणता देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान देश आहे हे याचे उत्तर
यातच दडलेले आहे .
"भारतीय वंशाची हिंदू धर्मीय व्यक्ती " ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त होणे हा एक प्रकारे नियतीने केलेला न्याय असे म्हणत कितीही इंची छाती फुगवली तरी एकेकाळी अन्य देशावर अधिराज्य गाजवणारा देश लोकशाहीच्या दृष्टीने किती प्रगल्भ आहे हे त्यांच्या अनुकरणातून दिसून येते .
सुदृढ लोकशाहीचे सर्वात मोठे लक्षण हे की , एक चुकीचा निर्णय देखील माफ असू शकत नाही हे माजी पंतप्रधानांच्या केवळ ४५ दिवसाच्या पायउतारावरून स्पष्ट होते . भारतात मात्र कुठलेही कर्तृत्व न दाखवता अनेक व्यक्ती १०/२० वर्षे आमदार -खासदार म्हणून निवडून येऊ शकते , मंत्री -मुख्यमंत्री होऊ शकते .
अधिकार -हक्क आहेत पण कर्तृत्वाच्या मूल्यमापनाचे मात्र कुठलेच निकष नाहीत हि आपली लोकशाही . नोटबंदी निर्णय , कुठलीही पूर्वसूचना न देता लादलेली टाळेबंदी , गरिबी हटावच्या नावाखाली वर्षानुवर्षे राबवल्या जाणाऱ्या यॊजनांचे फलित आणि निर्णय कर्ते यांचे मूल्यमापन करणारी कुठलीच विश्वसार्ह यंत्रणा भारतीय लोकशाहीत अस्तित्वात नाही आणि म्हणूनच भारतात शिक्षण असो की नसो , त्या त्या विषयाचे ज्ञान असो की नसो कुठलीही व्यक्ती थेट त्या खात्याची मंत्री बनू शकते .
ताजेच उदाहरण पहा ना ! ज्या खेळाडूने आपल्या कर्तृत्वाने क्रिकेटच्या जगतात "षटकारांचा बादशहा " असा नावलौकिक प्राप्त केला त्या व्यक्तीचा पराभव क्रिकेट सोडा न खेळलेल्या , राजकारणालाच "खेळ " मानणाऱ्या व्यक्तीकडून पराभव होतो यातूनच भारत अजुन्हि सूदृढ -निकोप -सक्षम लोकशाहीच्या मैलाच्या दगडापासून कोसो दूर आहे हे सुस्पष्ट होते . हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक क्षेत्रात अपात्र व्यक्तिचांच भरणा दिसून येतो .
…….आणि म्हणूनच प्रगत -विकसनशील राष्ट्र , स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तव साजरा करणारा ब्रिटनलाही अर्थ व्यवस्थेत मागे टाकलेला देश अशी दवंडी पिटली जात असली तरी आज हि २५० रुपयांचे सामान १०० रु . देऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ येणाऱ्या लोकसंख्येतून नागरिकांच्या जमिनीवरील आर्थिक वास्तवातून अधोरेखित होते .
भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आरूढ झाली हा आनंद साजरा करतानाच त्या देशातील नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या लोकशाही बाबतच्या जागृतता आणि संवेदनशीलतेचे कृतिशील अनुकरण करणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने व्यवस्थेत रुजवण्यासाठी 'चिंतन ' करणे अत्यंत आवश्यक आहे .
चौथी /सातवी पर्यत देखील शिक्षण न घेतलेल्या व्यक्ती शिक्षणमंत्री होऊ शकत असेल , आरोग्य व्यवस्थेचा गंधही नसलेली व्यक्ती आरोग्य मंत्री होऊ शकत असेल तर आपली दिशा योग्य आहे का याचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे . बरे ! एखादी व्यक्ती त्या पदावर नियुक्त झाल्यावर त्याचे मुल्याकंन करणारी कुठलीच व्यवस्था आपल्याकडे नाही . ती व्यक्ती , तो राजकीय पक्ष जो डंका पिटेल तेच वास्तव आहे हे मानण्याशिवाय भारतीय जनतेसमोर अन्य कुठलाच पर्याय उपलब्ध नसतो .
५ वर्षे सरपंच , जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर , मंत्री , मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने ५ वर्षात नेमके कोणते कर्तृत्व केले याचा कुठलाच लेखाजोखा मतदारांसमोर ठेवला जात नाही . मतदारांना देखील त्या बाबतचे सोयरसुतक असल्याचे दिसत नाही .
आपण ज्या व्यक्तीला निवडून देतो आहे त्या मागचे निकष कोणते ? याचे उत्तर ९० टक्के मतदारांकडे असल्याचे दिसत नाही . भारतीय लोकशाही व्यवस्था अमृत महोत्सवी वाटचालीनंतर देखील प्रगल्भ दिशेने झालेली नाही हेच यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होते .
एवढेच कशाला आपल्या देशात संपूर्ण आयुष्यभर पदे भोगलेल्या व्यक्ती आहेत पण त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या ठळक ५ गोष्टी कोणत्या या प्रश्नांवर देखील त्यांच्याकडे "नेमके " उत्तर नसते .
नुसत्या असतात त्या अमुक केले -तमुक केले अशा वलग्ना . त्याही पोकळ आणि फुकाच्याच . ५/१० टर्म आमदार खासदार झालेल्या व्यक्ती सल्ला देत असतात की " हे झाले पाहिजे -ते झाले पाहिजे " . अहो ! प्रश्न हा आहे की मग तुम्ही काय केले ?
१५ वर्षे कृषिमंत्री राहिलेलय व्यक्तीला पदाचा काळ संपल्या नंतर शेतकऱ्यांसाठी "हे करा , ते करा " अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार उरतो का ? मग सांगा ! अशी लोकशाही पद्धत जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या देशाचे भविष्य किती उज्ज्वल असू शकेल ते !!
या निवडीबाबत भारतीय नागरिकांनी अभिमान मानताना हि गोष्ट लक्षात ठेवायला हवी की यात खरे मोठे पण आहे ते ब्रिटिश नागरिकांचे , ब्रिटिश लोकशाही पद्धतीचे . भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटिश पंतप्रधानपदी पोहचली या विषयी एका मर्यादेपर्यंतचा अभिमान रास्त ठरतो पण त्याचे भांडवल करत भारतीयांनी ढोल पिटवण्याचा प्रकार म्हणजे दुसऱ्याच्या वरातीत नाचण्याच्या आनंद मानण्यासारखे होय ! खरा प्रश्न हा आहे की आपण अशा गोष्टींचे अनुकरण करणार की , भूमिपुत्रांच्या ढाली पुढे करत पात्र व्यक्तींना बांध घालण्यात धन्यता मानणार याचा .
सुधीर
लक्ष्मीकांत
दाणी
, बेलापूर
, नवी
मुंबई
. danisudhir@gmail.com 9869226272
प्रत्येक सार्वजनिक पदांशी निगडीत कोणत्या गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, याची लेखी नोंद असणे गरजेचे आहे. हाती घेतलेली कामे त्या अनुषंगाने आहेत काय? यावर अंकुश असणे सुद्धा आवश्यक आहे. अशा प्रकारे आढावा घेत राहणे आणि योग्य प्रकारे कार्य होत आहे किंवा नाही ? यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा गरजेची आहे.
उत्तर द्याहटवा