THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

जन मन की बात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जन मन की बात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ मे, २०२३

जन मन की बात : शासनाच्या दारी येणाऱ्यांना गतिमान सेवा द्या

 

                 शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीना अगदी सहज , सोप्या पद्धतीने विनाअडथळा मिळण्यासाठी  "शासन आपल्या दारी " हे अभियान जोमाने राबवण्या बरोबरच ते अधिक व्यापक करणार असल्याचे सूतोवाच मा . मुख्यमंत्र्यांनी केले आहे .  वरकरणी हा प्रकार लोकाभिमुख दिसत असला तरी डोळसपणे विचार केल्यास हा प्रश्न पडतो की मुळात असे "प्रतीकात्मक उपक्रम " करण्याची वेळच का येते ? 

           शासनाच्या योजना - नागरिकांना आवश्यक असणारे प्रमाणपत्रे /परवाने  वितरित करण्यासाठी ग्रामपंचायती पासून ते मंत्रालयांपर्यत विविध प्रशासकीय यंत्रणा आहेत . सुट्टीचा कालावधी वगळता हि कार्यालये  निरंतर सुरु असतात .  नागरिक दैनंदिन जीवनातील समस्या /प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय कार्यालयात येत असतात .  येणारया प्रत्येक नागरिकाचे  विशिष्ट कालमर्यादेत  काम करून देण्याचे  बंधन असणारे 'सेवा हक्क हमी , नागरिकांची सनद ' यासम  अनेक  कायदे आहेत . हि व्यवस्था असताना नागरिकांची कामे दीर्घकाळ प्रलंबितच का राहतात ? हा खरा प्रश्न आहे .

       लोकप्रतिनिधी , सत्ताधाऱ्यांचे प्रमुख कर्तव्य असते की  प्रशासनावर अंकुश ठेवणे आणि जनतेचे कामे विहित वेळेत होतील यासाठी प्रशासनाला भाग पाडणे . हे कर्तव्य 'प्रामाणिक पणे ' पार पाडले , शासन दरबारी येणारया नागरिकांची जाणीवपूर्वक अडवणूक करता गतिमान सेवा दिली तर अशा प्रकारचे प्रतीकात्मक आणि जनतेची धूळफेक करणारे उपक्रम राबवण्याची वेळच पडणार नाही . पण अलीकडच्या काळात अशा प्रतीकात्मक उपक्रमांची चलती आहे .

        आपण ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो त्या प्रभागातील महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज करत प्रभागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करता नगरसेवक 'मोफत डोळे तपासणी , मोफत रक्त तपासणी ' अशा प्रकारचे प्रतीकात्मक कार्यक्रम राबवण्यात धन्यता मानताना दिसतात .  तीच गत आमदार -खासदारांची दिसते . निवडणून आल्यानंतर आपले घटनात्मक उत्तरदायित्व पार पाडता निवडणुका जवळ आल्या की  'हळदी -कुंकू ' सारखे प्रसिद्धी मिळवणारे कार्यक्रम राबतात . मूलभूत कर्तव्याला मूठमाती देत  अशा प्रकारचे प्रतीकात्मक कार्यक्रम  मतदारांची दिशाभूल नव्हे काय ? 

      मुख्यमंत्री म्हणतात की  , सरकारी यंत्रणेकडे मोठे अधिकार आहेत . लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शासन -प्रशासनाकडे असतात . शासनाच्या शेकडो योजना  या नागरिकांसाठी असतात .  १०० टक्के रास्त मत . पण जमिनीवरील वास्तव  आणि मा . मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेले मत हे चुंबकाच्या टोकासारखे आहे . शासन -प्रशासनाकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणारे मोठे अधिकार असले तरी त्याचा वापर काही सन्माननीय अपवाद वगळता या अधिकाराचा वापर हा  जनतेला नाडण्यासाठी  होतो .

                स्वतःच्या बापजाद्याच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस नाव लावण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात . संपूर्ण महाराष्ट्रात एकही तलाठी सापडणार नाही की  नियमानुसार अर्ज सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील तो विहित कालावधीत वारसाची नोंद करेल . जोवर लक्ष्मी दर्शन होत नाही तोवर ते पेनच उचलत नाहीत हे  ' सरकार मान्य नियम ' आहे . हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . अशाच प्रकारची अडवणूक शासन -प्रशासन 'निरंतर ' करत असते . याला चाप लावणे  गरजेचे आहे . ते सरकरचे मुख्य कर्तव्य आहे . वर्तमानातील विज्ञान -तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनातील कर्मचाऱ्यांना -अधिकाऱ्यांना  उत्तरदायी  केले , प्रत्येक कामासाठी असणाऱ्या कमाल कालावधी नियमाचे पालन अनिवार्य केले तर आपसूकच नागरिकांना  'शासन आपल्या दारी ' आल्याची अनुभूती मिळू शकेल  . 

 

                 शासन -प्रशासन वर्तमानात इतके निर्ढावलेले आहे की  अगदी जिल्हाधिकारी -आयुक्त पदावरील व्यक्ती देखील नागरिकांच्या पत्राला -इमेल ला उत्तर देण्याचे कर्तव्य पार पाडत नाही  . नागरिकांनी एखादी समस्या मांडली तर तिचे निराकरण करता केवळ " पोस्टमन " ची भूमिका निभावत कागद कनिष्ठ अधिकाऱ्याकडे  पाठवण्यात धन्यता मानताना दिसतात. ते हे विसरतात की  कनिष्ठ पातळीवर प्रतिसाद मिळाला नाही म्हणून नागरिक वरिष्ठांची पायरी चढतात .

    आणखी एका  महत्वाच्या  गोष्टीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे . तो मुद्दा म्हणजे अनावश्यक असणारे कालबाह्य  नियम /कायदे . शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वर्तमानात २१ हजार वार्षिक मर्यादेची अट असणारा नियम आहे . आजच्या काळात किती कुटूंबाचे वार्षिक उत्त्पन्न २१ हजाराच्या आत असू शकेल ? अगदी घरची धुणीभांडी करणाऱ्या महिलेचे उत्पन्न देखील यापेक्षा अधिक असते . त्यामुळे हि अट प्रामणिपणे पाळली तर अगदी लाखात एखादी /दुसरी व्यक्ती शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकते  . यावरील वर्तमानातील उपाय म्हणजे तलाठ्याला हजार -दोनहजार देऊन २१ हजाराखालील उत्पनाचा दाखला घ्यायचा आणि तो सहजपणे मिळतो देखील  . नागरिकांनी दिलेल्या पुराव्याच्याच आधारे रहिवाशी दाखला शासन देते . प्रश्न हा आहे की  मग हेच पुरावे राहिवाशाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले का जात नाहीत ?

  नागरिकांना जलद विना अडथळा सेवा द्यायची प्रामाणिक इच्छा वर्तमान सरकारची असेल तर त्यांनी अशा कालबाह्य नियमांना तिलांजली देणे गरजेचे आहे .

       मा . मुख्यमंत्री महोदयांनी 'जन मन की  बात ' लक्षात घ्यावी आणि जनतेला शासनाने ठरवलेल्या कालावधीत सेवा १०० टक्के मिळतील याकडे अधिक लक्ष द्यावे  . अन्यथा "शासन आपल्या दारी " या सारखे उपक्रम जनतेप्रती केवळ मगरीचे आश्रू ठरतात . कटू असले तरी हेच  वास्तव आहे . ते नाकारता येणार नाही . जनता सुज्ञ झालेली आहे  , ती केवळ जाहिरातींना -घोषणांना भुलत नाही हे कर्नाटकातील मतदारांनी दाखवून दिलेले आहे . महाराष्ट्र हा कर्नाटकाचा शेजारी आहे . ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला  या वाक्प्रचारानुसार कर्नाटकचा गुण महाराष्ट्रातील मतदारांना लागू शकतो हे ध्यानात घ्यायला हवे  .  "निर्णय वेगवान -महाराष्ट्र गतिमान " हे केवळ जाहिरातीत राहता त्याची प्रचिती नागरिकांना प्रत्यक्ष शासन -प्रशासनात येणे आवश्यक आहे  .

 


सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

बेलापूर , नवी मुंबई