THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

ई-ऑफिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ई-ऑफिस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

सिडकोच्या कारभारात आमूलाग्र बदल हवेत! २० समस्या, १८ उपाययोजना; सजग नागरिक मंचाचे अश्विन मुदगल यांना खुले पत्र

 

📢 निवेदने, स्मरणपत्रे, प्रत्यक्ष पाठपुरावा... तरीही भेट नाही!

अखेर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खुले पत्र!

🔴 सिडकोच्या कारभारात आमूलाग्र प्रशासकीय सुधारणांची आवश्यकता!


प्रति,

मा. श्री. अश्विन मुदगल (भा.प्र.से.)
व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष,
सिडको, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

विषय : सिडकोच्या प्रशासकीय कारभारातील गंभीर त्रुटी दूर करून पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त व नागरिकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याबाबत खुले पत्र.

सन्माननीय महोदय,

सर्वप्रथम नवी मुंबईत आपले मनःपूर्वक स्वागत!

खरे तर आपण सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष भेटून आपले स्वागत करण्याचा आमचा मानस होता. मात्र, ती स्वप्नपूर्ती तूर्तास न झाल्याने खुल्या पत्राद्वारे आपले स्वागत करण्याची वेळ आली आहे.

आपण सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सजग नागरिक मंच, नवी मुंबईच्या वतीने सिडकोच्या प्रशासकीय सुधारणांसंदर्भात आपली भेट घेण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली. आजवर तब्बल ५ वेळा स्मरणपत्रे ई-मेलद्वारे पाठविली, प्रत्यक्ष निवेदन सादर केले आणि आपल्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आजतागायत पाच सदस्यीय शिष्टमंडळाला भेटीची वेळ उपलब्ध झालेली नाही.

नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक हिताच्या प्रशासकीय सुधारणांवर चर्चा करण्यासाठी एका सार्वजनिक महामंडळाच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेळ मिळू नये, ही बाब निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळे नागरिकांची भूमिका आणि सिडकोच्या कारभारातील वास्तव आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे खुले पत्र लिहिण्याची वेळ आली आहे.

मुंबईला पर्याय म्हणून आधुनिक नियोजित शहराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सिडकोची स्थापना झाली. स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या जमिनींचे संपादन करून सिडकोने नवी मुंबईसारखे नियोजनबद्ध शहर उभे केले. या ऐतिहासिक कार्याचे श्रेय निश्चितच सिडकोला जाते आणि म्हणूनच नागरिकांच्या मनात या संस्थेविषयी आजही आदर आहे.

मात्र, भूतकाळ कितीही गौरवशाली असला, तरी संस्थेचे भविष्य वर्तमानातील कार्यपद्धतीवरच अवलंबून असते. गेल्या काही वर्षांत प्रशासकीय दिरंगाई, पारदर्शकतेचा अभाव, तंत्रज्ञानाचा अपुरा वापर, नागरिकांच्या तक्रारी आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारींमुळे सिडकोच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


🔴 भाग १ : सिडकोच्या कारभारातील २० गंभीर समस्या

सजग नागरिक मंचाकडे नागरिकांकडून प्राप्त झालेली माहिती आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे खालील गंभीर बाबी आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.

🔴 १. बायोमेट्रिक उपस्थिती आणि कार्यालयीन शिस्तीचा अभाव

शासनाने निश्चित केलेल्या सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. बायोमेट्रिक उपस्थिती असूनही तिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने वेतन आणि उपस्थिती यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

🔵 २. ओळखपत्रांचा अभाव आणि कार्यालयातील अनियंत्रित गर्दी

सिडको मुख्यालयातील विशेषतः वसाहत विभागात बाजारासारखी गर्दी दिसते. अधिकारी, कर्मचारी आणि खासगी दलाल यांच्यातील फरक नागरिकांना समजावा यासाठी सर्वांनी ओळखपत्र परिधान करणे सक्तीचे करावे. कार्यालयीन शिस्तीनुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ओळखपत्र परिधान करणे अभिप्रेत असताना त्याचे पालन होत नसल्याचे दिसते.

🔴 ३. लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, साध्या कामांसाठी आणि NOC साठीही वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन अर्जांच्या प्रलंबित कालावधीची तपासणी आवश्यक आहे.

🔵 ४. माहिती अधिकार कायद्याचे अपुरे पालन

RTI कायद्याच्या कलम ४ नुसार १७ मुद्द्यांची माहिती स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. तसेच, माहिती संकलित नाही किंवा विस्तृत स्वरूपाची आहे, अशी कारणे देऊन अपूर्ण माहिती दिली जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करावी.

🔴 ५. नागरिकांच्या ई-मेल आणि निवेदनांना प्रतिसाद नाही

नागरिक, सामाजिक संस्था आणि सजग नागरिक मंचाकडून पाठविलेल्या ई-मेल व लेखी निवेदनांवर उत्तर मिळत नसल्याचा अनुभव आहे. गेल्या वर्षभरातील प्राप्त तक्रारी, त्यावरील कार्यवाही आणि प्रतिसाद यांचा विभागनिहाय आढावा घेणे आवश्यक आहे.

🔵 ६. बदली धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नाही

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ च्या अनुषंगाने नियुक्त्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याने हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहित कालावधी पूर्ण झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक संगणकीय पद्धतीने बदल्या करणे आवश्यक आहे.

🔴 ७. अपात्र व्यक्तींकडे महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार

आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडे संवेदनशील पदांचा प्रभारी कार्यभार सोपविल्याच्या तक्रारी आहेत. अशा नियुक्त्यांची पात्रता, नियमबद्धता आणि कालावधी तपासून योग्य निर्णय घ्यावा.

🔵 ८. शासकीय कामकाजासाठी खासगी Gmail चा वापर

अधिकृत कामकाजासाठी @cidco.in किंवा शासनाचे अधिकृत ई-मेल डोमेन वापरणे अपेक्षित असताना खासगी Gmail चा वापर होत असल्याचे दिसते. अगदी व्यवस्थापकीय संचालकांचा ई-मेलदेखील Gmail आधारित आहे. यामुळे प्रशासकीय गोपनीयता, माहितीची सुरक्षितता आणि सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.

🔴 ९. बोगस कर्मचारी प्रकरण

सिडकोतील बोगस कर्मचारी प्रकरण हे प्रशासकीय नियंत्रण आणि कर्मचारी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे उदाहरण आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.

🔵 १०. घरविक्री प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप

सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या घरवाटप प्रक्रियेत आणि वसाहत विभागातील कामकाजात बाहेरील एजंट व मध्यस्थांचा हस्तक्षेप असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी दलालमुक्त आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी.

🔴 ११. भविष्य निर्वाह निधीतील अनियमिततेचे प्रश्न

सिडको कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्यवस्थापनाबाबत आर्थिक अनियमिततेचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित आर्थिक नोंदींचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

🔵 १२. निष्क्रिय दक्षता विभाग

गेल्या वर्षभरात सिडकोच्या ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने लाचखोरीच्या प्रकरणांत पकडल्याची बाब गंभीर आहे. बाह्य यंत्रणेला दिसणारा भ्रष्टाचार सिडकोच्या अंतर्गत दक्षता विभागाच्या निदर्शनास का येत नाही, याची स्वतंत्र समीक्षा आवश्यक आहे.

🔴 १३. जनसंपर्क विभागाची निष्क्रियता

नागरिकांच्या तक्रारी ऐकणे, माहिती देणे आणि प्रशासन व जनता यांच्यात संवाद निर्माण करणे ही जनसंपर्क विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, नागरिकांच्या निवेदनांना प्रतिसाद मिळत नसल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रत्येक वृत्तामध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याची प्रतिक्रिया ठरलेलीच असते – "माहिती घेऊ, अधिकची चौकशी करून कारवाई करू." जनसंपर्क विभागाने केवळ औपचारिक प्रतिक्रिया न देता ठोस माहिती आणि वस्तुनिष्ठ उत्तर देणे आवश्यक आहे.

🔵 १४. संवेदनशील फाईल्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न

वसाहत आणि भूमी विभागातील जमिनीच्या स्वामित्व हक्काशी संबंधित महत्त्वाच्या नस्तींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न आहेत. मूळ कागदपत्रे गहाळ होणे किंवा फाईल्स चोरीला जाण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी कडक नियंत्रण आवश्यक आहे.

🔴 १५. सिडकोच्या मालकीची नसलेल्या जागेवरील खर्च

सिडकोच्या मालकीची नसलेल्या जागेवर पार्किंग सुविधा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक निधी खर्च झाल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित जागेची मालकी, खर्चाची वैधता आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक वसुली करावी.

🔵 १६. नावापुरत्या ऑनलाइन नागरी सेवा

ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही त्याची प्रिंट, कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेऊन नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. अशा अर्धवट डिजिटल व्यवस्थेला ऑनलाइन सेवा म्हणणे संयुक्तिक नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करणे आवश्यक आहे.

🔴 १७. NOC नियमांमधील संदिग्धता

अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये नोंदणी नसलेल्या स्वतंत्र सदनिकांच्या हस्तांतरणासाठी स्पष्ट नियमावली नसल्याचे सांगून नागरिकांची कामे अडवली जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तातडीने प्रशासकीय स्पष्टता आणून लेखी नियमावली प्रसिद्ध करावी.

🔵 १८. अनावश्यक सल्लागारांच्या माध्यमातून तिजोरीवर आर्थिक भार

प्राप्त माहितीनुसार सिडकोमध्ये वर्तमानात १०० च्या आसपास सल्लागार नियुक्त आहेत. प्रश्न हा आहे की, हे सल्लागार सिडकोला नेमके कोणते सल्ले देतात? एवढ्या मोठ्या संख्येने सल्लागारांची आवश्यकता का पडते? त्यांच्या नियुक्तीचे कारण, मानधन, कामाचे स्वरूप आणि प्रत्यक्ष कामगिरी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

🔴 १९. वाहन भत्ता व निधीचा अपव्यय

सिडकोच्या बहुतांश अधिकाऱ्यांना वाहन भत्ता दिला जातो आहे. ज्या अधिकाऱ्यांना स्थलभेटी देणे आवश्यक नाही, त्यांनाही वाहन भत्ता दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे ७० ते ८० टक्के अधिकारी वाहन घेऊन येत नसतानाही त्यांना वाहन भत्ता दिला जात असल्याची माहिती आहे. ट्रेनने येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वाहन भत्ता दिला जात असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. या संपूर्ण व्यवस्थेचे आर्थिक लेखापरीक्षण आवश्यक आहे.

🔵 २०. अतिक्रमण विभागाच्या बोटचेप्या धोरणामुळे टेकड्यांवर अतिक्रमणांची भाऊगर्दी

नवी मुंबईच्या सुदैवाने बेलापूर टेकडी, पारसिक हिल, खारघर हिल अशा निसर्गरम्य टेकड्या लाभलेल्या आहेत. मात्र, सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या बोटचेप्या धोरणामुळे या टेकड्यांवर अनधिकृत बांधकामांची भाऊगर्दी झाली आहे. या टेकड्यांना डेब्रिजचा विळखा बसत आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत.


🔵 भाग २ : सिडकोच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी १८ उपाययोजना

वरील समस्यांवर केवळ चौकशी किंवा आश्वासन पुरेसे नाही. सिडकोच्या संपूर्ण प्रशासकीय कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि उत्तरदायी बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंचाच्या वतीने पुढील उपाययोजना सुचविण्यात येत आहेत.

🔵 १. संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली

सिडकोतील सर्व विभागांचे कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे चालवावे. प्रत्येक फाईलची हालचाल, प्रलंबित कालावधी आणि जबाबदार अधिकारी यांची डिजिटल नोंद उपलब्ध असावी.

🔴 २. सिंगल डिजिटल विंडो

सर्व नागरी सेवांसाठी एकच अद्ययावत ऑनलाइन पोर्टल सुरू करावे. अर्जाचे टेबल-टू-टेबल ट्रॅकिंग आणि प्रत्येक टप्प्याची SMS व ई-मेलद्वारे माहिती नागरिकांना द्यावी.

🔵 ३. डिजिटल आवक-जावक व्यवस्था

मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल इनवर्ड विभाग सुरू करून प्रत्येक निवेदन स्कॅन करावे आणि संबंधित विभागाकडे ऑनलाइन पाठवावे. नागरिकांना तत्काळ मोबाइलवर आवक क्रमांक व पुढील कार्यवाहीचा मागोवा उपलब्ध करून द्यावा.

🔴 ४. संपूर्ण ऑनलाइन कार्यप्रणाली

अर्ज स्वीकारण्यापासून अंतिम प्रमाणपत्र देण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करावी. आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात स्वीकारून हार्ड कॉपी सादर करण्याची अनावश्यक सक्ती बंद करावी.

🔵 ५. फाईल्सचे डिजिटलायझेशन

वसाहत आणि भूमी विभागातील सर्व जुन्या व नवीन महत्त्वाच्या नस्तींचे स्कॅनिंग करून सुरक्षित डिजिटल संग्रह निर्माण करावा. मूळ कागदपत्रांसाठी स्वतंत्र सुरक्षित रेकॉर्ड रूम असावी.

🔴 ६. ओळखपत्र सक्तीचे

सिडकोतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कार्यालयीन वेळेत अधिकृत ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक करावे. नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्याची ओळख व पद सहज समजेल अशी व्यवस्था असावी.

🔵 ७. वेतन आणि बायोमेट्रिक उपस्थितीची सांगड

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन प्रक्रियेत बायोमेट्रिक उपस्थितीची नोंद विचारात घ्यावी. अनधिकृत अनुपस्थिती आणि कार्यालयीन वेळेचे उल्लंघन रोखण्यासाठी नियमित तपासणी करावी.

🔴 ८. नागरिक सनद व माहिती फलक

मुख्य प्रवेशद्वारावर आणि वसाहत विभागात लोकसेवा हक्क कायदा, नागरिक सनद, सेवा कालमर्यादा, कार्यालयीन वेळ व भोजनावकाशाचे स्पष्ट फलक लावावेत.

🔵 ९. बदली कायद्याची अंमलबजावणी

संवेदनशील विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ३/५/७ वर्षांच्या निकषांनुसार आढावा घ्यावा. दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत नियमांनुसार निर्णय घ्यावा.

🔴 १०. अधिकृत ई-मेलचा वापर

सर्व अंतर्गत आणि बाह्य शासकीय पत्रव्यवहारासाठी केवळ अधिकृत @cidco.in किंवा शासनमान्य डोमेनचा वापर अनिवार्य करावा. खासगी Gmail द्वारे अधिकृत कामकाज करण्यास प्रतिबंध करावा.

🔵 ११. सुरक्षित रेकॉर्ड रूम आणि नियंत्रित प्रवेश

महत्त्वाच्या फाईल्स टेबलावर उघड्या ठेवण्याऐवजी सुरक्षित रेकॉर्ड रूममध्ये ठेवाव्यात. वसाहत विभागातील गर्दी आणि दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी नागरिकांच्या प्रवेशाचे नियोजन करावे.

🔴 १२. मूळ फाईल्स नागरिकांच्या हातात देण्यास प्रतिबंध

कोणतीही मूळ शासकीय नस्ती नागरिक किंवा एजंटच्या हातात थेट देऊ नये. फाईल पाहण्याची आवश्यकता असल्यास अधिकृत कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत नियंत्रित पद्धतीने ती उपलब्ध करून द्यावी.

🔵 १३. ऑनलाइन अर्ज व NOC साठी कालमर्यादा

सर्व ऑनलाइन अर्ज आणि NOC प्रकरणांसाठी स्पष्ट सेवा कालमर्यादा निश्चित करावी. प्रलंबित प्रकरणांचा मासिक आढावा घेऊन विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी.

🔴 १४. विकासकामांचा वार्षिक कृती आराखडा

सिडकोच्या सर्व विकासकामांचा आणि प्रकल्पांचा वार्षिक कृती आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. प्रकल्पाची किंमत, कामाची मुदत, कंत्राटदार आणि प्रगती यांची माहिती नागरिकांसाठी खुली ठेवावी.

🔵 १५. कार्यालयीन वेळेत अनावश्यक कार्यक्रमांना प्रतिबंध

कार्यालयीन दिवशी आणि कामकाजाच्या वेळेत स्नेहसंमेलने, उत्सव, जयंती यांसारख्या कार्यक्रमांमुळे नियमित कामकाज विस्कळीत होऊ देऊ नये. दूरवरून येणाऱ्या नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावे.

🔴 १६. अधिकृत डेब्रिज डंपिंग सुविधा

नवी मुंबईतील बेकायदेशीर डेब्रिज डंपिंग रोखण्यासाठी सिडकोने अधिकृत डेब्रिज संकलन व विल्हेवाट सुविधा निर्माण करावी. यामुळे पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत डंपिंग रोखण्यास मदत होईल.

🔵 १७. धोकादायक अनधिकृत पार्किंग बंद करा

सिडको मुख्यालयासमोरील आणि विशेषतः टाटा पॉवरच्या उच्चदाब वाहिनीखालील धोकादायक पार्किंग तातडीने बंद करावे. संबंधित जागेची सुरक्षितता आणि पार्किंगची वैधता तपासून योग्य पर्यायी व्यवस्था करावी.

🔴 १८. RTI माहिती सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध करा

माहिती अधिकारांतर्गत नागरिकांना दिलेली माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करावी. त्यामुळे पारदर्शकता वाढेल, वारंवार समान माहिती मागविण्याची गरज कमी होईल आणि गैरप्रकारांबाबतचे संशय दूर होतील.


🔴 भाग ३ : व्यवस्थापकीय संचालक महोदय, आमचे काही थेट प्रश्न!

❓ १. सिडकोने नवी मुंबईसारखे नियोजनबद्ध शहर उभारले, मग त्याच संस्थेचा प्रशासकीय कारभार आजही पारंपरिक, संथ आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारायला लावणारा का असावा?

❓ २. सिडकोच्या कार्यालयात नागरिकांना ओळखपत्र, प्रवेश आणि कागदपत्रांच्या बाबतीत नियम लागू होतात; मग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीबाबतही तितकीच कठोरता का नसावी?

❓ ३. शासनाने लोकसेवा हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा आणि डिजिटल प्रशासनाची व्यवस्था निर्माण केली असताना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सिडकोला अडचण नेमकी काय आहे?

❓ ४. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सिडकोच्या कारभारात सुधारणा व्हाव्यात म्हणून नागरिकांचे प्रतिनिधी भेटीची वेळ मागत असताना त्यांना वारंवार पाठपुरावा का करावा लागतो?


🔵 भाग ४ : सजग नागरिक मंचाची भूमिका आणि धोरणात्मक पुढाकार

सन्माननीय महोदय,

सजग नागरिक मंच कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी आपली भेट मागत नाही. सिडकोचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त आणि नागरिकाभिमुख व्हावा, या सार्वजनिक हिताच्या उद्देशाने आम्ही आपल्याशी संवाद साधू इच्छितो.

या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंचाच्या वतीने 'सिडको प्रशासकीय सुधारणा धोरण दस्तऐवज – २०२६' (CIDCO Administrative Reforms Policy Paper – 2026) सादर करण्याची आमची तयारी आहे. या दस्तऐवजात समस्यांसोबतच त्यांच्या व्यावहारिक उपाययोजनाही मांडण्यात येणार आहेत.


🔴 भाग ५ : आमच्या स्पष्ट मागण्या

📌 १. सजग नागरिक मंचाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी तातडीने निश्चित भेटीची वेळ द्यावी.

📌 २. यापूर्वी सादर केलेल्या निवेदनांवर आणि स्मरणपत्रांवर आजपर्यंत काय कार्यवाही झाली, याचा लेखी तपशील द्यावा.

📌 ३. सिडकोच्या कारभारातील नमूद केलेल्या समस्यांची विभागनिहाय तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी.

📌 ४. सुचविलेल्या प्रशासकीय सुधारणांसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.


🔵 अंतिम भूमिका : सिडको ही जनतेची संस्था, कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही!

सिडको ही नागरिकांच्या हितासाठी निर्माण झालेली सार्वजनिक संस्था आहे; ती कोणत्याही अधिकाऱ्याची वैयक्तिक मालमत्ता नाही. नागरिकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणे ही कोणाची कृपा नसून लोकाभिमुख प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.

सिडकोचा गौरवशाली इतिहास निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, तो इतिहास जपण्यासाठी वर्तमानातील प्रशासकीय त्रुटी दूर करणे आणि नागरिकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे.

भूतकाळातील कामगिरीवर समाधान मानण्यापेक्षा वर्तमानातील कार्यपद्धतीत सुधारणा करून भविष्यकाळातील सिडको अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनविण्याची जबाबदारी आता आपली आहे.

⚠️ निवेदने दिली, स्मरणपत्रे पाठविली, प्रत्यक्ष पाठपुरावा केला... आता तरी नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद मिळणार का?

आपण या खुल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा.

कळावे.

आपले विनीत,

सजग नागरिक मंच, नवी मुंबई

📧 ई-मेल : alertcitizensforumnm@gmail.com
📱 भ्रमणध्वनी : 9869226272


🔴 पारदर्शक कारभारासाठी सजग नागरिकांचा आवाज!

🔵 NO TRANSPARENCY : NO VOTE

माहिती नाही, तर मतदान नाही!

सामान्य नागरिक केंद्रस्थानी — हक्काचे संरक्षण हेच आमचे ध्येय!