THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

भ्रष्टाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रष्टाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जुलै, २०२६

स्थानिक स्वराज्य संस्था : 'टक्केवारी'च्या राजकारणात हरवलेला विकास... की सरकारमान्य लुटीची केंद्रे?

  स्थानिक स्वराज्य संस्था : 'टक्केवारी'च्या राजकारणात हरवलेला विकास... की सरकारमान्य लुटीची केंद्रे?

"भ्रष्टाचार झाला पाहिजे, पण टक्केवारी कमी हवी!" हे  अंबरनाथ महापालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या तोंडून बाहेर पडलेले हे वाक्य केवळ एका लोकप्रतिनिधीचे वैयक्तिक मत म्हणून दुर्लक्षित करून चालणार नाही. उलट, हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची  "मन की बात"  म्हणूनच पाहावे लागेल.

          अनेक वर्षांपासून सामान्य करदाता नागरिक दबक्या आवाजात जे बोलत होता, त्यावर जणू एका जबाबदार लोकप्रतिनिधीने सार्वजनिक शिक्कामोर्तब केले आहे. भारतीय लोकशाहीसमोरील आजचे सर्वात मोठे संकट केवळ भ्रष्टाचार नाही. खरे संकट हे आहे की भ्रष्टाचार आता लपवला जात नाही, त्याची लाजही वाटत नाही. उलट, तो व्यवस्थेचा एक अलिखित नियम बनला आहे.  "काम किती?" यापेक्षा "टक्केवारी किती?"  हा प्रश्न अनेक ठिकाणी अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे.

          भारतीय लोकशाहीला "जगातील सर्वात मोठी लोकशाही" आणि "लोकशाहीची जननी" अशी बिरुदे दिली जातात. पण लोकशाहीची खरी परीक्षा संसदेत किंवा विधानसभेत होत नाही. ती ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका येथे होत असते. कारण नागरिकाचा शासनाशी रोजचा संबंध याच संस्थांशी येतो.


दुर्दैवाने, आज या संस्थांविषयी जनमानसात एक अत्यंत कटू समज दृढ होत चालला आहे की  "स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि प्रशासन यांच्यासाठी सरकारमान्य आर्थिक लुटीची केंद्रे." 

             हा निष्कर्ष कोणत्याही एका पक्षाविरोधातील राजकीय आरोप नाही. वस्तुस्थिती अशी आहे की सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या व्यवस्थेचे लाभार्थी असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येतात, आर्थिक गैरव्यवहार समोर येतात, चौकशा होतात; पण कोणताही राजकीय पक्ष भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने लावून धरताना दिसत नाही. काही दिवस तोंडदेखला विरोध होतो आणि नंतर सर्व काही पूर्ववत सुरू राहते. याचा अर्थ काय, हे सुज्ञ नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

         आज निवडणूक ही  "समाजसेवा किंवा लोकसेवेचे माध्यम कमी आणि  प्रचंड आर्थिक परतावा देणारी गुंतवणूक " अधिक बनत चालली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारा उमेदवार हा खर्च पाच वर्षांत अनेक पटींनी वसूल करण्याचे गणित आधीच मांडून मैदानात उतरतो, अशी सामान्य नागरिकांची धारणा झाली आहे. या मानसिकतेतूनच विकासकामांच्या नावाखाली निधीचा अपव्यय, निकृष्ट दर्जाची कामे, फुगवलेली अंदाजपत्रके आणि कमिशनची साखळी जन्माला येते.

🛑 'टक्केवारी'चा अलिखित नियम

    आज अनेक ठिकाणी एक अलिखित पण सर्वपरिचित व्यवस्था अस्तित्वात असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. एखादे विकासकाम मंजूर व्हायचे असेल तर ते विशिष्ट लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील कंत्राटदारालाच मिळाले पाहिजे. अन्यथा फाईल पुढे सरकत नाही. अनेक ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच  "दहा टक्के"  ही अघोषित पूर्वअट असल्याची चर्चा खुलेआम होताना ऐकायला मिळते.

        कायद्याच्या पुस्तकात हा नियम नाही; पण व्यवहारात तो अनेकांना अनुभवायला मिळतो, अशी नागरिकांची धारणा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेने जणू त्याला अलिखित मान्यता दिली आहे, अशी भावना निर्माण होणे हेच लोकशाहीचे सर्वात मोठे अपयश आहे.

            या व्यवस्थेचा सर्वात मोठा फटका नागरिकांना बसतो. विकासकामांचा प्राधान्यक्रम नागरिकांच्या गरजांवर नव्हे, तर टक्केवारीच्या गणितावर ठरू लागतो. त्यामुळे ज्या कामांची नागरिकांना खरोखर गरज आहे ती वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, तर आर्थिक लाभ मिळवून देणारी कामे मात्र प्राधान्याने केली जातात.


💰 सार्वजनिक निधी : विकासासाठी की राजकीय व्यवस्थापनासाठी?


स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा सार्वजनिक निधी हा नागरिकांच्या मूलभूत गरजाून करण्यासाठी, दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी असतो. मात्र, आज सामान्य करदाता नागरिकांच्या मनात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या निधीपैकी प्रत्यक्ष विकासकामांवर किती खर्च होतो आणि किती निधी राजकीय व्यवस्थापनासाठी वापरला जातो? '

            अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे की विकासनिधीचा मोठा भाग हा नागरिकांच्या हितापेक्षा राजकीय कार्यकर्ते, समर्थक, निवडणूक व्यवस्थापन आणि कंत्राटी साखळी टिकवून ठेवण्यासाठी वापरला जातो. ग्रामपंचायतींपासून महानगरपालिकांपर्यंत अनेक ठिकाणी अशी परिस्थिति दिसून येते की उपलब्ध निधीपैकी मोठा हिस्सा अपेक्षित दर्जाच्या विकासकामांवर खर्च होत नसावा, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होते.

           कंत्राटे गुणवत्तेच्या, स्पर्धात्मक दरांच्या किंवा सार्वजनिक हिताच्या निकषांवर देण्याऐवाजी राजकीय जवळीक, शिफारसी आणि हितसंबंध यांना अधिक महत्त्व दिले जाते, अशी धारणा दिवसेंदिवस बळावत आहे. परिणामी, नागरिकांना ज्या कामांची खरोखर आवश्यकता आहे ती वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात; मात्र अनावश्यक पेव्हर ब्लॉक, कंपाउंड वॉल, वारंवार डांबरीकरण, नुकतेच झालेले रस्ते पुन्हा खोदणे किंवा पुनरावृत्तीची विकासकामे मात्र सातत्याने सुरू राहतात.

         विकासकामांचा प्राधान्यक्रम नागरिकांच्या गरजांवर नव्हे, तर 'टक्केवारी'च्या गणितावर ठरू लागला, तर "सार्वजनिक निधी हा विकासाचे साधन न राहता राजकीय व्यवस्थापनाचे माध्यम बनतो." हीच आज सामान्य करदाता नागरिकांच्या मनातील सर्वात मोठी खदखद आहे.

 📉 उच्चतम दर... न्यूनतम दर्जा: 

या संपूर्ण व्यवस्थेचे जणू एकच सूत्र बनले आहे— "उच्चतम दर... न्यूनतम दर्जा." 

          परदेशात वीस-पंचवीस वर्षे टिकणारे सिमेंटचे रस्ते आपल्या शहरांमध्ये चार-पाच वर्षांत उखडतात. नुकतेच झालेले पदपथ पुन्हा उखडले जातात. चांगले रस्ते पुन्हा खोदले जातात. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी त्याच नाल्यांची साफसफाई, त्याच गटारांची दुरुस्ती आणि त्याच कामांची पुनरावृत्ती सुरू राहते.

           विकासाच्या नावाखाली प्रत्यक्षात निधीची पुनरावृत्ती होते; पण नागरिकांच्या जीवनमानात अपेक्षित सुधारणा होत नाही. दर्जेदार, दीर्घकालीन आणि शाश्वत विकासापेक्षा अल्पकालीन, पुनरावृत्ती होणारी आणि अधिक आर्थिक लाभ देणारी कामे व्यवस्थेला अधिक सोयीची ठरतात.

 🤝 लोकप्रतिनिधीच कंत्राटदार झाल्यावर दर्जेदार विकासाची अपेक्षा कशी करणार?

कायद्यानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वतःच्या किंवा आपल्या निकटच्या नातेवाईकांच्या नावाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची कंत्राटे घेण्यास मनाई आहे. या तरतुदीमागील उद्देश स्पष्ट आहे— सार्वजनिक हित आणि वैयक्तिक आर्थिक हित यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये. 

     परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बेनामी कंपन्या, निकटवर्तीय, राजकीय कार्यकर्ते किंवा विश्वासू भागीदार यांच्या माध्यमातून ही व्यवस्था चालत असल्याचे आरोप वारंवार होत असतात. परिणामी, ज्यांनी सार्वजनिक निधीच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे, कामांच्या गुणवत्तेवर देखरेख करायची आणि प्रशासनाला जाब विचारायचा, तेच अप्रत्यक्षपणे कंत्राटी व्यवस्थेचे लाभार्थी ठरतात.

         जिथे लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि निर्णयप्रक्रिया यांच्यातील सीमारेषाच पुसली जाते, तिथे सार्वजनिक हितापेक्षा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य मिळणे स्वाभाविक ठरते. त्याचा परिणाम निकृष्ट दर्जाची कामे, वाढता खर्च, पुनरावृत्तीची विकासकामे आणि सार्वजनिक निधीच्या अपव्ययाच्या स्वरूपात नागरिकांना भोगावा लागतो.

         म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकतेची सुरुवात लोकप्रतिनिधी आणि कंत्राटी व्यवस्था यांच्यात स्पष्ट व अभेद्य विभाजन निर्माण करण्यापासून झाली पाहिजे. अन्यथा "उच्चतम दर... न्यूनतम दर्जा" हेच विकासाचे वास्तव राहील.

 🧪 सरकारची 'लिटमस टेस्ट'

       भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा करणे सोपे आहे; पण त्याची खरी परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातूनच होते. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांपर्यंतचा प्रत्येक व्यवहार जर पारदर्शक असेल, तर सरकारच्या प्रामाणिकपणावर त्यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही.

 मग एक साधा प्रश्न प्रत्येक करदाता नागरिक विचारतो— जर कारभार इतका स्वच्छ असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपूर्ण आर्थिक आणि प्रशासकीय कारभार आजही नागरिकांसाठी पूर्णपणे खुला का नाही?


* एका रस्त्यावर गेल्या १० वर्षांत किती खर्च झाला?

* तो खर्च किती वेळा झाला?

* कोणत्या कंत्राटदाराने काम केले?

* कामाचा अंदाजित खर्च आणि प्रत्यक्ष खर्च किती होता?  मोजमाप पुस्तिका (Measurement Book), देयके, पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate), दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period – DLP), कामाचा दर्जा तपासणारे अधिकारी आणि त्यानंतर झालेली दुरुस्ती— ही माहिती नागरिकांना एका क्लिकवर का मिळू नये? 

       आज माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविण्यासाठी नागरिकांना अर्ज करावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो, अपील करावे लागते. ज्या माहितीवर नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागणे हीच पारदर्शकतेच्या दाव्यांची सर्वात मोठी विसंगती आहे.

        खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपूर्ण कारभार  'Public Domain by Default ' या तत्त्वावर आधारित असला पाहिजे. माहिती मागितल्यावर देण्याऐवजी माहिती आधीच सार्वजनिक असली पाहिजे. कारण सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया हा करदात्यांच्या घामाच्या पैशातून उभा राहिलेला असतो.

          जर सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा संपूर्ण कारभार सार्वजनिक संकेतस्थळावर खुला केला, तर सरकार पारदर्शक आहे, प्रामाणिक आहे आणि भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची इच्छाशक्ती खरी आहे, यावर शिक्कामोर्तब होईल. परंतु सातत्याने नागरिकांची मागणी असूनही अशी व्यवस्था उभी राहत नसेल, तर सरकारच्या पारदर्शकतेवर आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

        स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हीच कोणत्याही सरकारच्या प्रामाणिकपणाची खरी  लिटमस टेस्ट' आहे.

 🛠️ दृष्टिक्षेपातील उपाययोजना


भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक स्थानिक स्वराज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी केवळ चौकशा, निलंबने किंवा घोषणाबाजी पुरेशी ठरणार नाही. शासनाने पुढील तंत्रज्ञानाधिष्ठित, कायदेशीर आणि व्यवस्थात्मक सुधारणा तातडीने अंमलात आणणे आवश्यक आहे:


  • प्रत्येक विकासकामाचा डिजिटल इतिहास (Project Coding): प्रत्येक रस्ता, गटार, उद्यान, सार्वजनिक इमारत, जलवाहिनी, पदपथ आणि सार्वजनिक मालमत्तेला स्वतंत्र Project ID / Property Code द्यावा. त्या मालमत्तेवर गेल्या दहा वर्षांत झालेला खर्च, कंत्राटदाराचे नाव, कामाचा कालावधी, दोषदायित्व (DLP), देयके, छायाचित्रे आणि दुरुस्तीचा संपूर्ण इतिहास नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध असावा.
  •  स्थानिक स्वराज्य संस्थांचा संपूर्ण कारभार 'Public Domain' मध्ये:  सर्व निविदा, अंदाजपत्रके, Measurement Book (MB), Running Bills, Final Bills, Work Orders, Completion Certificates, Audit Reports, देयके, दंडात्मक कारवाई आणि संबंधित सर्व कागदपत्रे नागरिकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध करून देणे बंधनकारक करावे.
  • स्वतंत्र तांत्रिक आणि आर्थिक लेखापरीक्षण:  महानगरपालिका, नगरपालिका आणि मोठ्या ग्रामपंचायतींतील सर्व मोठ्या विकासकामांचे IIT, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये किंवा स्वतंत्र राष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ संस्थांकडून *Third Party Technical & Financial Audit* अनिवार्य करावे. रस्त्यांचे Core Testing आणि दर्जा तपासणी नियमित व्हावी.
  • Reverse Auction आणि Benchmarking: सर्व प्रकारच्या खरेदी प्रक्रियेत Reverse Auction प्रणालीचा वापर करून स्पर्धात्मक दर निश्चित करावेत. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खर्चाचे Benchmarking करून अवास्तव खर्च आणि कृत्रिम दरवाढ रोखावी.
  •  हितसंबंधांच्या संघर्षावर कठोर बंदी: लोकप्रतिनिधी, त्यांचे नातेवाईक, भागीदार, निकटवर्तीय किंवा बेनामी कंपन्यांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीही कंत्राटे घेण्यास कठोर बंदी घालावी. उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई, आर्थिक दंड आणि सदस्यत्व रद्द करण्यासारख्या कठोर तरतुदी कराव्यात.
  •  संगणकीकृत बदल्या आणि बायोमेट्रिक उपस्थिती:  कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात. सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीशी जोडून वेतन वितरण करावे.
  • 'रस्ता तिथे Utility Duct' धोरण:  एकदा रस्ता तयार झाल्यानंतर केबल, गॅस, पाणीपुरवठा किंवा इतर सेवांसाठी तो पुन्हा-पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक नवीन रस्त्यासोबत Utility Duct बंधनकारक करावे.

  •  नागरिकांचा थेट सहभाग:  प्रत्येक मोठ्या विकासकामापूर्वी सार्वजनिक सुनावणी, प्रभागनिहाय नागरिक सल्लागार समित्या, सामाजिक लेखापरीक्षण (Social Audit) आणि शहरातील सर्व सार्वजनिक मालमत्तेचे Geo-tagging अनिवार्य करावे.

  •  निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई : निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची राज्यस्तरीय Blacklist तयार करून त्यांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निविदांपासून निश्चित कालावधीसाठी अपात्र ठरवावे. दोषदायित्व कालावधीत खराब झालेले काम स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करणे बंधनकारक असावे.
  •  माहिती अधिकाराची गरजच उरणार नाही अशी व्यवस्था: सार्वजनिक माहिती आधीच ऑनलाइन उपलब्ध असल्यास माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. RTI हा माहिती मिळविण्याचा नव्हे, तर अपवादात्मक परिस्थितीत वापरण्याचा कायदा राहिला पाहिजे.


🏛️ आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे...

 आज सामान्य करदाता नागरिकांचा सरकारला एकच प्रश्न आहे— सरकारला खरोखर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे आहे का, की भ्रष्टाचारावर केवळ राजकीय भाषणे? 

 जर उत्तर पहिले असेल, तर सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांपासूनच करावी लागेल. कारण सर्वाधिक सार्वजनिक पैसा, सर्वाधिक कंत्राटे, सर्वाधिक नागरिकांचा संपर्क आणि सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी याच व्यवस्थेशी संबंधित आहेत.

    मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे वास्तव जाणून घ्यायचे असेल, तर कोणत्याही राजकीय भाषणाची गरज नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर किंवा कोणत्याही मोठ्या महानगरपालिकेतील गेल्या दहा वर्षांतील निवडक विकासकामांचे स्वतंत्र तांत्रिक आणि आर्थिक लेखापरीक्षण करून पाहावे.  सत्य स्वतः बोलू लागेल. 

         लोकशाहीची ताकद केवळ दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्यात नसते; ती निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वात (Accountability ) असते. करदाता नागरिक हा सरकारचा याचक नाही; तो सार्वजनिक निधीचा मालक आहे. त्यामुळे सार्वजनिक पैशाचा प्रत्येक रुपया कुठे, कसा आणि कोणाच्या फायद्यासाठी खर्च झाला, याचा हिशेब मागणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे.

    अंबरनाथ महापालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या तोंडून बाहेर पडलेले  "भ्रष्टाचार झाला पाहिजे... पण टक्केवारी कमी हवी!" हे वाक्य एका व्यक्तीचे मत म्हणून विसरून चालणार नाही. ते स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील आजच्या मानसिकतेचे अस्वस्थ करणारे प्रतिबिंब आहे. त्या वक्तव्यावर टीका करून प्रश्न सुटणार नाही; त्या वक्तव्याला जन्म देणारी व्यवस्था बदलावी लागेल.

       स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहेत. हा पाया जर भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरला, तर लोकशाहीची भव्य इमारत कितीही आकर्षक दिसली तरी तिचे कोसळणे अटळ आहे. म्हणूनच आज गरज केवळ भ्रष्टाचाराविरोधी घोषणांची नाही; तर पारदर्शक, उत्तरदायी आणि तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवस्थेची आहे.


अन्यथा सामान्य करदाता नागरिकांच्या मनातील हा निष्कर्ष अधिकाधिक दृढ होत जाईल—


 "स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीची मंदिरे नसून, 'टक्केवारी'च्या राजकारणात अडकलेली लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि प्रशासन यांची सरकारमान्य आर्थिक लुटीची केंद्रे बनली आहेत." 

 जर ही भावना समाजात कायमची रुजली, तर तो केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराभव नसेल; तो भारतीय लोकशाहीवरील जनविश्वासाच्या ऱ्हासाची सुरुवात ठरेल.


 सुधीर लक्ष्मीकांत दाणी   9869226272 


शनिवार, १ मार्च, २०२५

भ्रष्टाचार ,लाचखोरी हा तर सरकारी आस्थापने , नोकरशाहीचा , लोकप्रतिनिधींचा "सरकारमान्य " मूलभूत अधिकारच !

 

                    फ्रेंच कंपनीने म्हाडा वर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे आणि  मुख्यमंत्री महोदयांनी देखील नुकतेच काही  मंत्र्यांचे खाजगी सचिव फिक्सर आहेत अशी वाच्यता केल्याने  भारतीय यंत्रणेतील लाचखोरी पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आलेली आहे .

    "टोकाची   दांभिकता "  हा भारतातील प्रशासकीय व्यवस्था , राजकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांच्या रक्तात भिनलेला आहे . 

  " भ्रष्टाचार मुक्त कारभार , पारदर्शक कारभार " अशा दिल्या जाणाऱ्या घोषणा देखील 'दांभिकतेचाच " अविष्कार आहे याची प्रचिती  सातत्याने येते आहे  . लोकशाहीच्या सर्वच स्तंभाच्या डीएनए मध्येच 'दांभिकता ' ढासून भरली गेलेली असल्यानेच लोकशाहीचे सर्व स्तंभ 'भ्रष्टचाराला हद्दपार 'करण्याच्या घोषणा करून देखील भ्रष्टाचार देशव्यापी झालेला असून तो सुखनैवे नांदत आहे हे कटू वास्तव आहे .

                      ज्यांनी व्यवस्थेतील लाचखोरी , भ्रष्टाचार हद्दपार करणे अभिप्रेत आहे त्याच प्रशासनाला , राज्यकर्त्यांना तो प्राणप्रिय आहे  त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत, लाचखोरी मुक्त भारत   हे स्वप्न पूर्णत्वास जाणे नजीकच्या भविष्यात तरी संभवत नाही हे कटू वास्तव आहे .

 

    खरे तर 'हातच्या कंगनाला आरसा कशाला ' या म्हणीप्रमाणे भारतीय लोकशाही यंत्रणेत  लाचखोरी , भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे  हे दाखवण्यासाठी वा समजून घेण्यासाठी फ्रान्स सारख्या देशाने आरोप करण्याची आवश्यकता असत नाही . तलाठी पासून ते राज्य -केंद्र सरकारच्या सर्वोच्च शिखरापर्यंत लाचखोरी , भ्रष्टाचार 'चालू ' आहे याची प्रचिती पदोपदी , क्षणोक्षणी येतच असते . फक्त आपल्यातील दांभिकतेमुळे लाचखोरीच्या अस्तित्वाला नाकारले जाते आहे .

                 सर्वात महत्वाची गोष्ट  हि आहे की  , लाचखोरी -भ्रष्टाचाराला राजमान्यता आहे , वरदहस्त आहे त्यामुळे भारतातून भ्रष्टाचार , लाचखोरी हद्दपार होणे हे गेली अनेक दशके केवळ दिवास्वप्नच ठरते आहे .  

                  भ्रष्टाचार ,लाचखोर हद्दपार होण्याची गोष्ट सोडाच उलटपक्षी अलीकडच्या काही दशकात 'लाचखोरी -भ्रष्टाचार ' या गोष्टी अधिकाधिक 'अधिकृत ' होते आहे . ३ कोटेशनची तांत्रिक  अटींचे पालन करून बाजारात १० रुपयांना मिळणारी गोष्ट जर १०० रुपयाला सरकारी यंत्रणांनी खरेदी केली तर ते कृत्य सरकारी भाषेत , कायद्याच्या भाषेत 'कायदेशीर '  बाब ठरते .

 विकसित देशात सिमेंटचे रस्ते निर्माण करण्यासाठी विहित केलेल्या  प्रति चौरस फुट दरापेक्षा  आपल्या देशात ३ /४ पट दर दिला जातो व विकसित देशात सिमेंटच्या रस्त्यांचा डिफेक्ट लायेबिलिटी पिरियड ३० /३५ वर्षाचा असताना आपल्या देशात दोष निवारण कालावधी ५/१० वर्षे  विहित केला जात असला तरी  देखील तो भ्रष्टाचार ठरत नाही कारण  सर्व प्रशासकीय ,कायदेशीर सोपस्कार पार पाडूनच  तो दिला जात असल्याने तो भ्रष्टाचार ठरत नाही .

     एकवेळ भारतातील देव दक्षिणे शिवाय पावू शकेल पण लक्ष्मीदर्शनाशिवाय  भारतातील प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था पावणे कदापिही शक्य नाही  याचे ज्ञान फ्रेंच कंपनीला नसावे असे दिसते . त्यामुळे दोष खरा तर भारताचा, भारतीय व्यवस्थेचा  नसून तो फ्रांसचा आहे , फ्रेंच कंपनीचा आहे . फ्रांस  देशात , फ्रेंच कंपनीत वेगळी संस्कृती असू शकेल , देश सेवेचे वेगळे निकष वेगळे असू शकतील  भारतात देश सेवेचे मोल  मोजावेच लागते याची जाण आणि जाणीव हि  फ्रेंच  कंपनींना नसल्यानेच त्यांनी भारतावर  'भ्रष्टाचार  , लाचखोरी ' चे आरोप केलेला दिसतात . खरे तर  १४० करोड भारतीयांनी , भारतीय सरकारने फ्रेंच चा जाहीर धिक्कार आणि निषेध करायला हवा .  भारत बदल रहा है ! फ्रान्सने देखील स्वतःला बदलायला हवे .    

 

               भविष्यात भारतात कोणतेही  'विकासकामांचे कंत्राट " घेणाऱ्या विदेशी कंपन्यांनी , विदेशी सरकारांनी  एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की  भारतात भ्रष्टाचार ,लाचखोरी हा तर सरकारी आस्थापने , नोकरशाहीचा , लोकप्रतिनिधींचा "सरकारमान्य " मूलभूत अधिकारच  ! असून तो मान्य असेल तरच भारताच्या 'विकास ' कामात सहभागी व्हावे . विनाकारण भारताची बदनामी होईल असा पत्रव्यवहार करण्याचे  धाडस दाखवू नये .

 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

 (लेखक सजग नागरिक मंच नवी मुंबई चे  संघटक आहेत)

बुधवार, १७ जुलै, २०२४

जनतेची लक्षवेधी : सिडकोच्या भ्रष्ट कारभारावर तंत्रज्ञानाचा प्रहार ,अंकुश हाच सर्वोत्तम पर्याय !


 

                        " सिडको ,शासनात बिल्डरांचे दलाल "  असे वक्तव्य भाजपाचे आमदार श्री . गणेश नाईक यांनी केले आहे . अगदी पोटतिडकीने त्यांनी विधानसभेत सिडकोच्या कारभारावर आसूड ओढलेले आहेत . अलीकडच्या काळातील राजकीय संस्कृती लक्षात घेता अशा प्रकारचे धाडस आणि ते देखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून हा सुखद व आश्चर्यकारक धक्का होता .  या धाडसी वक्तव्यासाठी नाईक साहेबांचे सजग नागरिक मंच , नवी मुंबईच्या वतीने जाहीर अभिनंदन .

 

 पण .... पुढे काय ? भविष्यात खरंच सिडकोचा कारभार स्वच्छ ,पारदर्शक , भ्रष्टाचार मुक्त , दलाल मुक्त , लाचखोरी मुक्त होईल का ?  की     " सोन्याचे अंडे देणारी कोंबडी " ठरत असल्याने सिडकोतील भ्रष्टाचाराला  आजवर सरकार ,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेच अभय , वरदहस्त  लाभत गेला तसाच तो पुढेही लाभत राहील  या जनमनातील मताच्या अनुषंगाने एबीपी माझा साठी ब्लॉग .

  

                 सुदैवाने सत्ताधारी आमदार महोदयांनीच सदरील वक्तव्य थेट विधानसभेत केले हे बरे झाले , अन्यथा विरोधक जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी आरोप करत आहेत अशी ढाल पुढे करून सरकारला त्यातून सुटका करून घेता आली असती .  अर्थातच सिडको हे भ्रष्टचार , लाचखोरी ,अनियमितता याचे आगार आहे हे काही गुपित उरलेले नाही , सिडकोची पायरी चढणाऱ्या व न चढणाऱ्या सर्वानांच हे ज्ञात आहे .

                       समस्यांचे चर्वितचर्वण हा आपल्या देशातील सर्वच घटकांना जडलेला रोग आहे . भ्रष्टाचार , लाचखोरी या समस्येवर तर भारतात गल्लीपासून दिल्ली पर्यंत इतक्या वेळेला भाष्य झालेले आहे की  , लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये इतक्या वेळा नोंद होऊ शकली असती की  तेच एक रेकॉर्ड झाले असते .

                  दूरदृष्टीने 'वेळ पाहून 'सर्वच पक्षातील नेते भ्रष्टाचार , लाचखोरी , दलाली याबाबत बोलत असतात , पण हेच नेते प्रत्यक्षात मात्र " या व्यवस्थेचे खंदे समर्थक ' असतात . सरकारी यंत्रणेत पारदर्शकतेचा अभाव हिच भ्रष्ट ,लाचखोर व्यवस्थेची जननी आहे  याचे १०० टक्के ज्ञान असून देखील आपल्या देशातील सरपंच ते मुख्यमंत्री -पंतप्रधान पदापर्यत पोचणारा व पोहचू पाहणारा  कोणत्याच राजकीय पक्षाचा नेता हा अपारदर्शक व्यवस्थेवर प्रहार करण्याचे धाडस करत नाही .  गणेश नाईक हे नवी मुंबईचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी किमान नवी मुंबई महानगरपालिका आणि सिकडो प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठीचे आदेश व्यवस्थापकीय संचालक , नवी मुंबई पालिका आयुक्तांना द्यावेत . त्यांनी असे केले तर त्यांची भ्रष्टचाराप्रती  असलेला राग 'आतला आवाज ' आहे यावर नवी मुंबईकर नागरिकांचा विश्वास बसेल .

                ‘भ्रष्टाचाराला ' प्रति शब्द म्हणजे 'सिडको ' अशा प्रकारचा कारभार सिडकोचा होता /आहे आणि ९९ टक्के असेल कारण त्यास सर्वपक्षीय  स्थानिक लोकप्रतिनिधी पासून , नगरविकास विभाग , सरकारचा 'छुपा पण उघड उघड पाठिंबा ' आहे . असे म्ह्टले जाते की  सिडकोचे दर अत्यंत 'फिक्स ' आहेत . कुठल्याही बिल्डरला  भूखंड  घेण्यासाठी त्याची पूर्तता अनिवार्यच असते . जो नियम बिल्डरला तोच सर्वसामान्य नागरिकांना लावला जातो .

                सिडको प्रशासनात इतकी "टोकाची प्रामाणिकता " आहे की   तुम्हीं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा की  ऑफलाईन पद्धतीने , तुमचे कुठलेही काम असले तरी  'नियमाप्रमाणे लक्ष्मीदर्शन ' झाले नाही तर फाईल हलतच नाही .  'एका हाताने द्या , दुसऱ्या हाताने काम करून घ्या ' या तत्वानुसारच सिडको प्रशासनाचा कारभार सुरु असल्याने  सिडकोला व नवी मुंबई पालिकेला 'सरकारच्या सेवा हक्क कायद्याची ' देणेघेणे उरलेले नाही .  घटनेने नागरिकांना दिलेल्या माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करण्यात देखील सिडको अग्रेसर आहे . 

            असे म्हटले जाते की  सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी येण्यासाठी सरकार दरबारी वजन आणि लक्ष्मीदर्शन सक्तीचे आहे .हे वास्तव असेल तर  अशा प्रकारे येणारी व्यक्ती कडून पारदर्शक कारभाराची अपेक्षा म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखेच ठरते .

    घराचा अंदाज हा अंगणातूनच कळतो यानुसार  सिडकोचा  कारभार  अनागोंदी , बेकायदेशीरता ,अनधिकृतेने  पूर्णतः बरबटलेला आहे याची प्रचिती सिडकोच्या प्रांगणातूनच येते . नवी मुंबईतील सिडकोच्या मुख्यालयासमोरतील पार्किंग व्यवस्था देखील अतिक्रमण असून ती अनधिकृत आहे .

 

भ्रष्टाचार ,लाचखोरी यावर चर्वितचर्वण करण्यात धन्यता न मानता सिडकोचा कारभार स्वच्छ ,पारदर्शक असावा अशी धारणा असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढील उपायांची  तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी  सरकार दरबारी पाठपुरावा करावा :

 

१] वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने सिडकोचे कर्मचारी - अधिकाऱ्यांची मानसिकता हि सारंजामशाहीची झालेली आहे आणि त्याला तडा देण्यासाठी सिडकोतील अगदी शिपायापासून ते  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या या ३/५/७ वर्षांनी  दुसऱ्या शहरातील सिडकोत कराव्यात .

२] सिडकोमध्ये 'ई प्रशासन ' सुरु करून प्रत्येक फाईल ला  'ई ट्रेकिंग ' पद्धत सक्तीची करावी .

३] सिडको कारभारावर जनतेचा तिसरा डोळा राहण्यासाठी सिडको कडून वितरित केल्या जाणाऱ्या प्रत्येक भूखंडाची माहिती पब्लिक डोमेनवर टाकावी .

४] सिडकोतील फाईल मंजुरीसाठी आवश्यक पैशाची देवाणघेवाण हि पार्किंग मध्येच होत असल्याने राज्याच्या दक्षता विभागाने यावर लक्ष ठेवावे .

५] सिडकोत तटस्थ दक्षता विभाग असावा . यामध्ये सिडकोतील एकही कर्मचारी -अधिकारी नसावा .

६]सिडको प्रशासन माहिती दडवून ठेवण्यासाठी 'आरटीआय ' ला उत्तर देण्याचे टाळत असल्याने सरकारने सिडकोला दाखल होणाऱ्या प्रत्येक आरटीआय चे उत्तर हे संकेतस्थळावर  टाकणे सक्तीचे करावे . त्याच बरोबर गेल्या ३ वर्षात सिडकोला किती आरटीआय प्राप्त झाले , किती प्रथम अपील दाखल झाले , किती अर्जाना अभिप्रेत माहिती दिली , किती अर्ज प्रलंबित आहेत याचा लेखाजोखा नगरविकास खात्याने घ्यावा .

७] सिडकोमध्ये येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याच प्रमाणे सिडकोच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही लावावेत. 

८] सिडकोने गेल्या १० वर्षात सामाजिक भूखंडाचे केलेल्या वितरणाचे कॅग मार्फत ऑडिट केले जावे .

९] सिडकोमध्ये कार्यरत असणाऱ्या , निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या चल-अचल संपत्तीचे केंद्रीय दक्षता आयोग किंवा तटस्थ यंत्रणेमार्फ़त ऑडिट केले जावे  अनेक अधिकाऱ्यांचे  फार्म हाऊस आहेत , अनेक सदनिका आहेत , जमिनी आहेत .

१०] सिडकोने गेल्या १०/१५ वर्षात जमिनी बाबत केलेल्या 'आरक्षण बदलाचा ' डेटा गोळा करावा आणि त्याचे ऑडिट करावे .

११] सिडकोने नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाईन सुविधा पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या सेवा पूर्ततेबाबतचा आढावा विद्यमान सिडको व्यवस्थापकीय महोदयांनी  घेऊन त्यातील निष्कर्षानुसार प्रशासनाला कारवाईचे आदेश द्यावेत .

१२] राज्य सरकारच्या 'सेवा हक्क अधिनियमाची पूर्तता केली जाते आहे की  पायमल्ली याबाबतची पडताळणी नगरविकास खात्याने करावी .

१३] सिडकोचा कारभार नागरिकांसाठी खुला राहण्यासाठी सिडकोच्या सर्व विभागातील कारभाराचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर खुला करावा .

१४] फणसवाडीतील वाघोबा मंदिराजवळ सिडकोने वड ,पिंपळ ,बदाम अशा प्रकारच्या ४ हजार वृक्ष लावल्याचा बोर्ड आहे .पण प्रत्यक्षात असे एकही झाड नसल्याचे दिसते . या पार्श्वभूमीवर सिडकोने केलेल्या वृक्षारोपण  जतन -संवर्धनावर केलेल्या खर्चाची तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी आणि सिडकोने लावलेल्या वृक्षांपैकी प्रत्यक्षात किती वृक्ष जिवंत आहेत याची पडताळणी करावी .

 

                       जगातील कुठल्याही समस्येवर उपाय असतोच असतो . सिडकोतील लाचखोरी , भ्रष्टचार , अनियमतता त्यास अपवाद असत नाही . प्रश्न -समस्या सर्वज्ञात आहे .  प्रश्न हा आहे की  त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मानसिकता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची आहे का ?  सिडकोचा कारभार हा  पूर्णतः भूखंड ,जमिनीशी निगडित असल्याने  सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी सिडको म्हणजे 'सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ' ठरत असल्याने त्या कोंबडीच्या मानेला चाकू लावण्याचे धाडस  आजवर कोणत्याच नेत्याने , कोणत्याच सरकारने दाखवलेले नाही .  "घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या ?" अशी परिस्थिती असल्याने सिडकोच्या  भ्रष्टाचाराबाबत बोलले जाते पण त्यावर प्रहार करण्याचे धाडस मात्र दाखवले जात नाही हे कटू पण  जमिनीवरील सत्य  वास्तव आहे .

 

 





सुधीर लक्ष्मीकांत दाणी

[प्रवर्तक सजग नागरिक मंच नवी मुंबई]

९८६९२२६२७२

 

ई-मेल: alertcitizensforumnm@gmail.com